व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या संग्रहातून

“ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली”

“ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली”

पावसाचे दिवस ओसरले होते. सोमवार दिनांक १ सप्टेंबर १९१९ चा दिवस उजाडला होता. सूर्याच्या लख्ख प्रकाशामुळे वातावरणात हवाहवासा वाटणारा उबदारपणा जाणवत होता. दुपारची वेळ होती आणि अमेरिकेतल्या सीडर पॉईंट, ओहायो इथं होणाऱ्या अधिवेशनाकरता लोकांची वर्दळ सुरू झाली. २,५०० लोक आरामात मावतील अशा त्या मोठ्या प्रेक्षागृहात लोक जमू लागले. सुरवातीला त्यांची संख्या हजाराला थोडीशीच कमी असेल. पण संध्याकाळपर्यंत मात्र कारने, बोटीने आणि स्पेशल ट्रेनने आलेल्या २,००० लोकांची त्यात आणखी भर पडली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी तर लोकांची इतकी गर्दी झाली, की अधिवेशनाच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग प्रेक्षागृहाच्या बाहेर झाडांनी वेढलेल्या मोकळ्या जागेत घेण्यात आला.

झाडांच्या दाट पानांनी खाली बसलेल्या लोकांच्या डोक्यावर जणू एक छतच तयार झालं होतं. त्या पानांमधून येणाऱ्या सूर्याच्या किरणांमुळे लोकांच्या कपड्यांवर जणू नक्षी काढल्यासारखी जाळीदार सावली पडत होती. आणि लेक एरी या तलावाकडून येणाऱ्या मंद वाऱ्यावर स्त्रियांच्या टोपीतली पिसं डोलत होती. तो क्षण आठवून एका बांधवानं सांगितलं की “जगाच्या वर्दळीपासून दूर, त्या सुखद वातावरणात, आम्ही जणू नंदनवनातच आहोत की काय असं वाटत होतं.”

पण तिथं उपस्थित असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या आनंदापुढे ते सुंदर वातावरणदेखील फिकं पडलं होतं. एका बातमीपत्रात सांगितल्यानुसार ते “सर्व लोक त्या कार्यक्रमात अगदी तल्लीन होते, तरीदेखील तिथलं वातावरण अगदी उत्साही आणि आनंदी होतं.” गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना खूप कठीण छळाला तोंड द्यावं लागलं होतं. जसं की, युद्धादरम्यान झालेला विरोध, मंडळ्यांमध्ये निर्माण झालेले तीव्र मतभेद, नेतृत्व करणाऱ्या आठ बांधवांना जवळजवळ २० वर्षांच्या तुरुंगवासाची ठोठावण्यात आलेली शिक्षा, ब्रुकलिन बेथेलचं ठप्प पडलेलं कामकाज आणि राज्याच्या कामासाठी बऱ्याच बंधुभगिनींना झालेली तुरुंगवासाची शिक्षा. या सर्व गोष्टींमुळे या बायबल विद्यार्थ्यांना आता अनुभवायला मिळणारा ख्रिस्ती सहवास मधासारखा गोड वाटत होता. *

निराशेच्या आणि गोंधळलेल्या त्या परिस्थितीत, काही बायबल विद्यार्थ्यांनी साक्षकार्य करण्याचं सोडून दिलं होतं. पण बऱ्याच जणांनी मात्र अशा दबावाच्या वातावरणातही उत्तम भूमिका पार पाडली. उदाहरणार्थ, एकदा तपासणी करणाऱ्या एका व्यक्तीनं काही बायबल विद्यार्थ्यांची चौकशी केली होती. तो म्हणतो, की अगदी कडक शब्दात त्यांना ताकीद देण्यात आली होती. पण तरीही, “आम्ही शेवटपर्यंत देवाच्या वचनाचा प्रचार करत राहू” अशा मतावर ते अगदी ठाम होते.

या सबंध परीक्षेच्या काळात, हे विश्वासू बायबल विद्यार्थी “आपल्या स्वर्गीय पित्याच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करत होते, . . . आणि यादरम्यान प्रभूनं त्यांचं कसं नेतृत्व केलं हे त्यांनी पाहिलं.” आता सीडर पॉईंट इथं या रोमांचक अधिवेशनात ते सर्व एकत्र आले होते. एक बहिणीनं असं म्हटलं: “आपल्या सेवाकार्याची चाके आता पुन्हा वेग धरतील का?” असाच प्रश्न तिथं उपस्थित असलेल्या इतरांच्याही मनात होता. आणि आता इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्यांना आधी सुवार्तेच्या कामाला सुरवात करायची होती.

“जी.ए.”—एक नवंकोरं साधन!

एक खास गोष्ट म्हणजे अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर, आमंत्रण पत्रिकेवर आणि संपूर्ण प्रेक्षागृहाच्या आवारात “जी.ए.” अशी अक्षरं पाहायला मिळत होती. अधिवेशनाच्या त्या संपूर्ण आठवड्यादरम्यान या अक्षरांचं काय रहस्य आहे याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागून होती. पण शुक्रवारी, “सहकारी दिवशी,” बंधू जोसेफ एफ. रदरफर्ड यांनी या अधिवेशनाच्या ६,००० श्रोत्यांसमोर या रहस्याचा उलगडा केला. “जी.ए.” ही अक्षरं, क्षेत्रसेवेसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या नवीन मासिकाच्या नावाची पहिली अक्षरं होती. आणि ते मासिक होतं, द गोल्डन एज. *

आपल्या अभिषिक्त सहकाऱ्यांबद्दल बोलताना बंधू रदरफर्ड म्हणाले: “या परीक्षेच्या काळाच्या पलीकडे असणाऱ्या मसीहाच्या गौरवशाली राजवटीतील सुवर्ण युगाकडे त्यांनी विश्वासाच्या नेत्रांनी पाहिलं . . . त्या सुवर्ण युगाची साऱ्या जगाला घोषणा करणं त्यांच्याकरता एक प्रमुख जबाबदारी आणि विशेषाधिकार होता. देवाकडून मिळालेल्या त्यांच्या जबाबदारीचा तो एक भाग होता.”

द गोल्डन एज, हे “वस्तुस्थिती, आशा आणि निर्धार व्यक्त करणारं नियतकालिक” आता सत्याचा प्रसार करण्यासाठी एक नवीन मार्ग उपलब्ध करून देणारं माध्यम होतं. आणि तो मार्ग होता घरोघरी जाऊन मासिकाची वर्गणी मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली मोहीम! या मोहिमेत सहभाग घेण्यास कोण-कोण तयार आहेत, असं विचारल्यावर उपस्थित असलेल्या सर्वांनीच उभं राहून आपली इच्छा व्यक्त केली. येशूच्या पावलांचं अनुकरण करणाऱ्या त्या सर्व श्रोत्यांनी मग अगदी अंतःकरणातून आणि आवेशानं, “सेंड आऊट दाय लाईट अॅन्ड ट्रूथ, ओ लॉर्ड” (प्रभू तुझ्या सत्याचा प्रकाश आम्हावर प्रकाशू दे) हे गीत गायलं. बंधू जे. एम. नॉरीस नावाचे एक बांधव आठवून सांगतात, की “त्या सर्वांच्या जोरदार आवाजानं संपूर्ण वातावरण अक्षरशः हालून गेलं होतं.”

त्या सत्रानंतर, या मासिकाचे पहिले वर्गणीधारक बनण्याकरता सर्व उपस्थित बंधुभगिनी कित्येक तास रांगेत उभे होते. त्या वेळी मेबल फिलब्रिक नावाच्या एका बहिणीसारखंच सर्वांना वाटलं असेल. ती म्हणते: “आता पुन्हा एकदा आमच्या हातात एक मोठं काम होतं, ही गोष्टच आमच्याकरता रोमांचक होती!”

“ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली”

जवळपास ७,००० बायबल विद्यार्थी आता या कामगिरीसाठी सज्ज होते. ऑर्गनायझेशन मेथड या पत्रिकेत आणि टू हूम द वर्क इज एनट्रस्टेड या पुस्तिकेत याविषयी अशी माहिती देण्यात आली: मुख्यालयातील एक नवीन सेवा विभाग या कामाचं नेतृत्व करेल. यासोबतच, मंडळीत एका नवीन सेवा समितीची स्थापना करण्यात येईल आणि आवश्यक त्या सूचना कळवण्यासाठी एका संचालकाची नियुक्ती केली जाईल. मंडळीच्या क्षेत्राला १५० ते २०० घरांच्या गटात विभागलं जाईल. शिवाय क्षेत्रात आलेले अनुभव एकमेकांना सांगता यावेत आणि सेवा अहवालांची नोंद घेता यावी म्हणून दर गुरुवारी संध्याकाळी सेवा सभेचं आयोजन केलं जाईल.

हर्मन फिलब्रिक नावाचे बांधव म्हणतात, की “घरी परतल्यावर, आम्ही सर्व जण वर्गणीच्या मोहिमेत अगदी व्यस्त होऊन गेलो.” आणि बांधवांच्या या मेहनतीला दाद म्हणून त्यांना सर्वच ठिकाणी ऐकणारे लोकदेखील मिळाले. ब्यूला कोवी नावाची एक बहीण म्हणते, की “भीषण युद्धानंतर, दुःखाचं सावट असताना सुवर्ण युगाचा केवळ विचारच लोकांना आकर्षित करणारा होता.” तसंच, आर्थर क्लॉस नावाचे आणखी एक बांधव म्हणतात, की “इतक्या मोठ्या संख्येनं वर्गण्या मिळत असल्याचं पाहून, संपूर्ण मंडळीला आश्चर्याचा धक्काच बसला.” मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाल्यावर दोन महिन्यांतच, द गोल्डन एज मासिकाच्या जवळपास ५ लाख नमुना प्रती वितरित करण्यात आल्या, आणि ५०,००० लोक या मासिकाचे वर्गणीधारक बनले.

द वॉच टावर मासिकाच्या १ जुलै १९२० च्या अंकात, “गॉस्पल ऑफ द किंगडम” (राज्याचं शुभवर्तमान) हा लेख प्रकाशित करण्यात आला होता. ए. एच. मॅकमिलन यांनी नंतर सांगितलं की “आज जगभरात ज्या प्रकारे प्रचारकार्य केलं जातं आहे, त्याची जाहीर घोषणा सर्वात आधी या लेखात करण्यात आली होती.” “देवाचं राज्य आता उंबरठ्यावर आहे, या गोष्टीची साक्ष साऱ्या जगाला द्या” असा आर्जव या लेखात सर्व अभिषिक्त ख्रिश्चनांना करण्यात आला होता. “ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे,” त्या ख्रिस्ताच्या बांधवांना आज लाखो जण साथ देत आहेत आणि ते सर्व मिळून मसीहाच्या त्या सुवर्ण युगाची वाट पाहत, आवेशानं राज्याची सुवार्ता संपूर्ण जगाला घोषित करत आहेत.

^ परि. 5 जेहोवाज विटनेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्‌स किंगडम या पुस्तकातील, “परीक्षेचा काळ (१९१४-१९१८)” असं शीर्षक असलेला अध्याय ६ पाहा.

^ परि. 9 १९३७ मध्ये द गोल्डन एज मासिकाचं नाव बदलून कॉन्सोलेशन असं ठेवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा १९४६ मध्ये या मासिकाला अवेक! असं नाव देण्यात आलं.