व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

छळणाऱ्‍याचे डोळे उघडतात

छळणाऱ्‍याचे डोळे उघडतात

छळणाऱ्‍याचे डोळे उघडतात

येशूच्या अनुयायांना पाहून शौलाचा तीळपापड होत होता. जेरुसलेममध्ये त्याने त्यांचा छळ केला आणि स्तेफनाला दगडमार करून ठार मारल्यानंतरही त्याच्या मनाला काही शांती मिळाली नाही म्हणून तो आणखी पुढे सरसावतो. “शौल अजूनहि प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्‍याविषयींचे फूत्कार टाकीत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीहि त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे.”—प्रेषितांची कृत्ये ९:१, २.

आपली मोहीम आपण अगदी चांगल्याप्रकारे कशी काय पार पाडू शकतो याचा विचार करतच शौल दिमिष्काला चालत जात असावा. प्रमुख याजकाने त्याला दिलेल्या अधिकारामुळे शहरातील बहुसंख्य यहुदी समाजाचे नेतेही निश्‍चितपणे त्याला साथ देणार होते. शौलाने त्यांची मदत घ्यायचे ठरवले.

शौल दिमिष्काच्या जसजसा जवळ येत होता तसतसा त्याचा उत्साह आणखी वाढला असावा. जेरुसलेम ते दिमिष्क हा सुमारे २२० किलोमीटरचा सात किंवा आठ दिवसांचा पायी प्रवास शिणवणारा होता. अचानक भरदुपारी, शौलाभोवती सूर्याहूनही तेजोमय प्रकाश चमकला. तो खाली पडला. मग त्याने इब्री भाषेत एक वाणी ऐकली: “शौला, शौला, माझा छळ का करितोस? पराणीवर लाथ मारणे तुला कठीण” वाटेल. शौलाने विचारले: “प्रभो, तू कोण आहेस?” त्याला उत्तर मिळाले: “ज्या येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे. तर ऊठ व आपल्या पायांवर उभा रहा; कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे. ह्‍या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.” शौलाने त्याला विचारले: “प्रभुजी, मी काय करावे?” प्रभूने त्याला म्हटले, “उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.”—प्रेषितांची कृत्ये ९:३-६; २२:६-१०; २६:१३-१७.

शौलाबरोबर प्रवास करणाऱ्‍यांनी फक्‍त आवाज ऐकला, परंतु कोण बोलत आहे हे त्यांना दिसले नाही आणि तो काय बोलला हे त्यांना समजले नाही. शौल जेव्हा उठून उभा राहिला तेव्हा त्या तेजोमय प्रकाशामुळे त्याला समोरचे दिसेनासे झाले; त्याला हाताला धरून पुढे न्यावे लागले. “तो तीन दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्‍नपाणी घेतले नाही.”—प्रेषितांची कृत्ये ९:७-९; २२:११.

तीन दिवस मनन

नीट नावाच्या रस्त्यावर यहुदाचे घर होते. तेथे शौलाची चांगली काळजी घेण्यात आली. * (प्रेषितांची कृत्ये ९:११) या रस्त्याला अरबी भाषेत दर्ब अल मुस्तकिम असे नाव आहे; तो आजही दिमिष्कातील मुख्य रस्ता आहे. यहुदाच्या घरी असताना शौलाच्या मनात कोणकोणते विचार येत असतील याची कल्पना करा. त्या तेजोमय प्रकाशामुळे शौल तर अंधळा झालाच होता, पण त्याला आश्‍चर्याचा धक्का देखील बसला होता. तो या अद्‌भुत अनुभवाविषयी मनन करू लागला.

शौल ज्याला पूर्वी निरर्थक समजत होता तेच त्याच्या डोळ्यासमोर प्रकट झाले होते. सर्वात उच्च यहुदी नेत्यांनी ज्याला दोषी ठरवले, ‘तुच्छ मानले, मनुष्यांनी टाकले’ तो वधस्तंभावर खिळलेला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत होता! इतकेच नव्हे, तर तो देवाच्या उजव्या हाताला “अगम्य प्रकाशात” उभा होता! येशू खरोखरच मशीहा होता. स्तेफनाचे आणि इतरांचे बरोबर होते. (यशया ५३:३; प्रेषितांची कृत्ये ७:५६; १ तीमथ्य ६:१६) शौलाचे पूर्णपणे चुकले होते; कारण येशूने तर, शौल ज्यांचा छळ करीत होता अशा लोकांबरोबर असल्याचे दाखवून दिले होते! इतका पुरावा मिळाल्यावरही शौल “पराणीवर लाथ” कशी मारू शकत होता? हट्टी बैलालासुद्धा शेवटी त्याचा मालक त्याला ज्या दिशेने नेईल त्या दिशेने जावेच लागते. तेव्हा, येशूने केलेल्या मार्गदर्शनानुसार न करणे हे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे होते.

येशू मशीहा असल्यामुळे देव त्याला नाकारू शकत नाही. तरीपण, देवाने त्याला सर्वात अपमानास्पद मृत्यू सहन करू दिला; “टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो” हे वाक्य त्याच्याबाबतीत खरे ठरू दिले. (अनुवाद २१:२३) येशू वधस्तंभावरच मृत्यू पावला. तो पापी नव्हता तरीपण मानवजातीच्या पातकासाठी त्याला शापीत ठरवण्यात आले. शौलाने नंतर म्हटले: “नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहे कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे. . . . आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरुन सोडविले; जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे.”—गलतीकर ३:१०-१३.

येशूच्या बलिदानाला मुक्‍ती देणारे मूल्य आहे. त्या बलिदानाचा स्वीकार करून यहोवाने जणू नियमशास्त्राला आणि त्याच्या शापाला वधस्तंभावर खिळले. या गोष्टीची जाणीव झाल्यावर, यहुदी ज्या वधस्तंभाला “अडखळण” समजत होते तो खरे तर ‘देवाचे ज्ञान’ प्रकट करतो हे शौलाला कळून आले. (१ करिंथकर १:१८-२५; कलस्सैकर २:१४) मग जर, शौलासारख्या पापी लोकांना नियमशास्त्रानुसार जगल्यानंतरच नव्हे तर देवाने अपात्री कृपा दाखवल्यानंतर तारण मिळणार होते तर, नियमशास्त्राधीन नसलेल्यांना देखील तारण मिळण्याची संभावना होती. आणि त्याच विदेशी लोकांकडे येशू शौलाला पाठवत होता.—इफिसकर ३:३-७.

शौलाला यातले कितपत त्याच्या मतपरिवर्तनाच्या वेळी समजले हे आपल्याला माहीत नाही. राष्ट्रांविषयी त्याला मिळालेल्या कामगिरीविषयी येशूला कदाचित त्याला पुन्हा, कदाचित बऱ्‍याच वेळा सांगावे लागणार होते. बऱ्‍याच वर्षांनंतर शौलाने हे सर्वकाही ईश्‍वरी प्रेरणेने लिहून ठेवले. (प्रेषितांची कृत्ये २२:१७-२१; गलतीकर १:१५-१८; २:१, २) परंतु, लवकरच त्याला त्याच्या नवीन प्रभुकडून अधिक सूचना मिळणार होत्या.

हनन्याची भेट

शौलाला प्रकट झाल्यानंतर येशू हनन्यालाही प्रकट झाला. त्याने त्याला सांगितले: “उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर; कारण पाहा, तो प्रार्थना करीत आहे; आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवीत आहे असे त्याने पाहिले आहे.”—प्रेषितांची कृत्ये ९:११, १२.

हनन्याला शौलाविषयी माहीत असल्यामुळे येशूचे शब्द ऐकून त्याला आश्‍चर्य का वाटले असावे हे समजण्यायोग्य आहे. तो म्हणाला: “प्रभो, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्‍या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे; आणि येथेहि तुझे नाव घेणाऱ्‍या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे.” परंतु येशूने हनन्याला म्हटले: “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतति ह्‍यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे.”—प्रेषितांची कृत्ये ९:१३-१५.

येशूकडून आश्‍वासन मिळाल्यावर दिलेल्या पत्त्यावर हनन्या गेला. शौल भेटल्यावर व त्याला नमस्कार केल्यानंतर हनन्याने त्याच्यावर हात ठेवला. आणि अहवाल म्हणतो: “तत्क्षणी त्याच्या [शौलाच्या] डोळ्यांवरून खपल्यासारखे काही पडले व त्याला दृष्टि आली.” शौल आता ऐकायला तयार होता. येशूच्या शब्दांवरून शौलाला कदाचित काय समजले असेल त्याची हनन्याच्या या बोलण्यावरून आपल्याला खात्री पटते: “आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरविले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी; कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.” याचा परिणाम काय झाला? शौलाने “बाप्तिस्मा घेतला. मग अन्‍न घेतल्यावर त्याला शक्‍ति आली.”—प्रेषितांची कृत्ये ९:१७-१९; २२:१२-१६.

या वृत्तान्तात हनन्या जसा अचानक प्रवेश करतो तसाच अचानक तो आपली कामगिरी पूर्ण केल्यावर गायबही होतो; पुन्हा त्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पण यानंतर शौल जेथेही जातो तेथे लोक त्याचे बोलणे ऐकून आश्‍चर्यचकीत होतात! येशूच्या शिष्यांचा छळ करणारा, आणि त्यांना अटक करण्याच्या इराद्यानेच दिमिष्कात आलेला शौल आता सभास्थानांत प्रचार करू लागतो व येशू हाच ख्रिस्त आहे हे शाबीत करू लागतो.—प्रेषितांची कृत्ये ९:२०-२२.

“परराष्ट्रीयांचा प्रेषित”

येशूच्या शिष्यांचा छळ करायला निघालेल्या शौलाला दिमिष्काच्या रस्त्यावर अडवण्यात आले. मशीहाची ओळख पटल्यावर शौल इब्री शास्त्रवचनांतील अनेक कल्पना व भविष्यवाणींचा संबंध येशूशी जोडू शकला. त्याच्यासमोर प्रकट होऊन ज्याने त्याला “कह्‍यांत घेतले” व “परराष्ट्रीयांचा प्रेषित” होण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवली त्या येशूने शौलाचे जीवनच पार बदलून टाकले. (फिलिप्पैकर ३:१२; रोमकर ११:१३) पौल, प्रेषित असल्यामुळे त्याला हा बहुमान आणि अधिकार मिळाला होता ज्याचा परिणाम फक्‍त त्याच्या उर्वरित पार्थिव जीवनावरच नव्हे तर अख्ख्या ख्रिस्ती इतिहासावरही होणार होता.

अनेक वर्षांनंतर पौलाच्या प्रेषितपणावर वाद चालला होता तेव्हा त्याने दिमिष्काच्या रस्त्यावर त्याला आलेल्या अनुभवाची साक्ष देऊन प्रेषित होण्याच्या त्याच्या अधिकाराचे समर्थन केले. त्याने विचारले: “मी प्रेषित नाही काय? आपल्या प्रभु येशूला मी पाहिलेले नाही काय?” पुनरुत्थित येशू ज्या लोकांना प्रकट झाला त्यांचा उल्लेख केल्यानंतर शौल (पौल) म्हणतो: “जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाहि सर्वांच्या शेवटी दिसला.” (१ करिंथकर ९:१; १५:८) शौलाला जणू येशूला त्याच्या स्वर्गीय वैभवात पाहण्याची संधी मिळाली होती, वेळे आधीच आत्मिक जीवनात जन्म किंवा पुनरुत्थान होण्याचा बहुमान मिळाला होता.

शौलाने हा विशेषाधिकार स्वीकारला आणि त्यानुसार जगण्याचा त्याने कसोशीने प्रयत्नही केला. त्याने लिहिले: “प्रेषितांत मी कनिष्ट आहे; प्रेषित म्हणावयास मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. तरी . . . माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्‍या सर्वांपेक्षा [इतर सर्व प्रेषितांपेक्षा] मी अतिशय श्रम केले.”—१ करिंथकर १५:९, १०.

कदाचित, शौलाप्रमाणे तुम्हालाही तो काळ आठवत असेल जेव्हा, देवाची मर्जी संपादण्याकरता पूर्वजांपासून चालत आलेले धार्मिक आचारविचार बदलण्याची गरज आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात आली होती. यहोवाने तुम्हाला सत्य समजण्यास मदत केल्याबद्दल तुम्ही निश्‍चितच त्याचे मनापासून आभार मानले असतील. शौलाने प्रकाश पाहिला तेव्हा त्याचे डोळे उघडले; त्याच्याकडून काय अपेक्षिले जात आहे हे त्याने जाणल्यावर त्याने पुढचे पाऊल उचलायला उशीर लावला नाही. पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत त्याने ते काम आवेशाने आणि पूर्ण निर्धाराने केले. आज यहोवाची मर्जी संपादण्याची इच्छा असलेल्यांसाठी किती हे उत्तम उदाहरण!

[तळटीपा]

^ परि. 7 यहुदा कदाचित स्थानीय यहुदी समाजाचा नेता किंवा यहुद्यांसाठी असलेल्या धर्मशाळेचा मालक असावा असे एका विद्वानाचे मत आहे.

[२७ पानांवरील चित्र]

सध्याच्या दिमिष्कात नीट नावाचा रस्ता

[चित्राचे श्रेय]

Photo by ROLOC Color Slides