व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पराग पीडा की चमत्कार?

पराग पीडा की चमत्कार?

पराग पीडा की चमत्कार?

ऑस्ट्रेलियातील सावध राहा! लेखकाकडून

आक्‌-छी! हा शिंकण्याचा आवाज आणि त्याचबरोबर डोळ्यांतून येणारे पाणी, डोळ्यात येणारी खाज, नाकातून गळणारे पाणी, नाकात सुटणारी खाज, ही सर्व चिन्ह-लक्षणे लक्षावधी लोकांना वसंत ऋतू आल्याची सूचना देतात. परागकण हवेत अधिक सांद्रित होत असल्यामुळे लोकांना त्यांची अलर्जी होते. बीएमजेने (पूर्वीचे ब्रिटिश मेडिकल जर्नल) अंदाज लावल्याप्रमाणे, विकसित देशांत, ६ पैकी १ व्यक्‍तीला, मोसमी परागकणांची अलर्जी होते; याला पराग ज्वर असेही म्हटले जाते. ही संख्या, वनस्पती हवेत जे असंख्य प्रमाणात पराग सोडतात त्याच्या तुलनेत बरीच कमी आहे.

शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे, की स्वीडनच्या केवळ तिसऱ्‍या दक्षिण भागातील स्प्रूस जंगलातून दर वर्षी, ७५,००० टन पराग निर्माण होतात. उत्तर अमेरिकेतील पराग ज्वरापासून पीडित लोकांकरता अभिशाप ठरलेल्या केवळ एकाच रॅगवीड वनस्पतीतून, दिवसाला दहा लाख परागकण उत्पन्‍न होऊ शकतात. रॅगवीडचे पराग हवेत, जमिनीपासून ३ किलोमीटर उंचीवर आणि ६०० किलोमीटर दूर समुद्रापर्यंत आढळले आहेत.

पण काही लोकांना परागकणांमुळे अलर्जी का होते? या प्रश्‍नाचा विचार करण्याआधी आपण परागकणांचे आणि या सूक्ष्म कणांतील आश्‍चर्यकारक रचनेचे परीक्षण करून पाहू या.

जीवनावश्‍यक सूक्ष्म कण

पराग “हे बीजी वनस्पतींच्या नर परागकोशात तयार होतात आणि वेगवेगळ्या माध्यमांद्वारे (हवा, पाणी, कीटक, इत्यादी) ते किंजमंडलावर अथवा स्त्री घटकावर पडतात व त्यांच्यामुळे फलन होते” असे दि एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका म्हणतो.

फुलझाडांमध्ये, पराग कणांचे तीन भाग असतात—शुक्रकोशिकांचे प्रकल आणि दोन संरक्षक वेष्टने. बाहेरच्या जाड अधिलेपाचे विघटन करणे अतिशय कठीण असते शिवाय ते आम्ले, अल्कली आणि उच्च तापमानही सहन करू शकते. तरीपण काही अपवाद वगळता, बहुतेक प्रकारचे पराग फक्‍त काही दिवस किंवा आठवडेच सफलक्षम होऊ शकतात. परंतु, बाह्‍य वेष्टन अर्थात अधिलेप न कुजता हजारो वर्षे टिकू शकते. म्हणूनच, पृथ्वीवरील मातीत विपुल प्रमाणात पराग कण मिळू शकतात. वास्तविक पाहता, शास्त्रज्ञांना, वेगवेगळ्या खोलींतून घेतलेल्या मातीच्या नमुन्यात आढळलेल्या पराग कणांचा अभ्यास करून पृथ्वीवरील वनस्पती जीवनाविषयी पुष्कळ काही शिकता आले आहे.

परागकणाच्या अधिलेपावरील वेगवेगळ्या रचनांमुळे वनस्पती जीवनाविषयीचा इतिहास अचूक होऊ शकतो. परागकणाच्या प्रकारानुसार, अधिलेप गुळगुळीत, सुरकुतीयुक्‍त, रचनायुक्‍त, काटेरी व गाठीयुक्‍त असू शकतो. “यामुळे, वनस्पतींची ओळख व्हावी म्हणून प्रत्येक जातीच्या वनस्पतीचा परागकण, मानवाच्या बोटांच्या ठशांप्रमाणे विश्‍वसनीय असू शकतो,” असे मानवशास्त्राचे प्राध्यापक वोन एम. ब्रायन्ट, जुनियर सांगतात.

वनस्पतींचे परागसिंचन

फुलातील केसरदलातून निघालेला परागकण स्त्री-केसराच्या टोकावर पडतो तेव्हा रासायनिक प्रक्रियेमुळे परागकण फुगतो आणि बीजकाच्या तळापर्यंत पोहंचणारी एक नलिका तयार करतो. परागकणातील शुक्रकोशिका मग या नलिकेतून बीजकापर्यंत जातात आणि तेथे फलन होऊन बीज तयार होते. बीज पक्व झाल्यावर, अंकुरणासाठी त्याला फक्‍त इष्ट वातावरणात स्थिरावण्याची गरज असते.

काही बीज-धारक वनस्पती नर अथवा स्त्री असे वाढले तरी, दोन्ही पराग आणि बीजक तयार करतात. काही वनस्पती स्वपरागण करतात; काही वनस्पती, त्याच जातीतील किंवा एखाद्या जवळच्या जातीतील वनस्पतीवर पराग पाडून परपरागण करतात. परपरागण करणाऱ्‍या वनस्पती “बहुतेकदा, त्याच जातीचे किंजल्क ग्रहणशील होण्याच्या आधी आणि नंतर आपल्या परागकणांची भुकटी उधळून स्वपरागण टाळतात,” असे ब्रिटानिका म्हणते. इतर वनस्पतींमध्ये, आवश्‍यक रासायनिक क्षमता असते ज्यामुळे त्यांना स्वतःच्या परागांमधील व त्याच जातीच्या इतर वनस्पतींच्या परागांमधील फरक जाणवतो. आपल्या परागांची ओळख झाल्यावर ते पराग नलिकेची वाढ खुंटवून परागांना वांझ करतात.

पुष्कळ वनस्पती असलेल्या ठिकाणी हवेत अनेक परागांचे मिश्रण असते. मग वनस्पती त्यांना हवे असलेले पराग कसे काय निवडतात? काही वनस्पती, वायुगतिशास्त्राच्या जटील नियमांचा उपयोग करतात. जसे की, पाईनचे उदाहरण घ्या.

वायुपरागण

पाईनच्या झाडाला पुं-शंकूंचे गुच्छ येतात आणि पक्व झाल्यावर असंख्य पराग वाऱ्‍याने पसरवले जातात. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे, की स्त्री-शंकू आणि त्यांच्या अवतीभोवती असलेली सुईसारखी पाने यांच्यातील सहकार्यामुळे, वाऱ्‍याला अशाप्रकारे दिशा मिळते जेणेकरून हवेतील पराग चक्राकार गतीने शंकूच्या प्रजोत्पादन पृष्ठावर अर्थात कुक्षीवर पडतात. शंकूची खवले एकमेकांपासून वेगळी होऊन थोडीशी उघडतात तेव्हा ग्रहणशील स्त्री-शंकूतील ही कुक्षी दिसू लागते.

संशोधक कार्ल जे. निकलस यांनी पाईनशंकूंच्या हवेतील या पराक्रमांवर विस्तृत चाचण्या केल्या. सायंटिफिक अमेरिकन नावाच्या नियतकालिकात त्यांनी असे लिहिले: “आमच्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की प्रत्येक जातीच्या वनस्पतींच्या अनोख्या आकाराच्या शंकूमुळे हवेत परागांच्या उड्डाणाच्या भिन्‍न पद्धती निर्माण झाल्या आहेत. . . . तसेच, प्रत्येक प्रकारचा पराग, भिन्‍न आकाराचा, आकृतीचा आणि घनतेचा असतो ज्यामुळे हवेच्या संपर्कात आल्यावर तो एका अनोख्या मार्गाने आपल्या इष्ट स्थळी पडतो.” या पद्धती कितपत प्रभावशाली आहेत? निकलस म्हणतात: “आम्ही अभ्यासलेल्या बहुतेक शंकूंनी इतर जातीच्या नव्हे तर ‘स्वतःच्याच’ जातीच्या परागांना हवेतून निवडले.”

अर्थात, सर्वच वनस्पती हवेत पराग उधळून परागसिंचन करीत नाहीत—हे ऐकून अलर्जीचा त्रास होणाऱ्‍यांना हायसे वाटेल! पुष्कळ वनस्पती प्राण्यांद्वारे परागसिंचन करतात.

मकरंदाचे आमीष

पक्षी, लहान सस्तन प्राणी आणि कीटक यांद्वारे परागसिंचन करणाऱ्‍या वनस्पती सहसा, आकडे, कंटक, किंवा चिकट तंतू यांचा उपयोग करून परागसिंचन करणाऱ्‍याच्या शरीराला पराग चिकटवतात. उदाहरणार्थ, एक केसाळ मधमाशी एकाच वेळी सुमारे १५,००० परागकण घेऊन जाऊ शकते!

वास्तविक पाहता, मधमाश्‍यांची सपुष्प वनस्पतींचे परागसिंचन करण्यात प्रमुख भूमिका असते. याच्या बदल्यात वनस्पती या माश्‍यांना खाण्याकरता मधुरस आणि पराग देतात; परागांमुळे या माश्‍यांना प्रथिने, जीवनसत्व, खनिज आणि मेद मिळते. परस्परावलंबनाच्या या अनोख्या कार्यामुळे, मधमाश्‍या एका फेरीत १०० पेक्षा अधिक फुलांवर बसतील पण पुरेसे किंवा साठा संपत नाही तोपर्यंत एकाच जातीच्या वनस्पतीच्या फुलांतून पराग, मकरंद किंवा दोन्ही घेतील. या अद्‌भुत, उपजत वागणुकीमुळे परागसिंचन अधिक खात्रीने होण्यास मदत होते.

फसवी फुले

मधुरस देण्याऐवजी, काही वनस्पती परागसिंचन करवून घेण्याकरता कीटकांना भुरळ पाडून क्लिष्ट क्लृप्त्यांचा उपयोग करतात. पश्‍चिम ऑस्ट्रेलियात वाढणाऱ्‍या हॅमर ऑर्किडचेच उदाहरण घ्या. हॅमर ऑर्किडच्या फुलाची एक पाकळी, मानवी डोळ्यांनी पाहिल्यावरसुद्धा, ढब्बू, पंखहीन मादी थायनीड माशीसारखी हुबेहूब दिसते. इतकेच नव्हे तर या फुलातून, नरांना आकर्षित करण्यासाठी खरी मादी माशी सोडत असलेल्या रासायनिक सुवासासारखा वासही उत्सर्जित होत असतो! या फसव्या पाकळीच्या देठाजवळ परागाने भरलेले चिकट कोश असतात.

नर थायनीड माशी, नकली वासाला आकर्षित होऊन फुलात शिरतो आणि “मादी” माशी समजून शुंडिका हिसकावून उडून जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु उडण्याच्या बेतात असतानाच तो घसरून थेट चिकट परागकोशांतच उलटा पडतो. आपली चूक कळल्यावर तो, मादी समजून ज्या पाकळीला धरून असतो त्या पाकळीवरची (ही पाकळी बिजागरीला जोडलेली असते जी, सोडल्यावर आपल्या पूर्वस्थितीत पुन्हा येते) पकड सोडून उडून जातो आणि पुन्हा दुसऱ्‍या हॅमर ऑर्किड फुलाजवळ जाऊन फसतो. * या वेळेला तो, आधीच्या फुलातून आणलेल्या परागांनी ऑर्किडचे परागसिंचन करतो.

परंतु, मादी थायनीड माश्‍या सक्रिय असल्यास नर माश्‍या, तोतया फुलांऐवजी मादींनाच निवडतात यात काही संशय नाही. परंतु, हे ऑर्किड, मादी माश्‍या आपल्या भूमिगत कोशातून बाहेर पडायच्या अनेक आठवड्यांआधीच उमलतात; यामुळे या फुलांचा तात्पुरता फायदा होतो.

लोकांना अलर्जी का होते?

लोकांना परागांची अलर्जी का होते? सूक्ष्म परागकण नाकात शिरतात तेव्हा ते चिकट श्‍लेष्मलास्तात अडकतात. तेथून ते घशात उतरतात आणि त्यांना एकतर गिळले जाते किंवा खोकून बाहेर टाकले जाते व यामुळे सहसा काही अपायकारक परिणाम होत नाहीत. परंतु कधीकधी मात्र परागकणांमुळे प्रतिकारक्षमताही चेतवली जाते.

पराग प्रथिनांमुळे हा त्रास होतो. अलर्जीचा त्रास होणाऱ्‍या व्यक्‍तीची प्रतिकार क्षमता काही कारणास्तव विशिष्ट परागांच्या प्रथिनांना शरीरास एक धोका असे समजतात. त्यांच्या शरीरात साखळी प्रतिक्रिया सुरू होते; यामुळे प्रसित कोशिका तयार होतात ज्या, बहुत प्रमाणात हिस्टामीन संयुगे सोडण्याकरता असलेल्या शरीराच्या पेशींत आढळतात. हिस्टामीनमुळे रक्‍तपेशी अभिस्तीर्ण होतात आणि अधिक पारगम्य होतात ज्यामुळे विपुल प्रमाणात प्रतिरोधक कोशिका असलेले द्रव्य पाझरू लागते. नेहमीच्या परिस्थितीत, या प्रतिरोधक कोशिका, शरीरात जखम किंवा संसर्ग झालेल्या ठिकाणी जाऊन अपायकारक आक्रमकांना शरीराबाहेर हाकलण्याचे काम करतात. परंतु, अलर्जीचा त्रास होणाऱ्‍यांच्या शरीरात मात्र परागांमुळे खोटा संदेश मिळतो ज्याचा परिणाम, नाकात खाज येणे, नाक गळणे, पेशी सुजणे आणि डोळ्यांतून पाणी येणे यांसारखा त्रास सुरू होतो.

संशोधकांचा असा विश्‍वास आहे, की ज्यांना अलर्जीचा त्रास होतो त्यांना आपल्या पालकांकडून हा त्रास वारशाने मिळतो—ही प्रवृत्ती एखाद्या विशिष्ट गोष्टीशी संबंधित नसली तरी. प्रदूषण हे देखील, परागाची अलर्जी होण्यास एक कारणीभूत घटक असू शकते. बीएमजेने म्हटले, की “जपानमध्ये असे पाहण्यात आले आहे, की अलर्जीचा त्रास अशा लोकांना होतो जे, डिझेलमधून बाहेर पडणाऱ्‍या हवेत मिसळणाऱ्‍या कणांची उच्च पातळी असलेल्या क्षेत्रांमध्ये राहतात. या कणांमुळे अलर्जीचे प्रमाण वाढते, असे प्राण्यांवर अभ्यास केल्यावर दिसून आले.”

आनंदाची गोष्ट म्हणजे, अलर्जीचा त्रास असलेल्यांना अँटीहिस्टामीन औषधामुळे बराच आराम पडू शकतो. * या औषधाच्या नावावरूनच हे कळते, की ते हिस्टामीनचा प्रतिरोध करते. परागांमुळे चिडचिडेपणा होत असला तरीसुद्धा, या जीवनावश्‍यक सूक्ष्म कणांची रचना आणि त्यांची उधळण या दोन्हींतील कल्पकता पाहून कोणीही प्रभावीत होईल. पराग नसते तर पृथ्वी ग्रह निश्‍चितच एक माळरान असते. (g०३ ७/२२)

[तळटीपा]

^ या फुलाला हॅमर (हातोडी) ऑर्किड यासाठी म्हटले आहे कारण, हॅमर ऑर्किडमधली पाकळी बिजागरीला जोडलेल्या एका हातोडीप्रमाणे वर-खाली हलत असते.

^ पूर्वी, अँटीहिस्टामीनमुळे चक्कर येणे, तोंड सुकणे सारखी लक्षणे दिसायची. परंतु नवीन फॉर्म्युलांमुळे हे दुष्परिणाम कमी झाले आहेत.

[२४, २५ पानांवरील रेखाचित्र]

केसरदल

परागकोश

पराग कण

पराग नलिका

पाकळी

किंजमंडल

किंजल्क

किंजपुट

बीजक

[चित्राचे श्रेय]

NED SEIDLER/NGS Image Collection

[२५ पानांवरील चित्रे]

सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे विविध प्रकारचे पराग

[चित्राचे श्रेय]

पराग कण: © PSU Entomology/PHOTO RESEARCHERS, INC.

[२६ पानांवरील चित्रे]

हॅमर ऑर्किड फुलाचा एक भाग मादी माशीसारखाच दिसतो

[चित्राचे श्रेय]

हॅमर ऑर्किडची चित्रे: © BERT & BABS WELLS/OSF ▸

[२४ पानांवरील चित्राचे श्रेय]

पराग कण: © PSU Entomology/PHOTO RESEARCHERS, INC.

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

पराग कण: © PSU Entomology/PHOTO RESEARCHERS, INC.