व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी आव्हानांवर मात केली

त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे बदललं

त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे बदललं

बायबलच्या शिकवणींमुळे जीवन सुधारू शकतं कारण देवाचं वचन प्रभावशाली आहे. याबाबतीत आता आपण दोन उदाहरणं पाहू या: रीकार्डो आणि ॲन्ड्रस.

रीकार्डो: १५ वर्षांच्या कोवळ्या वयातच मी एका टोळीचा सदस्य बनलो. तिथल्या नवीन मित्रांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. त्यांचा माझ्यावर इतका प्रभाव पडला की मी दहा वर्षं तुरुंगात काढण्याचं ध्येय ठेवलं! हे कदाचित मूर्खपणाचं वाटेल. पण, माझ्या आजूबाजूला राहणारे अशा लोकांचा आदर करायचे जे तुरुंगात जायचे. त्यामुळे मलाही त्यांच्यासारखं बनायचं होतं.

टोळीच्या जीवनात असलेल्या सर्व गोष्टींचा मी अनुभव घेतला. त्यात ड्रग्सचं व्यसन, अनैतिकता आणि हिंसा यासारख्या गोष्टींचा समावेश होता. एका रात्री मी गोळीबार करण्यात सामील होतो, तेव्हा मी मरता-मरता वाचलो. या घटनेनंतर मी माझ्या जीवनाबद्दल आणि ध्येयांबद्दल गंभीरतेने विचार करू लागलो. मग मी निर्णय घेतला की मी माझ्या जीवनात बदल केला पाहिजे. पण हे कसं शक्य होणार होतं? आणि मला मदत कुठून मिळणार होती?

माझ्या बऱ्‍याचशा नातेवाइकांच्या जीवनात समस्या असल्यामुळे ते आनंदी नव्हते. पण त्यांच्यापैकी माझ्या मामांचं कुटुंब फार वेगळं होतं. मला माहीत होतं की ते चांगले लोक आहेत आणि ते बायबलच्या स्तरांनुसार चालतात. खरंतर, एकदा मी त्यांच्याकडून ऐकलं होतं की देवाचं नाव यहोवा आहे. त्या गोळीबाराच्या घटनेनंतर मी लगेच यहोवाच्या नावाने हाक मारून त्याच्याकडे मदतीसाठी प्रार्थना केली. आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्‍या दिवशी एका यहोवाच्या साक्षीदाराने माझं दार वाजवलं! त्यानेच मला बायबलबद्दल शिकवलं.

नंतर मला एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. माझे जुने मित्र मला सारखं फोन करून त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी बोलवायचे. त्यांना नाकारणं माझ्यासाठी अवघड होतं तरीही मी त्यांना नकार दिला. बायबल अभ्यास करण्याचा माझा दृढनिश्‍चय होता. आणि असं केल्याचा मला आनंद आहे. माझं जीवन पूर्णपणे बदललं आणि मला जीवनात खरा आनंद मिळाला.

मला आठवतं की टोळीच्या इतर सदस्यांकडून आदर मिळावा म्हणून मी दहा वर्षं तुरुंगात राहण्यासाठी देवाला प्रार्थना केली होती. पण आता मी त्याला प्रार्थना केली की मला निदान दहा वर्षं तरी पूर्णवेळेची सेवा करण्याची अनुमती दे. त्यामुळे जशी मला मदत मिळाली तशीच मलाही इतरांना मदत करता येईल. यहोवाने माझी प्रार्थना ऐकली आणि मी १७ वर्षांपासून पूर्णवेळेची सेवा करत आहे!

माझे आधीचे बरेचसे मित्र अनेक वर्षांपासून तुरुंगात आहेत. इतर काही जण मरण पावले. मागे वळून पाहताना मला माझ्या साक्षीदार नातेवाइकांचे खूप आभार मानावेसे वाटतात. बायबलच्या स्तरांनुसार जगण्यासाठी ते स्वेच्छेने वेगळे राहिल्यामुळे मी त्यांचा आदर करू लागलो. इतका आदर तर मी टोळीच्या कोणत्याही सदस्याचा केला नव्हता. पण सर्वातआधी मी यहोवाचा आभारी आहे, कारण त्याने मला सर्वात उत्तम जीवन जगण्याचा मार्ग दाखवला.

ॲन्ड्रस: माझा जन्म गरीब घरात झाला. मी अशा परिसरात वाढलो जिथे ड्रग्सचं व्यसन करणं, दुसऱ्‍यांची मालमत्ता हडपणं, खून करणं, वेश्‍याव्यवसाय करणं या सर्व गोष्टी सर्वसामान्य होत्या. माझ्या बाबांना दारूचं व्यसन होतं. माझे आईबाबा सतत भांडायचे आणि शिवीगाळ करायचे.

तरुण वयातच मला दारूचं आणि ड्रग्सचं व्यसन लागलं होतं. माझा बराच वेळ बाहेर फिरणं, चोरी करणं आणि चोरलेल्या वस्तू विकणं यांत जायचा. मोठा झाल्यानंतर माझं बाबांसोबत जवळचं नातं असावं म्हणून त्यांनी मला चुकीच्या गोष्टी करायला शिकवलं. ड्रग्स आणि इतर बेकायदेशीर माल देशात कसा आणायचा ते त्यांनी मला शिकवलं. त्यामुळे कमी वेळात मी भरपूर पैसा मिळवला. नंतर एक दिवस पोलीस माझ्या घरी आले आणि त्यांनी मला अटक केली. खून करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मला ५ वर्षं तुरुंगाची शिक्षा झाली.

एका सकाळी तुरुंगात घोषणा केली गेली की यहोवाच्या साक्षीदारांद्वारे कैद्यांसाठी बायबलवर आधारित चर्चा ठेवली आहे. मी विचार केला की तिथे जावं. तिथे शिकवलेल्या गोष्टी मला पटत होत्या, म्हणून मी साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास सुरू केला. मला वाईट वाटेल म्हणून त्यांनी देवाच्या वचनांचं महत्त्व कमी केलं नाही पण उघडपणे देवाच्या उच्च नैतिक स्तरांबद्दल सांगितलं.

थोड्या काळानंतर मला जाणवलं की मला माझ्या जीवनात बदल करण्याची गरज आहे आणि हे मी स्वतःच्या बळावर करू शकत नव्हतो. मी करत असलेल्या गोष्टी काही कैद्यांना आवडत नसल्यामुळे ते मला धमकी देत होते. म्हणून मी यहोवाकडे शक्‍ती आणि बुद्धीसाठी प्रार्थना केली आणि त्याने मला मदत केली. त्यामुळे त्यांच्या धमक्यांना घाबरण्याऐवजी मी धैर्याने बायबलबद्दल त्यांच्याशी बोलू लागलो.

जेव्हा मला माझ्या सुटकेबद्दल कळलं तेव्हा बाहेरच्या जगाबद्दल विचार करून मला खूप चिंता वाटू लागली. मला असं वाटत होतं की आणखी थोडा वेळ तुरुंगातच राहावं! तुरुंग सोडताना काही कैद्यांनी मला निरोप दिला. काहींनी प्रेमाने म्हटलं, “पाळक साहेब, जा आपल्या घरी.”

जर देवाने मला त्याच्याबद्दल शिकण्याची संधी दिली नसती तर माझ्या जीवनाचं काय झालं असतं! जेव्हा मी या गोष्टीवर विचार करतो तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो. मी यहोवाचा खूप-खूप आभारी आहे, कारण त्याने माझ्यावर प्रेम केलं आणि मी काही कामाचा नाही असा विचार केला नाही. *

^ लायब्ररी या टॅबखाली “बायबलमुळे जीवन बदलतं,” ही लेखमालिका पाहा.