व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

शोषून घेणारी जीभ

सरडा पालींना पकडतो, तसेच त्याच्या वजनाच्या १० टक्के वजन असलेल्या पक्ष्यांनाही पकडून खातो. हे त्याला कसे जमते? आजपर्यंत असे समजले जात होते की सरड्याची जीभ खरबरीत आणि चिकट असल्यामुळे त्याचा सावज सहज जिभेला चिकटतो. पण जड प्राण्यांनाही तो कसे पकडतो हे एक कोडेच होते. याचे उत्तर शोधून काढण्यासाठी (बिल्ट डेर विसनशाफ्ट या इंटरनेटवरील जर्मन वृत्त सेवेने दिलेल्या माहितीनुसार) बेल्जियमच्या ॲन्टवर्प शहरातील शास्त्रज्ञांनी सरडा कशाप्रकारे विजेच्या गतीने आपले खाद्य पकडतो याचे अतिजलद व्हिडिओ चित्रण केले. शास्त्रज्ञांना असे दिसून आले की सरडा आपली जीभ बाहेर फेकतो तेव्हा त्याच्या जिभेचे टोक चेंडूसारखे गोल होते. हल्ला करण्याआधी, त्याच्या जिभेचे दोन स्नायु आकसतात आणि यामुळे त्याच्या जिभेच्या टोकावर एक शोषून घेणारा कप तयार होतो जो पकडलेल्या प्राण्याला धरून ठेवतो. (g०१ ७/२२)

झोप व स्मरणशक्‍ती

लंडनच्या दी इंडिपेंडन्ट दैनिकानुसार, झोपेविषयी संशोधन करणाऱ्‍या अभ्यासकांना असे दिसून आले आहे की एखादी शिकलेली गोष्ट “काही आठवड्यांनंतर पुन्हा आठवण्यासाठी” रात्री जागरण करणे नव्हे तर चांगली झोप घेणे आवश्‍यक आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक रॉबर्ट स्टिकगोल्ड यांनी २४ उमेदवारांना घेऊन एक प्रयोग केला. या उमेदवारांना काही माहिती शिकवण्यात आली आणि त्यानंतर त्यांपैकी १२ जणांना रात्री झोपण्याची अनुमती देण्यात आली. बाकीच्या उमेदवारांना मात्र संपूर्ण रात्र जागावे लागले. जागरण केलेल्या गटाला थकवा घालवता यावा म्हणून, त्यानंतरच्या दोन रात्री दोन्ही गटांना नेहमीप्रमाणे झोपू देण्यात आले. उमेदवारांची स्मरणशक्‍ती परीक्षा घेण्यात आली तेव्हा असे दिसून आले की जे उमेदवार पहिल्या रात्री झोपले होते त्यांना शिकलेल्या गोष्टी “कितीतरी जास्त पटीने आणि सातत्याने आठवणीत राहिल्या, पण दुसऱ्‍या गटाला थकवा घालवण्यासाठी झोप घेऊ दिल्यावरही त्यांच्या स्मरणशक्‍तीत सुधारणा झाली नाही.” झोप घेतल्यामुळे आठवणी मनात अधिक पक्क्या बसतात; त्यामुळे या अभ्यासावरून हेच दिसून येते की खासकरून सुरवातीची गाढ “मंदगती तरंगाची” झोप न घेता अभ्यास करत बसल्याने फारसा फायदा होत नाही. (g०१ ८/८)

स्त्री व पुरुषांच्या ऐकण्यात फरक

डिसकव्हरी डॉट कॉम न्यूझने दिलेल्या माहितीनुसार संशोधकांनी स्थापित केले आहे की स्त्रिया ऐकताना आपल्या मेंदूच्या दोन्ही बाजूच्या भागांचा उपयोग करतात तर पुरुष केवळ एकाच बाजूचा उपयोग करतात. एका पुस्तकाची ध्वनीफीत ऐकताना, २० स्त्रियांच्या व २० पुरुषांच्या मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आले. या स्कॅन्सवरून असे दिसून आले की पुरुष ऐकण्यासाठी सहसा, ऐकणे व बोलणे या क्रियांशी संबंधित असलेल्या मेंदूच्या डाव्या भागाचा उपयोग करतात. पण ऐकताना स्त्रियांच्या मेंदूचे दोन्ही भाग क्रियाशील असल्याचे आढळले. इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथे रेडिओलॉजीचे सहायक प्राध्यापक असणारे डॉ. जोसेफ टी. लुरीटो म्हणतात: “आमच्या संशोधनावरून असे दिसून येते की स्त्रिया व पुरुष वेगवेगळ्या पद्धतीने भाषेचे विश्‍लेषण करतात, पण त्याअर्थी त्यांच्या कार्यक्षमतेत काही फरक आहे असे दिसून येत नाही.” डॉ. लुरीटो यांनी सांगितले की इतर अभ्यासांवरूनही असे दिसून येते की स्त्रिया “एकाच वेळी दोन संभाषणे ऐकू शकतात.” (g०१ ८/८)

रशियात यहोवाच्या साक्षीदारांना न्यायालयीन विजय

फेब्रुवारी २४, २००१ च्या द न्यू यॉर्क टाइम्स अंकात असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले: “द्वेष किंवा असहिष्णुतेला बढावा देणाऱ्‍या धार्मिक पंथांवर बंदी आणणाऱ्‍या १९९७ सालच्या एका कायद्याच्या आधारावर यहोवाच्या साक्षीदारांच्या गटावर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या फिर्यादींविरुद्ध साक्षीदारांना मॉस्कोच्या एका न्यायालयात आज [फेब्रुवारी २३] लक्षणीय विजय प्राप्त झाला ज्याचे संभाव्यतः दूरगामी परिणाम असू शकतील.” त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली न्यायपरीक्षा मार्च १२, १९९९ रोजी स्थगित करण्यात आली होती आणि त्यांच्या विश्‍वासांचे परीक्षण करण्यासाठी पाच तज्ज्ञांना नेमण्यात आले होते. मग दोन वर्षे ती केस ताटकळत होती. फेब्रुवारी ६, २००१ रोजी ती पुन्हा सुरू झाल्यावर, तीन आठवड्यांच्या आत न्यायालय या निष्कर्षावर आले की फिर्यादी पक्षाचे आरोप निराधार आहेत. पण फिर्यादी पक्षाने मॉस्को शहर न्यायालयास फेरचौकशीचा आदेश देण्याची विनंती केली. ३० मे रोजी ही विनंती मान्य करण्यात आली आणि या खटल्याचे पुन्हा परीक्षण करण्यासाठी तो चौकशी न्यायालयात पुनःप्रेषित करण्यात आला. या निर्णयाचे वृत्त देताना लॉस ॲन्जेलेस टाइम्सने म्हटले: “१९९७ सालचा धार्मिक कायदा प्रस्थापित करण्यात मुख्यतः, मिशनरी कार्याचा कडाडून विरोध करणाऱ्‍या रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचा हात होता. या चर्चने कित्येक पंथांना नोंदणीकरणाच्या कठीण प्रक्रियेतून जायला लावले. साक्षीदारांना मिळालेला न्यायालयीन विजय (ज्याविरुद्ध मॉस्कोचे अधिकारी अपील करणार आहेत) रशियात धार्मिक स्वातंत्र्याविषयी कळकळ असणाऱ्‍या सर्वांना आनंदविणारा आहे.” (g०१ ८/२२)