व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राज्य आशेमुळे आनंदी व्हा

राज्य आशेमुळे आनंदी व्हा

राज्य आशेमुळे आनंदी व्हा

मार्च १०, २००१ रोजी न्यूयॉर्कमधील मोठे बेथेल कुटुंबाच्या तीन इमारतींमधील ५,७८४ जण एका आनंदी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. हा सोहळा गिलियड मिशनरी प्रशालेच्या ११० व्या वर्गाच्या पदवीदानाचा होता.

यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य बंधू कॅरी बारबर यांनी सर्वांचे स्वागत करून या कार्यक्रमाची सुरवात करताना म्हटले, की “गिलियडच्या ११० व्या वर्गातील विद्यार्थ्यांना मिशनरी सेवेसाठी प्रशिक्षण मिळाल्याबद्दल आणि पृथ्वीभरातील विविध क्षेत्रांमध्ये नियुक्‍ती मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो.”

आनंदी कसे राहता येईल

बंधू बारबर यांच्या सुरवातीच्या शब्दांनंतर, बंधू डॉन ॲडम्स, “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धी देतो” याविषयावर ४८ विद्यार्थ्यांसहित श्रोत्यांशी बोलले. नीतिसूत्रे १०:२२ या वचनावर आधारित असलेल्या आपल्या भाषणात, यहोवाच्या सेवकांनी त्यांच्या जीवनात राज्य आस्थेला प्रथम स्थान दिल्यास तो त्यांचे पालनपोषन करतो आणि त्यांना आशीर्वाद देतो याची आठवण श्रोत्यांना करून दिली. “मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर” असे आमंत्रण पौलाला मिळाले तेव्हा त्याने ज्याप्रमाणे स्वेच्छा दाखवली तशीच मनोवृत्ती नवीन नियुक्‍ती स्वीकारण्याबाबतीत दाखवावी, असे त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले. (प्रेषितांची कृत्ये १६:९) पुष्कळ अडचणी आल्या तरीसुद्धा सांगितलेल्या क्षेत्रात प्रचार करण्याच्या स्वेच्छेमुळे त्याला अनेक हर्षभरीत आशीर्वाद मिळाले.

वर्गाच्या पदवीधरांनी त्यांचा पाच महिन्यांचा बायबलचा अभ्यासक्रम आणि मिशनरी कार्याच्या तयारीचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. तरीसुद्धा, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य दानीएल सिडलिक यांनी त्यांना कायम शिकत राहण्याचे उत्तेजन दिले. “खरे शिष्य व्हा” या विषयावर बोलताना त्यांनी म्हटले: “शिष्यत्व म्हणजे येशूच्या शब्दांचे सतत पालन करणे. यामध्ये त्याचे शब्द, संदेश आणि शिकवण नेहमीच ऐकण्याची स्वेच्छा दाखवण्याचा समावेश होतो.” त्यांनी स्पष्ट केले, की ख्रिस्ताचा शिष्य आपल्या स्वामीचा आवाज न ऐकता कोणताही निर्णय घेत नाही; देवाच्या बुद्धीचा ख्रिस्ताच्या जीवनाशी संबंध आहे. (कलस्सैकर २:३) आपल्यापैकी कोणीही असा नाही, की जो येशूचे शब्द ऐकल्यावर असे म्हणू शकतो, की मला त्याच्याविषयी सर्व काही माहीत आहे. यामुळे, बंधू सिडलिक यांनी पदवीधरांना कायम शिकत राहण्यास, शिकलेल्या गोष्टींचे अनुकरण करण्यास आणि बंधमुक्‍त करणारे ख्रिस्ती सत्य इतरांना शिकवत राहण्याचे उत्तेजन दिले.—योहान ८:३१, ३२.

देवाच्या सेवेत आनंदी राहण्यासाठी शिस्त आणि वाग्दंड स्वीकारण्यासाठी आपण इच्छुक असले पाहिजे. “तुमचे गुडदे तुमची सुधारणा करतील का?” हा प्रश्‍न गिलियडचे प्रशिक्षक, लॉरेन्स बोवन यांनी मांडला. बायबलमध्ये लाक्षणिक गुडद्यांचा संबंध खोल विचार आणि भावना यांच्यासोबत असल्याचे त्यांनी दाखवले. एखाद्याच्या व्यक्‍तिमत्त्वावर देवाच्या वचनातील प्रेरित सल्ल्याचा खोलवर परिणाम झाल्यास सुधारणा करण्यास मदत होते. (स्तोत्र १६:७; यिर्मया १७:१०, NW) एखादी व्यक्‍ती विश्‍वासूपणे चालत असल्यास यहोवावर याचा खोल प्रभाव पडतो. नीतिसूत्रे २३:१५, १६ वाचल्यावर वक्‍त्‌याने विचारले: “तुमचे गुडदे तुमची सुधारणा करतील का?” त्यांनी पुढे म्हटले: “तुमचे गुडदे तुमची सुधारणा करो अशी प्रार्थना आम्ही करतो आणि यामुळे तुम्ही यहोवाला आनंदित करू शकाल. तुम्ही त्याच्या गहन भावनांना चेतना देऊ शकाल. होय, मिळालेल्या नियुक्‍तीत तुम्ही निष्ठावंतपणे टिकून राहिलात तर देवाचे गुडदे उल्लासित कराल.”

या कार्यक्रमातील शेवटला भाग गिलियड प्रशिक्षक बनण्याआधी केनियात मिशनरी कार्य केलेले मार्क न्यूमार यांनी प्रस्तुत केला. “दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे” या भाषणात त्यांनी संतुष्टपणा विकसित करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. उपदेशक ६:९ च्या अनुषंगाने, बंधू न्यूमार यांनी शिफारस केली: “वस्तुस्थितीचा सामना करा. म्हणजेच ‘दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख माना.’ आपल्याला कराव्याशा वाटतात पण करता येत नाहीत अशा गोष्टींची दिवास्वप्ने पाहण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत समाधान शोधण्याचा प्रयत्न करा. स्वप्नाच्या जगात अवाजवी अपेक्षा करत राहिल्याने किंवा तुमच्या नियुक्‍तीसंबंधित नकारात्मक गोष्टींवर विचार करत राहिल्याने तुम्ही असंतुष्ट आणि असमाधानीच व्हाल.” तुम्ही कोठेही असला किंवा तुमची कोणतीही परिस्थिती असली तरीसुद्धा त्याबाबतीत ईश्‍वरी समाधानीपणा विकसित केल्याने आपल्या महान निर्माणकर्त्याची सेवा आनंदाने करत राहणे शक्य होते.

राज्य सेवा आणि गिलियडमधील आनंदी अनुभव

या भाषणांद्वारे मिळालेल्या व्यावहारिक सल्ल्यानंतर, विद्यार्थ्यांनी त्यांच्या पाच महिन्यांदरम्यान प्रचार कार्यात आलेले अनुभव सांगितले. पदवीदान मिळणाऱ्‍या विद्यार्थ्यांनी, गिलियड प्रशालेचे रजिस्ट्रार, वॉलस लिव्हरन्स यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला देवाचे सेवक म्हणून कसे शाबीत केले ते सांगितले. (२ करिंथकर ४:२) या विद्यार्थ्यांना काही लोकांच्या देवप्रदत्त विवेकास प्रेरित करण्यात यश आले. रस्त्यावर आणि घरोघरच्या कार्यात व इतर ठिकाणी भेटलेल्या प्रांजळ लोकांबरोबर बायबल अभ्यास कसा सुरू केला त्याचे अनुभव देखील या विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांनी भेट दिलेल्या बऱ्‍याच आस्थेवाईक लोकांनी, यहोवाच्या संघटनेच्या बायबल आधारित प्रकाशनांत सत्य असल्याचे म्हटले. बायबलमधील एक वचन दाखवल्यावर एका स्त्रीने खूप चांगली प्रतिक्रिया दाखवली. ती आता यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करत आहे.

यानंतर बंधू जोएल ॲडम्स यांनी काही जुन्या गिलियड पदवीधरांची मुलाखत घेतली. त्यांच्या भाषणाचा विषय होता, “शिकणे आणि यहोवाची सेवा करणे कधीही थांबवू नका.” मुलाखत घेण्यात आलेल्या मिशनऱ्‍यांनी नवीन मिशनऱ्‍यांना अगदी समयोचित सल्ला दिला. गिलियडच्या २६ व्या वर्गात असतानाच्या आठवणी काढत हॅरी जॉनसन यांनी म्हटले: “आम्हाला शिकवण्यात आले, की यहोवाने नेहमीच त्याच्या लोकांचे नेतृत्व केले आणि आताही तो करील. याच भरवशाने आम्हाला इतक्या वर्षांपर्यंत उत्तेजन मिळाले आहे.” गिलियडच्या ५३ व्या वर्गातील सदस्य, विल्यम नॉन्कस यांनी पदवीधरांना सल्ला दिला: “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बायबल सिद्धान्त नेहमी लक्षात ठेवा आणि आता व पुढे तुम्हाला तुमच्या जीवनात घ्याव्या लागणाऱ्‍या सर्व निर्णयांच्या वेळी या सिद्धान्तांचा अवलंब करा. यांमुळे तुम्ही तुमच्या नियुक्‍तीत टिकून राहाल आणि यहोवाचा समृद्ध आशीर्वाद तुमच्यावर असेल.”

कार्यक्रमात पुढे रिचर्ड रायन यांनी “यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मजबूत,” असा आपल्या भाषणाचा विषय निवडला होता. मुलाखत घेतलेल्यांपैकी ३० व्या वर्गातील पदवीधर, जॉन कुरट्‌झ हे होते; त्यांनी स्पेनमध्ये ४१ वर्षे मिशनरी सेवा केली होती. गिलियडच्या अभ्यासक्रमाबद्दल विचारल्यावर बंधू कुरट्‌झ यांनी म्हटले: “आपले प्रमुख पाठ्यपुस्तक बायबल आहे आणि बायबल समजण्यासाठी बायबल आधारित प्रकाशने आहेत. ही प्रकाशने सर्वांना उपलब्ध आहेत. गिलियडमध्ये कोणतीही गुप्त माहिती दिली जात नाही. गिलियडमध्ये मिळणारी माहिती सर्वच साक्षीदारांजवळ उपलब्ध असते हे ठामपणे मी नेहमीच सांगत असतो.”

यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य बंधू गिरीट लॉश यांनी “यहोवाच्या पंखांवर आणि पंखांखाली” याविषयाने या आध्यात्मिक कार्यक्रमाची सांगता केली. बायबलमध्ये, गरुडाच्या पंखांची उपमा देऊन, देव आपल्या विश्‍वासू सेवकांचे संरक्षण कसे करतो, त्यांना पाठबळ कसे देतो याचे चित्रण करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (अनुवाद ३२:११, १२; स्तोत्र ९१:४) काही वेळा प्रौढ गरुड आपल्या पिलांचे रक्षण करण्यासाठी कित्येक तास त्यांच्यावर आपले पंख पसरून ठेवतो. कधीकधी तर थंडीपासून पिलांचा बचाव करण्यासाठी मादी गरुड स्वतःच्या पंखानी त्यांना झाकते. अशाचप्रकारे यहोवा देखील आपल्या उद्देशांच्या सामंजस्यात, आपल्या विश्‍वासू सेवकांच्या मदतीला धावून येतो, विशेषकरून जेव्हा त्याचे सेवक आध्यात्मिक परीक्षांना तोंड देत असतात. यहोवा त्याच्या सेवकांची त्यांच्या सहनशक्‍तीपलीकडे परीक्षा होऊ देत नाही पण तिच्यातून निभावण्याचा उपाय तो सुचवतो. (१ करिंथकर १०:१३) बंधू लॉश यांनी असे म्हणून समारोप केला: “आध्यात्मिकरित्या सुरक्षित राहण्यासाठी आपण यहोवाच्या पंखांखाली राहिले पाहिजे. याचा अर्थ आपण स्वैराचारी आत्मा विकसित करू नये. आपण यहोवा आणि मातेसमान त्याच्या संघटनेच्या जवळ नेहमीच राहूया; त्यांच्या मार्गदर्शनापासून आणि प्रेमळ सल्ल्यापासून स्वतःला कधीही अलग करू नये.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी संपूर्ण जगभरातील हितचिंतकांकडून आलेले टेलीग्राम आणि शुभेच्छा वाचून दाखवल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना डिप्लोमा देण्यात आला. गिलियड प्रशालेची स्थापना करण्यात आली तेव्हा पाच वर्षांच्या कालावधीत केवळ मर्यादित वर्ग भरवले जातील असा विचार होता. परंतु यहोवा देवाने ही प्रशाला आजतागायत ५८ वर्षे चालू ठेवली आहे. बंधू बारबर यांनी सुरवातीला म्हटल्याप्रमाणे, “सन १९४३ मध्ये गिलियडची स्थापना झाल्यापासून गिलियड पदवीधारकांचा खरोखर किती उत्तम रेकॉर्ड बनला आहे! त्यांच्या सामुहिक प्रत्यनांमुळे यहोवाच्या गौरवशाली संघटनेत लाखो नम्र जण आले आहेत.” होय, या मिशनरी प्रशालेमुळे लाखो लोकांना राज्य आशेत आनंदी राहण्यास मदत मिळू शकली आहे.

[२४ पानांवरील चौकट]

वर्गाची आकडेवारी

विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: ८

नेमलेले देश: १८

एकूण विद्यार्थी: ४८

सरासरी वय: ३४

सत्यात सरासरी वर्षे: १८

पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १३

[२५ पानांवरील चित्र]

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा ११० वा पदवीधर वर्ग

खालील यादीत, ओळींना पुढून मागे अशा रितीने क्रमांक देण्यात आला आहे आणि नावे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने देण्यात आली आहेत.

(१) वासेक, इ.; मॅडलिन, एल.; इव्हान्स, जी.; वॉटानाबे, के. (२) ट्रॅफोर्ड, पी.; टर्फा, जे.; विल्सन, पी.; विल्यम्स, आर.; वेबर, ए. (३) जॉनसन, टी.; हानाऊ, के.; मोर्लु, एफ.; शार्पेन्त्ये, एफ.; पेकहॅम, आर.; ॲन्ड्रोसॉफ, पी. (४) सीगर्स, टी.; सीगर्स, डी.; बेली, पी.; बेली, एम.; मॅडलिन, के.; लिपोल्ड, इ.; लिपोल्ड, टी. (५) इव्हान्स, एन.; गोल्ड, आर.; बोल्मन, आय.; वासेक, आर.; उन्जीएन, जे.; विल्सन, एन. (६) टर्फा, जे.; झुडिमा एल.; झुडिमा, आर.; बेंग्ट्‌सन सी.; बेंग्ट्‌सन, जे.; गलानो, एम.; गलानो, एल. (७) पेकहॅम, टी.; मोर्लु, जे.; शार्पेन्त्ये, सी.; गोल्ड, एम.; बोल्मन, आर.; उन्जीएन, एफ. (८) वेबर, आर.; जॉनसन, बी.; हानाऊ, डी.; वॉटानाबे, वाय.; विल्यम्स, आर.; ट्रॅफोर्ड, जी.; ॲन्ड्रोसॉफ, टी.