व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४९

पुनरुत्थान—एक पक्की आशा!

पुनरुत्थान—एक पक्की आशा!

‘मेलेल्या लोकांना उठवलं जाईल अशी मी देवाकडून आशा बाळगतो.’—प्रे. कार्यं २४:१५.

गीत १२ सार्वकालिक जीवनाची प्रतिज्ञा

सारांश *

१-२. यहोवाच्या सेवकांना कोणती सुंदर आशा आहे?

अनेकांना वेगवेगळ्या गोष्टींची आशा असते. काहींना वाटतं, की आपल्याला एक चांगला विवाहसोबती मिळावा. काहींची अशी इच्छा असते, की आपली मुलं मोठी होऊन जबाबदार बनावीत. तर काही जण आपल्या आजारातून लवकरात लवकर बरं होण्याची वाट पाहत असतात. आपल्यालासुद्धा या गोष्टींची आशा असते. पण याशिवाय, आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाची आणि आपल्या जवळच्या व्यक्‍तीच्या पुनरुत्थानाचीही आशा आहे.

याबद्दल प्रेषित पौलने म्हटलं: “नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे, अशी . . . मीसुद्धा देवाकडून आशा बाळगतो.” (प्रे. कार्यं २४:१५) पण पुनरुत्थानाबद्दल फक्‍त पौलच बोलला नाही, तर याआधी ईयोबसुद्धा बोलला होता. ईयोबला याची पूर्ण खातरी होती, की त्याच्या मृत्यूनंतर यहोवा त्याला विसरणार नाही. तो त्याला पुन्हा जिवंत करेल.—ईयो. १४:७-१०, १२-१५.

३. पौलने १ करिंथकरच्या १५ व्या अध्यायात जे लिहिलं त्याचा आपल्याला कसा फायदा होईल?

पुनरुत्थानाची शिकवण ही आपल्या ‘प्राथमिक शिकवणींपैकी’ एक आहे. (इब्री ६:१, २) पौलने पुनरुत्थानाबद्दल जी चर्चा केली ती आपल्याला १ करिंथकरच्या १५ व्या अध्यायात वाचायला मिळते. त्यात त्याने जे लिहिलं त्यामुळे पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना नक्कीच खूप दिलासा मिळाला असेल आणि आज आपल्यालाही मिळू शकतो. आपण कितीही वर्षांपासून पुनरुत्थानाची वाट पाहत असलो तरी, त्यावर चर्चा केल्यामुळे पुनरुत्थानाची आपली आशा आणखी पक्की होईल.

४. आपल्या जवळच्या लोकांचं पुनरुत्थान होईल याची कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला खातरी पटेल?

येशूच्या पुनरुत्थानामुळे आपल्याला याची खातरी मिळते, की आपली जी जवळची माणसं आज आपल्यात नाहीत, त्यांना पुनरुत्थानाची आशा आहे. पौलने सुरुवातीला करिंथच्या लोकांना आनंदाचा संदेश सांगितला, तेव्हा त्याने त्यांना येशूच्या पुनरुत्थानाबद्दलही सांगितलं होतं. (१ करिंथ. १५:१, २) पुढे तो म्हणाला, की एखाद्या ख्रिश्‍चनाचा जर येशूच्या पुनरुत्थानावर विश्‍वास नसेल, तर त्याच्या विश्‍वासाला काहीच अर्थ नाही. (१ करिंथ. १५:१७) यावरून दिसून येतं, की येशूचं पुनरुत्थान झालं आहे याची जर आपल्याला खातरी पटली, तरच इतरांचंही पुनरुत्थान होईल याची आपल्याला खातरी पटेल.

५-६. (क) १ करिंथकर १५:३, ४ या वचनांत कोणत्या तीन गोष्टी सांगितल्या आहेत? (ख) यांमुळे आपल्याला कोणती आशा मिळते?

पुनरुत्थाबद्दल लिहिताना पौलने खरोखर घडलेल्या तीन घटनांचा सुरुवातीला उल्लेख केला: (१) “ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला.” (२) “त्याला पुरण्यात आलं.” (३) “शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे, तिसऱ्‍या दिवशी त्याला उठवण्यात आलं.”—१ करिंथकर १५:३, ४ वाचा.

मसीहाबद्दल यशया संदेष्ट्याने आधीच सांगितलं होतं, की “त्याला जिवंतांच्या देशातून छाटून टाकण्यात” येईल, आणि “दुष्टांच्या कबरेत त्याची कबर नेमण्यात” येईल. पण याशिवाय आणखी एक गोष्ट घडणार होती. त्याबद्दल यशयाने पुढे म्हटलं, की मसीहा “अनेकांच्या पापांचं ओझं” वाहील. येशूने आपल्या जीवनाचं बलिदान दिलं तेव्हा त्याने आपल्या पापांचं ओझं वाहिलं. (यश. ५३:८, ९, १२; मत्त. २०:२८; रोम. ५:८) तर मग येशूचा मृत्यू होणं, त्याला पुरलं जाणं आणि त्याला उठवलं जाणं या गोष्टींमुळे आपल्याला कोणती आशा मिळते? पाप आणि मृत्यूतून सुटका मिळण्याची आशा, आणि आपली जी जवळची माणसं आज आपल्यात नाहीत त्यांना पुन्हा भेटण्याची आशा.

अनेकांनी दिलेली साक्ष

७-८. कोणत्या गोष्टींवरून दिसून येतं, की येशूचं पुनरुत्थान झालं होतं?

येशूचं पुनरुत्थान झालं होतं यावर आपला पक्का विश्‍वास असला पाहिजे. तरच, मेलेल्या लोकांचं नवीन जगात पुनरुत्थान होईल याची आपल्याला आणखी खातरी पटेल. पण यहोवाने येशूला जिवंत केलं होतं असं आपण खातरीने का म्हणू शकतो?

येशूचं पुनरुत्थान झाल्यावर अनेकांनी त्याला पाहिलं आणि त्याबद्दल इतरांना सांगितलं. (१ करिंथ. १५:५-७) येशूला कोणीकोणी पाहिलं त्याबद्दल पौल आपल्या पत्रात सांगतो. सगळ्यात आधी तो प्रेषित पेत्रचा (केफाचा) उल्लेख करतो. पेत्रने येशूला पाहिलं हे इतर काही शिष्यांनीही सांगितलं. (लूक २४:३३, ३४) पौल असंही म्हणतो, की येशू “१२ प्रेषितांना दिसला.” त्यानंतर तो एकाच वेळी पाचशेहून जास्त बांधवांना दिसला. कदाचित हे तेव्हा घडलं असेल, जेव्हा ते गालीलमध्ये एकत्र जमले होते. या घटनेबद्दल आपल्याला मत्तय २८:१६-२० मध्ये वाचायला मिळतं. पुढे येशूचा भाऊ याकोब याला तो दिसला, असंही पौल सांगतो. खरंतर, येशू हाच मसीहा आहे या गोष्टीवर पूर्वी याकोब विश्‍वास नव्हता; पण पुन्हा जिवंत झालेल्या येशूला पाहिल्यावर मात्र त्याला खातरी पटली. (योहा. ७:५) विशेष म्हणजे, इ.स. ५५ च्या आसपास पौलने जेव्हा हे पत्र लिहिलं, तेव्हा ज्या लोकांनी पुनरुत्थान झालेल्या येशूला पाहिलं होतं त्यांच्यापैकी अनेक जण जिवंत होते. त्यामुळे ज्या लोकांना येशूच्या पुनरुत्थानाबद्दल शंका होती, ते यांच्यापैकी कोणाशीही बोलून आपली शंका दूर करू शकत होते.

९. प्रेषितांची कार्यं ९:३-५ यात सांगितल्याप्रमाणे आणखी कशावरून सिद्ध झालं, की येशूचं पुनरुत्थान झालं होतं?

नंतर पुनरुत्थान झालेला येशू पौललाही दिसला. (१ करिंथ. १५:८) पौल (शौल) जेव्हा दिमिष्कला चालला होता, तेव्हा त्याला येशूचा आवाज ऐकू आला आणि येशू स्वर्गात असल्याचा दृष्टान्त त्याला दिसला. (प्रेषितांची कार्यं ९:३-५ वाचा.) पौलने अनुभवलेल्या या घटनेमुळेही हे सिद्ध झालं, की येशूचं पुनरुत्थान झालं होतं.—प्रे. कार्यं २६:१२-१५.

१०. येशूच्या पुनरुत्थानाची खातरी पटल्यावर पौलने काय केलं?

१० पौलने जी घटना अनुभवली होती आणि जिच्याबद्दल इतरांना सांगितलं, त्याकडे काहींनी नक्कीच लक्ष दिलं असेल. कारण एकेकाळी तो ख्रिश्‍चनांचा छळ करायचा. पण येशूचं पुनरुत्थान झालं आहे याची जेव्हा त्याला स्वतःला खातरी पटली, तेव्हा ही गोष्ट इतरांना सांगण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. त्यासाठी त्याने मारहाण, तुरुंगवास आणि समुद्रावरची संकटंही सोसली. (१ करिंथ. १५:९-११; २ करिंथ. ११:२३-२७) पौलला येशूच्या पुनरुत्थानाची इतकी खातरी पटली होती, की त्याबद्दलचा प्रचार करण्यासाठी तो आपला जीवही द्यायला तयार होता. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी जी साक्ष दिली त्यावरून आपल्याला याची खातरी पटत नाही का, की येशूचं पुनरुत्थान खरंच झालं होतं? आणि यामुळे पुनरुत्थानावरची आपली आशा आणखी पक्की होत नाही का?

पौलने इतरांच्या चुकीच्या धारणा सुधारल्या

११. पुनरुत्थानाबद्दल करिंथमधल्या काही ख्रिश्‍चनांच्या चुकीच्या धारणा का असाव्यात?

११ करिंथ हे ग्रीक लोकांचं शहर होतं. पुनरुत्थानाबद्दल तिथल्या काही ख्रिश्‍चनांच्या चुकीच्या धारणा होत्या. आणि काही जण तर असंही म्हणायचे, की “मेलेल्यांचं पुनरुत्थान होणार नाही.” (१ करिंथ. १५:१२) ते असं का म्हणायचे? कारण पूर्वी एकदा जेव्हा पौल ग्रीक लोकांच्या दुसऱ्‍या एका शहरात, म्हणजे अथेन्समध्ये असा प्रचार करत होता, की येशूचं पुनरुत्थान झालं आहे तेव्हा तिथल्या तत्त्वज्ञानींनी त्याची थट्टा केली होती. कदाचित या लोकांच्या विचारसरणीचा करिंथमधल्या काही ख्रिश्‍चनांवरही परिणाम झाला असेल. (प्रे. कार्यं १७:१८, ३१, ३२) शिवाय, करिंथमध्ये असेही काही जण होते जे पुनरुत्थानाचा वेगळा अर्थ काढायचे. ते कदाचित असं मानायचे, की पापी असल्यामुळे आपण “मेलेल्या अवस्थेत” असतो. पण ख्रिस्ती बनल्यानंतर आपल्या पापांची क्षमा होते आणि त्या अर्थाने आपण “जिवंत” होतो. करिंथमधले हे लोक पुनरुत्थानाची शिकवण का मानत नव्हते याचं कारण कोणतंही असो, त्यांचा विश्‍वास व्यर्थ होता. कारण देवाने जर येशूचं पुनरुत्थानच केलं नाही, तर याचा अर्थ असा होईल, की खंडणी बलिदानही दिलं गेलं नाही आणि आपण सगळे अजूनही पापीच आहोत. त्यामुळे ज्यांनी पुनरुत्थानाची शिकवण नाकारली, त्यांना कोणतीही आशा नव्हती.—१ करिंथ. १५:१३-१९; इब्री ९:१२, १४.

१२. पहिले पेत्र ३:१८, २२ या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे येशूचं पुनरुत्थान हे आधी होऊन गेलेल्या पुनरुत्थानांपेक्षा वेगळं कसं होतं?

१२ पौलने स्वतः येशूला दृष्टान्तात पाहिलं होतं. त्यामुळे त्याला याची पक्की खातरी होती, की “ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आलं [होतं].” पण येशूचं पुनरुत्थान हे आधी झालेल्या पुनरुत्थानांपेक्षा वेगळं होतं. कारण ज्यांचं आधी पुनरुत्थान झालं होतं, ते नंतर पुन्हा मेले. पण येशूच्या बाबतीत तसं घडलं नाही. त्याच्याबद्दल पौल म्हणाला: “तो मरण पावलेल्यांपैकी पहिलं फळ आहे.” येशूला पहिलं फळ का म्हटलं आहे? एक कारण म्हणजे, अदृश्‍य शरीरात पुनरुत्थान होणारा तो पहिला होता. आणि दुसरं म्हणजे, पुनरुत्थानानंतर मानवांपैकी स्वर्गात जाणारासुद्धा तो पहिला होता.—१ करिंथ. १५:२०; प्रे. कार्यं २६:२३; १ पेत्र ३:१८, २२ वाचा.

ते “जिवंत केले जातील”

१३. आदाम आणि येशू यांच्यातला कोणता फरक पौलने दाखवून दिला?

१३ एका माणसाच्या मृत्यूमुळे लाखो लोक कसे जिवंत होऊ शकतात? याचं उत्तर पौलने खूप स्पष्टपणे दिलं. आदामने जे पाप केलं त्यामुळे मानवांवर काय ओढवलं आणि येशूने जे बलिदान दिलं त्यामुळे काय शक्य झालं यांतला फरक पौलने सांगितला. आदामच्या बाबतीत पौलने असं म्हटलं: “मृत्यू हा एकाच माणसाद्वारे आला आहे.” आदामने जेव्हा पाप केलं तेव्हा त्याने स्वतःवर आणि त्याच्या वंशजांवर मृत्यू आणला. आणि त्याच्या पापाचे परिणाम आपण आजही भोगत आहोत. पण याच्या अगदी उलट, देवाने आपल्या मुलाला जिवंत केल्यामुळे आपल्याला किती सुंदर आशा मिळते याचा विचार करा! पौलने म्हटलं: “पुनरुत्थानसुद्धा एकाच माणसाद्वारे,” म्हणजे येशूद्वारे होतं. पुढे तो म्हणतो: “कारण ज्याप्रमाणे आदाममुळे सगळे मरत आहेत, त्याचप्रमाणे ख्रिस्तामुळे सगळे जिवंत केले जातील.”—१ करिंथ. १५:२१, २२.

१४. आदामचं पुनरुत्थान केलं जाईल का? समजावून सांगा.

१४ पौलने म्हटलं: “आदाममुळे सगळे  मरत आहेत.” याचा काय अर्थ होतो? हाच, की आदामपासून त्याच्या वंशजांना वारशाने पाप आणि अपरिपूर्णता मिळाली आहे आणि त्यामुळे ते सगळे मरतात. (रोम. ५:१२) पण येशूच्या खंडणी बलिदानामुळे पुढे त्यांना जिवंत केलं जाण्याची आशा आहे. आदामला मात्र ही आशा नाही; येशूच्या खंडणी बलिदानाचा त्याला फायदा होणार नाही. कारण तो परिपूर्ण होता आणि त्याने जाणूनबुजून देवाची आज्ञा मोडली. आज जे लोक जाणूनबुजून पाप करतात त्यांना आदामसारखीच शिक्षा मिळेल. भविष्यात जेव्हा “मनुष्याचा मुलगा” न्याय करायला येईल तेव्हा ‘बकऱ्‍यांसारखी’ मनोवृत्ती दाखवणाऱ्‍या या लोकांचा तो “सर्वकाळासाठी नाश” करेल.—मत्त. २५:३१-३३, ४६; इब्री ५:९.

ज्यांचं स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान झालं, त्यांच्यापैकी येशू पहिला होता (परिच्छेद १५-१६ पाहा) *

१५. “सगळे  जिवंत केले जातील” असं जे पौलने म्हटलं ते कोणाच्या बाबतीत म्हटलं?

१५ पौलने म्हटलं: “ख्रिस्तामुळे सगळे  जिवंत केले जातील.” (१ करिंथ. १५:२२) इथे पौलने “सगळे” असं जे म्हटलं ते कोणाबद्दल म्हटलं आहे? सगळ्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांबद्दल. हे कशावरून म्हणता येईल? पौलने हे पत्र कोणाला लिहिलं होतं त्याकडे लक्ष द्या. त्याने ते करिंथमधल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लिहिलं होतं. त्यांचं स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान केलं जाणार होतं. आणि त्यांना, “पवित्र जन होण्यासाठी ख्रिस्त येशूचे शिष्य या नात्याने” पवित्र करण्यात आलं होतं. याशिवाय, “जे ख्रिस्ती लोक मरण पावले”  होते त्यांचासुद्धा पौलने आपल्या पत्रात उल्लेख केला. (१ करिंथ. १:२; १५:१८; २ करिंथ. ५:१७) पौलने लिहिलेल्या दुसऱ्‍या एका पत्रात त्याने म्हटलं: जे “[येशूसारखाच] मृत्यू झाल्यामुळे . . . त्याच्यासोबत एक” झाले आहेत, ते “त्याच्यासारखं पुनरुत्थान होण्याद्वारेही . . . त्याच्यासोबत एक” होतील. (रोम. ६:३-५) येशूचं अदृश्‍य शरीरात पुनरुत्थान झालं आणि तो स्वर्गात गेला. ख्रिस्ताच्या सर्व अभिषिक्‍त शिष्यांच्या बाबतीतही असंच होईल.

१६. पौलने येशूला “पहिलं फळ” का म्हटलं?

१६ पौलने आपल्या पत्रात म्हटलं, की ख्रिस्त हा “मरण पावलेल्यांपैकी पहिलं फळ आहे.” हे खरं आहे, की येशूच्या आधी लाजरचं आणि इतर जणांचं पृथ्वीवर पुनरुत्थान करण्यात आलं होतं. पण येशू हा पहिलाच  होता ज्याला अदृश्‍य शरीर देऊन उठवण्यात आलं होतं आणि ज्याला सर्वकाळाचं जीवन देण्यात आलं होतं. येशूची तुलना, इस्राएली लोक देवाला देत असलेल्या पहिल्या पिकाच्या अर्पणाशी केली जाऊ शकते. तसंच, येशूला “पहिलं फळ” म्हणण्याद्वारे पौलला असं म्हणायचं होतं, की येशूनंतर इतरांचंही स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान केलं जाणार होतं. येशूप्रमाणेच, पुढे त्याच्या प्रेषितांना आणि इतर अभिषिक्‍त शिष्यांना स्वर्गातल्या जीवनासाठी उठवलं जाणार होतं.

१७. प्रेषितांना आणि इतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गातल्या जीवनाचं प्रतिफळ कधी मिळणार होतं?

१७ पौलने करिंथकरांना पत्र लिहिलं, तेव्हा प्रेषितांचं आणि ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त शिष्यांचं पुनरुत्थान व्हायला अजून सुरुवात झाली नव्हती. उलट, त्यांचं पुनरुत्थान भविष्यात होईल असं पौलने म्हटलं. त्याने म्हटलं: “प्रत्येकाला त्याच्या योग्य क्रमाप्रमाणे: ख्रिस्त, जो पहिलं फळ आहे. त्यानंतर,  जे ख्रिस्ताचे आहेत ते त्याच्या उपस्थितीदरम्यान  उठवले जातील.” (१ करिंथ. १५:२३; १ थेस्सलनी. ४:१५, १६) आज आपण ख्रिस्ताच्या “उपस्थितीदरम्यान” जगत आहोत. यावरून दिसून येतं, की प्रेषितांना आणि इतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गातल्या जीवनाच्या प्रतिफळासाठी आणि ‘येशूसारखं पुनरुत्थान होऊन त्याच्यासोबत एक’ होण्यासाठी त्याच्या उपस्थितीपर्यंत थांबावं लागणार होतं.

पुनरुत्थानाची आशा पक्की आहे!

१८. (क) स्वर्गातल्या पुनरुत्थानानंतर आणखी एक पुनरुत्थान होईल असं का म्हणता येईल? (ख) १ करिंथकर १५:२४-२६ या वचनांत सांगितल्याप्रमाणे स्वर्गात कोणत्या घटना घडतील?

१८ ज्यांना स्वर्गातल्या जीवनाची आशा नाही अशा विश्‍वासू ख्रिश्‍चनांबद्दल काय? त्यांनासुद्धा पुनरुत्थानाची आशा आहे. असं का म्हणता येईल? कारण बायबल म्हणतं, की पौलचं आणि अभिषिक्‍त जनांचं “पहिलं  पुनरुत्थान” होईल. (फिलिप्पै. ३:११) जर अभिषिक्‍त जनांचं पहिलं पुनरुत्थान होणार असेल, तर याचा अर्थ यानंतर आणखी एक पुनरुत्थान होईल. आणि याच पुनरुत्थानाबद्दल ईयोब बोलत होता. आणि याच पुनरुत्थानाची आपल्याला आशा आहे असा त्याचा विश्‍वास होता. (ईयो. १४:१५) पहिले करिंथकर १५:२४-२६ (वाचा.) या वचनांत सांगितल्याप्रमाणे, येशू जेव्हा सगळी सरकारं, अधिकारी आणि सत्ता नाहीशा करेल, तेव्हा त्याच्यासोबत स्वर्गात ते अभिषिक्‍त जनसुद्धा असतील ज्यांना ‘ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान उठवलं जातं.’ तसंच, ‘शेवटचा शत्रू, म्हणजे मृत्यूसुद्धा नाहीसा केला जाईल.’ तर स्पष्टच आहे, की ज्यांना स्वर्गातल्या जीवनासाठी उठलं जाईल त्यांची, वारशाने मिळालेल्या मृत्यूपासून कायमची सुटका होईल. पण इतरांबद्दल काय?

१९. ज्यांना स्वर्गातल्या जीवनाची आशा नाही ते कशाची खातरी बाळगू शकतात?

१९ ज्यांना स्वर्गातल्या जीवनाची आशा नाही ते कशाची खातरी बाळगू शकतात? पौलने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. तो म्हणाला: “नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे, अशी . . . मीसुद्धा देवाकडून आशा बाळगतो.” (प्रे. कार्यं २४:१५) अनीतिमान लोक तर स्वर्गात जाऊ शकत नाहीत. तर मग स्पष्टच आहे, की इथे पौल भविष्यात पृथ्वीवर होणार असलेल्या पुनरुत्थानाबद्दल बोलत होता.

पुनरुत्थानावर आपला विश्‍वास असेल, तर एका आनंदी भविष्याकडे आपण आशेने पाहू शकतो (परिच्छेद २० पाहा) *

२०. मृत लोकांचं पुनरुत्थान होईल याची तुम्हाला कशामुळे खातरी पटते?

२० तर मग, मृत लोकांचं पुनरुत्थान होईल याबद्दल आपल्याला कोणतीही शंका नाही. ज्यांना पृथ्वीवर जिवंत केलं जाईल त्यांना सर्वकाळ जीवन जगण्याची आशा आहे. हे अभिवचन पूर्ण होईल याची आपण पक्की खातरी बाळगू शकतो. मरण पावलेले आपले जवळचे लोक आपल्याला पुन्हा भेटतील याचा विचार करून आपल्याला खरंच किती दिलासा मिळतो! भविष्यात जेव्हा ख्रिस्त आणि त्याच्यासोबत इतर जण “१,००० वर्षांपर्यंत राजे म्हणून राज्य करतील,” तेव्हा आपल्या प्रियजनांना उठवलं जाईल. (प्रकटी. २०:६) आणि आपल्याविषयी म्हणायचं तर हजार वर्षांचा तो काळ सुरू होण्याआधी जरी आपला मृत्यू झाला, तरी आपलं पुनरुत्थान होईल याची आपण खातरी बाळगू शकतो. पुनरुत्थानाच्या “या आशेमुळे पुढे आपली निराशा होणार नाही.” (रोम. ५:५) ही आशा आपल्याला विश्‍वासात मजबूत राहायला आणि आनंदाने यहोवाची सेवा करत राहायला मदत करेल. पण या सगळ्या गोष्टींशिवाय १ करिंथकरच्या १५ व्या अध्यायातून आणखी बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.

गीत ५५ चिरकालाचे जीवन!

^ परि. 5 पहिले करिंथकर १५ व्या अध्यायात खासकरून पुनरुत्थानाबद्दल सांगितलं आहे. पुनरुत्थानाची शिकवण आपल्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे? आणि येशूचं पुनरुत्थान झालं होतं असं आपण खातरीने का म्हणू शकतो? या प्रश्‍नांची आणि पुनरुत्थानाबद्दल असलेल्या इतर महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं या लेखात आपण पाहू या.

^ परि. 56 चित्रांचं वर्णन: स्वर्गात जाणाऱ्‍यांपैकी येशू पहिला होता. (प्रे. कार्यं १:९) पुढे, त्याच्या शिष्यांपैकी थोमा, याकोब, लुदिया, योहान, मरीया आणि पौल हेसुद्धा स्वर्गात गेले.

^ परि. 58 चित्रांचं वर्णन: एका भावाने आणि त्यांच्या पत्नीने अनेक वर्षं एकत्र मिळून यहोवाची सेवा केली होती. नंतर पत्नीचा मृत्यू होतो. पण तिचं पुनरुत्थान होईल याची त्या भावाला पक्की खातरी आहे. या आशेवर भरवसा ठेवून ते विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करतात.