व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १२

इतरांप्रती सहानुभूती दाखवा

इतरांप्रती सहानुभूती दाखवा

“तुमच्या सर्वांच्या विचारांत एकता असावी, तसेच एकमेकांशी वागताना सहानुभूती . . . दाखवा.”​—१ पेत्र ३:८.

गीत ५३ ऐक्य जपू या

सारांश *

१. १ पेत्र ३:८ या वचनानुसार आपल्याबद्दल सहानुभूती असणाऱ्‍या लोकांसोबत आपल्याला संगती करायला का आवडतं?

आपल्या भावना समजून घेणाऱ्‍या आणि आपल्या भल्याचा विचार करणाऱ्‍या लोकांसोबत राहायला आपल्याला नेहमी आवडतं. आपण काय विचार करतो आणि आपल्या काय भावना आहेत हे समजून घेण्यासाठी ते जणू स्वतःला आपल्या जागी ठेवतात. कधीकधी तर काही सांगण्याआधीच आपल्याला कशाची गरज आहे हे ते ओळखतात आणि लगेच मदत करतात. “सहानुभूती” * दाखवणाऱ्‍या अशा लोकांबद्दल आपण खरंच मनापासून कदर बाळगतो.​—१ पेत्र ३:८ वाचा.

२. सहानुभूती दाखवण्यासाठी आपल्याला मेहनत घेण्याची गरज का पडू शकते?

ख्रिस्ती या नात्याने इतरांप्रती सहानुभूती दाखवण्याची आपल्या सर्वांची इच्छा असते. पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. का? याचं एक कारण म्हणजे आपली अपरिपूर्णता. (रोम. ३:२३) जन्मतःच आपल्यात फक्‍त स्वतःबद्दल विचार करण्याची प्रवृत्ती असते आणि या प्रवृत्तीविरुद्ध आपल्याला लढत राहावं लागतं. तसंच संगोपन किंवा जीवनातले अनुभव यांमुळेही काहींना सहानुभूती दाखवणं कठीण जाऊ शकतं. त्यासोबतच, या शेवटच्या दिवसांत पुष्कळ जण इतरांच्या भावनांची कदर करत नाहीत. याउलट, ते “स्वतःवर प्रेम करणारे” आहेत. (२ तीम. ३:१, २) आणि आपल्या अवतीभोवती असणाऱ्‍या अशा लोकांचाही आपल्यावर प्रभाव पडत असतो. मग इतरांप्रती सहानुभूती दाखवण्यासाठी असलेल्या या अडथळ्यांवर मात करायला आपल्याला कुठून मदत मिळू शकते?

३. (क) आपण आणखी चांगल्या प्रकारे सहानुभूती कशी दाखवू शकतो? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?

यहोवा देव आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांचं अनुकरण करण्याद्वारे आपण आणखी चांगल्या प्रकारे सहानुभूती दाखवू शकतो. यहोवा प्रेम आहे आणि इतरांबद्दल काळजी दाखवण्याबाबतीत त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. (१ योहा. ४:८) येशूने आपल्या पित्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचं हुबेहूब अनुकरण केलं. (योहा. १४:९) एक मानव करुणा कशी दाखवू शकतो हे त्याने पृथ्वीवर असताना दाखवून दिलं. या लेखात आधी आपण पाहू या की यहोवा आणि येशू यांनी इतरांच्या भावना कशा प्रकारे समजून घेतल्या. त्यानंतर आपण त्यांचं अनुकरण कसं करू शकतो हेदेखील पाहू या.

सहानुभूती दाखवण्याच्या बाबतीत यहोवाचं उदाहरण

४. यहोवाला आपल्या सेवकांबद्दल काळजी आहे हे आपल्याला यशया ६३:७-९ या वचनांवरून कसं कळतं?

यहोवाला आपल्या सेवकांच्या भावनांची कदर असल्याचं बायबल सांगतं. उदाहरणार्थ, प्राचीन काळात इस्राएली लोकांना वेगवेगळ्या समस्येतून जावं लागलं तेव्हा यहोवाला कसं वाटलं याचा विचार करा. बायबल म्हणतं: “त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला.” (यशया ६३:७-९ वाचा.) त्यानंतर यहोवाने जखऱ्‍या संदेष्ट्याद्वारे स्पष्ट केलं, की त्याच्या लोकांना वाईट वागणूक दिली जाते तेव्हा ती जणू त्याला दिल्यासारखीच आहे. यहोवाने आपल्या लोकांना म्हटलं: “जो तुम्हाला हात लावतो, तो जणू माझ्या डोळ्यातल्या बुबुळाला हात लावतो.” (जख. २:८) खरंच, यहोवाला आपल्या लोकांची किती काळजी आहे याचं हे किती जबरदस्त वर्णन!

यहोवाने इस्राएली लोकांबद्दल करुणा दाखवली आणि त्यांना इजिप्तच्या दास्यातून सोडवलं (परिच्छेद ५ पाहा)

५. दुःखात असलेल्या आपल्या सेवकांना वाचवण्यासाठी यहोवाने कार्य केल्याचं एक उदाहरण द्या.

आपल्या सेवकांना सहन कराव्या लागत असलेल्या दुःखाबद्दल यहोवाला फक्‍त काळजीच वाटत  नाही तर त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तो कार्यही  करतो. उदाहरणार्थ, इस्राएली लोक इजिप्तच्या दास्यात दुःख-कष्ट सहन करत होते तेव्हा यहोवाने त्यांचं दुःख समजून घेतलं आणि त्यांना सोडवण्यासाठी तो प्रवृत्त झाला. यहोवाने मोशेला म्हटलं: “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे; . . . त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे; त्यांस मिसरांच्या हातातून सोडवावे, . . . म्हणून मी उतरलो आहे.” (निर्ग. ३:७, ८) यहोवाला त्याच्या लोकांबद्दल करुणा वाटली आणि म्हणून त्याने त्यांना दास्यातून सोडवलं. अनेक शतकांनंतर वचन दिलेल्या देशात जेव्हा इस्राएली लोकांवर शत्रूंनी हल्ला केला तेव्हा यहोवाने काय केलं? “जुलूम व त्रास असह्‍य होऊन इस्राएल लोक कण्हत असल्यामुळे देवाला त्यांची दया येऊ लागली होती.” आपल्या लोकांप्रती असलेल्या सहानुभूतीमुळे यहोवाने पुन्हा त्यांना वाचवलं. शत्रूंपासून सोडवण्यासाठी त्याने शास्त्यांचा वापर केला.​—शास्ते २:१६, १८, सुबोधभाषांतर.

६. चुकीची विचारसरणी असलेल्या एखाद्या व्यक्‍तीची यहोवाला काळजी असल्याचं एक उदाहरण सांगा.

आपल्या सेवकांची विचारसरणी योग्य नसते तेव्हादेखील यहोवा त्यांच्या भावनांची कदर करतो. योनाचंच उदाहरण घ्या. देवाने त्याला निनवेविरुद्ध न्यायाचा संदेश सांगण्याची कामगिरी सोपवली होती. लोकांनी जेव्हा पश्‍चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्यांना माफ करण्याचा निर्णय घेतला. पण योनाला मात्र हा निर्णय आवडला नाही. त्याने केलेली भविष्यवाणी पूर्ण होणार नाही म्हणून त्याला “राग आला.” पण यहोवा योनाशी धीराने वागला आणि त्याची विचारसरणी सुधारण्यासाठी त्याने त्याला मदत केली. (योना ३:१०–४:११) त्यानंतर योनाला आपली चूक लक्षात आली. आज आपल्याला फायदा व्हावा म्हणून हा अहवाल लिहिण्यासाठी यहोवाने त्याचा वापरही केला.​—रोम. १५:४. *

७. यहोवा ज्या प्रकारे आपल्या सेवकांशी वागला त्यावरून आपल्याला कोणती खात्री पटते?

यहोवा ज्या प्रकारे आपल्या लोकांशी वागला त्यावरून त्याला आपल्या सेवकांबद्दल सहानुभूती असल्याची खात्री आपल्याला पटते. आपल्यापैकी प्रत्येकाचं दुःख आणि त्रास त्याला माहीत आहे. “सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ” यहोवाच आहे. (२ इति. ६:३०) आपल्या मनातल्या खोल भावना, विचार आणि आपल्या कमतरता तो जाणतो. आणि आपण “सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो [आपल्यावर] येऊ देणार नाही.” (१ करिंथ. १०:१३) देवाच्या या वचनामुळे आपल्याला खरंच खूप दिलासा मिळतो!

सहानुभूती दाखवण्याबाबतीत येशूचं उदाहरण

८-१०. इतरांची काळजी करण्यासाठी येशूला कोणत्या गोष्टींमुळे मदत झाली?

येशू पृथ्वीवर मानव म्हणून होता तेव्हा त्याला इतरांबद्दल खूप सहानुभूती होती. यासाठी कमीतकमी तीन गोष्टींमुळे त्याला मदत झाली. पहिली, आधी उल्लेख केल्याप्रमाणे येशूने स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या पित्याचं हुबेहूब अनुकरण केलं. पित्याप्रमाणेच त्याचंही लोकांवर प्रेम होतं. ज्या गोष्टी निर्माण करण्यासाठी येशूने यहोवाला मदत केली होती त्यांबद्दल त्याला आनंद तर होता, पण खासकरून “मनुष्यजातीच्या ठायी” त्याला जास्त आनंद होता. (नीति. ८:३१) प्रेमामुळे येशूला इतरांच्या भावनांची कदर होती.

दुसरी गोष्ट म्हणजे, येशू लोकांचं मन ओळखू शकत होता. त्यांचे हेतू आणि भावना तो जाणू शकत होता. (मत्त. ९:४; योहा. १३:१०, ११) म्हणूनच लोक दुःखाने पीडित असल्याचं येशूला कळायचं, तेव्हा त्याला त्यांची काळजी वाटायची आणि तो त्यांचं सांत्वन करायचा.​—यश. ६१:१, २; लूक ४:१७-२१.

१० तिसरी गोष्ट म्हणजे, येशूने इतरांप्रमाणेच काही समस्यांचा सामना केला. उदाहरणार्थ, येशू गरीब कुटुंबात लहानाचा मोठा झाला. येशूने आपल्या वडिलांकडून म्हणजे योसेफकडून कष्टाचं काम शिकून घेतलं. (मत्त. १३:५५; मार्क ६:३) येशूने सेवाकार्य सुरू करण्याच्या काही काळाआधी योसेफचा मृत्यू झाला असावा. त्यामुळे येशूने आपल्या प्रिय व्यक्‍तीला मृत्यूत गमावण्याचं दुःख अनुभवलं होतं. तसंच, एकाच कुटुंबातल्या सदस्यांचा विश्‍वास वेगळा असतो तेव्हा परिस्थिती कशी असते हेदेखील त्याने अनुभवलं होतं. (योहा. ७:५) अशा प्रकारे, सर्वसामान्य लोकांना कोणत्या समस्या असतात आणि त्यांच्या काय भावना असतात हे या व इतर परिस्थितींमुळे येशूला समजायला मदत झाली.

येशू करुणा दाखवत एका बहिऱ्‍या माणसाला गर्दीपासून दूर नेऊन बरं करतो (परिच्छेद ११ पाहा)

११. येशूला इतरांबद्दल सहानुभूती होती हे खासकरून केव्हा दिसून आलं? स्पष्ट करा. (मुखपृष्ठावर दिलेलं चित्र पाहा.)

११ खासकरून येशूने केलेल्या चमत्कारांवरून लोकांबद्दल त्याला काळजी असल्याचं दिसून येतं. त्याने फक्‍त कर्तव्य म्हणून नाही, तर दुःखात असलेल्यांबद्दल त्याला “कळवळा आला” म्हणून चमत्कार केले. (मत्त. २०:२९-३४; मार्क १:४०-४२) उदाहरणार्थ, येशूने एका बहिऱ्‍या माणसाला गर्दीपासून दूर नेऊन बरं केलं आणि विधवेच्या एकुलत्या एका मुलाला जिवंत केलं, तेव्हा त्याच्या काय भावना असतील हे आपण समजू शकतो. (मार्क ७:३२-३५; लूक ७:१२-१५) यावरून कळतं की येशूने त्या लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना मदत करण्याची त्याची इच्छा होती.

१२. मार्था आणि मरीया यांना येशूने सहानुभूती दाखवली हे योहान ११:३२-३५ या वचनांवरून कसं कळतं?

१२ मार्था आणि मरीया यांना येशूने सहानुभूती दाखवली. त्यांच्या भावाचा, लाजरचा मृत्यू झाला होता. आणि त्यांना शोक करताना पाहून “येशू रडू लागला.” (योहान ११:३२-३५ वाचा.) आपला जिवलग मित्र आपल्याला सोडून गेला आहे, फक्‍त या कारणामुळे तो रडला का? नाही. कारण तो त्याला पुन्हा जिवंत करणारच होता. पण आपल्या जवळच्या लोकांच्या डोळ्यांत अश्रू पाहून त्याला दुःख झालं आणि त्यांच्या भावना समजून घेतल्यामुळे त्याला रडू आलं.

१३. येशूला लोकांबद्दल सहानुभूती आहे हे जाणल्यामुळे आपल्याला कसं प्रोत्साहन मिळतं?

१३ येशूला लोकांबद्दल सहानुभूती होती हे जाणून घेतल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं. हे खरं आहे, की आपण त्याच्यासारखं परिपूर्ण नाही. तरीही तो ज्या प्रकारे इतरांशी दयाळूपणे वागला त्यामुळे आपलं त्याच्यावर प्रेम आहे. (१ पेत्र १:८) देवाच्या राज्याचा तो आज राजा आहे हे माहीत असल्यामुळे आपल्याला खरंच खूप प्रोत्साहन मिळतं. तो लवकरच सर्व दुःख काढून टाकेल. येशू मानव म्हणून या पृथ्वीवर होता आणि तो आपली परिस्थिती चांगल्या प्रकारे समजू शकतो. या कारणामुळे आपण म्हणू शकतो की सैतानाच्या राज्यामुळे मानवजातीला झालेलं नुकसान तो चांगल्या प्रकारे भरून काढेल. आपल्या शासकाकडे “आपल्या दुर्बलतांविषयी सहानुभूती” दाखवण्याची क्षमता आहे आणि हा खरंच एक मोठा आशीर्वाद आहे!​—इब्री २:१७, १८; ४:१५, १६.

यहोवा आणि येशू यांचं अनुकरण करा

१४. इफिसकर ५:१, २ या वचनानुसार आपल्याला काय करण्याचं प्रोत्साहन मिळतं?

१४ आपण यहोवा आणि येशू यांच्या उदाहरणांचा विचार करतो तेव्हा इतरांप्रती सहानुभूती दाखवण्यासाठी आपल्याला आणखी प्रोत्साहन मिळेल. (इफिसकर ५:१, २ वाचा.) आपण त्यांच्याप्रमाणे लोकांची मने जाणू शकत नसलो तरी आपण इतरांच्या भावना आणि गरजा समजण्याचा प्रयत्न करू शकतो. (२ करिंथ. ११:२९) आपण या स्वार्थी जगासारखं “फक्‍त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू [नये], तर इतरांच्या फायद्याचाही विचार” करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे.​—फिलिप्पै. २:४.

(परिच्छेद १५-१९ पाहा) *

१५. सहानुभूती हा गुण खासकरून कोणी दाखवला पाहिजे?

१५ मंडळीतल्या वडिलांनी खासकरून सहानुभूती दाखवण्याची गरज आहे. यहोवाने त्यांना कळपाची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली आहे. आणि त्यांना माहीत आहे की यासाठी त्यांना यहोवाला हिशोब द्यावा लागेल. (इब्री १३:१७) आपल्या सहविश्‍वासू जणांना मदत करण्यासाठी वडिलांनी सहानुभूती दाखवणं गरजेचं आहे. मग वडील हा गुण कसा दाखवू शकतात?

१६. सहानुभूती दाखवणारे वडील काय करतात आणि हे का गरजेचं आहे?

१६ इतरांबद्दल सहानुभूती दाखवणारे वडील ख्रिस्ती बंधुभगिनींना वेळ देतात. ते प्रश्‍न विचारून खूप धीराने आणि लक्षपूर्वकपणे त्यांचं ऐकतात. एखाद्याला आपलं मन मोकळं करायचं असतं, पण शब्द सुचत नाहीत तेव्हा असं करणं खासकरून गरजेचं असतं. (नीति. २०:५) स्वेच्छेने आपला वेळ देऊन वडील आपल्या बंधुभगिनींसोबत विश्‍वासाचं आणि मैत्रीचं एक मजबूत बंधन तयार करत असतात.​—प्रे. कार्ये २०:३७.

१७. मंडळीतल्या वडिलांनी दाखवलेला कोणता गुण बऱ्‍याच बंधुभगिनींना खूप मौल्यवान वाटतो? एक उदाहरण द्या.

१७ बऱ्‍याच बंधुभगिनींना मंडळीतल्या वडिलांनी दाखवलेली सहानुभूती खूप मौल्यवान वाटते. असं का? ॲडेलेड म्हणते: “मंडळीतले वडील आपल्याला समजू शकतात म्हणून त्यांच्याशी बोलणं सोपं जातं. आपण त्यांच्याशी बोलतो तेव्हा त्यांचे हावभाव, त्यांचं बोलणं यांवरून आपल्याला समजतं की त्यांना आपल्याबद्दल सहानुभूती आहे.” वडिलांबद्दल कदर व्यक्‍त करत एक बांधव आपला अनुभव आठवून म्हणतो: “माझ्या परिस्थितीबद्दल ऐकताना त्या वडिलांचे डोळे भरून आले होते. आणि मी तो चेहरा कधीच विसरू शकत नाही.”​—रोम. १२:१५.

१८. आपण इतरांप्रती सहानुभूती कशी दाखवू शकतो?

१८ फक्‍त वडिलांनी सहानुभूती दाखवली पाहिजे असं नाही. सर्वांनीच हा गुण विकसित केला पाहिजे. हे आपण कसं करू शकतो? आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना आणि मंडळीतल्या बंधुभगिनींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मंडळीतल्या तरुणांची, आजारी असलेल्या बंधुभगिनींची, वृद्धांची आणि ज्यांनी आपल्या प्रिय जणांना मृत्यूत गमावलं आहे त्यांची काळजी असल्याचं दाखवा. त्यांची विचारपूस करा. ते जेव्हा त्यांच्या भावना व्यक्‍त करतात तेव्हा लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला त्यांच्या परिस्थितीची खरंच जाणीव आहे हे त्यांना दिसून आलं पाहिजे. तुमच्याकडून होता होईल ती मदत करण्याचा प्रयत्न करा. या सर्व गोष्टी केल्याने दिसून येईल की आपलं त्यांच्यावर खरंच प्रेम आहे.​—१ योहा. ३:१८.

१९. आपण सर्वांना एकाच प्रकारे मदत का करू नये?

१९ सर्वांना एकाच प्रकारे मदत करण्यापेक्षा प्रत्येकाची परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार आपण मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं का? कारण समस्येत असताना प्रत्येक जण सारख्याच पद्धतीने वागत नाही. काही जण त्याबद्दल मोकळेपणाने बोलतात. पण इतर काही जणांना आपल्या समस्यांबद्दल बोलायला आवडत नाही. त्यामुळे मदत करताना आपण अगदी खाजगी प्रश्‍न विचारण्याचं टाळलं पाहिजे. (१ थेस्सलनी. ४:११) आपल्याशी बोलताना इतर जण जेव्हा मन मोकळं करतात तेव्हा आपल्याला कदाचित असंही जाणवेल की आपले विचार त्यांच्यापेक्षा खूप वेगळे आहेत. पण तरी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की, त्या परिस्थितीत त्यांच्या  तशा भावना आहेत. अशा वेळी आपण ऐकण्यासाठी उत्सुक आणि बोलण्यात संयमी असलं पाहिजे.​—मत्त. ७:१; याको. १:१९.

२०. पुढच्या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

२० मंडळीत सहानुभूती दाखवण्यासोबत आपण हा मौल्यवान गुण सेवाकार्यातही दाखवला पाहिजे. आपण हा गुण शिष्य बनवताना कसा दाखवू शकतो? याबद्दल आपण पुढच्या लेखात चर्चा करू या.

गीत ३५ देवाच्या धीराबद्दल कृतज्ञता

^ परि. 5 यहोवा आणि येशूला लोकांच्या भावनांची कदर आहे. या लेखात आपण त्यांच्या उदाहरणांवरून शिकणार आहोत. तसंच, आपणसुद्धा इतरांना सहानुभूती का दाखवली पाहिजे आणि हे आपण कसं करू शकतो हेही आपण या लेखातून शिकू या.

^ परि. 1 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: “सहानुभूती” दाखवणं म्हणजे इतरांच्या भावना समजून घेण्याचा आणि त्या भावना स्वतः अनुभवण्याचा प्रयत्न करणं. (रोम. १२:१५) या लेखात “सहानुभूती” आणि “काळजी” एकाच अर्थाने वापरले आहेत.

^ परि. 6 यहोवाने निराश झालेल्या किंवा घाबरलेल्या इतर विश्‍वासू सेवकांनाही मदत केली. जसं की, हन्‍ना (१ शमु. १:१०-२०), एलीया (१ राजे १९:१-१८) आणि एबद-मलेख. (यिर्म. ३८:७-१३; ३९:१५-१८)

^ परि. 65 चित्रांचं वर्णन: राज्य सभागृहांत होणाऱ्‍या सभांमध्ये बंधुभगिनींना प्रेम दाखवण्याच्या बऱ्‍याच संधी आपल्याजवळ असतात. आपण पाहू शकतो की, (१) एक वडील एका लहान प्रचारकाशी आणि त्याच्या आईशी बोलत आहे, (२) एक पिता आणि त्यांची मुलगी एका वृद्ध बहिणीला कारपर्यंत पोचायला मदत करत आहेत आणि (३) एका बहिणीला मार्गदर्शन हवं असताना दोन वडील तिचं अगदी लक्षपूर्वक ऐकत आहेत.