व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोणाच्या दर्जांवर तुम्ही भरवसा ठेवू शकता?

कोणाच्या दर्जांवर तुम्ही भरवसा ठेवू शकता?

कोणाच्या दर्जांवर तुम्ही भरवसा ठेवू शकता?

आफ्रिकेत पहिल्यांदाच गेलेल्या एका गृहस्थाने एक कुतूहलजनक गोष्ट पाहिली. रस्त्याच्या कडेला एक मनुष्य अगदी ताठ उभा होता. दर काही मिनिटांनी तो तसाच ताठ उभा राहून हळूहळू बाजूला सरकायचा. नंतर या गृहस्थाला कळले, की तो मनुष्य अशी हालचाल का करत होता. खरे तर, एका टेलिफोनच्या खांबाच्या सावलीत तो मनुष्य उभे राहण्याचा प्रयत्न करत होता. सूर्याची दिशा बदलत चालल्यामुळे सावलीची दिशा देखील बदलत होती.

सूर्याच्या बदलत्या दिशेमुळे बदलणाऱ्‍या सावलीप्रमाणेच मानवांचे व्यवहार व मानके अर्थात दर्जेही सतत बदलत राहतात. परंतु, ‘ज्योतिमंडळाचा पिता’ यहोवा देव मात्र कधीच बदलत नाही. शिष्य याकोबाने त्याच्याविषयी असे लिहिले की, त्याला “पालट नाही व फिरण्याची छायाही नाही.” (याकोब १:१७, पं.र.भा.) इब्री संदेष्टा मलाखी यानेही देवाच्या तोंडचे हे शब्द लिहिले: “मी परमेश्‍वर बदलणारा नव्हे.” (मलाखी ३:६) यशयाच्या दिवसांतील इस्राएल राष्ट्राला देवाने असे म्हटले: “तुमच्या वृद्धापकाळापर्यंतहि मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन.” (यशया ४६:४) म्हणूनच, सर्वसमर्थ देवाने दिलेल्या अभिवचनांवरील आपला विश्‍वास काळ बदलल्यामुळे कमी होण्याची गरज नाही.

नियमशास्त्रातून धडा

यहोवाच्या अभिवचनांप्रमाणेच, बरोबर व चूक यांबद्दलचे त्याचे दर्जे विश्‍वसनीय व अटळ आहेत. दोन प्रकारच्या वजनमापांचा (आणि दोन्हीपैकी केवळ एकच अचूक असल्यास) उपयोग करणाऱ्‍या एखाद्या व्यापाऱ्‍यावर तुम्ही कधी भरवसा ठेवाल का? निश्‍चितच नाही. त्याचप्रकारे, “खोट्या तागडीचा परमेश्‍वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे.” (नीतिसूत्रे ११:१; २०:१०) इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्रात यहोवाने अशी एक आज्ञा दिली होती: “न्याय करण्यात, मोजणी करण्यात, तोलण्यात अथवा मापण्यात काही अन्याय करू नका. तुमच्यापाशी खरी तागडी, खरी वजने, खरा एफा व खरा हिन असावा; ज्याने तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणिले तो मी परमेश्‍वर तुमचा देव आहे.”—लेवीय १९:३५, ३६.

इस्राएल लोकांनी यहोवाच्या या आज्ञेचे पालन केल्यामुळे यहोवा त्यांच्यावर संतुष्ट होता आणि त्याने त्यांना अनेक भौतिक आशीर्वादही दिले होते. तसेच, मोजमाप व वजनकाटे फक्‍त यांच्याबाबतीतच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक पैलूत देवाच्या कधी न बदलणाऱ्‍या दर्जांनुसार जीवन जगल्याने त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍या उपासकांना अनेक आशीर्वाद मिळतात. देव म्हणतो: “जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.”—यशया ४८:१७.

आज जगाचे दर्जे खालावत का चालले आहेत?

आज जगाचे दर्जे खालावत का चालले आहेत त्याचे कारण बायबलमध्ये दिले आहे. बायबलमध्ये प्रकटीकरण नावाच्या शेवटल्या पुस्तकात स्वर्गातील एका लढाईचे वर्णन दिले आहे. या लढाईचा परिणाम पृथ्वीवरील सर्व मानवजातीवर होतो. प्रेषित योहानाने त्याविषयी असे लिहिले: “स्वर्गात युद्ध सुरू झाले; मीखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले; तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणहि उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.”—प्रकटीकरण १२:७-९.

या युद्धाचा तात्कालिक परिणाम काय होता? योहान पुढे म्हणतो: “म्हणून, स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्‍यांनो, उल्लास करा; पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.”—प्रकटीकरण १२:१२.

पहिले महायुद्ध १९१४ मध्ये सुरू झाले तेव्हा ‘पृथ्वीवर अनर्थ’ ओढवला. तेव्हा, आज जगात असलेल्या दर्जांपासून अतिशय वेगळ्या असलेल्या दर्जांचा तेथेच अंत झाला. इतिहासकार बारबरा टकमन असे म्हणाल्या: “१९१४-१८ चे महायुद्ध एका दरीप्रमाणे आहे ज्याने त्या काळाला आपल्या काळापासून विभक्‍त केले आहे. त्यानंतरच्या वर्षांत उपयुक्‍त व उत्पादनशील ठरू शकणाऱ्‍या असंख्य लोकांचे प्राण घेऊन, विश्‍वासांचा नाश करून, कल्पनांमध्ये बदल करून व भ्रमनिरासामुळे कधीही भरून न निघणाऱ्‍या जखमा करून [या महायुद्धाने] दोन युगांमध्ये एक खरोखरची व मानसिक दरी निर्माण केली आहे.” त्यांच्याबरोबर काम करणारे आणखी एक इतिहासकार एरिक हॉब्सबॉम त्यांनीही असेच म्हणून आपली सहमती दर्शवली: “पूर्वी विकसनशील राष्ट्रांमध्ये ज्या दर्जांना सर्वसामान्य समजले जायचे ते दर्जे १९१४ पासून खालावत चालले आहेत. आणि हा बदल स्पष्ट दिसणारा आहे. . . . आताच्या लोकांचे दर्जे एकोणीसाव्या शतकातील आपल्या पूर्वजांनी ज्याला जंगली लोकांचे दर्जे म्हटले असते त्याप्रमाणेच झाले आहेत; हे किती मोठ्या प्रमाणात झाले आहे याचे पूर्णपणे आकलन होणे शक्य नाही.”

ह्‍यूमॅनिटी—ए मॉरल हिस्ट्री ऑफ द ट्‌वेंटीयथ सेंचुरी या पुस्तकाचे लेखक जॉनथन ग्लोवर म्हणतात: “आपल्या युगाचे एक वैशिष्ट्य म्हणजे नैतिक नियमांचा ऱ्‍हास होय.” पाश्‍चिमात्य जगात धर्माचे महत्त्व कमी होत असल्यामुळे, बाहेरच्या उगमाकडून आलेले नैतिक नियम प्रभावी ठरतील की नाही याबद्दल ते साशंक असले तरी ते अशी ताकीद देतात: “धार्मिक नैतिक नियमांवर ज्यांचा विश्‍वास नाही अशांनीही, [नैतिक नियमांचा होत चाललेला] ऱ्‍हास याबद्दल काळजी व्यक्‍त केली पाहिजे.”

आजच्या दिवसांत सर्रासपणे होत असलेला विश्‍वासघात (मग तो व्यापारी क्षेत्रात, राजनीतीत, धर्मात किंवा व्यक्‍तिगत व कौटुंबिक नातेसंबंधात असो) आणि त्याच्यामुळे भोगावे लागणारे परिणाम हे सर्व, पृथ्वीवरील रहिवाशांवर पीडा आणण्याच्या सैतानाच्या दुष्ट कटाचा भाग आहेत. सैतानाने जणू शेवटपर्यंत युद्ध चालू ठेवण्याचा आणि देवाच्या दर्जांनुसार जगण्याचा प्रयत्न करत असलेल्यांना स्वतःबरोबर नाश करवण्याचा चंगच बांधला आहे.—प्रकटीकरण १२:१७.

परंतु, इतक्या सर्रासपणे होणाऱ्‍या बेईमानीवर किंवा विश्‍वासघातावर काही उपाय नाही का? प्रेषित पेत्र या प्रश्‍नाचे उत्तर देतो: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची [देवाच्या] वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) या अभिवचनावर आपण भरवसा ठेवू शकतो कारण आपले उद्देश पूर्ण करण्याची देवाजवळ शक्‍ती तर आहेच शिवाय ते पूर्ण करण्याची तो आपल्याला गॅरंटी देखील देतो. ‘आपल्या मुखातून निघणाऱ्‍या वचनाबद्दल’ यहोवा असे म्हणतो: “ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.” खरेच, किती भरवसालायक आहे हे अभिवचन!—यशया ५५:११; प्रकटीकरण २१:४, ५.

देवाच्या दर्जांनुरूप जगणे

सतत बदलत राहणाऱ्‍या व खालावत चाललेल्या दर्जांच्या जगात यहोवाचे साक्षीदार वर्तनाविषयी बायबलमध्ये दिलेल्या दर्जांनुरूप जगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते बहुसंख्य लोकांपासून वेगळे असे उठून दिसतात. यामुळे सहसा लोकांचे लक्ष आकर्षित होते; परंतु काहीजण त्यांची थट्टामस्करी देखील करतात.

लंडनमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनात, एका टीव्ही पत्रकाराने एका प्रतिनिधीला विचारले, की यहोवाचे साक्षीदार खरोखरच ख्रिश्‍चन आहेत का? या प्रतिनिधीने असे उत्तर दिले: “यात काहीच वाद नाही. ते खरंच ख्रिश्‍चन आहेत. कारण येशू हा आमचा आदर्श आहे. जगात स्वार्थीपणा खूपच वाढलाय. पण आम्ही येशू ख्रिस्ताला मार्ग, सत्य व जीवन असे स्वीकारून त्यानुसार जगतो. तो त्रैक्याचा भाग नसून देवाचा पुत्र आहे असा आम्ही विश्‍वास करतो. म्हणूनच, बायबलबद्दल आम्हाला असलेली समज मान्य धर्मांपासून अतिशय वेगळी आहे.”

ही मुलाखत जेव्हा बीबीसी वर प्रसारीत करण्यात आली तेव्हा त्या पत्रकाराने असे म्हणून कार्यक्रमाची सांगता केली: “आता मला पहिल्यापेक्षा जास्त कळते, की यहोवाचे साक्षीदार आपल्या घरी का येतात. सभ्य पेहराव आणि चांगले आचरण असलेले २५,००० लोक एकाच ठिकाणी पूर्वी कधी पाहिल्याचं मला आठवत नाही.” एका बाहेरच्या व्यक्‍तीकडून, देवाच्या न बदलणाऱ्‍या दर्जांनुरूप जगण्याच्या सुज्ञपणाची किती ही उत्तम ग्वाही!

इतरांनी ठरवलेल्या दर्जांनुरूप जगण्यास काही लोकांना आवडत नसले तरीसुद्धा, देवाचे दर्जे कोणते आहेत हे तुम्ही तुमच्या बायबलचे परीक्षण करून पाहावे, असे आम्ही तुम्हाला उत्तेजन देतो. परंतु नुसते वरवर पाहू नका. प्रेषित पौलाच्या सल्ल्याचे अनुकरण करा: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरुप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोमकर १२:२) तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाला भेट द्या आणि त्यांच्याबरोबर ओळख करून घ्या. हे लोक सर्वांसारखेच साधारण लोक आहेत, बायबलमधील अभिवचनांवर त्यांचा भरवसा आहे व देवाने ठरवून दिलेल्या दर्जांनुरूप आपले जीवन व्यतीत करण्याद्वारे ते देवावरील त्यांचा भरवसा प्रदर्शित करतात, हे तुम्हाला दिसून येईल.

तुमच्या व्यक्‍तिगत जीवनात तुम्ही देवाच्या न बदलणाऱ्‍या व भरवसालायक दर्जांनुरूप जीवन जगलात तर तुम्हाला निश्‍चितच अनेक आशीर्वाद मिळतील. देव आपल्याला काय करण्यास सांगतो ते पाहा: “तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटासारखी झाली असती.”—यशया ४८:१८.

[५ पानांवरील चित्रे]

आज, व्यापार, राजनीती, धर्म, आणि कौटुंबिक वर्तुळात बेभरवशाचे वातावरण आहे