व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

युद्धाच्या जखमा भरून काढणे

युद्धाच्या जखमा भरून काढणे

युद्धाच्या जखमा भरून काढणे

एब्रहॅम २० वर्षांपर्यंत एक गनिमी सैनिक होता. * पण आता त्याने युद्धात लढण्याचे सोडून दिले आहे. उलट, पूर्वी जे लोक त्याचे शत्रू होते त्यांतील काही जण आता त्याचे अगदी जवळचे मित्र झाले आहेत. पण कोणत्या कारणामुळे त्याच्यात इतका बदल झाला? बायबलमुळे! बायबलचा अभ्यास केल्यानंतर एब्रहॅमला आशा मिळाली, ज्ञान मिळाले. जगाच्या परिस्थितीकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहण्यास तो शिकला. बायबलचा अभ्यास केल्यानंतर, लढाई करण्याची त्याला इच्छाच उरली नाही आणि दुःख, शोक, द्वेष आणि कटुता यांमुळे त्याच्या मनावर झालेल्या जखमा हळूहळू भरू लागल्या. बायबलमध्ये हृदयासाठी प्रभावकारी औषध आहे हे त्याला समजले.

मनावर झालेल्या या जखमा भरून काढण्यास बायबल एखाद्याला मदत कशी करते? बायबलचा अभ्यास केल्यानंतर एब्रहॅमच्या जखमा गायब झाल्या नाहीत किंवा त्याने जे काही सहन केले होते ते त्याच्या मनावरून अगदी पुसलेही गेले नाही. तर, निर्माणकर्त्याप्रमाणे विचार करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यामुळे आता त्याला भवितव्यासाठी एक आशा आहे. पूर्वी तो ज्या गोष्टींना महत्त्व द्यायचा त्यांऐवजी आता देवाला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या गोष्टी त्यालाही महत्त्वाच्या वाटतात. अशाप्रकारे त्याच्या मनावर झालेल्या जखमा भरून निघू लागल्या व त्याची मनोवृत्ती बदलू लागली.

मुलकी युद्धात भरती

एब्रहॅमचा जन्म १९३० च्या दशकात आफ्रिकेत झाला. दुसऱ्‍या महायुद्धानंतर, त्याच्या देशावर शेजारचा एक बलाढ्य देश राज्य करू लागला. पण एब्रहॅमच्या देशातील बऱ्‍याच लोकांना स्वातंत्र्य हवे होते. १९६१ मध्ये एब्रहॅमने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. या चळवळीचा उद्देश होता शेजारच्या शक्‍तिशाली देशाविरुद्ध गनिमी काव्याने युद्ध करणे.

एब्रहॅम म्हणतो, “ते आमचे शत्रू होते. त्यांनी आम्हाला ठार मारायचा कट रचला म्हणून आम्हीही त्यांना ठार मारायचे ठरवले.”

एब्रहॅमच्या जीवाला नेहमी धोका असायचा. म्हणून १९८२ साली २० वर्षे सशस्त्र लढा दिल्यानंतर तो युरोपला पळून गेला. युरोपला आला तेव्हा तो पन्‍नाशी गाठणार होता. शिवाय त्याच्याजवळ भरपूर वेळ असल्यामुळे जीवनाबद्दल तो विचार करू लागला. त्याच्या स्वप्नांचे काय झाले होते? पुढे तो काय करणार होता? एब्रहॅमची यहोवाच्या साक्षीदारांबरोबर ओळख झाली व तो त्यांच्या सभांना जाऊ लागला. त्याला आठवले की आफ्रिकेत असताना एका साक्षीदाराने दिलेले एक ट्रॅक्ट त्याने वाचले होते. त्या ट्रॅक्टमध्ये पृथ्वीवर येणाऱ्‍या परादीसबद्दल आणि मानवजातीवर राज्य करणाऱ्‍या एका स्वर्गीय राज्याबद्दल सांगितले होते. पण हे खरे असू शकते का?

एब्रहॅम म्हणतो: “मी बायबलचा अभ्यास सुरू केला, तेव्हा मला समजले की मी लढाई-झगड्यात कितीतरी वेळ वाया घालवला होता. कारण, सर्व लोकांना बरोबरीने वागवणारे एकमात्र सरकार म्हणजे देवाचे राज्य आहे.”

एब्रहॅमने बाप्तिस्मा घेतला. यहोवाचा साक्षीदार झाल्याच्या काही काळानंतर, तो या युरोपियन राष्ट्रात ज्या ठिकाणी राहात होता तेथे रॉबर्ट नावाचा एक मनुष्य येऊन राहू लागला. रॉबर्टही आफ्रिकाहून पळून आला होता. रॉबर्ट आणि एब्रहॅम एकाच लढाईत पण एकमेकांविरुद्ध लढत होते. रॉबर्ट नेहमी जीवनाच्या उद्देशाविषयी विचार करायचा. तो धार्मिक प्रवृत्तीचा मनुष्य होता. आणि त्याने बायबलमधील काही भाग वाचले होते म्हणून त्याला देवाचे नाव यहोवा असल्याचे ठाऊक होते. एब्रहॅमच्या मंडळीतील साक्षीदारांनी रॉबर्टला बायबल आणखी चांगल्याप्रकारे समजण्यास मदत करण्याची इच्छा दाखवली तेव्हा रॉबर्ट लगेच तयार झाला.

रॉबर्ट म्हणतो: “यहोवाचे साक्षीदार ज्या दिवसापासून माझ्याकडे येऊ लागले अगदी तेव्हापासूनच मला त्यांची एक गोष्ट आवडू लागली. ते नेहमी यहोवाचं आणि येशूचं नाव घ्यायचे तेव्हा, यहोवा आणि येशू हे दोघेही एक नसून दोन वेगवेगळ्या व्यक्‍ती आहेत हे ते कबूल करत असल्याचे मी पाहिले. ही गोष्ट मला फार आवडली आणि पटली देखील कारण बायबलमध्येच तसे दिले आहे हे मला माहीत होते. शिवाय, साक्षीदारांचा सभ्य पेहराव, इतरांबरोबर मग ते कोणत्याही देशाचे का असेनात, त्यांचे प्रेमाने वागणे या सर्व गोष्टींची माझ्या मनावर खोलवर छाप पडली.”

आधी शत्रू आता मित्र

रॉबर्ट आणि एब्रहॅम आधी शत्रू होते पण आता त्यांच्यात घनिष्ट मैत्री आहे. ते दोघेही यहोवाच्या साक्षीदारांच्या एकाच मंडळीत पूर्ण वेळेचे सुवार्तिक म्हणून सेवा करतात. एब्रहॅम म्हणतो: “मी युद्धात होतो तेव्हा नेहमी विचार करायचो, की दोन देशांचे लोक एकाच धर्माचे असून एकमेकांचा द्वेष का करतात? रॉबर्ट आणि मी एकाच चर्चचे सदस्य होतो तरीपण आम्ही दोघं एकमेकांविरुद्ध लढायचो. आता आम्ही दोघंही यहोवाचे साक्षीदार आहोत आणि आमच्या विश्‍वासामुळेच आम्ही आता मित्र झालो आहोत.”

रॉबर्ट म्हणतो: “हाच खरा फरक आहे. आता आमचा दोघांचा एकच विश्‍वास असल्यामुळे आम्ही एका खऱ्‍या बंधुसमाजाचे भाग बनलो आहोत. आम्ही पुन्हा कधीही युद्धात भाग घेणार नाही.” एके काळी कट्टर शत्रू असलेल्या या दोघांच्या हृदयावर बायबलने शक्‍तिशाली प्रभाव पाडला आहे. द्वेष आणि कटुतेची जागा भरवसा आणि मैत्रीने घेतली आहे.

एब्रहॅम आणि रॉबर्ट ज्या वेळी युद्धात होते त्याच वेळी दुसऱ्‍या एका युद्धात आणखी दोघे तरुणही एकमेकांच्या विरुद्ध लढत होते. रॉबर्ट आणि एब्रहॅमसारखीच त्यांची पण कहाणी आहे. यांच्याही हृदयावर झालेल्या जखमांवर बायबलमधील औषधोपचाराचा लवकरच प्रभाव पडला. कसा ते पाहू या.

मारा किंवा मरा

धर्मपरायण कुटुंबात लहानाचा मोठा झालेल्या गेब्रियलला असे शिकवण्यात आले होते की त्याचा मायदेश एका पवित्र युद्धात लढत होता. त्यामुळे वयाच्या १९ व्या वर्षीच तो स्वखुशीने मिलिटरीत भरती झाला आणि त्याला युद्धात पाठवावे अशी त्याने विनंती केली. तेरा महिन्यांपर्यंत तो घनघोर युद्ध चाललेल्या ठिकाणी होता; कधीकधी तर शत्रूंपासून फक्‍त दीड किलोमीटरच्या अंतरावर असायचा. तो म्हणतो: “मला एक खास घटना आठवते. आमच्या कमांडरनं आम्हाला सांगितलं, की त्या रात्री शत्रू आपल्यावर हल्ला करणार आहेत. म्हणून मग आम्ही सर्वजण जागरण करून रात्रभर तोफांचा वर्षाव करीत होतो.” शेजारच्या देशातील लोक आपले शत्रू आहेत, त्यांना ठार मारलंच पाहिजे असे गेब्रियलला वाटायचे. तो म्हणतो: “मला वाटायचं, होता होईल तितक्या लोकांना ठार मारायचं आणि मग हुतात्म्यासारखं स्वतः देखील मरायचं. माझ्या मित्रांनाही असंच वाटायचं.”

पण काही काळानंतर हाच गेब्रियल निराश झाला. तो तेथून डोंगरांवर पळून गेला; त्याने रांगत सरहद्द पार केली आणि तटस्थ राष्ट्रात गेला व तेथून मग युरोपला पळून गेला. जीवनात इतक्या समस्या का आहेत, या समस्या देवाकडून शिक्षा तर नाहीत, असे तो नेहमी प्रार्थनेत देवाला विचारायचा. मग त्याची भेट यहोवाच्या साक्षीदारांबरोबर झाली. जीवनात इतक्या समस्या का आहेत याचे कारण त्यांनी त्याला बायबलमधून दाखवले.—मत्तय २४:३-१४; २ तीमथ्य ३:१-५.

बायबलचा जसजसा तो अभ्यास करत गेला तसतसे त्याला कळू लागले की बायबलमध्ये सत्य आहे. “या अभ्यासाद्वारे मी शिकलो, की आपण परादीस पृथ्वीवर अनंतकाळ जगू शकतो. लहानपणापासून माझं हे स्वप्न होतं.” बायबलचा अभ्यास केल्याने गेब्रियलला दिलासा मिळाला. जणू कोणीतरी त्याच्या जखमी हृदयावर मलमपट्टी केली होती. त्याच्या हृदयावर खोलवर झालेल्या जखमा बायबलमधील या मलमामुळे हळूहळू भरून निघू लागल्या. गेब्रिएलची भेट डॅनियलबरोबर झाली. डॅनियल पूर्वी गेब्रियलचा शत्रू होता. पण आता गेब्रियलच्या मनात त्याच्याविषयी कसलाही द्वेष राहिला नाही. पण डॅनियल युरोपमध्ये कसा काय येऊन पोहंचला?

“तू खरोखरच अस्तित्वात असशील तर मला मदत कर!”

डॅनियल एक कॅथलिक होता. वयाच्या १८ व्या वर्षी त्याला मिलिटरी सेवेसाठी बोलवण्यात आले. गेब्रियल ज्या युद्धात लढत होता त्याच युद्धात पण विरोधी पक्षात लढण्यासाठी डॅनियलला पाठवण्यात आले. सरहद्दीपासून खूप जवळ, डॅनियल एका रणगाड्यातून जात होता आणि अचानक त्याच्या रणगाड्यावर एक बॉम्ब फेकण्यात आला. रणगाड्यात असलेले त्याचे मित्र ठार झाले. तो जिवानिशी वाचला; पण गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला कैदी म्हणून नेण्यात आले. तो कित्येक महिने दवाखान्यात उपचार घेत होता आणि त्याच्यानंतर तटस्थ राष्ट्रात त्याला पाठवेपर्यंत त्याला एका छावणीत राहावे लागले. एकाकीपणा आणि निराशा यांमुळे त्याने आत्महत्या करण्याचे ठरवले. डॅनियलने देवाला प्रार्थना केली: “तू खरोखरच अस्तित्वात असशील तर मला मदत कर!” आणि अगदी दुसऱ्‍याच दिवशी यहोवाचे साक्षीदार त्याच्याकडे आले. त्याच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे त्यांनी दिली. त्यानंतर तो निर्वासित म्हणून युरोपला राहायला गेला. येथे पुन्हा एकदा त्याची भेट यहोवाच्या साक्षीदारांबरोबर झाली. त्याने बायबलचा अभ्यास सुरू केला. या अभ्यासामुळे त्याची चिंता, द्वेषाची भावना नाहीशी झाली.

आता गेब्रिएल आणि डॅनियल चांगले मित्र आहेत. दोघेही यहोवाचे बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार आहेत व एका संयुक्‍त बंधुसमाजाचा भाग आहेत. गेब्रियल म्हणतो: “यहोवाबद्दलचे प्रेम आणि बायबलचे ज्ञान या दोन गोष्टींनी मला यहोवाप्रमाणे मनोवृत्ती बाळगण्यास मदत केली. डॅनिएल आता माझा शत्रू नाही. यहोवाचा साक्षीदार नसतो तर कदाचित त्याला ठार मारायला मला आनंद वाटला असता. पण बायबलने मला याच्या अगदी उलट शिकवण दिली—डॅनियलसाठी माझा जीव देण्यासाठी मी तयार असले पाहिजे, हे बायबलने मला शिकवले.”

“मी वेगवेगळ्या धर्माच्या आणि राष्ट्रांच्या लोकांना एकमेकांना मारताना पाहिले आहे. आणि युद्धात विरोधी पक्षातील एकाच धर्माच्या लोकांनीही एकमेकांची कत्तल केली. हे पाहिल्यावर मला वाटलं की देवच या सर्वासाठी जबाबदार आहे. पण बायबलचा अभ्यास केल्यावर मला समजलं, की देव नव्हे तर सैतान युद्धासाठी जबाबदार आहे. गेब्रियलचा आणि माझा आता एकच विश्‍वास आहे. आम्ही पुन्हा कधी युद्धात भाग घेणार नाही,” असे डॅनियलने म्हटले.

“देवाचे वचन सजीव, सक्रिय”

एब्रहॅम, रॉबर्ट, गेब्रियल आणि डॅनियल यांच्या जीवनात एवढा बदल कशामुळे झाला? त्यांच्या मनात खोलवर रुजलेला द्वेष आणि दुःख ते कसे काढू शकले?

या प्रत्येकाने “सजीव, सक्रिय” असलेले बायबल वाचले, त्यावर मनन केले आणि त्यातील सत्य शिकून घेतले. (इब्री लोकांस ४:१२) मानवजातीचा निर्माणकर्ता हाच बायबलचा लेखक असल्यामुळे, ऐकू व शिकू इच्छिणाऱ्‍या लोकांच्या हृदयावर त्यांच्याच भल्यासाठी प्रभाव कसा पाडायचा हे त्याला माहीत आहे. “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍यांकरिता उपयोगी आहे.” बायबलचे वाचन करणाऱ्‍या लोकांनी बायबलमधील मार्गदर्शन स्वीकारले तर ते त्यातील नीतिनियमांनुसार व दर्जांनुसार वागण्यास सुरवात करतात. ते यहोवाप्रमाणे विचार करू लागतात. यामुळे त्यांचा खूप फायदा होतो. त्या फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे, युद्धामुळे ज्यांच्या मनावर जखमा झालेल्या आहेत त्याही भरून निघतात.—२ तीमथ्य ३:१६.

देवाच्या वचनात कोठेही असे म्हटलेले नाही की अमुक राष्ट्रीय, वंशीय किंवा जातीय गट दुसऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ आहे किंवा वाईट आहे. उलट ते म्हणते, ‘देव पक्षपाती नाही, तर प्रत्येक राष्ट्रांत जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.’ बायबलचा अभ्यास करणारी व्यक्‍ती जेव्हा हे कबूल करते तेव्हा ती तिच्या मनातील वांशिक किंवा राष्ट्रीय द्वेषाच्या भावनांवर हळूहळू मात करायला शिकते.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.

बायबलमध्ये असे भाकीत केले आहे, की फार लवकर देव सध्याचे मानवी शासन काढून त्याऐवजी त्याचे मशिही राज्य स्थापन करणार आहे. या राज्याद्वारे अर्थात शासनाद्वारे तो “दिगंतापर्यंत लढाया बंद” करील. युद्ध चेतवून त्यात भाग घेण्यास लोकांना आर्जवणाऱ्‍या संस्थांना नष्ट केले जाईल. युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करून परादीस पृथ्वीवर जगण्याची संधी देण्यात येईल. तेव्हा कोणालाही आक्रमणामुळे किंवा कोणाच्या जुलूमामुळे पळून जावे लागणार नाही.—स्तोत्र ४६:९; दानीएल २:४४; प्रेषितांची कृत्ये २४:१५.

त्या काळच्या लोकांबद्दल बायबल म्हणते: “ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील . . . असे व्हावयाचे नाही. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत.” सर्व प्रकारची हानी किंवा झालेली जखम भरून निघेल. या आशेवर भरवसा ठेवल्याने एखाद्याच्या मनावर झालेल्या जखमा हळूहळू भरून निघतात.—यशया ६५:२१-२३.

बायबल खरोखरच हृदयासाठी प्रभावकारी औषध आहे. बायबलच्या शिकवणींमुळे कित्येक लोकांच्या हृदयावर झालेल्या युद्धाच्या जखमा भरून निघाल्या आहेत. पूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले लोक आता संयुक्‍त आंतरराष्ट्रीय बंधुसमाजाचे भाग बनले आहेत. मानवजातीच्या मनातील द्वेषाच्या, कटुपणाच्या, दुःखाच्या व शोकाच्या भावना जोपर्यंत पूर्णपणे नाहीशा होत नाहीत तोपर्यंत, म्हणजे देवाच्या नवीन व्यवस्थेतही लोकांना बायबलच्या शिकवणी शिकवल्या जातील. आणि मग मानवजातीच्या निर्माणकर्त्याने वचन दिल्याप्रमाणे तेव्हा “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.”—यशया ६५:१७.

[तळटीप]

^ या लेखातील काही नावे बदलण्यात आली आहेत.

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

“मी बायबलचा अभ्यास सुरू केला, तेव्हा मला समजले की मी लढण्यात माझा कितीतरी वेळ वाया घालवला होता”

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

पूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या लोकांच्या मनावर बायबलचा शक्‍तिशाली प्रभाव पडू शकतो

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

द्वेष आणि कटुपणाची जागा हळूहळू भरवसा आणि मैत्रीने घेतली

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

बायबलचे वाचन करणारी व्यक्‍ती बायबलमधील मार्गदर्शनाचा स्वीकार करते तेव्हा त्यातील नीतिनियमांनुसार व दर्जांनुसार ती वागण्यास सुरवात करते

[७ पानांवरील चित्र]

पूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले लोक आता संयुक्‍त आंतरराष्ट्रीय बंधुसमाजाचे भाग बनले आहेत

[४ पानांवरील चित्राचे श्रेय]

निर्वासितांची छावणी: UN PHOTO १८६८११/J. Isaac