व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवा करण्याची प्रेरणा

सेवा करण्याची प्रेरणा

सेवा करण्याची प्रेरणा

कोणती गोष्ट, २४ विवाहित जोडप्यांना आयुष्याच्या ऐन बहरात असताना आपले कुटुंब, मित्र आणि आपला ओळखीचा परिसर सोडून एका अनोळख्या ठिकाणी मिशनरी कार्य घेण्यास प्रेरित करत असावी? पापुआ न्यू गिनी, तायवान, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यांसारख्या देशांमध्ये जायला त्यांना इतका आनंद का होत असावा? त्यांना काहीतरी साहसी कार्य करून दाखवायचे आहे म्हणून? नाही. देव आणि शेजाऱ्‍यांबद्दलचे खरे प्रेम त्यांना हे पाऊल उचलण्यास प्रेरित करते.—मत्तय २२:३७-३९.

हे लोक कोण आहेत? ते वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या १०९ व्या वर्गाचे पदवीधर आहेत. शनिवार, सप्टेंबर ९, २००० रोजी न्यूयॉर्कच्या पॅटरसन येथील वॉचटावर शैक्षणिक केंद्रामध्ये आणि सॅटलाइटद्वारे प्रक्षेपित केल्या जाणाऱ्‍या ठिकाणी जमलेल्या एकूण ५,१९८ लोकांनी यशस्वी मिशनरी होण्यासाठी उपयोगी पडणारा प्रेमळ सल्ला ऐकला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टीफन लेट्ट होते. ते यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या शिक्षण समितीचे सदस्य आहेत. त्यांनी, “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा,” या मत्तय ५:१३ मधील वचनावर आपल्या भाषणाची सुरवात केली. बंधू लेट्ट म्हणाले, की या वचनातील येशूचे शब्द निर्विवादपणे पदवी मिळणाऱ्‍या विद्यार्थ्यांना लागू होतात. कारण, मीठामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे अन्‍न जसे रुचकर होते त्याचप्रमाणे हे विद्यार्थीसुद्धा प्रभावकारी प्रचारकार्य करून लाक्षणिक अर्थाने मीठासारखे आहेत.

अखेरचे उत्तेजन

यानंतर बंधू लेट्ट यांनी संक्षिप्त परंतु अगदी प्रभावशाली शास्त्रवचनीय भाषणे देण्यासाठी सत्यात अनेक वर्षांपासून असलेल्या काही बांधवांना बोलवले. त्यांपैकी बंधू जॉन वीसचक यांचे पहिले भाषण झाले. ते लेखन विभागामध्ये काम करतात. त्यांच्या भाषणाचा विषय होता: “सर्वात छोटे स्तोत्र मिशनरी कार्याला उत्तेजन देते.” हे भाषण ११७ व्या स्तोत्रावर आधारित होते. आज, यहोवा आणि त्याचे राज्य यांच्याविषयीची साक्ष संपूर्ण जगभरातील ‘राष्ट्रांना’ आणि ‘लोकांना’ द्यायची गरज आहे. सर्व लोकांना ‘यहोवाची स्तुती’ करण्यास आर्जवून स्तोत्र ११७ मधील वचनाची पूर्णता करण्याचे उत्तेजन विद्यार्थ्यांना देण्यात आले.

अध्यक्षांनी नंतर मग नियमन मंडळाचे गाय पिअर्स यांना पुढील भाषणासाठी बोलवले. “लवचीक, परंतु दृढ असा” या विषयावर त्यांनी भाषण दिले. देवाचे वचन भक्कम आहे. अनुवाद ३२:४ मध्ये यहोवाला दुर्ग म्हटले असले तरीसुद्धा त्याचे वचन लवचीक आहे. कारण ते कुठल्याही एका भाषेच्या किंवा राष्ट्राच्या लोकांसाठी नव्हे तर सर्व भाषेच्या, गटाच्या व संस्कृतीच्या लोकांसाठी अर्थात सर्व मानवजातीसाठी लिहिण्यात आले होते. देवाच्या वचनातील संदेशाचा लोकांच्या अंतःकरणावर आणि विवेकावर प्रभाव पडेल अशा तऱ्‍हेने त्याचा प्रचार करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला. (२ करिंथकर ४:२) “योग्य तत्त्वांच्या बाबतीत दृढ राहा. पण त्याचसोबत लवचीकही असा. तुम्हाला ज्या क्षेत्रात नेमण्यात येईल तेथील लोकांची संस्कृती वेगळी आहे म्हणून त्यांना कमी लेखू नका,” असे बंधू पिअर्स म्हणाले.

जवळजवळ ५३ वर्षे वॉचटावर संस्थेच्या मुख्यालयात सेवा करणारे बंधू कार्ल ॲडम्स यांनी “येथून तुम्ही कोठे जाल?” या विचाराला चालना देणाऱ्‍या विषयावर भाषण दिले. गिलियड प्रशिक्षकांपैकी ते एक होते. गिलियड प्रशालेतील २४ जोडप्यांना २० वेगवेगळ्या देशांमध्ये नेमणूका मिळाल्या होत्या. पण तेथे जाऊन सर्व काही पाहिल्यानंतर मग काय? आपण, चंचल मनाच्या जगिक लोकांमध्ये राहत आहोत. लोकांना नवनवीन ठिकाणी जाऊन काही वेगळे करायला आवडते कारण यातून त्यांना स्वतःला आनंद मिळतो. पण गिलियडचे विद्यार्थी या लोकांपासून खूप वेगळे आहेत. यहोवाच्या ‘मेंढरांची’ निःस्वार्थपणे काळजी घेण्यासाठी यहोवा त्यांना जेथे नेमतो तेथे ते आनंदाने जातात. त्यांनी प्राचीन इस्राएलमधील लोकांसारखे होऊ नये. सर्व मानवजातीला आशीर्वाद देण्याकरता यहोवाने इस्राएली लोकांना संधी दिली होती. पण स्वार्थापोटी इस्राएली लोकांनी ती संधी हुकवली. अशा इस्राएली लोकांचे अनुकरण करण्याऐवजी त्यांनी येशू ख्रिस्ताचे अनुकरण करावे. येशूने नेहमी निःस्वार्थाने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली व प्रत्येक बाबतीत तो आज्ञाधारक राहिला.—योहान ८:२९; १०:१६.

गिलियड प्रशाळेचे रजिस्ट्रार, बंधू वॅलस लिव्हरन्स यांनी दिलेल्या भाषणाचा विषय होता: “देवाच्या गहन गोष्टींचे जतन करा.” शास्त्रवचनांमध्ये देवाच्या वचनाची धन, रत्ने, मौल्यवान धातू किंवा अशा अमुल्य वस्तुंशी वारंवार तुलना करण्यात आली आहे; या वस्तू बहुमोल आहेत. नीतिसूत्रे २:१-५ वचने आपल्याला दाखवून देतात, की ‘देवाविषयीच्या ज्ञानाचा’ आपण “गुप्त निधीप्रमाणे” शोध केला पाहिजे. बंधू लिव्हरन्स यांनी सर्व गिलियड विद्यार्थ्यांना, त्यांच्या नवीन नेमणुकांमध्ये सेवा करत असताना देवाच्या गहन गोष्टींचा शोध करीत राहण्याचे उत्तेजन दिले. बंधू लिव्हरन्स म्हणाले: “असे करणे सुज्ञपणाचे आहे कारण त्यामुळे यहोवावरील तुमचा भरवसा आणि विश्‍वास आणखी वाढतो व तुमच्या नेमणुकीत टिकून राहण्याचा तुमचा निश्‍चय आणखी पक्का होतो. शिवाय, यामुळे तुम्हाला पूर्ण खात्रीनिशी बोलायला मदत मिळेल व अधिक प्रभावशाली शिक्षक होऊन तुम्ही लोकांना देवाच्या उद्देशांविषयी शिकवू शकाल.”

गिलियड प्रशालेच्या आणखी एका शिक्षकांनी, लॉरेन्स बोवन यांनी वर्गाचे दृश्‍य सादर करून गेल्या पाच महिन्यांमध्ये यहोवाने विद्यार्थ्यांच्या क्षेत्र सेवेवर आशीर्वाद कसा दिला हे समजावून सांगितले. त्यांनी प्रेषितांची कृत्ये २०:२० मध्ये दिलेल्या पौलाच्या इफिसमधील सार्वजनिक सेवेचा उल्लेख केला. पौलाने प्रत्येक संधीचा फायदा घेऊन साक्ष दिली यावर त्यांनी जोर दिला. विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून एक गोष्ट स्पष्ट झाली, की ज्यांना देवाबद्दल आणि शेजाऱ्‍यांबद्दल प्रेम आहे ते प्रेषित पौलाप्रमाणे इतरांना सत्य सांगण्यास कचरत नाहीत. ते देवाच्या वचनातील शक्‍तीला त्यांच्यावर कार्य करू देतात. यामुळे त्यांना यहोवाकडून खूप आशीर्वाद मिळतात.

अनुभवी लोकांचे बोल

गिलियड प्रशालेच्या कार्यक्रमादरम्यान सर्व विद्यार्थ्यांना, खास प्रशिक्षणासाठी पॅटरसन शैक्षणिक केंद्रामध्ये २३ देशांतून आलेल्या शाखा समितीच्या सदस्यांना भेटण्याचा सुहक्क मिळाला. सेवा विभागात काम करणारे लिएन विवर आणि मर्टन कॅम्पबेल यांनी वेगवेगळ्या शाखा समिती सदस्यांच्या मुलाखती घेतल्या. यांतील काही सदस्य स्वतःच गिलियडचे पदवीधर होते. मिशनरी कार्यात मुरलेल्या या सदस्यांचे अनुभव ऐकून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना व मित्रांना खूप दिलासा मिळाला.

आपल्या विदेशी नेमणुकीशी जुळवून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगले सल्ले देण्यात आले. जसे की “सकारात्मक असा. तुम्हाला एखादा वेगळाच अनुभव आला किंवा तुम्हाला काही समजत नसेल तर निराश होऊन हार मानू नका. यहोवावर विसंबून राहा.” “तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्यास शिका, यहोवा तुमच्या जीवनासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व गरजा पूर्ण करील असा भरवसा ठेवा.” इतरांनी, विद्यार्थ्यांना त्यांच्या नेमणुकीत आनंद कसा टिकवून ठेवता येईल यावर भर दिला. त्यांचे काही बोल असे होते: “तुम्हाला पाठवण्यात आले आहे त्या ठिकाणाची तुलना, तुमच्या गावाशी करू नका;” “स्थानीय भाषा शिकून ती नीट बोला जेणेकरून तुम्हाला स्थानीय लोकांबरोबर चांगले संभाषण करता येईल;” “लोकांचे रीतीरिवाज, संस्कृती काय आहेत हे जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या नेमणुकीत टिकून राहता येईल.” हे बोल नवीन मिशनऱ्‍यांसाठी खूप उत्तेजनकारक होते.

मुलाखतींनंतर, बंधू डेव्हिड स्प्लेन यांनी, “विद्यार्थी की पदवीधर?” या शीर्षकाचे प्रमुख भाषण दिले. बंधू स्प्लेन सध्या यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य आहेत. गिलियडच्या ४२ व्या वर्गातून त्यांनी पदवी घेतली होती आणि मिशनरी म्हणून सेवाही केली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले: “तुम्ही जेव्हा तुमच्या नेमणुकीत जाल तेव्हा स्वतःबद्दल तुमचा कोणता दृष्टिकोन असेल? आपण पदवीधर असल्यामुळे मिशनरी कार्याबद्दल आपल्याला सर्व काही माहीत आहे असा तुमचा दृष्टिकोन असेल, की आपण केवळ विद्यार्थी आहोत, आपल्याला पुष्कळ काही शिकायचे आहे, असा असेल?” बंधू स्प्लेन म्हणाले, की सुज्ञ पदवीधर स्वतःला विद्यार्थी समजतात. आपल्या मिशनरी नेमणुकीत भेटणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीकडून आपण काही ना काही शिकू शकतो असा दृष्टिकोन मिशनऱ्‍यांनी बाळगावा. (फिलिप्पैकर २:३) सर्व विद्यार्थ्यांनी, सहमिशनरी, शाखा कार्यालय आणि स्थानीय मंडळी या सर्वांना सहकार्य द्यावे असे उत्तेजन देण्यात आले. “तुमची वार्षिक परीक्षा संपलेली असली तरीसुद्धा तुम्ही विद्यार्थीच आहात. तुम्ही तुमच्या नेमणुकीत शिकायला आला आहात हे सर्वांना कळू द्या,” असे बंधू स्प्लेन शेवटी म्हणाले.

या भाषणानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचे डिप्लोमा मिळाले व त्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर एक वर्ग प्रतिनिधीने व्यासपीठावर येऊन ‘देवाच्या वचनातून आम्ही जे काही शिकलो त्याचा पवित्र सेवेत जास्तीतजास्त उपयोग करू’ हा विद्यार्थ्यांनी केलेला दृढसंकल्प सर्वांसमोर वाचून दाखवला. तो क्षण भारावून टाकणारा होता.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांना हे मान्य असेल, की या कार्यक्रमात मिळालेल्या सल्ल्यामुळे देवाबद्दल आणि शेजाऱ्‍यांबद्दल प्रेम दाखवण्याचा पदवीधारकांचा संकल्प आणखीनच पक्का झाला. शिवाय, त्यांच्या मिशनरी नेमणुकीतील लोकांना आध्यात्मिक मदत करण्यासही ते आणखी ठामनिश्‍चयी झाले.

[२५ पानांवरील चौकट]

वर्गाची आकडेवारी

प्रतिनिधीत्त्व केलेले एकूण देश: १०

नेमून दिलेले एकूण देश: २०

एकूण विद्यार्थी: ४८

सरासरी वय: ३३.७

सत्यात सरासरी वर्षे: १६.२

पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १२.५

[२६ पानांवरील चित्र]

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा पदवीधर होणारा १०९ वा वर्ग

खालील यादीत, पुढून मागे याप्रकारे ओळींची संख्या देण्यात आली आहे आणि प्रत्येक ओळीत नावे डावीकडून उजवीकडे या क्रमाने देण्यात आलेली आहेत

(१) कॉलिन्स, ई.; माईल्स, एल.; अल्वराडो, ए.; लेक, जे. (२) व्हॅन डुसन, एल.; बिहारी, ए.; हेककिनेन, एच.; कोस, एस.; स्मिथ, एच. (३) ॲशफोर्ड, जे.; ॲशफोर्ड, सी.; बोर, सी.; रिचर्ड, एल.; विलबर्न, डी.; लेक, जे. (४) चिचीआय, के.; चिचीआय, एच.; रमायरेझ, एम.; बॉमन, डी.; बेक्कर, जी.; बिहारी, एस.; रमायरेझ, ए. (५) व्हॅन डुसन, डब्ल्यू.; लेमॅट्रे, एच.; पिस्को, जे.; कट्‌स, एल.; रस्सल, एच.; जॉनसन, आर. (६) बेक्कर, एफ.; बॉमन, डी.; जॉनसन, के.; पायफर, ए.; मॅडसेन, सी.; लेमॅट्रे, जे.; हेककिनेन, पी. (७) स्मिथ, आर.; रस्सल, जे.; कॉलिन्स, ए.; पिस्को, डी.; विलबर्न, आर.; कोस, जी. (८) कट्‌स, बी.; बोर, जे.; मॅडसेन, एन.; पायफर, एस.; रिचर्ड, ई.; माईल्स, बी.; अल्वराडो, आर.