व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास—फलदायक व आनंददायक

अभ्यास—फलदायक व आनंददायक

अभ्यास—फलदायक व आनंददायक

‘जर तू त्याचा शोध करिशील, तर देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.’—नीतिसूत्रे २:४, ५.

१. फावल्या वेळात केलेले वाचन देखील कशाप्रकारे आनंददायक ठरू शकते?

बरेच लोक केवळ छंद म्हणून वाचन करतात. जर साहित्य चांगले असेल तर वाचन आनंददायक ठरू शकते. ठरलेल्या आराखड्यानुसार बायबल वाचन करण्याव्यतिरिक्‍त काही ख्रिस्ती बांधवांना स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे तसेच चार शुभवर्तमान किंवा बायबलच्या इतर पुस्तकांतूनही वाचन करायला आवडते. या पुस्तकांतील सुंदर भाषाशैली व त्यांतील गहन विचार यामुळे त्यांना हे वाचन अत्यंत आनंददायक वाटते. इतर काहीजण यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक, सावध राहा!, टेहळणी बुरूज नियतकालिकांत प्रकाशित होणाऱ्‍या जीवनकथा किंवा इतिहास, भूगोल आणि इतर निसर्गविज्ञानाची पुस्तके वाचणे पसंत करतात.

२, ३. (अ) गहन आध्यात्मिक गोष्टींची तुलना जड अन्‍नाशी कशी करता येईल? (ब) अभ्यास म्हणजे काय?

फावल्या वेळातले वाचन हे सहसा करमणुकीकरता केले जाते. पण अभ्यास मात्र मानसिकरित्या सतर्क राहून केला जातो. फ्रॅन्सिस बेकन या इंग्रज तत्त्वज्ञान्याने असे लिहिले: “काही पुस्तके फक्‍त चाखायची असतात, काही थेट गिळायची असतात, तर क्वचित काही अशी असतात जी बारीक चावून चावून पचवायची असतात.” बायबल हे निश्‍चितच शेवटल्या प्रकारात मोडते. प्रेषित पौलाने लिहिले: “ह्‍याविषयी [राजा व याजक असलेल्या मलकीसदेकाने पूर्वसूचित केलेल्या ख्रिस्ताविषयी] आम्हास पुष्कळ सांगावयाचे आहे; ते तुम्हाला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहा. पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्‍न आहे.” (इब्री लोकांस ५:११, १४) जड अन्‍न नीट चावल्यानंतरच गिळंकृत केले जाते व पचवले जाते. त्याचप्रकारे गहन आध्यात्मिक गोष्टी आत्मसात करून आठवणीत ठेवायच्या असतील तर त्यांवर विचार करणे महत्त्वाचे आहे.

एका शब्दकोषात “अभ्यास” या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे: “ज्ञान किंवा समज प्राप्त करण्याकरता वाचन, संशोधन आदी पद्धतींनी बुद्धीचा उपयोग करणे.” साहजिकच अभ्यास म्हणजे केवळ वरवर वाचणे किंवा वाचताना काही शब्द किंवा वाक्यांश रेखांकित करणे नव्हे. अभ्यास हे मेहनतीचे काम आहे व त्यासाठी ज्ञानेंद्रियांचा उपयोग केला जातो. पण याचा अर्थ तुम्हाला त्यातून आनंद मिळू शकत नाही असा होत नाही.

आनंददायक अभ्यास

४. स्तोत्रकर्त्यानुसार, देवाच्या वचनाचा अभ्यास चैतन्यदायी व उत्साहवर्धक का ठरतो?

देवाच्या वचनाचे वाचन व त्याचा अभ्यास चैतन्यदायी व उत्साहवर्धक आहे. म्हणूनच स्तोत्रकर्त्याने म्हटले: “परमेश्‍वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करिते; परमेश्‍वराचा निर्बंध विश्‍वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो. परमेश्‍वराचे विधि सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करितात; परमेश्‍वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते.” (स्तोत्र १९:७, ८) यहोवाचे नियम व त्याचे निर्बंध आपल्या मनाचे पुनरुज्जीवन करण्यास समर्थ आहेत; ते आपल्याला आध्यात्मिक आरोग्य देतात, आंतरिक आनंद देतात आणि यहोवाच्या अद्‌भुत उद्देशांची स्पष्ट समज मिळाल्यामुळे आपले नेत्र प्रकाशमान होतात. अभ्यास निश्‍चितच आनंददायक आहे!

५. अभ्यास आनंददायक केव्हा ठरतो?

एखाद्या कामाचे चांगले परिणाम दिसून येतात तेव्हा त्या कामातला आनंद आपोआपच द्विगुणित होतो. अभ्यासातील आनंद द्विगुणीत करण्यासाठी नव्याने प्राप्त झालेल्या ज्ञानाचा आपण लगेच उपयोग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याकोबाने लिहिले: “जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करुन ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृति करणारा होतो व त्याला आपल्या कार्यांत धन्यता मिळेल.” (याकोब १:२५) शिकलेल्या मुद्द्‌यांचे लवकरात लवकर वैयक्‍तिक जीवनात पालन केल्यास खूप समाधान मिळते. तसेच प्रचार कार्यात किंवा एखाद्या व्यक्‍तीसोबत अभ्यास करताना विशिष्ट प्रश्‍न विचारला जातो, तेव्हा त्या व्यक्‍तीला उत्तर देण्याच्या खास उद्देशाने त्या प्रश्‍नाचे उत्तर शोधून काढताना देखील खूप आनंद होतो.

देवाच्या वचनाबद्दल आवड निर्माण करणे

६. स्तोत्र ११९ व्या अध्यायाच्या लेखकाने यहोवाच्या वचनाबद्दलचे आपले प्रेम कशाप्रकारे व्यक्‍त केले?

हिज्कियाने कोवळ्या वयात असताना स्तोत्र ११९ लिहिले असावे असा अंदाज केला जातो. या अध्यायात त्याने यहोवाच्या वचनाबद्दल आपले प्रेम काव्यरूपात व्यक्‍त केले आहे. तो म्हणतो: “मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरावयाचा नाही. तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत. . . . मी तुझ्या आज्ञांत आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत. माझ्यावर करुणा कर म्हणजे मी जगेन; कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. हे परमेश्‍वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी उत्कंठा धरिली आहे; तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे.”—स्तोत्र ११९:१६, २४, ४७, ७७, १७४.

७, ८. (अ) एका संदर्भ ग्रंथानुसार देवाच्या वचनाने ‘आनंदित होण्याचा’ काय अर्थ होतो? (ब) यहोवाचे वचन आपल्याला प्रिय आहे हे आपण कसे दाखवू शकतो? (क) यहोवाचे नियमशास्त्र वाचण्याआधी एज्राने काय करण्याचा निश्‍चय केला?

स्तोत्र ११९ अध्यायातील “आनंद मानीन” असे भाषांतर केलेल्या वाक्यांशाबद्दल इब्री शास्त्रवचनांवरील एका शब्दकोषात याप्रकारे खुलासा केला आहे: ‘या अध्यायातील १६ व्या वचनात सदर वाक्यांश आनंदित होणे, मनन करणे या क्रियापदांसारखाच उपयोगात आणण्यात आला आहे. आनंदित होणे, मनन करणे व उल्लसित होणे ही एकापाठोपाठ वापरण्यात आली आहेत. यावरून कदाचित असे सूचित होत असावे की जेव्हा एक व्यक्‍ती अर्थपूर्ण पद्धतीने मनन करते तेव्हा याहवेहच्या वचनाच्या अभ्यासात तिला आनंद वाटू लागतो. त्या व्यक्‍तीच्या भावना यात गोवलेल्या आहेत हे देखील यावरून दिसून येते.’ *

निश्‍चितच यहोवा देवाच्या वचनाबद्दल आपल्याला मनापासून प्रेम वाटले पाहिजे. देवाच्या वचनातून आपण जे वाचले त्यावर विचार करत राहण्यात आपल्याला आनंद वाटला पाहिजे. गहन आध्यात्मिक विचारांबद्दल आपण मनन केले पाहिजे, त्यांत पूर्णपणे गढून चिंतन केले पाहिजे. याकरता शांतचित्ताने विचार करणे व प्रार्थना करणे आवश्‍यक आहे. एज्राप्रमाणे आपणही देवाच्या वचनाचे वाचन व अभ्यास करण्याचा मनापासून निश्‍चय केला पाहिजे. एज्राविषयी बायबलमध्ये असे सांगितले आहे: “परमेश्‍वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्राएलास त्यातले नियम व निर्णय शिकविण्याचा एज्राने निश्‍चयच केला होता.” (एज्रा ७:१०) एज्राने कोणत्या तीन गोष्टी करण्याचा निश्‍चय केला होता ते लक्षात घ्या. अध्ययन करण्याचा, त्याप्रमाणे चालण्याचा आणि इतरांना शिकवण्याचा. आपणही एज्राच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे.

अभ्यास आपल्या उपासनेचा भाग आहे

९, १०. (अ) स्तोत्रकर्त्याने यहोवाच्या वचनावर कशाप्रकारे मनन केले? (ब) ‘मनन करणे’ असे भाषांतर केलेल्या इब्री क्रियापदाचा काय अर्थ होतो? (क) बायबलचा अभ्यास आपल्या उपासनेचा एक भाग आहे असा विचार करणे का महत्त्वाचे आहे?

स्तोत्रकर्ता म्हणतो की तो यहोवाचे विधी, आज्ञा व नियम यांचे मनन करतो. “मी तुझ्या विधीचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन. तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारीन आणि तुझ्या नियमांचे मनन करीन. अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करितो.” (स्तोत्र ११९:१५, ४८, ९७, ९९) यहोवाच्या वचनाचे ‘मनन करण्याचा’ काय अर्थ होतो?

१० ‘मनन करणे’ असे भाषांतर केलेल्या इब्री क्रियापदाचा अर्थ, “विचार करणे,” किंवा “चिंतन करणे” असाही होतो. “देवाच्या कार्यांवर व त्याच्या वचनावर शांतचित्ताने विचार करण्याच्या संदर्भात हे क्रियापद वापरले जाते.” (थियॉलॉजिकल वर्डबुक ऑफ दि ओल्ड टेस्टमेंट) स्तोत्रकर्ता देवाच्या वचनावर “विचार” करायचा, व देवाचे वचन त्याला प्रिय असल्यामुळे तो त्याचा “अभ्यास” करायचा; ही त्याची “उपासना” होती. हे सर्व सूचित करण्याकरता नामरूपात असलेला मनन हा शब्द वापरला जातो. देवाच्या वचनाचा अभ्यास आपल्या उपासनेचा भाग आहे हे विचारात घेता, ही बाब किती गंभीर आहे हे आपल्या लक्षात येते. म्हणूनच अतिशय काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक अभ्यास करणे आवश्‍यक आहे. अभ्यास आपल्या उपासनेत समाविष्ट आहे, किंबहुना अभ्यास केल्यामुळे आपण अधिक चांगल्याप्रकारे उपासना करू शकतो.

देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करणे

११. यहोवा आपल्या लोकांना गहन आध्यात्मिक विचार कसे प्रकट करतो?

११ यहोवाची स्तुती करताना स्तोत्रकर्ता म्हणतो: “हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत.” (स्तोत्र ९२:५) प्रेषित पौलानेही ‘देवाच्या गहन गोष्टींचा,’ उल्लेख केला होता. यहोवा देव आपल्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी “आत्म्याच्या द्वारे” आपल्या लोकांना कळवत असलेल्या गहन विचारांच्या संदर्भात पौल सांगत होता. (१ करिंथकर २:१०; मत्तय २४:४५) दास वर्ग, सर्वांना विचारात घेऊन आध्यात्मिक पोषण पुरवत आहे. म्हणजेच नवीन लोकांकरता ‘दूध’ आणि “प्रौढांसाठी जड अन्‍न.”—इब्री लोकांस ५:११-१४.

१२. दास वर्गाने खुलासा केलेल्या ‘देवाच्या गहन गोष्टींचे’ एखादे उदाहरण द्या.

१२ ‘देवाच्या गहन गोष्टी’ समजून घेण्याकरता देवाच्या वचनाचा प्रार्थनापूर्वक अभ्यास करणे व त्यावर विचार करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, यहोवा देव एकाचवेळी न्याय व दया हे दोन्ही गुण कसे प्रकट करतो याविषयी अतिशय अर्थपूर्ण माहिती प्रकाशित करण्यात आली. यहोवा देव दया दाखवतो याचा अर्थ तो न्यायाच्या बाबतीत हातमिळवणी करतो असा होत नाही. उलट, देवाची दया ही खरे तर त्याच्या न्यायाची व प्रीतीची अभिव्यक्‍ती आहे. पापी व्यक्‍तीचा न्याय करताना, त्या व्यक्‍तीला येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारे दया दाखवणे शक्य आहे का याचा आधी यहोवा देव विचार करतो. पण जर पापी व्यक्‍ती पश्‍चात्तापी नसेल किंवा तिच्यात बंड करण्याची प्रवृत्ती असेल तर मग त्या व्यक्‍तीला अनावश्‍यक दया न दाखवता यहोवा न्यायानुसार शिक्षा भोगू देतो. दोन्ही बाबतीत यहोवा आपल्या अत्युच्च तत्त्वांनुसारच व्यवहार करतो. * (रोमकर ३:२१-२६) खरोखर, ‘देवाची बुद्धी किती अगाध आहे!’—रोमकर ११:३३.

१३. आजवर प्रकट करण्यात आलेल्या आध्यात्मिक सत्यांविषयी आपण कदर कशी व्यक्‍त करू शकतो?

१३ यहोवा आपल्याला त्याचे विचार कळवतो याचा आपल्याला स्तोत्रकर्त्याप्रमाणेच आनंद वाटत नाही का? दाविदाने लिहिले: “हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे? ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील; मला जाग येते तेव्हाहि मी तुझ्याजवळच असतो.” (स्तोत्र १३९:१७, १८) अर्थात देवाच्या राज्यात सदासर्वकाळपर्यंत यहोवा आपल्याला त्याचे जे गहन विचार प्रकट करेल त्यांच्या तुलनेत आज आपल्याला मिळालेले ज्ञान काहीच नाही! पण, तरीसुद्धा आतापर्यंत स्पष्ट झालेल्या बहुमोल आध्यात्मिक सत्यांची आपण कदर बाळगतो आणि देवाच्या सत्य वचनाच्या आणखी खोलात शिरण्याचा प्रयत्न करत राहतो.—स्तोत्र ११९:१६०.

मनस्वी प्रयत्न आणि सुयोग्य साधने आवश्‍यक

१४. नीतिसूत्रे २:१-६ ही वचने देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याकरता मनस्वी प्रयत्न करण्यावर कशाप्रकारे जोर देतात?

१४ गहन विषयांवर बायबल अभ्यास करण्याकरता मेहनत घ्यावी लागते. नीतिसूत्रे २:१-६ ही वचने वाचल्यास ही गोष्ट अगदीच स्पष्ट होते. परमेश्‍वराचे ज्ञान संपादन करण्यासाठी मनस्वी प्रयत्न करावे लागतात यावर जोर देण्याकरता शलमोन राजाने कोणती क्रियापदे वापरली आहेत त्याकडे लक्ष द्या. त्याने लिहिले: “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारिशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्‍वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल, कारण ज्ञान परमेश्‍वर देतो; त्याच्या मुखांतून ज्ञान व सुज्ञता येतात.” (तिरपे वळण आमचे.) जमिनीत लपवलेला खजिना मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे बऱ्‍याच खोलवर खोदावे लागते त्याचप्रमाणे अभ्यासाचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी संशोधन करणे आवश्‍यक आहे.

१५. अभ्यासाची पद्धत योग्य असली पाहिजे हे बायबलमधील कोणत्या उदाहरणावरून फार चांगल्याप्रकारे स्पष्ट होते?

१५ अभ्यासामुळे खरा आध्यात्मिक फायदा होण्याकरता अभ्यास करण्याची पद्धत योग्य असली पाहिजे. शलमोनाने लिहिले: “लोखंडी हत्यार बोथटले व त्याला धार लाविली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. कार्यसिद्धीस ज्ञान उपयोगाचे आहे.” (उपदेशक १०:१०) बोथटलेल्या हत्याराने काम करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा ते हत्यार वापरण्याची पद्धत योग्य नसेल तर काम करणाऱ्‍याची शक्‍ती तर वाया जाईलच पण त्याचे काम देखील चांगले होणार नाही. त्याचप्रकारे, तितकाच वेळ अभ्यास करूनही दोन व्यक्‍तींना त्यापासून मिळणारा लाभ वेगवेगळा असू शकतो. सर्वकाही आपल्या अभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. थियोक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबुकच्या ७ व्या अध्यायात अधिक चांगल्याप्रकारे अभ्यास करण्याकरता अतिशय परिणामकारक सूचना दिल्या आहेत. *

१६. गहन अभ्यास करण्याकरता कोणत्या व्यावहारिक सूचना आपल्याला देण्यात आल्या आहेत?

१६ कुशल कारागीर आपले काम सुरू करण्याआधी आपल्याला लागणारे सर्व साहित्य हाताशी ठेवतो. तसेच आपणही अभ्यासाला बसण्याआधी आपल्या वैयक्‍तिक लायब्ररीतून जी जी पुस्तके लागणार आहेत ती काढून घेतली पाहिजे. अभ्यास म्हणजे केवळ करमणूक नाही हे आपण आधीच पाहिले आहे. त्यासाठी मानसिकरित्या सतर्क राहणे आवश्‍यक आहे. हे लक्षात घेता, अभ्यासाकरता आपण कोणत्या स्थितीत बसतो हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. मानसिकरित्या सतर्क राहण्याकरता, बिछान्यावर पडून, किंवा आरामखुर्चीत बसण्याऐवजी, टेबल आणि खूर्चीचा वापर करणे जास्त चांगले ठरेल. काहीवेळ एकाग्र होऊन अभ्यास केल्यानंतर थोडा बदल म्हणून तुम्ही पाय मोकळे करायला अथवा ताज्या हवेत थोडावेळ फिरायला जाऊ शकता.

१७, १८. उपलब्ध असलेल्या अभ्यासाच्या उत्तम साधनांचा तुम्हाला कशाप्रकारे उपयोग करता येईल याची उदाहरणे द्या.

१७ अभ्यासाकरता आपल्याजवळ अत्यंत सरस साहित्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन हे बायबल. आता हे भाषांतर ३७ भाषांत उपलब्ध आहे. न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशनच्या स्टॅन्डर्ड एडिशनमध्ये वचनांचे संदर्भ दिलेले आहेत; तसेच “टेबल ऑफ द बुक्स ऑफ द बायबल” या शीर्षकाखाली प्रत्येक पुस्तकाचा लेखक, ते पुस्तक कोठे लिहिण्यात आले व त्याला किती कालखंड लागला हे देण्यात आले आहे. शिवाय, बायबलमधील शब्दांची यादी, अपेंडिक्स आणि नकाशे देखील आहेत. काही भाषांत हे बायबल मोठ्या आकारात देखील उपलब्ध आहे. याला रेफरन्स बायबल म्हणतात. यात वरील सर्व गोष्टी तर आहेतच पण त्याव्यतिरिक्‍तही बरेच काही आहे. विशेष म्हणजे यात सविस्तर तळटीपा आहेत व या तळटीपांची देखील यादी या बायबलमध्ये आहे. देवाच्या वचनात आणखी खोलवर शिरण्याकरता सहायक ठरणारी जी काही साधने तुमच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध आहेत त्यांचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घेत आहात का?

१८ आणखी एक अतिशय बहुमोल साधन म्हणजे इन्साईट ऑन द स्क्रिप्चर्स हा दोन खंडांचा बायबल ज्ञानकोष. हे ग्रंथ तुम्हाला समजणाऱ्‍या भाषेत तुमच्याजवळ असतील तर अभ्यास करताना ते नेहमी जवळ असू द्या. जवळजवळ सगळ्या बायबल विषयांवर यांत तुम्हाला संदर्भ व अतिरिक्‍त माहिती मिळेल. तसेच, ऑल स्क्रिप्चर्स इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲन्ड बेनेफिशियल हे पुस्तक देखील तुम्हाला सहायक ठरेल. बायबलचे कोणतेही पुस्तक वाचायला सुरवात करण्याआधी “ऑल स्क्रिप्चर” या पुस्तकातून त्या बायबल पुस्तकाच्या अध्यायाचा अभ्यास करा. यात तुम्हाला त्या बायबल पुस्तकातील माहितीची भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्‍वभूमी समजून घ्यायला मदत होईल. तसेच त्या पुस्तकाचा सारांश, इतकेच नव्हे तर आज आपल्याकरता या पुस्तकाचे काय महत्त्व आहे याविषयी देखील तुम्हाला वाचायला मिळेल. छापील स्वरूपात उपलब्ध असलेल्या या अनेक साधनांव्यतिरिक्‍त अलीकडेच सीडीवर वॉचटावर लायब्ररी नऊ भाषांत उपलब्ध झाली आहे.

१९. (अ) यहोवाने आपल्याकरता बायबल अभ्यासाची उत्तम साधने का पुरवली आहेत? (ब) बायबल वाचन व अभ्यास करण्याकरता काय आवश्‍यक आहे?

१९ यहोवाने ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासांकरवी’ ही सर्व साधने आपल्याकरता पुरवली आहेत; कारण आपल्या सेवकांना ‘आपल्याविषयीचे ज्ञान प्राप्त व्हावे’ अशी देवाची इच्छा आहे. (नीतिसूत्रे २:४, ५) योग्य पद्धतीने व नियमितपणे अभ्यास केल्यामुळे आपल्याला यहोवाला अधिक चांगल्याप्रकारे ओळखणे व त्याच्यासोबत अगदी जवळचा नातेसंबंध जोडणे शक्य होते. (स्तोत्र ६३:१-८) अभ्यास करणे सोपे नाही हे खरे आहे, पण तुमचे प्रयत्न निश्‍चितच आनंददायक व लाभदायक ठरू शकतात. शिवाय अभ्यासाकरता पुरेसा वेळ देखील आवश्‍यक आहे; कदाचित तुम्ही म्हणाल, ‘बायबल वाचन व वैयक्‍तिक अभ्यास करण्यासाठी मी वेळ कुठून काढू?’ हा विषय पुढील लेखात, म्हणजे या मालिकेतील शेवटल्या लेखात विचारात घेतला आहे.

[तळटीपा]

^ परि. 7 न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ ओल्ड टेस्टमेंट थियॉलॉजी ॲन्ड एक्झेजेसिस, खंड चौथा, पृष्ठे २०५-७.

^ परि. 12 टेहळणी बुरूज ऑगस्ट १, १९९८ अंकातील पृष्ठ १३ वरील परिच्छेद ७ पाहा. बायबल अभ्यास करताना एक खास उपक्रम म्हणून तुम्ही या अंकातील दोन्ही अभ्यास लेखांची उजळणी करू शकता तसेच वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स या बायबल ज्ञानकोषात “जस्टीस,” “मर्सी” व “राइचसनेस” या विषयांवरील माहिती देखील पडताळून पाहू शकता.

^ परि. 15 वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित. हे पुस्तक तुमच्या भाषेत उपलब्ध नसल्यास परिणामकारक अभ्यास पद्धतींविषयी माहितीकरता टेहळणी बुरूज ऑगस्ट १, १९९३, पृष्ठे २१-२५; जून १, १९८७, पृष्ठे १४-१५ पाहा.

उजळणीचे प्रश्‍न

• वैयक्‍तिक अभ्यास चैतन्यदायक व फलदायक होण्याकरता आपण काय करू शकतो?

• स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपण यहोवाच्या वचनाच्या अभ्यासाने ‘आनंदित होतो,’ त्यावर ‘मनन’ करतो हे कसे दाखवू शकतो?

• देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याकरता मेहनत घेणे आवश्‍यक आहे हे नीतिसूत्रे २:१-६ या वचनांतून कसे दिसून येते?

• यहोवाने आपल्याकरता अभ्यासाची कोणती उत्तम साधने पुरवली आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील चित्र]

शांतपणे मनन व प्रार्थना केल्यास देवाचे वचन आपल्याला अधिक प्रिय वाटू लागेल

[१७ पानांवरील चित्रे]

देवाच्या वचनात आणखी खोलवर शिरण्याकरता सहायक ठरणाऱ्‍या साधनांचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घेत आहात का?