व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल काय म्हणतं?

जुगाराबद्दल देवाला काय वाटतं?

जुगाराबद्दल देवाला काय वाटतं?

काहींना वाटतं जुगार हा निव्वळ करमणुकीचा एक प्रकार आहे, तर काहींना वाटतं ते एक जीवघेणं व्यसन आहे.

जुगार खेळण्यात गैर काय?

लोक काय म्हणतात?

अनेकांना वाटतं, की कायदेशीर जुगार खेळण्यात काहीच गैर नाही. कारण सरकारमान्य लॉटरीसारख्या जुगारातून मिळणारा पैसा जनतेच्या हितासाठी वापरला जातो.

बायबल काय म्हणतं?

बायबलमध्ये कुठंच जुगाराचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पण, त्यात अशी बरीच तत्त्वं देण्यात आली आहेत ज्यांवरून जुगाराबद्दल देवाला काय वाटतं हे लक्षात येतं.

जुगार खेळणाऱ्याचा प्रामुख्यानं दुसऱ्याच्या पैशावर डोळा असतो. पण, ही गोष्ट बायबलमध्ये दिलेल्या इशाऱ्याच्या अगदी उलट आहे. बायबल म्हणतं: “सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा.” (लूक १२:१५) खरंतर, लोभामुळंच जुगार खेळण्याच्या प्रवृत्तीला खतपाणी मिळतं. जुगार कंपन्या मोठमोठ्या जॅकपॉटच्या जाहिराती करतात, पण त्यातले धोके मात्र लपवतात; कारण त्यांना माहीत असतं, की श्रीमंत होण्याच्या स्वप्नापायी लोक कसिनोमध्ये वाट्टेल तितका पैसा लावायला तयार असतात. लोभापासून रक्षण होण्याऐवजी जुगारामुळं माणसात आयता पैसा मिळवण्याची हाव निर्माण होते.

जुगाराच्या मुळाशी स्वार्थी हेतू दडलेला असतो. तो म्हणजे, दुसऱ्यांनी हरलेला पैसा जिंकणं. पण, बायबल असं म्हणतं, की “कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचेही पाहावे.” (१ करिंथकर १०:२४) तसंच, देवानं दिलेल्या आज्ञांपैकी एक आज्ञा अशी आहे: “तू आपल्या शेजाऱ्याच्या . . . मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नकोस.” (निर्गम २०:१७, ईझी टू रीड व्हर्शन) कसंही करून जिंकायचं अशी जिद्द बाळगणारा जुगारी एका अर्थी हीच आशा करत असतो की इतरांनी हरावं जेणेकरून त्यांचा पैसा त्याच्या खिशात जाईल.

भाग्यात असेल तर पैशाचा पाऊस पडेल असा विश्वास ठेवून लोक जुगार खेळतात. पण बायबल असा इशारा देतं, की नशिबावर विश्वास ठेवणं साफ चुकीचं आहे. प्राचीन इस्राएलमध्ये असे काही लोक होते जे “गादासाठी (भाग्यदेवतेसाठी) मेजवानी तयार” करायचे. पण देवाला ते आवडलं का? नाही. तो त्यांना म्हणाला: “माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.”—यशया ६५: ११, १२.

हे खरं आहे, की काही देशांत कायदेशीर जुगारातून मिळणारा पैसा शिक्षणासाठी, अर्थविकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी वापरला जातो. पण हा पैसा मुळात लोभ, स्वार्थ आणि आयत्या धनाची लालसा यातून मिळवलेला असतो ही गोष्ट मात्र नाकारता येत नाही.

“तू आपल्या शेजाऱ्याच्या . . . मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नकोस.”निर्गम २०:१७.

जुगाराचे परिणाम

बायबल काय म्हणतं:

बायबल इशारा देतं: “जे श्रीमंत होऊ पाहतात ते मोहात आणि सापळ्यात व अती मूर्खपणाच्या आणि हानिकारक वासनांच्या आहारी जाऊन नाश पावतात.” (१ तीमथ्य ६:९, ईझी टू रीड व्हर्शन) जुगाराचं मूळ कारण म्हणजे लोभ. “लोभ” इतका वाईट आहे की बायबलमध्ये त्याचा उल्लेख अशा गोष्टींमध्ये करण्यात आला आहे ज्या आपण टाळल्याच पाहिजेत.—इफिसकर ५:३.

जुगार म्हणजे आयता पैसा. त्यामुळं साहजिकच लोकांच्या मनात पैशाची हाव निर्माण होते. पण बायबल असं सांगतं की पैशाची हाव “सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे.” पैशाची हाव इतकी वाढत जाते की एका व्यक्तीला पैशाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. त्यामुळं तिच्या मनावर प्रचंड दडपण येतं आणि देवाला ती विसरून जाते. पैशाच्या लोभाला बळी पडलेल्यांबद्दल बायबल म्हणतं की ते एका अर्थी “स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून” घेतात.—१ तीमथ्य ६:१०.

लोभ हा माणसाला कधीच तृप्त करत नाही. कितीही पैसा असला तरी माणसाला तो कमीच वाटतो आणि त्यामुळं तो जीवनातला आनंद गमावून बसतो. बायबल म्हणतं ते किती खरं आहे: “ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही.”—उपदेशक ५:१०.

जुगाराकडे ओढले जाणारे लक्षावधी लोक अगदी नकळत त्याच्या महाजालात अडकतात. जुगाराचं हे जाळं जगभर पसरलं आहे! अहवालांवरून दिसून येतं, की एकट्या अमेरिकेतच लाखो लोक जुगाराच्या आहारी गेले आहेत.

बायबलचं एक वचन म्हणतं: “[“लोभाने,” NW] मिळवलेल्या धनाचा शेवट कल्याणकारक होत नाही.” (नीतिसूत्रे २०:२१) जुगारामुळं कित्येक जण कर्जबाजारी किंवा कंगाल झाले आहेत; त्यांची नोकरी सुटली आहे, कुटुंबं विस्कळीत झाली आहेत आणि मित्र दुरावले आहेत. असे असंख्य परिणाम जुगारामुळं भोगावे लागतात. पण, बायबलच्या तत्त्वांचं पालन केल्यानं या दुष्परिणामांपासून एका व्यक्तीचं संरक्षण होऊन तिचं जीवन सुखी होऊ शकतं.

“जे श्रीमंत होऊ पाहतात ते मोहात आणि सापळ्यात व अती मूर्खपणाच्या आणि हानिकारक वासनांच्या आहारी जाऊन नाश पावतात.”१ तीमथ्य ६:९.▪ (g15-E 03)