व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | येशूला यातना सहन करून मरण का सोसावं लागलं?

असं खरोखरच घडलं होतं का?

असं खरोखरच घडलं होतं का?

इ.स. ३३ सालच्या मार्च-एप्रिल महिन्यादरम्यान नासरेथच्या येशूला मृत्यूदंड देण्यात आला. त्यानं अधिकाऱ्यांविरुद्ध बंड केला आहे, असा त्याच्यावर खोटा आरोप लावून त्याला अगदी अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यानंतर एका वधस्तंभावर त्याला खिळे ठोकण्यात आले. मरतेवेळी त्याला सहन कराव्या लागलेल्या यातनांची तीव्रता, शब्दांत व्यक्त करता येत नाही. पण देवाने त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत केलं आणि ४० दिवसांनंतर तो स्वर्गात गेला.

हा उल्लेखनीय अहवाल आपल्याला, बायबलच्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील पहिल्या चार पुस्तकांत म्हणजे चार शुभवर्तमानांत वाचायला मिळतो. या ग्रीक शास्त्रवचनांना सहसा ‘नवा करार’ असं म्हटलं जातं. पण मग प्रश्न येतो, की येशूच्या जीवनातील या घटना खरोखरच घडल्या होत्या का? या प्रश्‍नावर आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण, जर त्या घटना घडल्या नसतील तर ख्रिस्ती विश्वास निरर्थक ठरेल. आणि, पृथ्वीवर येणाऱ्या नंदनवनात सदासर्वकाळ जगणं हे केवळ एक स्वप्न ठरेल. (१ करिंथकर १५:१४) पण, जर त्या घटना खरोखरच घडल्या असतील तर, मानवजातीपुढं एक उज्ज्वल भविष्य आहे ज्याचा लाभ तुम्हालाही होऊ शकतो. तेव्हा, शुभवर्तमानाच्या अहवालात सांगितलेल्या घटना खरोखरच घडल्या होत्या की त्या फक्त दंतकथा आहेत, याचं आता आपण परीक्षण करूयात.

वस्तुस्थिती काय दाखवते

शुभवर्तमानातील अहवाल, आपल्या मनोरंजनासाठी लिहून ठेवलेल्या दंतकथा नाहीत. तर, ते वास्तविक आहेत. त्यातील घटना अचूक व सविस्तर सांगितल्या आहेत. जसं की, त्यात अशा अनेक ठिकाणांची नावं आहेत जिथं आपण आजही जाऊ शकतो. या अहवालांमध्ये खऱ्याखुऱ्या लोकांचा उल्लेख आहे जे एकेकाळी जिवंत होते. आधुनिक दिवसांतील इतिहासकारसुद्धा या गोष्टीला दुजोरा देतात.—लूक ३:१, २, २३.

पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील अनेक लेखकांनी त्यांच्या लिखाणांत येशूचा उल्लेख केला होता. * शुभवर्तमान अहवालांत आपण येशूला ठार मारल्याच्या ज्या पद्धतीविषयी वाचतो ती पद्धत, त्या काळी रोमी लोक देत असलेल्या शिक्षेच्या पद्धतीशी जुळते. शिवाय, शुभवर्तमान अहवालांतील घटना वाचताना खऱ्या आणि प्रामाणिक वाटतात. कारण त्यात येशूच्या शिष्यांनी केलेल्या चुकांचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. (मत्तय २६:५६; लूक २२:२४-२६; योहान १८:१०, ११) या सर्व पुराव्यांवरून कळतं, की शुभवर्तमान लिहिणाऱ्या लेखकांनी येशूबद्दल जे काही लिहिलं ते प्रामाणिक व अचूक आहे.

येशूला पुन्हा जिवंत केल्याच्या अहवालाविषयी काय?

येशू जिवंत होता आणि मरण पावला हे अनेकांना माहीत आहे. पण मेल्यानंतर त्याला पुन्हा जिवंत करण्यात आलं होतं, यावर मात्र अनेकांचा विश्वास बसत नाही. तो पुन्हा जिवंत झाला आहे, यावर तर त्याच्या प्रेषितांनीसुद्धा सुरुवातीला विश्वास ठेवला नव्हता. (लूक २४:११) पण त्यांनी व इतर शिष्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी जेव्हा येशूला जिवंत झालेलं आपल्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा मात्र कुणाच्याच मनात शंका उरली नाही. एकदा तर ५०० पेक्षा जास्त लोकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलं!—१ करिंथकर १५:६.

येशूचे शिष्य स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, म्हणजेच त्यांना अटक करून ठार मारलं जाण्याची भीती होती तरीसुद्धा ते या चमत्काराविषयी सांगत राहिले. ज्यांनी येशूला ठार मारलं होतं अगदी त्यांनादेखील ही आनंदाची बातमी सांगितली. (प्रेषितांची कृत्ये ४:१-३, १०, १९, २०; ५:२७-३२) येशूला पुन्हा जिवंत केलंय की नाही याबद्दल इतक्या सर्व शिष्यांच्या मनात शंका असती तर त्यांनी जिवावर उदार होऊन ही आनंदाची बातमी सांगितली असती का? खरंतर, येशूला पुन्हा जिवंत करण्यात आलं आहे या वस्तुस्थितीमुळंच, त्या काळी आणि आजही ख्रिस्ती धर्माचा जगावर जबरदस्त प्रभाव पडला आहे.

येशूचा मृत्यू आणि त्याला पुन्हा जिवंत करण्यात आलं त्याबद्दल शुभवर्तमानातील अहवाल, हे ऐतिहासिक रीत्या अचूक आहेत. अहवालांतील घटनांचं तुम्ही काळजीपूर्वक परीक्षण केलं तर तुमची खातरी पटेल, की त्या घटना खरोखरच घडल्या होत्या. आणि या घटना का घडल्या हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हा तुमचा भरवसा आणखी वाढेल. पुढील लेखात याबद्दल आणखी सांगण्यात आलं आहे. (w16-E No.2)

^ परि. 7 इ.स. ५५ साली जन्मलेला टॅसिटस यानं असं लिहिलं: “ख्रिस्तुस म्हणजे ख्रिस्त, याला टायबेरियसच्या शासन काळात एका अधिकाऱ्यानं अर्थात पंतय पिलाताने देहान्ताची शिक्षा दिली होती. ‘ख्रिस्तुस’ याच नावावरून ‘ख्रिस्ती’ किंवा ‘ख्रिश्चन’ ही नावं आली आहेत.” पहिल्या शतकातील स्यूटोनियस आणि यहूदी इतिहासकार जोसिफस यांनीदेखील येशूचा उल्लेख केला होता. तसंच, दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीला बिथुनियाचा शासक धाकटा प्लिनी यानंही येशूचा उल्लेख केला होता.