व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आसा, यहोशाफाट, हिज्कीया, योशीया

“पूर्ण हृदयाने” यहोवाची सेवा करा

“पूर्ण हृदयाने” यहोवाची सेवा करा

“हे यहोवा, मी तुला विनंती करतो, मी कसा तुझ्यापुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने चाललो . . . हे आता आठव.”—२ राजे २०:३, पं.र.भा.

गीत क्रमांक: ५२, ३२

१-३. यहोवाची “पूर्ण हृदयाने” सेवा करण्याचा काय अर्थ होतो? उदाहरण द्या.

आपण सर्व जण अपरिपूर्ण आहोत आणि चुका करतो. पण, यहोवाने आपल्यासाठी खंडणीची तरतूद केली आहे आणि तो आपल्याला क्षमा करण्यासही तयार असतो. यासाठी आपण खरंच त्याचे खूप कृतज्ञ आहोत! नम्रता दाखवून आपण जर खरा पश्‍चात्ताप केला, तर आपण त्याच्याकडे क्षमा मागू शकतो. तसंच, आपल्या “पातकांच्या मानाने” तो आपल्याशी व्यवहार करणार नाही, याची खात्रीदेखील बाळगू शकतो. (स्तो. १०३:१०) असं असलं तरी, आपण “पूर्ण हृदयाने” यहोवाची सेवा केली पाहिजे. (१ इति. २८:९, पं.र.भा.) पण आपण तर अपरिपूर्ण आहोत. मग पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करणं आपल्याला कसं शक्य आहे?

हे समजण्यासाठी आपण आसा राजाची तुलना अमस्या राजासोबत करू. दोन्ही राजांनी चांगल्या गोष्टी केल्या. पण, अपरिपूर्ण असल्याकारणाने त्यांच्या हातूनही चुका झाल्या. असं असलं तरी, बायबल म्हणतं की आसाने संपूर्ण आयुष्य पूर्ण हृदयाने देवाची सेवा केली. (२ इति. १५:१६, १७; २५:१, २; नीति. १७:३) त्याने नेहमी यहोवाला आनंदित करण्याचा प्रयत्न केला आणि तो पूर्णपणे यहोवाला समर्पित राहिला. पण, अमस्याने मात्र “खऱ्या अंतःकरणाने” किंवा पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा केली नाही. देवाच्या शत्रूंचा नाश केल्यानंतर त्याने तिथल्या दैवतांच्या मूर्ती आपल्यासोबत आणल्या आणि तो त्यांची उपासना करू लागला.—२ इति. २५:११-१६.

“पूर्ण हृदयाने” यहोवाची सेवा करणाऱ्या व्यक्तीचं, यहोवावर गाढ प्रेम असतं आणि सदासर्वकाळ त्याची उपासना करण्याची तिची इच्छा असते. बायबलमध्ये “हृदय” हा शब्द सहसा, आपण आतून कशा प्रकारची व्यक्ती आहोत त्याला चित्रित करतो. यात आपल्या विचारसरणीचा, आवडी-निवडींचा, ध्येयांचा आणि हेतूंचा समावेश होतो. आपण अपरिपूर्ण असलो तरीही पूर्ण हृदयाने यहोवाची उपासना करू शकतो. त्याची सेवा करावी लागते म्हणून किंवा आपल्याला सवय आहे म्हणून आपण त्याची सेवा करत नाही. तर आपली मनापासून इच्छा असल्यामुळे आपण त्याची सेवा करतो.—२ इति. १९:९.

४. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

देवाची पूर्ण हृदयाने सेवा करण्याचा काय अर्थ होतो, हे चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण आसा व यहूदामधील आणखी तीन विश्वासू राजांची उदाहरणं पाहूयात. ते राजे म्हणजे यहोशाफाट, हिज्कीया आणि योशीया. या राजांच्या हातूनही चुका झाल्या. पण तरी ते यहोवाचं मन आनंदित करू शकले. ते पूर्ण हृदयाने आपली उपासना करत आहेत हे यहोवाने पाहिलं. यहोवाचा त्यांच्याबद्दल असा दृष्टिकोन का होता आणि आपण त्यांचं अनुकरण कसं करू शकतो?

आसाने पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा केली

५. राजा बनल्यानंतर आसाने काय केलं?

इस्राएल राष्ट्राची, इस्राएलचं राज्य आणि यहूदाचं राज्य अशा दोन भागांत विभागणी झाली. त्यानंतर यहूदावर राज्य करणारा तिसरा राजा म्हणजे आसा. जेव्हा आसा यहूदाचा राजा बनला तेव्हा त्याने निर्धार केला, की तो त्याच्या राज्यात चाललेली खोटी उपासना आणि अगदी घृणास्पद लैंगिक अनैतिकता यांचा नायनाट करेल. लोक ज्या मूर्तींची उपासना करायचे त्या त्याने मोडून टाकल्या आणि मंदिरातील वेश्या कृत्यं करणाऱ्यांना देशाबाहेर घालवून दिलं. इतकंच नाही तर आसाने आपल्या आजीला “राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने अशेराप्रीत्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती.” (१ राजे १५:११-१३) आसाने लोकांना यहोवाचा शोध करण्याचं, तसंच त्याच्या नियमशास्त्राचं व आज्ञांचं पालन करण्याचंही प्रोत्साहन दिलं. लोकांना यहोवाची उपासना करण्यास मदत व्हावी, यासाठी आसाला जे काही करणं शक्य होतं ते त्याने केलं.—२ इति. १४:४.

६. कूशी लोकांनी जेव्हा यहूदावर हल्ला केला तेव्हा आसाने काय केलं?

आसाच्या शासनात पहिली दहा वर्षं यहूदा राज्याला एकही युद्ध लढावं लागलं नाही. पण, त्यानंतर कूशी लोक यहूदाविरुद्ध लढण्यासाठी आले. त्यांच्या सैन्यात दहा लाख पुरुष व तीनशे रथ होते. (२ इति. १४:१, ६, ९, १०) मग अशा वेळी आसाने काय केलं? यहोवा आपल्या लोकांना मदत करेल याबद्दल त्याच्या मनात जराही शंका नव्हती. त्यामुळे त्याने यहोवाला प्रार्थना केली आणि लढाईत विजय मिळावा म्हणून त्याच्याजवळ विनंती केली. (२ इतिहास १४:११ वाचा.) बऱ्याच वेळा इस्राएलचे राजे यहोवाला विश्वासू राहिले नव्हते. पण, तेव्हाही यहोवाने स्वतःच्या नावासाठी, व तोच खरा देव आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्या लोकांना शत्रूंविरुद्ध विजय मिळवण्यास मदत केली होती. (१ राजे २०:१३, २६-३०) पण, या वेळी यहोवाने आपल्या लोकांना यासाठी मदत केली, कारण आसा हा पूर्णपणे त्याच्यावर निर्भर राहिला होता. यहोवाने आसाच्या प्रार्थनेचं त्याला उत्तर दिलं आणि तो लढाई जिंकला. (२ इति. १४:१२, १३) पण, पुढे जाऊन आसाच्या हातून एक गंभीर चूक घडली. त्याने यहोवावर निर्भर राहण्याऐवजी अराम देशाच्या राजाकडे मदत मागितली. (१ राजे १५:१६-२२) पण, यहोवाने त्याच्या हातून घडलेल्या केवळ या चुकीकडेच लक्ष दिलं नाही. तर आसाने संपूर्ण आयुष्य आपल्यावर पूर्ण मनाने प्रेम केलं आहे याकडे लक्ष दिलं. बायबल म्हणतं की आसाचे “मन साऱ्या हयातीत परमेश्वराकडे पूर्णपणे लागलेले होते.” (१ राजे १५:१४) आसाच्या या चांगल्या उदाहरणाचं आपण कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?

७, ८. तुम्ही कशा प्रकारे आसाचं अनुकरण करू शकता?

आपणही यहोवाला पूर्ण मनाने समर्पित आहोत की नाही, याचं आपल्यापैकी प्रत्येकाने परीक्षण केलं पाहिजे. यासाठी आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकतो: ‘अगदी कठीण परिस्थितीतही मी यहोवाला आज्ञाधारक राहील का? त्याची मंडळी शुद्ध ठेवण्याचा माझा निर्धार पक्का आहे का?’ आसाला आपल्या आजीला राजमातेच्या पदावरून काढण्यासाठी किती धैर्य दाखवण्याची गरज पडली असेल याचा विचार करा. कदाचित तुमच्यासमोरही अशी वेळ येऊ शकते जेव्हा तुम्हाला धैर्य दाखवण्याची गरज पडेल. एक उदाहरण घ्या. समजा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने किंवा जवळच्या एखाद्या मित्राने पाप केलं आहे आणि त्याबद्दल पश्‍चात्ताप न दाखल्यामुळे त्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं आहे. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? अशा व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारे संगती न करण्याचा तुमचा निर्धार पक्का असेल का? तुमचं ‘हृदय’ तुम्हाला काय करण्यास प्रेरित करेल?

आसाप्रमाणे कदाचित आपल्यालाही काही वेळा असं वाटेल, की सर्व जण आपल्या विरोधात आहेत. तुम्ही यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे कदाचित तुमचे वर्गसोबती किंवा शिक्षक तुमची थट्टा करत असतील. किंवा मग तुम्ही कामावरून सुट्टी घेऊन संमेलनांना जाता व जास्त वेळ काम करून आणखी पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणून तुमच्यासोबत काम करणारे तुम्हाला मूर्ख समजत असतील. अशा वेळी आसाप्रमाणे यहोवावर निर्भर राहा. यहोवाला प्रार्थना करा, धैर्य दाखवा आणि जे योग्य आहे ते करत राहा. हे नेहमी लक्षात असू द्या, की यहोवाने आसाला मदत केली आणि तो तुम्हालाही नक्कीच मदत करेल.

९. प्रचारकार्याद्वारे आपण यहोवाचं मन आनंदित कसं करत असतो?

आसाने फक्त स्वतःचाच विचार केला नाही, तर त्याने इतरांनाही यहोवाचा शोध करण्याचं उत्तेजन दिलं. आपणदेखील लोकांना यहोवाची उपासना करण्यास मदत करतो. आपण जेव्हा इतरांसोबत त्याच्याबद्दल बोलतो तेव्हा तो ते पाहतो. यहोवावर आणि लोकांवर प्रेम असल्यामुळे आणि लोकांच्या भविष्याबद्दल काळजी असल्यामुळे आपण सुवार्ता सांगतो. हे पाहून यहोवाला खरंच किती आनंद होत असेल!

यहोशाफाट राजाने यहोवाचा शोध केला

१०, ११. आपण यहोशाफाट राजाचं अनुकरण कसं करू शकतो?

१० यहोशाफाट याची “चालचलणूक त्याचा बाप आसा याच्याप्रमाणे होती.” (२ इति. २०:३१, ३२) आपल्या पित्याप्रमाणेच यहोशाफाटाने लोकांना यहोवाची उपासना करत राहण्याचं प्रोत्साहन दिलं. यहूदा राज्यातील लोकांना शिकवण्यासाठी त्याने काही पुरुषांना “परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ” घेऊन पाठवलं. (२ इति. १७:७-१०) इतकंच नाही तर लोकांना यहोवाकडे परत येण्यास मदत करण्यासाठी, तो इस्राएल राज्याच्या उत्तरेकडे असलेल्या एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत गेला. (२ इति. १९:४) यहोशाफाट एक असा राजा होता ज्याने आपल्या पूर्ण मनाने यहोवाचा शोध केला.—२ इति. २२:९.

११ आजदेखील यहोवाची इच्छा आहे, की जगभरातील लोकांना त्याच्याबद्दल शिकवलं जावं. आणि खरंतर या कामात आपण सर्व जण हातभार लावू शकतो. प्रत्येक महिन्यात शिकवण्याच्या या कार्यात सहभागी होण्याचं ध्येयं तुम्ही ठेवलं आहे का? इतरांनीही यहोवाची उपासना करण्यास सुरवात करावी म्हणून त्यांना बायबल शिकवायला तुम्हाला आवडेल का? असं करता यावं म्हणून तुम्ही प्रार्थना करता का? आणि जर एखादा बायबल अभ्यास तुम्हाला मिळाला, तर तो घेण्यासाठी तुम्ही तुमचा वैयक्तिक वेळ खर्च करण्यास तयार आहात का? एखादा बायबल अभ्यास सुरू करता यावा यासाठी तुम्ही जर मेहनत घेत असाल, तर यहोवा तुम्हाला नक्कीच मदत करेल. यहोवाची उपासना पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी यहोशाफाटाने ज्या प्रकारे लोकांना मदत केली, त्या प्रकारे तुम्हीही अक्रियाशील झालेल्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू शकता. तसंच, ज्यांनी पाप करण्याचं सोडून दिलं आहे अशा बहिष्कृत झालेल्या लोकांना मंडळीतील वडील भेटण्याची व्यवस्था करू शकतात आणि त्यांना मदत करू शकतात.

१२, १३. (क) यहोशाफाटाला भीती वाटली तेव्हा त्याने काय केलं? (ख) याबाबतीत आपण यहोशाफाटाच्या उदाहरणाचं अनुकरण का केलं पाहिजे?

१२ जेव्हा एक मोठं सैन्य यहूदाविरुद्ध लढण्यासाठी आलं, तेव्हा यहोशाफाटदेखील आपल्या पित्याप्रमाणे यहोवावर निर्भर राहिला. (२ इतिहास २०:२-४ वाचा.) या मोठ्या सैन्याला पाहून तो घाबरला आणि त्याने यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली. प्रार्थनेत त्याने हे कबूल केलं, की तो स्वतःच्या बळावर त्याच्या शत्रूंवर विजय मिळवू शकत नाही. त्याने हेदेखील म्हटलं की अशा परिस्थितीत काय करावं हे त्याला आणि त्याच्या लोकांना समजत नाही. पण, यहोवा आपल्याला मदत करेल याबद्दल यहोशाफाटाला जराही शंका नव्हती. तो यहोवाला म्हणाला: “आमचे डोळे तुजकडे लागले आहेत.”—२ इति. २०:१२.

१३ यहोशाफाटाप्रमाणे कधीकधी आपल्यालाही आपल्या समस्येबद्दल काय करावं हे समजणार नाही. अशा परिस्थितीत कदाचित आपणही घाबरून जाऊ शकतो. (२ करिंथ. ४:८, ९) पण, यहोशाफाटाने काय केलं हे नेहमी लक्षात असू द्या. त्याने सर्व लोकांपुढे यहोवाला प्रार्थना केली आणि आपण किती हतबल झालो आहोत हे बोलून दाखवलं. (२ इति. २०:५) तुम्ही जर एक कुटुंबप्रमुख असाल, तर तुम्ही यहोशाफाटाच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकता. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला समस्येचा सामना करता यावा आणि त्या परिस्थितीत काय करावं हे समजावं, म्हणून यहोवाकडे प्रार्थनेत मदत मागा. तुम्ही कुटुंबासोबत मिळून प्रार्थना करता, तेव्हा कोणताही संकोच न बाळगता यहोवापुढे आपल्या सर्व भावना व्यक्त करा. असं केल्याने यहोवावर तुमचा किती भरवसा आहे हे संपूर्ण कुटुंबाला जाणवेल. यहोवा देवाने यहोशाफाटाला मदत केली आणि तो तुम्हालाही नक्कीच मदत करेल.

हिज्कीया राजा, जे योग्य आहे ते करत राहिला

१४, १५. हिज्कीयाने यहोवावर पूर्ण भरवसा असल्याचं कसं दाखवलं?

१४ हिज्कीयाचा पिता एक मूर्तिपूजक होता आणि त्याचं खूप वाईट उदाहरण हिज्कीयापुढे होतं. पण, असं असूनही हिज्कीया राजा यहोवाला धरून राहिला. हिज्कीयाने “उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडले, अशेरा मूर्तीचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले.” कारण इस्राएली लोक त्याची उपासना करत होते. हिज्कीया हा यहोवाला पूर्णपणे समर्पित होता. “परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या” त्या हिज्कीया पाळत राहिला.२ राजे १८:१-६.

१५ हिज्कीया राजाच्या शासनादरम्यान अश्शूरच्या शक्तिशाली सैन्याने यहुदाला वेढा घातला आणि यरुशलेमेचा नाश करण्याची धमकी दिली. अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहोवाची निंदा केली आणि हिज्कीयाने आपल्याला शरण जावं म्हणून खूप प्रयत्न केले. या कठीण प्रसंगात हिज्कीयाने पूर्णपणे यहोवावर भरवसा ठेवला आणि प्रार्थनेत त्याच्याकडे मदत मागितली. त्याला हे माहीत होतं, की यहोवा देव हा अश्शूरच्या सैन्यापेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहे. तसंच, तो आपल्या लोकांना वाचवू शकतो याचीही त्याला पूर्ण खात्री होती. (यशया ३७:१५-२० वाचा.) यहोवाने हिज्कीयाच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि एका स्वर्गदूताला पाठवून १,८५,००० अश्शूरी सैनिकांना मारून टाकलं.—यश. ३७:३६, ३७.

१६, १७. तुम्ही हिज्कीयाच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकता?

१६ नंतर हिज्कीया खूप आजारी पडला आणि मरणास टेकला. या कठीण काळात त्याने यहोवाला प्रार्थना केली आणि त्याच्या विश्वासूपणाची आठवण ठेवून यहोवाने त्याला मदत करावी म्हणून विनंती केली. (२ राजे २०:१-३ वाचा. *) यहोवाने हिज्कीयाची प्रार्थना ऐकली आणि त्याला त्याच्या आजारातून बरं केलं. बायबलमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की आज आपल्या काळात यहोवा देव एखादा चमत्कार करून आपल्या आजारपणाला काढून टाकेल किंवा आपलं आयुष्य वाढवेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. पण, हिज्कीयाप्रमाणे आपण मदतीसाठी यहोवावर निर्भर राहू शकतो. आपण त्याला म्हणू शकतो: “हे यहोवा, मी तुला विनंती करतो, मी कसा तुझ्यापुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने चाललो आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले तेच करत आलो आहे हे आता आठव.” तुम्हाला या गोष्टीची खात्री आहे का, की यहोवा नेहमी तुमची काळजी घेईल; अगदी तुमच्या आजारपणातही?—स्तो. ४१:३.

१७ आपण आणखी एका मार्गाने हिज्कीया राजाचं अनुकरण करू शकतो. हिज्कीयाने देशातून मूर्तिपूजा पूर्णपणे काढून टाकली होती. आज जर एखादी गोष्ट यहोवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधांच्या आड येत असेल, किंवा मग यहोवाच्या सेवेत जो वेळ घालवायला हवा, तो वेळ आपण एखादी दुसरी गोष्ट करण्यामागे घालवत असू, तर आपणही अशा गोष्टींना आपल्या जीवनातून पूर्णपणे काढून टाकलं पाहिजे. उदाहरणार्थ, आज अनेक लोक काही मानवांना इतकं महत्त्व देतात, की ते त्यांना देवाच्या जागी ठेवतात. व्यक्तिशः ओळख नसलेल्या प्रसिद्ध व नामवंत लोकांना ते खूप पसंत करतात. अनेक जण त्यांच्याबद्दलची माहिती वाचण्यासाठी आणि त्यांचे फोटो पाहण्यासाठी आपला बहुतेक वेळ खर्च करतात. लोकांशी इंटरनेटद्वारे संवाद साधण्यासाठी ते सोशल मिडिया आणि इतर साधनांचा वापर करतात. हे खरं आहे की, या माध्यमांचा वापर करून आपल्या नातेवाइकांशी किंवा जवळच्या मित्रांशी संवाद साधणं आपल्याला आवडतं. पण, जगातील लोकांप्रमाणे आपणही सोशल मिडियावर आपला बहुतेक वेळ वाया घालवण्याची शक्यता आहे. इंटरनेटवर आपण जे फोटो टाकतो किंवा जी मतं मांडतो, ती जेव्हा लोक पसंत करतात तेव्हा आपल्याला गर्व होऊ शकतो. किंवा मग समजा काही लोकांनी आपली मतं किंवा फोटो पाहणं थांबवलं असेल, तेव्हा कदाचित आपल्याला रागही येऊ शकतो. अक्विल्ला व प्रिस्किल्ला तसंच प्रेषित पौल यांच्या उदाहरणावरून आपण बरंच काही शिकू शकतो. तुम्हाला काय वाटतं, त्यांनी आपला वेळ लोकांच्या रोजच्या जीवनातील बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्यासाठी घालवला असेल का? खासकरून यहोवाची सेवा न करणाऱ्या लोकांच्या जीवनातील गोष्टींबाबत? बायबल म्हणतं, की “वचन सांगण्यात पौल गढून गेला होता.” आणि प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी प्रचारात आणि शिकवण्याच्या कार्यात आपला वेळ घालवला आणि इतरांना “देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.” (प्रे. कृत्ये १८:४, ५, २६) आपणदेखील स्वतःला विचारू शकतो: ‘मी इतर मानवांना देवापेक्षाही जास्त महत्त्व देतो का? ज्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या नाहीत, त्या करण्यात मी माझा बहुतेक वेळ घालवतो का?’—इफिसकर ५:१५, १६ वाचा.

योशीयाने यहोवाच्या आज्ञांचं पालन केलं

१८, १९. आपण योशीयाचं अनुकरण कसं करू शकतो?

१८ योशीया राजानेदेखील यहोवाच्या आज्ञांचं पूर्ण मनाने पालन केलं. (२ इति. ३४:३१) तो हिज्कीया राजाचा पणतू होता. अगदी तरुण असतानाच तो “आपला पूर्वज दावीद याच्या देवाच्या भजनी लागला.” नंतर जेव्हा तो २० वर्षांचा झाला, तेव्हा त्याने यहूदामधून मूर्तिपूजेला काढून टाकण्यास सुरवात केली. (२ इतिहास ३४:१-३ वाचा.) योशीयाने यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याने यहूदाच्या इतर अनेक राजांपेक्षा याबाबतीत खूप जास्त काम केलं. एक दिवस महायाजकाला मंदिरात देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ मिळाला. मिळालेल्या या ग्रंथाच्या प्रती कदाचित स्वतः मोशेने लिहिलेल्या ग्रंथाच्या मूळ प्रती असाव्यात. योशीयाच्या सचिवाने नियमशास्त्राचा तो ग्रंथ त्याला वाचून दाखवला. त्या वेळी योशीयाला जाणवलं, की यहोवाची पूर्णपणे सेवा करण्यासाठी त्याला आणखी काही गोष्टी करण्याची गरज आहे. त्याने इतरांनाही तसं करण्याचं प्रोत्साहन दिलं. याचा परिणाम असा झाला, की “त्याच्या सर्व कारकीर्दीत त्यांनी [लोकांनी] आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर यास अनुसरावयाचे सोडले नाही.”—२ इति. ३४:२७, ३३.

१९ यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेण्याच्या बाबतीत मंडळीतील तरुण योशीयाच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. यहोवा देव क्षमा करण्यास तयार असतो, हे योशीयाला कदाचित पश्‍चात्तापी वृत्ती दाखवणाऱ्या त्याच्या आजोबांकडून, म्हणजेच राजा मनश्शेकडून शिकायला मिळालं असावं. तुम्हीसुद्धा तुमच्या कुटुंबातील आणि मंडळीतील अशा वृद्ध बंधुभगिनींकडून शिकू शकता जे यहोवाला विश्वासू राहिले आहेत. यहोवाने त्यांच्यासाठी ज्या अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत, त्यांबद्दल ते तुम्हाला सांगू शकतील. देवाच्या वचनातील गोष्टी जेव्हा योशीयाला समजल्या, तेव्हा त्याने काय केलं हेदेखील लक्षात ठेवा. यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी तो उत्सुक होता आणि बदल करण्यासही तो लगेच तयार झाला. बायबलचं वाचन केल्यामुळे कदाचित तुम्हाला जाणवेल, की यहोवाच्या आज्ञेत राहण्याचा तुमचा निर्धार आणखी पक्का होत आहे. यामुळे यहोवासोबतची तुमची मैत्री आणखी घनिष्ठ होईल आणि तुम्ही जीवनात आणखी जास्त आनंदी व्हाल. तसंच, इतरांनाही यहोवाबद्दल सांगण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. (२ इतिहास ३४:१८, १९ वाचा.) जेव्हा तुम्ही बायबलचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला हेदेखील जाणवेल, की देवाची सेवा करताना तुम्ही स्वतःमध्ये आणखी सुधारणा करू शकता. जेव्हा तुम्हाला हे जाणवेल तेव्हा योशीयाप्रमाणे बदल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यास तयार राहा.

यहोवाची पूर्ण हृदयाने सेवा करा!

२०, २१. (क) या लेखात चर्चा करण्यात आलेल्या चारही राजांमध्ये कोणतं साम्य आहे? (ख) पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

२० यहोवाची पूर्ण हृदयाने सेवा केलेल्या यहूदातील या चार राजांपासून आपण काय शिकू शकतो? यहोवाचं मन आनंदित करण्याचा आणि संपूर्ण आयुष्य त्याचीच उपासना करण्याचा या पुरुषांचा निर्धार पक्का होता. जेव्हा शक्तिशाली शत्रू त्यांच्या विरोधात आले, तेव्हा ते पूर्णपणे यहोवावर निर्भर राहिले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यहोवावर प्रेम असल्यामुळे ते त्याची सेवा करत होते.

२१ हे चारही राजे अपरिपूर्ण होते आणि त्यांच्या हातूनही चुका झाल्या. पण असं असलं तरी ते करत असलेल्या सेवेवर यहोवा संतुष्ट होता. कारण त्यांच्या हृदयात काय आहे हे यहोवा पाहू शकत होता. तसंच, त्याच्यावर ते अगदी मनापासून प्रेम करत आहेत हेदेखील त्याला माहीत होतं. आपणही अपरिपूर्ण आहोत आणि आपल्या हातूनही चुका होतात. पण, जेव्हा आपण ‘पूर्ण हृदयाने’ यहोवाची सेवा करतो, तेव्हा ते पाहून त्याचं मन आनंदित होतं. पुढच्या लेखात आपण पाहूयात, की या चार राजांच्या हातून ज्या चुका झाल्या त्यांपासून आपण कोणता धडा शिकू शकतो.

^ परि. 16 २ राजे २०:१-३ (पं.र.भा.): “त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरणास टेकला. तेव्हा आमोजाचा मुलगा यशया भविष्यवादी त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, यहोवा असे सांगतो, तू आपल्या घरची व्यवस्था कर, कारण तू मरशील, वाचणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून यहोवाची प्रार्थना करून म्हटले, हे यहोवा, मी तुला विनंती करतो, मी कसा तुझ्यापुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने चाललो आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले तेच करत आलो आहे हे आता आठव. तेव्हा हिज्कीया फार रडला.”