व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इच्छास्वातंत्र्य यहोवाकडून मिळालेली एक अमूल्य भेट

इच्छास्वातंत्र्य यहोवाकडून मिळालेली एक अमूल्य भेट

“जेथे यहोवाचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.”—२ करिंथ. ३:१७, NW.

गीत क्रमांक: ३१, ३२

१, २. (क) इच्छास्वातंत्र्याबद्दल लोकांची काय मतं आहेत? (ख) या स्वातंत्र्याबद्दल बायबल आपल्याला काय सांगतं, आणि आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

निर्णय घेताना एक स्त्री आपल्या मैत्रिणीला म्हणाली: “मला विचार करावा लागेल असं काही सांगू नको; मी नेमकं काय करू, फक्त तेवढं सांग. ते जास्त सोपं आहे.” आपल्या निर्माणकर्त्याकडून मिळालेल्या इच्छास्वातंत्र्याच्या अमूल्य देणगीचा वापर करण्याऐवजी, आपण काय करावं हे दुसऱ्यांनी आपल्याला सांगावं अशी अपेक्षा ही स्त्री करत होती. तुमच्या बाबतीत काय? तुम्हाला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात, की दुसऱ्यांनी आपल्यासाठी निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा तुम्ही करता? इच्छास्वातंत्र्याकडे म्हणजे निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता?

इच्छास्वातंत्र्याकडे पाहण्याचा लोकांचा वेगवेगळा दृष्टिकोन आहे. काही जण म्हणतात की आपल्याला इच्छास्वातंत्र्य नाही. कारण, आपण जीवनात काय करणार आहोत हे देवाने आधीच ठरवलं आहे. तर काही लोक म्हणतात, खरं इच्छास्वातंत्र्य फक्त त्यालाच म्हणता येईल जेव्हा आपल्याला सर्व बाबतीत अगदी पुरेपूर स्वातंत्र्य असेल. लोकांची वेगवेगळी मतं आहेत. पण बायबल म्हणतं की देवाने आपल्याला अशी क्षमता आणि स्वातंत्र्य देऊन निर्माण केलं आहे ज्यामुळे स्वतःसाठी योग्य निर्णय घेणं आपल्याला शक्य आहे. (यहोशवा २४:१५ वाचा.) तसंच, बायबलमध्ये आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरंदेखील मिळतात: आपल्याला दिलेल्या या इच्छास्वातंत्र्याला काही मर्यादा आहेत का? एखादा निर्णय घेताना आपण या स्वातंत्र्याचा कसा उपयोग करू शकतो? आपण घेतलेल्या निर्णयांवरून, आपण यहोवावर खरोखर प्रेम करतो हे कसं दिसून येतं? इतरांनी घेतलेल्या निर्णयांचा आपण आदर करतो, हे आपण कसं दाखवू शकतो?

यहोवा आणि येशू ख्रिस्ताकडून आपण काय शिकू शकतो?

३. यहोवा त्याच्या स्वातंत्र्याचा कसा उपयोग करतो?

संपूर्ण विश्वात फक्त यहोवा देवच अशी एक व्यक्ती आहे जिच्या स्वातंत्र्याला कोणत्याही मर्यादा नाहीत. आणि यहोवा ज्या प्रकारे आपल्या या स्वातंत्र्याचा उपयोग करतो त्यापासून आपण बरंच काही शिकू शकतो. उदाहरणार्थ, यहोवाने इस्राएली लोकांना त्याचा खास निधी आणि “खास प्रजा” होण्यासाठी निवडलं. (अनु. ७:६-८) असं करण्यामागे त्याच्याकडे एक कारण होतं. यहोवाला आपला मित्र अब्राहाम याला दिलेलं अभिवचन पूर्ण करायचं होतं. (उत्प. २२:१५-१८) शिवाय आजही जेव्हा यहोवा आपल्या या स्वातंत्र्याचा वापर करतो, तेव्हा तो प्रेमळपणे आणि योग्य रितीने करतो. इस्राएली लोकांनी जेव्हा यहोवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही, तेव्हा यहोवाने त्यांना ज्या प्रकारे सुधारलं त्यावरून आपल्याला हे दिसून येतं. जेव्हा इस्राएली लोकांनी खरा पश्‍चात्ताप दाखवला तेव्हा यहोवाने त्यांच्यावर प्रेम आणि दया दाखवली. यहोवा म्हणाला: “मी त्यांना वाटेवर आणीन, त्यांजवर मोकळ्या मनाने [“स्वेच्छेने,” NW] प्रीती करेन.” (होशे. १४:४) आपल्या स्वातंत्र्याचा इतरांना मदत करण्यासाठी उपयोग करून, यहोवाने आपल्यासमोर एक सर्वोत्तम उदाहरण मांडलं आहे!

४, ५. (क) सर्वात प्रथम इच्छास्वातंत्र्य देऊन कोणाला निर्माण करण्यात आलं, आणि या स्वातंत्र्याचा त्याने कसा उपयोग केला? (ख) आपण प्रत्येकाने कोणती जाणीव ठेवली पाहिजे आणि का?

स्वर्गदूतांची आणि मानवांची निर्मिती करताना यहोवाने त्यांना इच्छास्वातंत्र्य देऊन निर्माण केलं. यहोवाने सर्वप्रथम येशूला निर्माण केलं. यहोवाने त्याला स्वतःच्या प्रतिरूपात आणि इच्छास्वातंत्र्य देऊन निर्माण केलं. (कलस्सै. १:१५) मिळालेल्या या स्वातंत्र्याचा येशूने कसा उपयोग केला? पृथ्वीवर येण्यापूर्वी येशूने यहोवाला एकनिष्ठ राहण्याचं निवडलं; त्याने सैतानाला त्याच्या बंडाळीमध्ये साथ दिली नाही. पृथ्वीवर आल्यानंतर सैतान देऊ करत असलेल्या गोष्टींना येशूने नाकारलं. (मत्त. ४:१०) त्यानंतर या पृथ्वीवरील शेवटल्या रात्री येशूने आपल्या स्वर्गीय पित्याला सांगितलं, की त्याला स्वतःची नाही तर पित्याची इच्छा पूर्ण करायची आहे. तो म्हणाला: “हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” (लूक २२:४२) येशूच्या पावलांवर पाऊल ठेऊन चालणं आणि आपल्या स्वातंत्र्याचा यहोवाच्या गौरवासाठी उपयोग करणं आपल्यालाही खरंच शक्य आहे का?

हो, आपल्याला हे शक्य आहे. आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेऊन चालू शकतो. कारण, आपल्यालाही देवाच्या प्रतिरूपात बनवण्यात आलं आहे. (उत्प. १:२६) पण साहजिकच, आपल्याला यहोवाप्रमाणे पूर्ण स्वातंत्र्य नाही. देवाच्या वचनांवरून आपल्याला कळतं की आपल्या स्वातंत्र्याला काही मर्यादा आहेत. आणि या मर्यादांना आपण पाळावं अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. उदाहरणार्थ, कुटुंबामध्ये पत्नीने आपल्या पतीला अधीनता दाखवावी आणि मुलांनी आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहावं, अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. (इफिस. ५:२२; ६:१) यहोवाने आपल्याला ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत त्यांची जाणीव ठेवल्याने, आपल्या इच्छास्वातंत्र्याचा योग्य वापर करणं आपल्याला शक्य होतं. आपण आपल्या इच्छास्वातंत्र्याचा वापर कसा करतो यावरच आपलं सार्वकालिक जीवन अवलंबून आहे.

इच्छास्वातंत्र्य—योग्य आणि अयोग्य वापर

६. आपल्या स्वातंत्र्याला काही मर्यादा असणं गरजेचं आहे, हे एका उदाहरणाद्वारे समजावून सांगा.

मर्यादित स्वातंत्र्याला खरं स्वातंत्र्य म्हणता येईल का? हो नक्कीच. कारण, या मर्यादा आपल्या भल्याकरताच आहेत. एक उदाहरण घ्या. दूरवर असलेल्या एखाद्या शहराला भेट देण्यासाठी आपण स्वतः गाडी चालवून जाण्याचं ठरवतो. हे ठरवणं आपल्या हातात आहे. पण कल्पना करा की, गाडी चालवताना पाळण्यासाठी कोणतेही नियम-कायदे नाहीत. प्रत्येक जण आपापल्या मर्जीप्रमाणे गाडी रस्त्याच्या कोणत्याही बाजूने चालवू शकतो आणि हव्या त्या वेगाने जाऊ शकतो. मग अशा परिस्थितीत आपल्यापैकी कोणालाही गाडी चालवणं सुरक्षित वाटेल का? नक्कीच नाही. म्हणजेच गाडी चालवण्याचं स्वातंत्र्य जरी आपल्याला असलं तरी गाडी चालवताना, मर्यादांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. कारण त्या आपल्या सुरक्षेसाठीच आहेत. या उदाहरणावरून हेच दिसून येतं की, खऱ्या स्वातंत्र्याचे फायदे मिळवायचे असतील तर मर्यादा या गरजेच्या आहेत. यहोवाने आपल्याला ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत त्या आपल्या फायद्याच्याच आहेत, हे आता आपण बायबलमधील इतर काही उदाहरणांद्वारे पाहू.

७. (क) आदामाच्या निर्मितीमध्ये आणि प्राण्यांच्या निर्मितीमध्ये कोणता मुख्य फरक होता? (ख) आदामाने आपल्या इच्छास्वातंत्र्याचा वापर केला याचं एक उदाहरणं द्या.

यहोवाने जेव्हा पहिल्या मानवाची, आदामाची निर्मिती केली तेव्हा त्यालादेखील स्वर्गदूतांप्रमाणेच इच्छास्वातंत्र्याची अमूल्य भेट दिली. पण यहोवाने ही भेट प्राण्यांना दिली नाही. आदामाने यहोवाकडून मिळालेल्या या सुंदर भेटीचा सुरवातीला चांगला उपयोग केला. त्याने प्रत्येक प्राण्याला नाव दिलं, आणि यात त्याला आनंददेखील मिळाला. बायबल सांगतं, आदाम प्राण्यांना कोणती नावं देतो हे पाहावं यासाठी देवाने त्या प्राण्यांना त्याच्याकडे नेलं. प्रत्येक प्राण्याला पाहिल्यानंतर आदामाने त्यांना योग्य ती नावं दिली. आदामाने दिलेली नावं यहोवाने बदलली नाहीत, तर “आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले.”—उत्प. २:१९.

८. इच्छास्वातंत्र्याचा आदामाने गैरवापर कसा केला आणि त्याचे काय परिणाम झाले?

संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवण्याची जबाबदारी यहोवाने आदामावर सोपवली. यहोवाने सांगितलं: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” (उत्प. १:२८) पण त्याऐवजी आदामाने मनाई केलेलं फळ खाण्याची निवड केली, आणि यहोवाने जी मर्यादा त्याला घालून दिली होती तिचं उल्लंघन केलं. आदामाने त्याला दिलेल्या इच्छास्वातंत्र्याचा अयोग्यपणे वापर केला. त्यामुळे संपूर्ण मानवजात हजारो वर्षांपासून त्रास भोगत आहे. (रोम. ५:१२) आदामाच्या निर्णयाचे जे वाईट परिणाम झाले आहेत ते आपण नेहमी लक्षात ठेवूयात. असं केल्यामुळे आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण योग्य प्रकारे वापर करू, आणि यहोवाने ज्या मर्यादा आपल्याला घालून दिल्या आहेत त्यांचा आदर करू.

९. यहोवाने इस्राएली लोकांना कोणती निवड करण्याची संधी दिली, आणि त्यांनी यहोवाला कोणतं वचन दिलं?

आदाम आणि हव्वेमुळे संपूर्ण मानवजातीवर अपरिपूर्णता आणि मृत्यू ओढावला. पण तरी देवाने मानवांना दिलेली इच्छास्वातंत्र्याची भेट त्यांच्याकडून काढून घेतली नाही. यहोवाने इस्राएली लोकांशी ज्या प्रकारे व्यवहार केला त्यावरून आपण हे पाहू शकतो. यहोवाने त्यांना त्याची खास निधि किंवा खास प्रजा होण्याची संधी दिली. (निर्ग. १९:३-६) इस्राएली लोकांनी यहोवाची प्रजा होण्याचं निवडलं आणि त्याने घालून दिलेल्या मर्यादांचं ते पालन करतील असं सांगितलं. ते म्हणाले: “परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” (निर्ग. १९:८) पण दुःखाची गोष्ट म्हणजे काही काळाने इस्राएली लोकांनी यहोवाला दिलेलं वचन पाळलं नाही. या उदाहरणावरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. तो म्हणजे, यहोवाकडून मिळालेल्या इच्छास्वातंत्र्याची आपण कदर केली पाहिजे आणि यहोवाशी जडून राहण्याद्वारे त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत.—१ करिंथ. १०:११.

१०. अपरिपूर्ण मानव त्यांना मिळालेल्या इच्छास्वातंत्र्याचा वापर देवाला गौरव देण्यासाठी करू शकतात, हे इब्री लोकांस अध्याय ११ मध्ये दिलेल्या विश्वासू जणांच्या उदाहरणावरून कसं दिसून येतं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१० इब्री लोकांस अध्याय ११ मध्ये आपण अशा सोळा विश्वासू स्त्री-पुरुषांची नावं पाहतो ज्यांनी यहोवाने घालून दिलेल्या मर्यादा पाळण्याची निवड केली. याचा परिणाम म्हणजे त्यांना भरपूर आशीर्वाद मिळाले आणि एका चांगल्या भविष्याची आशादेखील. उदाहरणार्थ, नोहाचा यहोवा देवावर भक्कम विश्वास होता. यहोवाने नोहाच्या कुटुंबाचा आणि त्यांच्यापासून भविष्यात येणाऱ्या मानवजातीचा बचाव करण्यासाठी, त्याला तारू बांधण्यास सांगितलं आणि काही सूचना दिल्या. नोहाने यहोवाच्या सूचनांचं पालन करण्याची निवड केली. (इब्री ११:७) अब्राहाम आणि साराने स्वखुशीने यहोवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि अभिवचन दिलेल्या देशात जाण्यास ते निघाले. नंतर त्यांना ऊर शहरात “परत जाण्याची संधी होती,” तरीदेखील त्यांनी देवाने दिलेल्या अभिवचनावर आपली दृष्टी लावली. बायबल म्हणतं की त्यांनी “अधिक चांगल्या देशाची . . . उत्कंठा” धरली. (इब्री ११:८, १३, १५, १६) मोशेने इजिप्तचं ऐश्वर्य नाकारलं आणि “पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे” पसंत केले. (इब्री ११:२४-२६) या विश्वासू स्त्री-पुरुषांचं अनुकरण करण्याद्वारे आपल्याला मिळालेल्या इच्छास्वातंत्र्याची आपण कदर करूयात, आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी या स्वातंत्र्याचा वापर करूयात.

११. (क) इच्छास्वातंत्र्यामुळे आपण कोणता सर्वात मोठा आशीर्वाद अनुभवतो? (ख) तुमच्या इच्छास्वातंत्र्याचा योग्य वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे प्रेरणा मिळते?

११ एखाद्या गोष्टीविषयी आपण स्वतः निर्णय घेण्याऐवजी, इतरांनी आपल्यासाठी निर्णय घेतले तर ते सोपं वाटतं. पण असं केलं तर देवाने आपल्याला देऊ केलेल्या सर्वात मोठ्या आशीर्वादांपैकी असलेला एक आशीर्वाद आपण कधीही अनुभवू शकणार नाही. तो कोणता? याविषयी आपल्याला अनुवाद ३०:१९, २० (वाचा.) मध्ये पाहायला मिळतं. १९ व्या वचनात आपण पाहतो की देवाने इस्राएली लोकांना निवड करण्याची संधी दिली होती. २० व्या वचनात आपण पाहतो की यहोवाने त्याच्यावर असलेलं त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची संधीही त्यांना दिली. आज आपणही यहोवाची उपासना करण्याची निवड करू शकतो. आपल्याला मिळालेल्या इच्छास्वातंत्र्याद्वारे यहोवाच्या नावाचा गौरव करण्याची आणि त्याच्यावर असलेलं आपलं प्रेम व्यक्त करण्याची विशेष संधी आज आपल्याकडेही आहे.

इच्छास्वातंत्र्याचा अयोग्य वापर करू नका

१२. आपल्याला मिळालेल्या इच्छास्वातंत्र्याचा आपण कोणत्या प्रकारे वापर करू नये?

१२ कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्राला एक मौल्यवान भेटवस्तू देता. पण तो ती कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो. किंवा याहूनही अधिक वाईट म्हणजे तो त्या भेटवस्तूचा दुरुपयोग करून दुसऱ्यांना हानी पोहचवतो. अशा वेळी तुम्हाला कसं वाटेल? नक्कीच तुम्हाला खूप दुःख होईल. यहोवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्याची एक खूप मौल्यवान भेट दिली आहे. त्यामुळे जेव्हा लोक या मौल्यवान भेटीचा दुरुपयोग करतात आणि जीवनात चुकीची निवड करतात किंवा याचा वापर इतरांना हानी पोहचवण्यासाठी करतात तेव्हा यहोवालाही दुःख होतं. बायबल म्हणतं, “शेवटल्या काळी” माणसे “उपकार न स्मरणारी” होतील. (२ तीम. ३:१, २) पण यहोवाकडून मिळालेल्या या मौल्यवान भेटीसाठी आपण त्याचे आभार मानायला हवेत. हे आपण कसं करू शकतो? आणि या स्वातंत्र्याचा आपण अयोग्य वापर कसा टाळू शकतो?

१३. कोणता एक मार्ग आहे ज्याद्वारे ख्रिस्ती व्यक्ती तिला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अयोग्य वापर टाळू शकते?

१३ आपल्या प्रत्येकाला मित्र, पेहराव आणि मनोरंजन निवडण्याची मोकळीक आहे. पण आपल्याला मिळालेल्या या स्वातंत्र्याचं कारण देत आपण कदाचित अशी निवड करू ज्यामुळे यहोवा नाराज होईल. किंवा मग आपण जगातील लोकांच्या चालीप्रमाणे वागायला लागू शकतो. (१ पेत्र २:१६ वाचा.) पण मिळालेल्या या स्वातंत्र्याचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करण्याऐवजी, आपण त्याचा वापर सर्व बाबतीत “देवाच्या गौरवासाठी” करायला हवा.—१ करिंथ. १०:३१; गलती. ५:१३.

१४. आपल्या इच्छास्वातंत्र्याचा वापर करताना आपण यहोवावर अवलंबून राहणं का गरजेचं आहे?

१४ यहोवा म्हणतो: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” (यश. ४८:१७) आपण यहोवा देवावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे आणि त्याने आपल्याला ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला जीवनात योग्य निर्णय घेणं शक्य होईल. आपण नम्रपणे कबूल केलं पाहिजे की, “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्म. १०:२३) पहिला मानव आदाम आणि अविश्वासू इस्राएली लोकांनी यहोवाने घालून दिलेल्या मर्यादांचं उल्लंघन केलं. ते यहोवाऐवजी स्वतःवर अवलंबून राहिले. त्यांच्या उदाहरणातून आपण धडा घेऊ या. स्वतःवर अवलंबून राहण्याऐवजी आपण “आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव” ठेवू या.—नीति. ३:५.

इतरांच्या इच्छास्वातंत्र्याची कदर बाळगा

१५. गलतीकर ६:५ या वचनातील तत्त्वामधून आपण काय शिकतो?

१५ इतर जण जेव्हा त्यांच्या जीवनात निर्णय घेतात तेव्हा आपण त्यांच्या इच्छास्वातंत्र्याची कदर बाळगायला हवी. असं का? कारण यहोवाने आपल्या प्रत्येकाला ही मौल्यवान भेट दिली आहे, आणि सारख्याच परिस्थितीत दोन ख्रिस्ती व्यक्ती एकसारखाच निर्णय घेतील असं नाही. या निर्णयांमध्ये इतरांसोबत असलेला आपला व्यवहार आणि उपासनादेखील सामील आहे. गलतीकर ६:५ (वाचा.) मध्ये दिलेलं तत्त्व नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती तिच्या स्वतःच्या निर्णयांसाठी स्वतःच जबाबदार असते. जेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवतो, तेव्हा त्यांना असलेल्या स्वातंत्र्याची कदर बाळगण्यास आपल्याला मदत होते.

आपल्या विवेकाला पटत असलेल्या गोष्टी इतरांवर न थोपता, आपण स्वतःसाठी निर्णय घेऊ या (परिच्छेद १५ पाहा)

१६, १७. (क) करिंथमधल्या बांधवांमध्ये इच्छास्वातंत्र्यामुळे मतभेद कसे निर्माण झाले? (ख) पौलाने करिंथमधल्या ख्रिश्चनांना कशी मदत पुरवली, आणि यावरून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो?

१६ आपल्या बांधवांच्या इच्छास्वातंत्र्याची आपण कदर का केली पाहिजे, हे बायबलमधील एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ या. करिंथमधल्या ख्रिश्चनांचे मूर्तीला वाहिलेले मांस खाण्यावरून मतभेद झाले. प्राण्यांचे हे मांस कदाचित प्रथम मूर्तींना वाहिले जात असावे, पण नंतर तेच मांस बाजारात विकण्यासाठी ठेवले जात होते. काही ख्रिश्चनांचा विवेक त्यांना हे मांस विकत घेऊन खाण्यासाठी अनुमती देत होता. कारण त्यांना हे माहीत होतं की मूर्ती या काहीच नाहीत. पण काही ख्रिस्ती जे पूर्वी मूर्तिपूजा करत होते, त्यांना मूर्तींना वाहिलेलं मांस खाणं म्हणजे मूर्तिपूजा केल्यासारखंच वाटत होतं. (१ करिंथ. ८:४, ७) ख्रिश्चनांमध्ये या विषयावरून असलेल्या मतभेदांमुळे ख्रिस्ती मंडळीत फूट पडण्याची शक्यता होती, आणि ही एक गंभीर समस्या होती. मग पौलाने करिंथमधल्या ख्रिश्चनांना हा महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्यास कशी मदत केली?

१७ प्रथम पौलाने मतभेद असलेल्या दोन्ही गटांतील ख्रिश्चनांना सांगितलं की, खाण्यापिण्याच्या गोष्टी या देवासोबत असलेला आपला नातेसंबंध मजबूत करत नाहीत. (१ करिंथ. ८:८) नंतर पौलाने त्यांना ताकीद दिली की, त्यांना असलेली “मोकळीक” किंवा निवड करण्याच्या स्वातंत्र्यामुळे ज्यांचा विवेक कमकुवत आहे त्यांना अडखळण्यास त्यांनी कारण होऊ नये. (१ करिंथ. ८:९) त्यानंतर ज्यांचा विवेक कमकुवत आहे त्यांना पौलाने सांगितलं की जे अशा प्रकारचं मांस खातात त्यांचा त्यांनी न्याय करू नये. (१ करिंथ. १०:२५, २९, ३०) म्हणजेच, उपासनेसंबंधित महत्त्वाच्या असलेल्या या गोष्टीमध्ये, प्रत्येक ख्रिश्चनाने आपापल्या विवेकाला पटेल असा निर्णय घ्यायचा होता. आज आपण फक्त मोठमोठ्या गोष्टींमध्येच नाही, तर लहानसहान गोष्टींमध्येही आपल्या बांधवांच्या वैयक्तिक निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याचा आदर करू नये का?—१ करिंथ. १०:३२, ३३.

१८. इच्छास्वातंत्र्याच्या मौल्यवान भेटीची तुम्ही कदर करत आहात हे तुम्ही कसं दाखवून द्याल?

१८ यहोवा देवाने आपल्या सर्वांना इच्छास्वातंत्र्य दिलं आहे, त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने मोकळीक म्हणजेच स्वातंत्र्य मिळते. (२ करिंथ. ३:१७) यहोवाकडून मिळालेल्या या मौल्यवान भेटीची आपण कदर करतो. कारण या अमूल्य भेटीमुळे आपण असे काही निर्णय घेऊ शकतो ज्यांद्वारे आपण यहोवावर असलेलं आपलं प्रेम दाखवून देऊ शकतो. तर मग यहोवाच्या नावाला गौरव मिळेल असे निर्णय आपण घेत राहू. तसंच, आपण इतरांच्या इच्छास्वातंत्र्याचीही कदर करत राहू.