व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रोगमुक्‍त जग

रोगमुक्‍त जग

रोगमुक्‍त जग

“सर्व लोकांना मूलभूत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकरता सर्व देशांनी एकजूट होऊन सहकार्याने व सेवाभावाने प्रयत्न केले पाहिजेत कारण कोणत्याही एका देशातील लोकांचे आरोग्य सुधारणे हे इतर सर्व देशांशी संबंधित व त्यांच्या फायद्याचे आहे.”—अल्मा-अता घोषणापत्रक, सप्टेंबर १२, १९७८.

पंचवीस वर्षांआधी, पृथ्वीच्या पाठीवर सर्वांना मूलभूत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे काहींना साध्य करण्याजोगे ध्येय वाटत होते. सध्याच्या कझाकस्तानातील अल्मा अता शहरात झालेल्या मूलभूत आरोग्य सेवा या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या प्रतिनिधींनी, सन २००० सुरू होण्याआधी सर्व मानवांना प्रमुख संसर्गजन्य रोगांविरुद्ध प्रतिबंधक लशी देण्याचा संकल्प केला. तसेच हे वर्ष सुरू होण्याच्या आत पृथ्वीवर सर्वांना स्वच्छतेच्या मूलभूत सवलती आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचीही योजना होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी या घोषणापत्रकावर स्वाक्षऱ्‍या केल्या.

ध्येय निश्‍चितच उदात्त होते पण त्यानंतर जे घडले ते मात्र निराशाजनक आहे. मूलभूत आरोग्य सेवा सर्वांना उपलब्ध आहे असे आज निश्‍चितच म्हणता येणार नाही, शिवाय, संसर्गजन्य रोग अजूनही पृथ्वीवरील कोट्यवधी लोकांना भेडसावतात. आणि हे जीवघेणे रोग सहसा मुलांचा तसेच प्रौढांचा ऐन उमेदीच्या काळात बळी घेतात.

एड्‌स, टीबी व मलेरिया या तीन घातक रोगांच्या भीतीनेही विविध देशांना “एकजूट होऊन सहकार्याने” प्रयत्न करण्यास प्रवृत्त केलेले नाही. अलीकडेच एड्‌स, टीबी व मलेरिया या रोगांशी सामना करण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या जागतिक निधीकरता सरकारांना ६१,००० कोटी रुपये देण्याचे आवाहन करण्यात आले. पण २००२ सालच्या उन्हाळ्यापर्यंत केवळ ९,४०० कोटी रुपये देऊ करण्यात आले होते; विशेष म्हणजे, त्याच वर्षी लष्करावरती ३२,९०,००० कोटी रुपये खर्च करण्यात आले! दुःखाची गोष्ट आहे की आजच्या विभाजित जगात, मानवजातीला भेडसावणाऱ्‍या अशा फार कमी गोष्टी आहेत ज्या सर्वांच्या कल्याणाकरता, सर्व राष्ट्रांना एकत्र आणू शकतील.

उत्तम हेतू असूनही, संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यात आरोग्य अधिकारी स्वतःच हतबल आहेत. सरकार आवश्‍यक निधी पुरवण्यास तयार नाही. रोगजनक सूक्ष्मजंतू बऱ्‍याच औषधांना प्रतिरोधी बनले आहेत. त्यात लोक आपली धोकेदायक जीवनशैली बदलायला तयार नाहीत. शिवाय गरिबी, युद्ध आणि दुष्काळ यांसारख्या स्थानिक समस्यांमुळे, रोगजनक जंतूंना कोट्यवधी मानवांच्या शरीरात घर करण्याकरता सुलभ मार्ग तयार झाला आहे.

आपल्या आरोग्याविषयी देवाला काळजी

उपाय आहे. मानवजातीच्या आरोग्याविषयी यहोवा देवाला कळकळ आहे हे दाखवणारा स्पष्ट पुरावा आपल्याजवळ आहे. आपली रोगप्रतिबंधक यंत्रणा याचे एक उत्तम उदाहरण आहे. तसेच, प्राचीन इस्राएल राष्ट्राला यहोवाने जे अनेक नियम घालून दिले होते ते देखील दाखवतात की संसर्गजन्य रोगांपासून त्यांचे संरक्षण करण्याची त्याची इच्छा होती. *

आपल्या स्वर्गीय पित्याचे व्यक्‍तिमत्त्व प्रतिबिंबित करणाऱ्‍या येशू ख्रिस्तानेही, रोगाने पीडित असलेल्यांबद्दल कणव व्यक्‍त केली. मार्कच्या शुभवृत्तात, येशू ख्रिस्ताला एक कुष्टरोगी भेटल्याचे वर्णन आहे. तो कुष्टरोगी येशूला म्हणतो, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.” त्या माणसाला होत असलेल्या पीडा व यातनांची जाणीव होऊन येशूला त्याचा कळवळा येतो. तो त्याला म्हणतो, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”—मार्क १:४०, ४१.

येशूने केवळ काही मोजक्याच लोकांचे रोग बरे केले नाहीत. शुभवर्तमानकार मत्तय लिहितो की येशू “सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालीलभर फिरला.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ४:२३) त्याच्या चमत्कारांमुळे केवळ यहुदिया व गालीलातल्याच लोकांना फायदा झाला नाही. तर, ज्याविषयी येशूने प्रचार केला ते देवाचे राज्य आपल्या सर्व विरोधकांचा नाश केल्यावर मानवजातीवर राज्य करील तेव्हा कशाप्रकारे सर्व प्रकारचे आजार कायमचे नाहीसे होतील याची आपल्यालाही पूर्वझलक त्याच्या चमत्कारांमुळे मिळाली.

जागतिक आरोग्य एक अशक्य स्वप्न नव्हे

बायबल आपल्याला आश्‍वासन देते की जगातील सर्व लोकांना आरोग्य प्राप्त होणे हे एक अशक्य स्वप्न नाही. प्रेषित योहानाने अशा एका भावी काळाविषयी दृष्टान्त पाहिला, की जेव्हा ‘देवाचा मंडप मनुष्यांजवळ असेल.’ देवाच्या या कृतीमुळे, ‘मरण, शोक, रडणे व कष्ट ही राहणार नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेलेल्या असतील.’ हे आश्‍चर्य वास्तवात कधी घडणारच नाही असे तुम्हाला वाटते का? पुढील वचनात स्वतः देव म्हणतो: “ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.”—प्रकटीकरण २१:३-५.

अर्थात, गरिबी, दुष्काळ व युद्ध यांचा अंत झाल्याशिवाय रोगराईचा अंत होणे शक्य नाही कारण ही संकटेच सहसा संसर्गजन्य रोगजंतूंना पोसतात. म्हणूनच यहोवाने हे मोठे कार्य आपल्या राज्यावर अर्थात ख्रिस्ताच्या शासनाखालील स्वर्गीय सरकारावर सोपवले आहे. लाखो उपासक हे सरकार यावे अशी कळकळीची प्रार्थना करीत आहेत. तेव्हा ते निश्‍चितच येईल आणि देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण करील.—मत्तय ६:९,१०.

पण देवाचे हे राज्य केव्हा येईल? या प्रश्‍नाचे उत्तर देताना येशूने जगामध्ये घडणाऱ्‍या अनेक घटनांची मालिका सांगितली; या घटना घडतील तेव्हा ते एक चिन्ह असेल की लवकरच देवाचे राज्य कारवाई करणार आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांपैकी एक म्हणजे, “जागोजाग मऱ्‍या येतील.” (लूक २१:१०, ११; मत्तय २४:३,) “मऱ्‍या” असे भाषांतर केलेला ग्रीक शब्द “कोणत्याही प्राणघातक संसर्गजन्य रोगास” सूचित करतो. वैद्यकीय शास्त्राने बरीच प्रगती केली असूनही, २० व्या शतकात निश्‍चितच कित्येक भयंकर मऱ्‍यांनी जगात हैदोस घातला.—“१९१४ पासून मऱ्‍यांनी घेतलेले बळी” या शीर्षकाची चौकट पाहा.

शुभवर्तमानातील येशूच्या शब्दांशी मिळतीजुळती माहिती देणारी प्रकटीकरणाच्या पुस्तकातील एक भविष्यवाणी अनेक घोडेस्वारांविषयी सांगते. येशू ख्रिस्त स्वर्गात सत्ता हाती घेईल तेव्हा हे घोडेस्वार त्याच्यासोबत स्वारी करतील. यांपैकी चवथा घोडेस्वार ‘फिकट रंगाच्या घोड्यावर’ स्वार असून तो ‘प्राणघातक मरी’ घडवून आणतो. (प्रकटीकरण ६:२, ४, ५,; NW) १९१४ पासून काही मुख्य संसर्गजन्य रोगांमुळे दगावलेल्या लोकांची संख्या पाहिल्यास पूर्ण खात्री होते की हा लाक्षणिक घोडेस्वार निश्‍चितच स्वारी करत आहे. ‘प्राणघातक मरीमुळे’ सबंध जगातील लोकांना पीडा सहन कराव्या लागतात हा देवाचे राज्य जवळ आले असल्याचा आणखी एक पुरावा आहे. *मार्क १३:२९.

संसर्गजन्य रोगांची लाट काही दशकांपर्यंत थोपवून धरण्यास वैद्यकीय शास्त्राला यश आले असले तरीसुद्धा, एक नवी लाट उसळण्याच्या बेतात आहे. निश्‍चितच, ईश्‍वराच्या मदतीशिवाय ही समस्या कायमची सोडवणे मानवांना शक्य नाही. पण आनंदाची गोष्ट म्हणजे आपला निर्माणकर्ता अगदी हेच आश्‍वासन आपल्याला देतो. संदेष्टा यशया आपल्याला हमी देतो की देवाच्या राज्यात, “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” शिवाय, ‘देव मृत्यु कायमचा नाहीसा करील, प्रभु परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रु पुसेल.’ (यशया २५:८; यशया ३३:२२, २४) तो दिवस उजाडेल तेव्हा रोगराईची काळरात्र कायमची सरलेली असेल. (g०४ ५/२२)

[तळटीपा]

^ मोशेच्या नियमशास्त्रात केरकचऱ्‍याची विल्हेवाट, मलवहन, आरोग्यशास्त्र व रुग्णाला एकांतवासात ठेवणे याविषयी सूचना होत्या. डॉ. एच. ओ. फिलिप्प्सा म्हणतात, की “जीवनाच्या मूलभूत गोष्टींविषयी, तसेच रोगनिदान, उपचार व प्रतिबंधक उपाय यांसंबंधी बायबलमध्ये दिलेली माहिती ही हिप्पोक्रेटीसच्या तत्त्वांपेक्षा अधिक प्रगत व विश्‍वासार्ह आहे.”

^ देवाचे राज्य लवकरच या पृथ्वीवर येईल हे दाखवणाऱ्‍या आणखी पुराव्यांकरता सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातील ११ वा अध्याय पाहावा.

[१२ पानांवरील चौकट]

१९१४ पासून मऱ्‍यांनी घेतलेले बळी

हे आकडे अर्थातच अंदाजावर आधारित आहेत. पण तरीसुद्धा, १९१४ पासून मानवजातीला विविध रोगांनी कितपत पछाडले आहे याची चांगली कल्पना या आकड्यांवरून येते.

देवी (३० कोटी - ५० कोटींपर्यंत) देवी रोगावर परिणामकारक असा उपचार शोधून काढण्यातच आला नाही. मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय लशीकरण मोहीम राबवल्यामुळे शेवटी १९८० साली या रोगाचे निर्मूलन झाले.

टीबी (१० कोटी - १५ कोटींपर्यंत) या घडीला टीबी दर वर्षी जवळजवळ २० लाख लोकांचा बळी घेतो आणि जगातल्या तीन व्यक्‍तींपैकी एकाच्या शरीरात टीबी रोगाचे जंतू आहेत.

मलेरिया (८ कोटी - १२ कोटींपर्यंत) २० व्या शतकाच्या पूर्वार्धात मलेरिया रोगाचे वार्षिक बळी २० लाख होते. सध्या या रोगाची सर्वाधिक मृत्यूसंख्या आफ्रिकेत आढळते; येथे वर्षाला दहा लाख लोक मलेरियाने अजूनही दगावतात.

स्पॅनिश फ्लू (२ कोटी - ३ कोटींपर्यंत) काही इतिहासकारांच्या मते मृत्यूसंख्या यापेक्षा कितीतरी जास्त होती. या घातक साथीने १९१८ ते १९१९ दरम्यान म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या पाठोपाठ जगात धुमाकूळ घातला होता. मॅन ॲण्ड मायक्रोब्स या पुस्तकानुसार, “गाठींच्या प्लेगनेही इतक्या लोकांचा इतक्या अल्पावधीत बळी घेतला नव्हता.”

टायफस ज्वर (सुमारे २ कोटी) सहसा युद्धाच्या काळात या साथीचा उद्रेक झाल्याचे आढळते. पहिल्या महायुद्धानंतर आलेल्या टायफस ज्वराच्या साथीचा पूर्व युरोपातील देशांना तडाखा बसला.

एड्‌स (२ कोटींपेक्षा जास्त) ही आधुनिक विपत्ती दर वर्षी ३० लाख लोकांना मृत्यूच्या दरीत ढकलत आहे. संयुक्‍त राष्ट्रांच्या एड्‌स विरोधी कार्यक्रमाच्या चालू अंदाजांनुसार ‘मोठ्या प्रमाणात, प्रतिबंधक पावले उचलण्यात आली नाहीत व उपचारासंबधी प्रयत्न करण्यात आले नाहीत तर २००० ते २०२० या दरम्यान ६.८ कोटी लोक या रोगाने दगावतील.’

[११ पानांवरील चित्रे]

देवाच्या राज्यात यांसारख्या रोगांची कोणालाही भीती राहणार नाही

एड्‌स

मलेरिया

टीबी

[चित्राचे श्रेय]

एड्‌स: CDC; मलेरिया: : CDC/Dr. Melvin; टीबी: © २००३ Dennis Kunkel Microscopy, Inc.

[१३ पानांवरील चित्र]

येशूने सर्व प्रकारचे रोग व दुखणी बरी केली