व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेमळ देवाला ओळखणे

प्रेमळ देवाला ओळखणे

राज्य घोषकांचा वृत्तान्त

प्रेमळ देवाला ओळखणे

ब्राझीलच्या ॲन्टोनियो नावाच्या अवघ्या सोळा वर्षाच्या तरूणाला जीवन अगदीच निरस वाटू लागले होते, त्याला जगण्याचा कंटाळा आला होता. आपल्या जीवनात आता काहीच अर्थ राहिलेला नाही असे त्याला नेहमी वाटत असल्यामुळे तो ड्रग्ज घेऊ लागला, दारू पिऊ लागला. आत्महत्त्या करण्याचा विचारही त्याच्या मनात अनेकदा येऊन गेला. अशावेळी त्याला त्याच्या आईचं म्हणणं आठवायचं. ती नेहमी म्हणायची: “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) पण त्याच्या मनात विचार यायचा, की मग हा प्रेमळ देव आहे तरी कुठे?

ड्रग्ज आणि दारूचे व्यसन सोडण्यास मदत मिळावी म्हणून ॲन्टोनियो त्याच्या पाळकाकडे जाऊ लागला. कॅथलिक चर्चची सर्व कामे तो उत्साहाने करू लागला पण त्याच्या मनातील पुष्कळ प्रश्‍न त्याला भेडसावत होते. जसे की, योहान ८:३२ येथे येशूने म्हटले होते की, “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.” येथे येशू कोणत्या मुक्‍ततेची गोष्ट करत होता? यासारख्या प्रश्‍नांची उत्तरे त्याला चर्चमध्ये मिळू शकली नाहीत. यामुळे ॲन्टोनियो पुन्हा ड्रग्ज आणि दारूकडे वळला. आणि आताची त्याची अवस्था पहिल्यापेक्षाही वाईट झाली.

यादरम्यान, ॲन्टोनियोची पत्नी मारीया यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करायला लागली. अन्टोनियोने तिला विरोध केला नाही पण त्याला वाटायचे की साक्षीदार ‘अमेरिकन संस्कृती व धर्माचा प्रसार करणारे धर्मप्रचारक आहेत.’

मारीयाने आपला अभ्यास थांबवला नाही. ती ॲन्टोनियोला आवडतील अशा विषयांची टेहळणी बुरूज सावध राहा! मासिकं मुद्दाम टेबलावर ठेवायची. ॲन्टोनियोला वाचनाची आवड असल्यामुळे तो अधेमधे मारीया नसताना ती मासिकं चाळायचा. आणि जीवनात पहिल्यांदाच त्याला बायबलमधून त्याच्या प्रश्‍नांची उत्तरं मिळाली. तो म्हणतो: “माझी बायको आणि साक्षीदार यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि मला मदत करण्याची त्यांची इच्छा आहे हे मला समजू लागले.”

एकोणीशे ब्यान्‍नव साली ॲन्टोनियो यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास तयार झाला. पण ड्रग्ज आणि दारूचे व्यसन मात्र तो सोडू शकला नाही. एकदा आपल्या मित्रासोबत घरी परतत असताना पोलिसांनी त्याला अडवले. तपासात त्याच्या खिशात कोकेन सापडले. त्यामुळे पोलिसांनी त्याला बेदम मारले. एकाने त्याच्यावर पिस्तुल रोखले तेव्हा बाकीचे पोलिस ओरडू लागले: “सोडू नका त्याला, सरळ गोळी घाला.”

ॲन्टोनियो खूप घाबरला. त्या स्थितीत असताना त्याला त्याच्या गत जीवनाची आठवण झाली. आतापर्यंत आपण किती वाईट जीवन जगलो होतो याची त्याला आठवण झाली. त्याला आपलं कुटुंब आठवलं, त्याला यहोवाची आठवण झाली. त्याने मनातल्या मनात प्रार्थना केली आणि यहोवाकडे साहाय्य मागितले. अचानक पोलिसांच्या मनात काय आले कोणास ठाऊक ते त्याला तसेच सोडून निघून गेले. यहोवानेच आपल्याला वाचवले होते याची ॲन्टोनियोला खात्री पटली. तो तसाच भारावलेल्या अवस्थेत घरी गेला.

या घटनेनंतर ॲन्टोनियोने पुन्हा आवेशाने बायबलचा अभ्यास सुरू केला. हळूहळू तो आपल्या जीवनात बदल करू लागला. (इफिसकर ४:२२-२४) ड्रग्ज घ्यायची त्याला हुक्की यायची तेव्हा तो स्वतःवर खूप ताबा ठेवायचा. या व्यसनातून पूर्णपणे बरे होण्याकरता व्यसनी लोकांसाठी असलेल्या पुनर्वसन केंद्रात त्याला राहावे लागले. तेथे त्याने सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक आणि बायबल आधारित इतर पुस्तकं वाचून काढली. आणि वाचलेल्या गोष्टी तो इतर रुग्णांनाही सांगू लागला.

दवाखान्यातून घरी आल्यावर त्याने साक्षीदारांबरोबर बायबल अभ्यास पुन्हा सुरू केला. आज ॲन्टोनियो, त्याची आई, त्याची पत्नी मारीया आणि त्याच्या दोन मुली सर्व मिळून आनंदाने यहोवाची सेवा करत आहेत. तो म्हणतो: “‘देव प्रीति आहे,’ या शब्दांचा खरा अर्थ आता मला समजला आहे.”

[८ पानांवरील चित्र]

रीउ दे झानेइरुमध्ये प्रचार करताना