व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“पोलिश बांधवांचा पंथ”—त्यांचा छळ का करण्यात आला?

“पोलिश बांधवांचा पंथ”—त्यांचा छळ का करण्यात आला?

“पोलिश बांधवांचा पंथ”—त्यांचा छळ का करण्यात आला?

पोलिश कायदेमंडळाने १६३८ साली स्वतःला पोलिश बांधव म्हणवणाऱ्‍या एका लहान धार्मिक गटावर अतिशय कडक कारवाई केली. या पंथाच्या मालकीचे एक चर्च आणि मुद्रणालय पूर्णपणे नष्ट करण्यात आले. त्यांचे राकाव विद्यापीठ बंद करण्यात आले आणि या विद्यापीठात शिकवणाऱ्‍या प्राध्यापकांना हद्दपार करण्यात आले.

वीस वर्षांनंतर, पोलिश कायदेमंडळ आणखी दोन पावले पुढे गेले. सदर पंथाच्या एकूण एक सदस्याने (त्यावेळी एकूण १०,००० किंवा त्यापेक्षा थोडे जास्त सदस्य होते) देश सोडावा असा हुकूम जारी करण्यात आला. पण सबंध युरोपात सर्वात सहिष्णु राष्ट्र असे नाव कमवलेल्या पोलंडमध्ये अशी टोकाची परिस्थिती कशी काय निर्माण झाली? पोलिश बांधवांच्या पंथाने असा कोणता गुन्हा केला होता, की ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध इतकी कडक कारवाई करण्यात आली?

हेप्रकरण खरे तर पोलंडच्या कॅलव्हिनिस्ट चर्चमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्‌यांवर झालेल्या जोरदार मतभेदामुळे सुरू झाले. सर्वात मोठा वाद हा त्रैक्याच्या धर्मसिद्धांतावरून झाला होता. त्रैक्याच्या धर्मसिद्धान्ताला बायबलचा आधार नाही असे मानणारा एक धर्मसुधारक गट चर्चमध्ये निर्माण झाला होता. साहजिकच चर्चचे अधिकारी यामुळे क्रोधिष्ट झाले आणि शेवटी हा धर्मसुधारक गट कॅलव्हिनिस्ट चर्चपासून फुटला.

कॅलव्हिनिस्ट चर्चने या फुटलेल्या सदस्यांना एरियन्स * हे नाव दिले; पण या नव्या पंथाचे सदस्य मात्र स्वतःला ख्रिस्ती किंवा पोलिश बांधव म्हणवायचे. त्यांना सोकीनियन्स देखील म्हटले जायचे; कारण लायल्यस सोकीनस नावाच्या एक इटालियन गृहस्थावर सर्व्हिटस यांचा बराच प्रभाव झाला होता आणि त्याचा भाचा फॉस्टस सोकीनस पोलंडला आल्यानंतर पोलिश बांधव पंथाचा प्रमुख सदस्य बनला होता.

दरम्यान, यान शेनयेनस्की नावाचा पोलिश उमराव असे एखादे “शांत, एकांत ठिकाण” शोधू लागला की जेथे या नव्या धर्मपंथाची वाढ होऊ शकेल. पोलंडच्या राजाकडून मिळालेल्या खास हक्काचा उपयोग करून शेनयेनस्कीने राकाव नावाच्या शहराची स्थापना केली; हे गाव नंतर सोकीनियन पंथाचे धार्मिक केंद्र बनले. शेनयेनस्कीने राकावच्या नागरिकांना अनेक संविधानिक हक्क मिळवून दिले; यांपैकी एक होता धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क.

या नव्या शहरात अनेक कारागीर, डॉक्टर, औषधतज्ज्ञ, शहरी लोक आणि अमीर उमराव येऊन स्थायिक होऊ लागले. शिवाय पोलंड, लिथुएनिया, ट्रान्सिल्व्हेनिया, फ्रांस आणि इंग्लंडहूनही अनेक ख्रिस्ती पाळक येथे येऊ लागले. अर्थात हे सर्वच लोक सोकीनियन पंथाच्या धार्मिक समजुतींशी सहमत नव्हते; त्यामुळे पुढील तीन वर्षे, म्हणजे १५६९ पासून १५७२ पर्यंत राकाव शहरात धर्मशास्त्रीय विषयांवर निरंतर वाद होत होते. याचा परिणाम काय झाला?

फूट

सोकीनियन पंथातच फूट पडली; जहालमतवादी एकीकडे तर मवाळमतवादी एकीकडे झाले. हे मतभेद असले तरीसुद्धा या दोन गटांचे समान विश्‍वास अतिशय लक्षवेधक होते. त्रैक्याचा धर्मसिद्धान्त त्यांनी स्वीकारला नाही; लहान बाळांचा बाप्तिस्मा करण्याच्या प्रथेच्या ते विरोधात होते; ते सहसा कोणतेही शस्त्र जवळ बाळगत नसत आणि सरकारी पदव्या स्वीकारत नसत. * तसेच, नरक असते व तेथे असह्‍य वेदना दिल्या जातात ही शिकवणही त्यांनी अमान्य केली. हे सर्व विश्‍वास पारंपरिक धार्मिक समजुतींच्या विरोधात होते.

कॅलव्हिनिस्ट व कॅथलिक या दोन्ही पंथांच्या पाळकवर्गाने सोकीनियन पंथाला भयंकर विरोध केला पण दुसरा सिगिस्मंड ऑगस्टस आणि स्टीफन बॅथरी यांच्यासारख्या राजांच्या कारकीर्दीत धार्मिक सहिष्णुतेला चालना देण्यात आली आणि या अनुकूल परिस्थितीचा सोकीनियन पाळकांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्याकरता फायदा करून घेतला.

बुडनी यांची अविस्मरणीय कामगिरी

त्याकाळी एक कॅलव्हिनिस्ट बायबल भाषांतर प्रचलित होते; पण बऱ्‍याच वाचकांना ते समजायला कठीण होते. हे भाषांतर मूळ भाषांतून नव्हे तर लॅटिन भाषेतल्या व्हल्गेट व एका आधुनिक फ्रेंच भाषांतरावरून केलेले होते. या भाषांतराविषयी असे म्हणण्यात आले की यात “सुंदर शैलीच्या नावावर प्रामाणिकता आणि अचूकतेचा बळी देण्यात आला होता.” बऱ्‍याच चुका या भाषांतरात पाहण्यात आल्या. त्यामुळे, शीमोन बुडनी नावाच्या सुप्रसिद्ध विद्वानाला या भाषांतरातील चुका सुधारण्याचे काम सोपवण्यात आले. पण ते या निष्कर्षावर आले, की या जुन्या भाषांतरातील चुका सुधारण्यापेक्षा नवीन भाषांतर करणे जास्त सोपे जाईल. आणि त्याप्रमाणे १५६७ साली बुडनी या कामाला लागले.

भाषांतर करताना बुडनी यांनी प्रत्येक शब्दाचा आणि शब्दाच्या वेगवेगळ्या रुपांचा अगदी सखोल अभ्यास केला; पोलंडमध्ये यापूर्वी कोणीही इतका व्यापक अभ्यास केलेला नव्हता. हिब्रू भाषेतला मजकूर पोलिश भाषेत व्यक्‍त करणे कठीण होते त्या त्या ठिकाणी त्यांनी समासातील टिप्पणींमध्ये त्या विशिष्ट वाक्यांशाचे शाब्दिक भाषांतर दिले. आवश्‍यकता पडल्यास त्यांनी काही नवीन शब्द तयार केले; पण अन्यथा त्यांनी अगदी दररोजच्या व्यवहारात वापरली जाणारी साधी पोलिश भाषाच वापरली. वाचकाला बायबलचे यथातथ्य आणि अचूक भाषांतर वाचायला मिळावे हेच त्यांचे ध्येय होते.

बुडनी यांनी केलेले संपूर्ण बायबलचे भाषांतर १५७२ साली प्रकाशित करण्यात आले. पण प्रकाशकांनी त्यांच्या ग्रीक शास्त्रवचनांच्या भाषांतरात काही फेरबदल केले. बुडनी यांनी हार मानली नाही, उलट ते सुधारित आवृत्ती तयार करण्याच्या कामाला लागले आणि दोन वर्षांत त्यांनी हे काम पूर्णही केले. बुडनी यांचे ग्रीक शास्त्रवचनांचे भाषांतर याआधीच्या पोलिश भाषांतरकारांनी केलेल्या भाषांतरापेक्षा श्रेष्ठ होते. शिवाय, त्यांनी बऱ्‍याच ठिकाणी मूळ भाषेप्रमाणे यहोवा हे नाव घातले.

सोळाव्या शतकाच्या शेवटी आणि सतराव्या शतकाच्या सुरवातीच्या तीन दशकांत पोलिश बांधवांच्या पंथाचे केंद्रस्थान असलेले राकाव हे धार्मिक आणि शैक्षणिक कार्यांचे केंद्र बनले. पोलिश बांधवांच्या पंथाचे मुख्य पुढारी आणि लेखक येथे निरनिराळ्या हस्तपत्रिका आणि स्वतःची लिखाणे प्रकाशित करत.

शिक्षणाला बढावा दिला

राकाव येथे १६०० साली मुद्रणालय सुरू करण्यात आले तेव्हापासून पोलिश बांधव पंथाचे प्रकाशन कार्य अधिकच वाढले. या मुद्रणालयात अनेक भाषांतून संक्षिप्त शोधनिबंधांपासून मोठमोठे ग्रंथ देखील तयार करता यायचे. पाहता पाहता राकाव येथील मुद्रणालयाला युरोपातल्या सर्वोत्तम मुद्रणालयांच्या बरोबरीचे समजले जाऊ लागले. म्हणतात की पुढच्या ४० वर्षांत येथे जवळजवळ २०० प्रकाशने मुद्रित करण्यात आली. या प्रकाशनांसाठी लागणारा उत्तम दर्जाचा कागद जवळच असलेल्या (पोलिश बांधवाच्याच मालकीच्या) एका पेपर मिलमधून पुरवला जायचा.

पोलिश बांधव पंथियांना लवकरच जाणीव झाली की त्यांच्या पंथाच्या सदस्यांना आणि इतरांनाही शिक्षण मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानुसार, त्यांनी १६०२ साली राकाव विद्यापीठाची स्थापना केली. पोलिश बांधव पंथातील सदस्यांची मुले आणि कॅथलिक व प्रोटेस्टंट मुले देखील येथे शिकायला येऊ लागली. हे मुळात धर्मशास्त्रीय शिक्षण देणारे विद्यापीठ असले तरीसुद्धा धर्माशिवायही बऱ्‍याच विषयांचे शिक्षण येथे दिले जात होते. परदेशी भाषा, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, कायदा, तर्कशास्त्र, निसर्गशास्त्र, गणित, वैद्यकीय शास्त्र आणि जिम्नॅस्टिक्स यांसारखे विषय अभ्यासक्रमात होते. विद्यापीठात प्रशस्त ग्रंथालय होते आणि स्वतःचेच मुद्रणालय असल्यामुळे त्यात ग्रंथांची भर पडतच गेली.

सतरावे शतक संपत आले तोपर्यंत असे वाटू लागले होते की पोलिश बांधवांचा पंथ असाच उन्‍नती करत राहील. पण घडले निराळेच.

चर्च आणि सरकारचा कडवा विरोध

पोलिश अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य झ्बीगनेव ऑगोनॉफस्की खुलासा करतात: “सतराव्या शतकाची तीन दशके उलटल्यावर पोलंडमध्ये एरियन पंथियांचे अस्तित्व जास्तच धोक्यात येऊ लागले.” कारण कॅथलिक चर्च आपला विरोध अधिकाधिक स्पष्टपणे व्यक्‍त करू लागले होते. पाळकवर्गाने पोलिश बांधव पंथाची बरीच निंदानालस्ती केली; त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी मिळेल तो मार्ग अवलंबण्यास ते तयार होते. आणि पोलंडचे राजकीय दृश्‍य आता बदलले असल्यामुळे त्यांचे काम अनायासे सोपे झाले होते. व्हासा घराण्याचा राजा तिसरा सिगिस्मंड हा पोलंडचा नवा राजा पोलिश बांधव पंथाचा वैरी होता. त्याच्यानंतर गादीवर आलेल्या व्हासा घराण्याच्याच दुसरा जॉन कॅझिमिर याने देखील पोलिश बांधव पंथाचे खच्चीकरण करण्याच्या कॅथलिक चर्चच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला.

त्यात राकाव विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांनी क्रॉसच्या प्रतिमेची हेतूपुरस्सर विटंबना केल्याचा आरोप करण्यात आला तेव्हा तर प्रकरण अगदीच विकोपाला गेले. पोलिश बांधव पंथाच्या मुख्य केंद्राचा नाश करण्यासाठी या घटनेचे निमित्त झाले. राकाव विद्यापीठाच्या मालकांना कायदेमंडळाच्या न्यायसमितीपुढे आणण्यात आले आणि राकाव विद्यापीठ व येथील मुद्रणालयाला साहाय्य पुरवण्याद्वारे ‘अधार्मिक तत्त्वांचा प्रसार’ करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. पोलिश बांधव पंथाचे सदस्य देशद्रोही आहेत, ते चैनबाजी करतात आणि ते अनैतिक जीवन जगतात असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले. कायदेमंडळाने राकाव विद्यापीठ बंद करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, पोलिश बांधव पंथाच्या मालकीचे मुद्रणालय व चर्च नष्ट करण्यात यावे असेही ठरवण्यात आले. पंथाच्या सर्व सदस्यांना शहर सोडण्याचा हुकूम देण्यात आला. विद्यापीठात शिकवणाऱ्‍या प्राध्यापकांनी देश सोडून जावे अन्यथा मृत्यूदंड दिला जाईल असे जाहीर करण्यात आले. पोलिश बांधव पंथाचे काही सदस्य सिलेसिया आणि स्लोव्हाकिया यांसारख्या सुरक्षित ठिकाणी जाऊन राहू लागले.

सोळाशे अठ्ठावन्‍न साली कायदेमंडळाने जाहीर केले की पोलिश बांधव पंथाच्या सदस्यांनी तीन वर्षांच्या आत आपली सगळी संपत्ती विकावी आणि देश सोडून जावे. नंतर ही मुदत कमी करून दोन वर्षे करण्यात आली. या मुदतीनंतर कोणी पोलिश बांधव पंथाच्या विश्‍वासांचे पालन करताना आढळल्यास, त्या व्यक्‍तीला मृत्यूदंड देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.

काही सोकीनियन अनुयायी नेदरलँड्‌स येथे येऊन स्थायिक झाले आणि तेथे त्यांनी आपले प्रकाशन सुरू ठेवले. ट्रान्सिलव्हेनिया येथे १८ व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत पोलिश बांधव पंथाची एक काँग्रीगेशन (मंडळी) होती. आठवड्यांतून तीन वेळा त्यांच्या सभा व्हायच्या; यांत भजने गायली जायची, उपदेश दिले जायचे आणि पंथाच्या शिकवणुकींचे संक्षिप्त वर्णन असलेल्या एका ग्रंथातून वाचन केले जायचे. काँग्रीगेशनमध्ये अनुचित प्रकारांचा शिरकाव होऊ नये म्हणून गैरवर्तन करणाऱ्‍या पंथाच्या सदस्यांना सुधारणुकीचा सल्ला दिला जायचा, ताकीद दिली जायची आणि तशी वेळ आल्यास बहिष्कृतही केले जायचे.

पोलिश बांधव पंथाचे सदस्य देवाच्या वचनाचे अभ्यासक होते. देवाच्या वचनातून त्यांना काही अनमोल सत्ये कळून आली व ती त्यांनी मोठ्या उत्सुकतेने इतरांनाही सांगण्याचा प्रयत्न केला. पण कालांतराने, पंथाचे सदस्य सबंध युरोपात वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेले आणि यामुळे समान विश्‍वास टिकवून ठेवणे कठीण होत गेले. काळाच्या ओघात पोलिश बांधव पंथ नामशेष झाला.

[तळटीपा]

^ परि. 5 एरियस (सा.यु.२५०-३३६) हा ॲलेक्झांड्रियन पंथाचा पाळक होता व त्याचे असे म्हणणे होते की येशू हा देव पित्यापेक्षा कनिष्ठ आहे. त्याच्या या मताचे सा.यु. ३२५ साली झालेल्या नयसियन धर्मसभेत खंडन करण्यात आले.—सावध राहाच्या! जून २२, १९८९ इंग्रजी अंकातील पृष्ठ २७ वर पाहा.

^ परि. 9 सावध राहाच्या! नोव्हेंबर २२, १९८८ इंग्रजी अंकातील पृष्ठ १९ वर “सोकीनियन पंथ—त्रैक्याच्या विरोधात का होता?”

[२३ पानांवरील चित्र]

एका सोकीनियन पाळकाच्या मालकीचे घर

[२३ पानांवरील चित्र]

वरती: आजचे राकाव; उजवीकडे १६५० साली ‘एरियन पंथाचे’ नामोनिशाण मिटवण्याच्या हेतूने स्थापित केलेले मठ; खाली: पोलिश बांधव पंथियांशी मुद्दाम संघर्ष सुरू करण्यासाठी कॅथलिक पाळकवर्गाने या क्रॉसची प्रस्थापना केली होती

[२१ पानांवरील चित्राचे श्रेय]

Title card of Biblia nieświeska by Szymon Budny, १५७२