व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतके नियम कशाला?

इतके नियम कशाला?

तरुण लोक विचारतात . . .

इतके नियम कशाला?

“अमक्या वेळेतच घरात आलं पाहिजे, हे वेळेचं बंधन माझ्यावर लादलं जायचं तेव्हा माझं डोकचं फिरायचं! दुसऱ्‍या मुलांना उशिरापर्यंत बाहेर राहायची परवानगी होती, मला नव्हती. हे पाहून मला खूप राग यायचा.”—ॲलन.

“तुमच्या सेलफोनची सतत तपासणी होत असते ना, तेव्हा खूप राग येतो. मला वाटतं जसं काय मी लहान बाळचं आहे!”—एलिझबेथ.

घरात खूप नियम आहेत बुवा, असे कधी तुम्हाला वाटले आहे का? तुम्ही कधी घरात काही न सांगता बाहेर पडायचा प्रयत्न केला आहे का? किंवा मग आईवडिलांना तुमच्या एखाद्या कृत्याविषयी खोटे बोलला आहात का? या प्रश्‍नांची होय अशी उत्तरे असतील तर तुमच्या भावना या किशोरवयीन मुलीसारख्या आहेत जिने आपल्या आईबाबांविषयी म्हटले, की ते आपल्याला जास्तच जपतात. ती पुढे म्हणते: ‘त्यांनी मला थोडीतरी मोकळीक दिली पाहिजे!’

तुमच्या पालकांनी कदाचित घरात तुमच्यासाठी काही नियम बनवले असतील. हे नियम, गृहपाठ, घरातील लहानमोठी कामे करण्याविषयी असतील; आणि किती वेळ फोन वापरला पाहिजे, किती वेळ टीव्ही पाहिला पाहिजे किंवा कंप्युटर वापरला पाहिजे, याविषयी काही बंधने असतील. हे नियम कदाचित फक्‍त घरापुरतेच नसतील तर घरातून बाहेर पडल्यावर म्हणजे शाळेत कसे वागायचे, कोणत्या मुलांबरोबर मैत्री करायची याबाबतीत देखील असतील.

पुष्कळ तरुण मुले पालकांनी बनवलेले नियम तोडतात. एका अभ्यासात मुलाखत घेतलेल्या जवळजवळ दोन तृतीयांश तरुणांनी म्हटले, की घरातील नियम तोडल्याबद्दल त्यांना शिक्षा देण्यात आली होती. सहसा शिक्षा देण्यामागचे हेच एक कारण असायचे.

परंतु पुष्कळ तरुण हेही कबूल करतात की गोंधळ टाळण्यासाठी काही नियमांची आवश्‍यकता ही असतेच. परंतु, जर घरात नियम असले पाहिजेत तर मग त्यांतील काही नियम नकोसे का वाटतात? आणि तुमच्या पालकांनी बनवलेले नियम बंधनकारक आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर या नियमांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन बदलून तुम्ही जीवन सुखकारक कसे बनवू शकता?

“मी आता कुकुलं बाळ नाहीए”!

“मी आता कुकुलं बाळ नाहीए. त्यांनी मला थोडीतरी मोकळीक दिली पाहिजे, हे मी माझ्या आईबाबांना कसं सांगू?” असे एमीली नावाची एक किशोरवयीन विचारते. तुम्हाला कधी एमीलीसारखे वाटले आहे का? तिच्याप्रमाणे तुम्हालाही नियमांचा राग येत असावा कारण तुम्हाला अजूनही लहान बाळासारखे वागवले जाते, असे तुम्हाला वाटत असेल. परंतु तुमच्या आईवडिलांचा याबाबत वेगळा दृष्टिकोन असेल. कदाचित त्यांना वाटत असेल, की या नियमांमुळे तुमचे संरक्षण होईल आणि पुढे प्रौढ झाल्यावर तुमच्यावर जेव्हा जबाबदाऱ्‍या येतील तेव्हा तुम्ही त्या पेलण्यास तयार असाल.

तुम्हाला काही प्रमाणात मोकळीक असली तरीसुद्धा, तुमच्या वयोमानानुसार तुम्हाला जितकी मोकळीक दिली पाहिजे तितकी दिली जात नाही, असे तुम्हाला वाटेल. त्यातल्या त्यात तुमच्या बहिणीला अथवा भावाला काहीशी मोकळीक दिलेली असेल तर तुम्हाला आणखीनच राग येत असावा. मार्सी नावाची एक तरुणी म्हणते: “मी १७ वर्षांची आहे. तरीपण, मला संध्याकाळी घरात लवकर यायला सांगितलं जातं. मी काहीही चूक केली तर मला लगेच शिक्षा दिली जाते. आणि तेच, माझा भाऊ जेव्हा माझ्या वयाचा होता तेव्हा त्याला घरात किती वेळेत यायचं त्याबद्दल कसलीही बंधनं नव्हती, त्याला कधी शिक्षा व्हायची नाही.” आपल्या किशोरवयाची आठवण करीत मॅथ्यू आपल्या लहान बहिणीविषयी आणि आतेबहिणीविषयी बोलताना म्हणाला: “या मुलींनी काहीही केलं ना, तरी चालतं!”

नियम नसलेलं घर?

आपण कधी एकदाचे या नियमांतून सुटून आपल्या मर्जीनुसार जीवन जगू, असा कदाचित तुम्ही विचार करत असाल. पण नियमांविना तुम्ही खरोखरच यशस्वी होऊ शकाल का? तुम्ही कदाचित तुमच्या वयाच्या अशा काही तरुणांना ओळखत असाल ज्यांना, त्यांना हवा तितका वेळ रात्री उशीरापर्यंत बाहेर राहण्याची, त्यांना हवे ते कपडे घालण्याची, कधीही आणि कुठेही आपल्या मित्रांबरोबर जाण्याची परवानगी आहे. कदाचित या मुलांच्या आईवडिलांना, आपली मुले काय करत आहेत याकडे लक्ष देण्याची फुरसत नाही. परंतु, अशाप्रकारे मुलांचे संगोपन करणे हे यशस्वी ठरलेले नाही. (नीतिसूत्रे २९:१५) तुम्ही जगात, प्रेमाचा अभाव असल्याची मनोवृत्ती पाहता ती अशा लोकांमध्ये असते जे बहुतांशी स्वार्थी असतात. यांपैकी पुष्कळ लोक अशा घरात लहानाचे मोठे झालेले असतात जेथे कसलीच बंधने अथवा नियम नव्हते.—२ तीमथ्य ३:१-५.

आज कदाचित तुम्हाला नियम नकोसे वाटतील, पण एक ना एक दिवशी, याच नियमांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. अलीकडे, काही तरुण प्रौढ स्त्रियांचा अभ्यास करण्यात आला ज्या, कसलेही नियम नसलेल्या किंवा पालकांचे लक्ष नसलेल्या घरात लहानाच्या मोठ्या झाल्या. या स्त्रियांतील एकीनेही, घरात नियम नसण्याविषयी सकारात्मक उद्‌गार काढले नाहीत. उलट, घरात नियम न बनवणे हा, आपल्या पालकांना आपल्याविषयी कसलीही काळजी नव्हती किंवा त्यांच्यामध्ये काळजी घेण्याची कुवत नव्हती, याचा पुरावा आहे, असे त्या म्हणाल्या.

तेव्हा, ज्या मुलांना आपल्या मर्जीनुसार वागण्याची मोकळीक दिली जाते त्यांना पाहून बोटे मोडण्याऐवजी, कृपया आपल्या आईवडिलांनी घालून दिलेले नियम हे, त्यांना तुमच्यावर किती प्रेम आहे व तुमच्याविषयी किती काळजी आहे याचा पुरावा आहे, असे समजा. तुमच्यावर उचित बंधने लादण्याद्वारे तुमचे पालक यहोवा देवाचे अनुकरण करतात. यहोवा देवाने आपल्या लोकांना सांगितले: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.”—स्तोत्र ३२:८.

पण कधीकधी तुम्हाला घरातील नियम फारच कडक आहेत असे वाटेल. असे असल्यास, तुम्ही काही व्यावहारिक पावले उचलू शकता ज्यामुळे घरातील तुमचा वावर अधिक आनंददायक होऊ शकेल.

मनमोकळ्या चर्चेचे उत्तम परिणाम

तुम्हाला अधिक मोकळीक हवी असेल किंवा तुम्हाला आता जितकी मोकळीक आहे तितकी पुरेशी आहे परंतु तुम्हाला कमी मनःस्ताप हवा असेल तर यावर एकमात्र उपाय म्हणजे आपल्या आईवडिलांबरोबर मनमोकळी चर्चा करणे. ‘मी माझ्या आईबाबांबरोबर याविषयी चर्चा करायचा प्रयत्न करून पाहिला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही,’ असे काहीजण म्हणतील. तुम्हालाही जर असेच वाटत असेल तर तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘मी माझ्या बोलण्याच्या पद्धतीत सुधारणा कशी करू शकतो?’ संवाद साधल्यामुळे तुम्ही (१) तुम्हाला जे हवे ते मिळवू शकता किंवा (२) तुम्ही ज्याची विचारणा करीत आहात ते तुम्हाला का दिले जात नाही, हे चांगल्याप्रकारे समजू शकता. तुम्हाला जर मोठ्यांप्रमाणे वागणूक हवी असेल तर तुम्ही तुमच्या बोलण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे आवश्‍यक आहे.

आपल्या भावनांवर ताबा ठेवायला शिका. बायबल म्हणते: “मूर्ख आपल्या मनांतील सर्व क्रोध व्यक्‍त करितो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवितो.” (नीतिसूत्रे २९:११) मनमोकळी चर्चा म्हणजे फक्‍त तक्रार करणे नव्हे. तुम्ही जर तुमचे म्हणणे तक्रारीच्या सुरात मांडले तर तुमचे पालक तुम्हाला आणखीनच रागवतील! तेव्हा, किरकिर करायची, रागाने फुगून बसायचे आणि लहान मुलांसारखे धमक्या देण्याचे सोडून द्या. तुमचे पालक तुमच्यावर बंधने घालतात तेव्हा रागामुळे तुम्हाला कितीही जोराने दार आपटण्याचा किंवा पाय आपटण्याचा मोह झाला तरी स्वतःला आवर घाला. कारण तुमचे असे वर्तन पाहून तुमचे आईवडील कदाचित तुम्हाला मोकळीक देण्याऐवजी तुमच्यावर आणखी नियम घालतील.

आपल्या पालकांच्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करा. एक-पालक कुटुंबात वाढलेल्या ट्रेसी नावाच्या एका ख्रिस्ती तरुणीला याचा फायदा झाला आहे. ती स्वतःला विचारते: “‘हे असे नियम घालण्याद्वारे माझी आई नेमकं काय साध्य करायचा प्रयत्न करतेय?’ ती मला एक चांगली व्यक्‍ती बनवण्याचा प्रयत्न करतेय.” (नीतिसूत्रे ३:१, २) अशाप्रकारे आपल्या आईवडिलांना असलेली काळजी समजून घेतल्यामुळे तुम्हाला तुमचा दृष्टिकोन त्यांना समजावून सांगायला सोपे जाईल. जसे की, ते कदाचित तुम्हाला एखाद्या पार्टीला जाऊ देण्यास कचरत असतील. तर त्यांच्याबरोबर वाद घालत बसण्यापेक्षा तुम्ही असे विचारू शकता, “माझ्याबरोबर कोणी प्रौढ, विश्‍वासू मित्र आल्यास तुम्ही मला जाऊ द्याल का?” तुमचे आईवडील नेहमीच तुमच्या विनंत्या पूर्ण करणार नाहीत. पण तुम्ही जर त्यांना असलेली काळजी समजून घेतलीत तर ते मान्य करतील अशी एखादी गोष्ट सुचवण्याची संधी मिळेल.

तुमच्या पालकांचा आत्मविश्‍वास संपादन करा. आपल्या आईवडिलांचा आत्मविश्‍वास संपादन करणे हे, बँकेच्या खात्यात पैसा जमा करण्यासारखे आहे. तुम्ही पूर्वी खात्यात जितके जमा केले आहे तेवढेच काढू शकता. खात्यात जमा केलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम काढायचा प्रयत्न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल आणि पुष्कळ वेळा खात्यातून पैसे काढायचा प्रयत्न केल्यास तुमचे खातेच एकदा बंद करण्यात येईल. एक ज्यादा सुहक्क मिळणे हे, खात्यातून पैसे काढण्यासारखे आहे; त्यामुळे तुम्ही जर आधी जबाबदार व्यक्‍तीप्रमाणे वागला असाल तरच तुम्हाला परवानगी मिळू शकेल.

वाजवी अपेक्षा बाळगा. पालकांना आपल्या पाल्यावर उचित प्रमाणात ताबा ठेवावा लागतो. त्यामुळे, बायबल ‘बापाच्या आज्ञांविषयी’ आणि ‘आईच्या शिस्तीविषयी’ सांगते. (नीतिसूत्रे ६:२०) तरीपण, घरातील नियमांमुळे तुमचे आयुष्य बरबाद होईल असे तुम्हाला वाटण्याची गरज नाही. उलट, तुम्ही जर तुमच्या पालकांच्या आज्ञेत राहिलात तर यहोवा असे वचन देतो, की पुढे तुमचेच “कल्याण” होईल.—इफिसकर ६:१-३. (g १२/०६)

“तरुण लोक विचारतात . . . ” मालिकेतील आणखी लेख www.watchtower.org/ype या संकेतस्थळावर तुम्हाला सापडतील

विचार मंथन

◼ कोणते नियम तुम्हाला जास्त कठीण वाटतात?

◼ या लेखातील कोणते मुद्दे तुम्हाला, पालकांनी बनवलेल्या नियमांचे यशस्वीरीत्या पालन करण्यास मदत करू शकतील?

◼ तुम्ही आपल्या पालकांचा होता होईल तितका भरवसा कसा संपादन करू शकाल?

[११ पानांवरील चौकट/चित्रे]

एखादा नियम तोडला जातो तेव्हा

हे दृश्‍य तुमच्या परिचयाचे असेल: तुम्ही ठरलेल्या वेळेचे उल्लंघन केले आहे, तुम्हाला दिलेले काम केले नाही किंवा फोनवर तुम्हाला जितका वेळ बोलायची परवानगी होती त्याच्यापेक्षा जास्त वेळ खर्च केलात. आता याचे स्पष्टीकरण तुम्हाला तुमच्या आईबाबांना द्यायचे आहे. ही नाजूक घडी तुम्ही आणखी बिकट होण्यापासून कशी रोखू शकता?

खरं बोला. आपल्या आईवडिलांना थापा मारण्याची ही वेळ नाही. जे झालं ते अगदी खरं खरं व सविस्तर सांगा. (नीतिसूत्रे २८:१३) तुम्ही जर थापा मारत राहिलात तर, तुमच्या आईवडिलांचा तुमच्यावर होता नव्हता तितकाही भरवसा निघून जाण्याची शक्यता आहे. स्वतःचं म्हणणं खरं करण्याचा किंवा नेमकं काय झालं होतं ते कमी करून सांगायचा प्रयत्न करू नका. “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते,” ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा.—नीतिसूत्रे १५:१.

क्षमा मागा. आईवडिलांना तुमच्यामुळे झालेली चिंता, निराशा किंवा ज्यादा कामाबद्दल तुम्हाला वाईट वाटले हे बोलून दाखवणे उचित आहे व यामुळे तुमची शिक्षा देखील कमी होऊ शकेल. (१ शमुवेल २५:२४) परंतु तुम्हाला मनापासून वाईट वाटले पाहिजे, दिखावा नको.

परिणाम स्वीकारा. तुम्ही प्रथम, तुम्हाला झालेल्या शिक्षेविषयी वाद घालाल; तुम्हाला झालेली शिक्षा ही तुमच्या चुकीपेक्षा जास्त होती असे कदाचित तुम्हाला वाटेल. (नीतिसूत्रे २०:३) परंतु, आपल्या चुकांची जबाबदारी स्वीकारणे हे परिपक्वतेचे एक लक्षण आहे. (गलतीकर ६:७) इथून पुढे तुम्ही आपल्या पालकांचा आत्मविश्‍वास पुन्हा संपादन करण्याचा प्रयत्न करू शकता.

[१२ पानांवरील चित्र]

आपल्या पालकांच्या चिंता समजण्याचा प्रयत्न करा