व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ६

आपला पिता यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो

आपला पिता यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो

“तेव्हा अशा प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या.’”—मत्त. ६:९.

गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे

सारांश *

१. पारसच्या राजाशी एका व्यक्‍तीला बोलायचं असेल तर तिला काय करण्याची गरज होती?

कल्पना करा, तुम्ही जवळपास २,५०० वर्षांआधी पारस या देशात राहत आहात. त्या देशातल्या राजाशी तुम्हाला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, म्हणून तुम्ही त्या देशाची राजधानी शूशन इथे जाता. पण परवानगीशिवाय तुम्ही राजाशी बोलू शकत नाही, कारण तसं केलं तर तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा होईल.—एस्ते. ४:११.

२. यहोवाशी बोलताना आपल्या काय भावना असल्या पाहिजेत?

आपल्यासाठी खरंच ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे की यहोवा त्या पारसच्या राजासारखा नाही! यहोवा मानवी शासकांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. असं असलं तरी आपण कोणत्याही वेळी त्याच्याशी बोलू शकतो. खरंतर त्याची अशी इच्छा आहे की आपण मनमोकळेपणाने त्याच्याशी बोलावं. उदाहरणार्थ यहोवाला महान सृष्टिकर्ता, सर्वसमर्थ आणि सर्वोच्च अधिकारी अशा मोठ्या पदव्या असल्या, तरी त्याला वाटतं की आपण त्याच्याशी बोलताना ‘पिता’ या शब्दाचा वापर करावा. (मत्त. ६:९) कारण आपलं यहोवासोबत जवळचं नातं असावं असं त्याला वाटतं आणि हे जाणून आपल्याला खरंच खूप आनंद होतो!

३. आपण यहोवाला ‘पिता’ का म्हणू शकतो आणि या लेखात कशावर चर्चा केली जाईल?

यहोवाला पिता म्हणून हाक मारणं अगदी योग्य आहे. कारण त्यानेच सर्वांना जीवन, श्‍वास आणि इतर सर्व गोष्टी दिल्या आहेत. (प्रे. कार्ये १७:२४, २५) तो आपला पिता असल्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपण त्याचं ऐकावं. जर आपण त्याचं ऐकलं तर आपल्याला बरेच आशीर्वाद मिळतील. (इब्री १२:९) त्या आशीर्वादांपैकी एक म्हणजे भविष्यात तो आपल्या सेवकांना पृथ्वीवर किंवा स्वर्गात सर्वकाळाचं जीवन देईल. इतकंच काय तर आजही तो आपल्याला अनेक आशीर्वाद देतो. या लेखात आपण चर्चा करणार आहोत की यहोवा प्रेमळ पिता आहे हे कशावरून सिद्ध होतं आणि भविष्यात तो आपल्याला कधीच सोडणार नाही याची खातरी आपण का बाळगू शकतो? पण सर्वात आधी आपण यावर चर्चा करू या, की आपला स्वर्गीय पित्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि तो आपली काळजी करतो हे आपण खातरीने का म्हणू शकतो.

यहोवा प्रेमळ आणि काळजी घेणारा पिता आहे

एका काळजी घेणाऱ्‍या पित्याची इच्छा असते की त्याने आपल्या मुलाच्या जवळ असावं; अगदी त्याच प्रकारे यहोवालाही आपल्या जवळ राहण्याची इच्छा आहे (परिच्छेद ४ पाहा)

४. देवाला पिता मानणं काही लोकांना कठीण का जातं?

देवाला आपला पिता मानणं तुम्हाला कठीण जातं का? यहोवा इतका श्रेष्ठ आहे की त्याच्या तुलनेत आपण काहीच नाही असं काही जणांना वाटू शकतं. तसंच, सर्वसमर्थ देव प्रत्येकाची काळजी घेतो याबद्दलही त्यांना शंका वाटते. असं असलं तरी, आपल्या प्रेमळ पित्याची इच्छा आहे की आपण अशी शंका मनात बाळगू नये. त्याने आपल्याला जीवन दिलं आहे आणि त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याशी मैत्री करावी. प्रेषित पौल अथेन्सच्या लोकांशी या विषयावर बोलला तेव्हा त्याने म्हटलं की यहोवा “आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.” (प्रे. कार्ये १७:२४-२९) ज्या प्रकारे एक मूल स्वाभाविकपणे आपल्या प्रेमळ वडिलांकडे धावत जातं, त्याच प्रकारे आपल्यापैकी प्रत्येकाने यहोवाकडे जावं अशी त्याची इच्छा आहे.

५. एका बहिणीच्या अनुभवातून आपण काय शिकू शकतो?

काही लोकांना त्यांच्या वडिलांनी प्रेमाने किंवा आपुलकीने वागवलेलं नसतं, म्हणून त्यांना यहोवाला आपला पिता मानणं कठीण जाऊ शकतं. एका ख्रिस्ती बहिणीने याबद्दल म्हटलं: “माझे वडील मला वाईटसाईट बोलायचे आणि खूप शिवीगाळ करायचे. जेव्हा माझा बायबल अभ्यास सुरू झाला तेव्हा यहोवाला पिता मानणं मला कठीण गेलं. पण त्याला जाणून घेतल्यावर माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.” तुम्हालाही असंच वाटतं का? जर वाटत असेल, तर निराश होऊ नका. कारण कालांतराने तुम्हाला जाणवेल की यहोवा तुमचा सर्वात चांगला पिता आहे.

६. मत्तय ११:२७ या वचनानुसार आपण यहोवाला प्रेमळ पिता म्हणून ओळखावं यासाठी त्याने आपल्याला कोणत्या मार्गाने मदत केली आहे?

यहोवाला आपण एक प्रेमळ पिता म्हणून ओळखावं यासाठी त्याने आपल्याला एका मार्गाने मदत केली आहे. तो म्हणजे, येशू जे बोलला आणि त्याने जी कार्यं केली ती सर्व यहोवाने बायबलमध्ये नमूद केली आहेत. (मत्तय ११:२७ वाचा.) येशूने अगदी हुबेहूब यहोवाच्या गुणाचं अनुकरण केलं आणि त्यामुळे तो म्हणू शकला: “ज्याने मला पाहिलं आहे, त्याने पित्यालाही पाहिलं आहे.” (योहा. १४:९) येशूने बऱ्‍याचदा यहोवाला पिता म्हटलं. शुभवर्तमानाच्या चार पुस्तकात येशूने जवळजवळ १६५ वेळा यहोवाचा उल्लेख ‘पिता’ म्हणून केला. पण असं का? याचं एक कारण म्हणजे लोकांना खातरी पटावी की यहोवा एक प्रेमळ पिता आहे.—योहा. १७:२५, २६.

७. यहोवा आपल्या मुलासोबत ज्या प्रकारे वागला त्यावरून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

यहोवा आपल्या मुलासोबत ज्या प्रकारे वागला त्यातून आपण काय शिकू शकतो हे आता आपण पाहू या. यहोवाने नेहमीच येशूची प्रार्थना ऐकली आणि त्याने ती फक्‍त ऐकली नाही तर तिचं उत्तरही दिलं. (योहा. ११:४१, ४२) येशूला जेव्हापण परीक्षेचा किंवा छळाचा सामना करावा लागला तेव्हा त्याला नेहमीच आपल्या पित्याच्या प्रेमाची आणि मदतीची जाणीव झाली.—लूक २२:४२, ४३.

८. कोणत्या मार्गाने यहोवाने येशूच्या गरजा पूर्ण केल्या?

येशूने म्हटलं: “मी पित्यामुळे जिवंत आहे.” (योहा. ६:५७) असं म्हणून त्याने मान्य केलं की यहोवाने त्याला जीवन दिलं आणि त्याला जगण्यासाठी ज्या गोष्टी लागल्या त्या सर्व त्याने पुरवल्या. येशूचा आपल्या पित्यावर पूर्ण भरवसा होता व त्याने त्याच्या सर्व शारीरिक गरजा पूर्ण केल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यहोवाने त्याची आध्यात्मिक गरज पूर्ण केली. म्हणजेच त्याने येशूला विश्‍वासू राहण्यासाठी मदत केली.—मत्त. ४:४.

९. एक प्रेमळ पिता या नात्याने यहोवा येशूवर प्रेम करतो हे त्याने कसं दाखवून दिलं?

यहोवाने येशूला खातरी करून दिली की एक प्रेमळ पिता या नात्याने तो येशूला मदत करत आहे. (मत्त. २६:५३; योहा. ८:१६) यहोवाने येशूला छळाचा सामना करू दिला पण त्यादरम्यान त्याने त्याला धीर धरण्यासाठी मदत केली. येशूला माहीत होतं की त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागला तरी तो तात्पुरता असेल. (इब्री १२:२) यहोवाने येशूची प्रार्थना ऐकली, त्याच्या गरजा पूर्ण केल्या, त्याला प्रशिक्षण दिलं आणि त्याला मदत केली. असं करून त्याने दाखवून दिलं की त्याचं येशूवर प्रेम आहे. (योहा. ५:२०; ८:२८) आपला स्वर्गीय पिता आपलीही अशाच प्रकारे काळजी कशी घेतो याबद्दल आता आपण पाहू या.

आपला प्रेमळ पिता आपली काळजी कशी घेतो?

प्रेमळ वडील आपल्या मुलांचं (१) लक्ष देऊन ऐकतात, (२) त्यांच्या गरजा पूर्ण करतात, (३) त्यांना शिकवतात, (४) त्यांचं संरक्षण करतात. स्वर्गात राहणारा आपला प्रेमळ पिता अशाच प्रकारे आपली काळजी घेतो (परिच्छेद १०-१५ पाहा) *

१०. स्तोत्र ६६:१९, २० या वचनांनुसार यहोवा आपल्यावर प्रेम करतो हे तो कसं दाखवतो?

१० यहोवा आपली प्रार्थना ऐकतो.  (स्तोत्र ६६:१९, २० वाचा.) आपण यहोवाला मोजक्याच वेळी प्रार्थना करावी अशी त्याची इच्छा नाही, तर तो आपल्याला आर्जवतो की आपण नेहमी त्याच्याशी बोलावं. (१ थेस्सलनी. ५:१७) आपण कुठूनही आणि कोणत्याही वेळी यहोवाला प्रार्थना करू शकतो. आपली प्रार्थना लक्ष देऊन ऐकण्यासाठी तो नेहमी तयार असतो. आपल्याला या गोष्टीची जाणीव होते तेव्हा त्याच्यावर असलेलं आपलं प्रेम आणखी वाढतं. म्हणूनच स्तोत्रकर्त्याने असं म्हटलं, की “मी परमेश्‍वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो.”—स्तो. ११६:१.

११. यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो?

११ आपला पिता आपल्या प्रार्थना फक्‍त ऐकतच नाही तर त्यांचं उत्तरही देतो. याबद्दल प्रेषित योहानने म्हटलं की देवाच्या “इच्छेनुसार असलेले काहीही आपण मागितले तरी तो आपले ऐकतो.” (१ योहान ५:१४, १५) पण हेही खरं आहे की कदाचित यहोवा आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्या प्रार्थनांचं उत्तर देणार नाही. आपल्यासाठी सर्वात चांगलं काय आहे हे त्याला माहीत आहे. म्हणून कधीकधी आपण प्रार्थनेत मागितलेल्या सर्वच गोष्टी तो आपल्याला देत नाही किंवा उत्तरासाठी आपण थांबावं अशी त्याची इच्छा असते.—२ करिंथ. १२:७-९.

१२-१३. आपला स्वर्गीय पिता कोणत्या मार्गांनी आपल्या गरजा पुरवतो?

१२ यहोवा आपल्या गरजा पुरवतो.  यहोवाने आज्ञा दिली आहे की एका कुटुंबप्रमुखाने आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्यात आणि हीच गोष्ट तो स्वतःसुद्धा करतो. (१ तीम. ५:८) तो आपल्या मुलांना जगण्यासाठी लागणाऱ्‍या सर्व गोष्टी पुरवतो. आपण अन्‍न, वस्त्र आणि निवारा यांबद्दल चिंता करू नये अशी त्याची इच्छा आहे. (मत्त. ६:३२, ३३; ७:११) एक प्रेमळ पिता असल्यामुळे यहोवा भविष्यातही आपल्या सर्व गरजा नक्कीच पूर्ण करेल!

१३ सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपलं यहोवासोबत एक चांगलं नातं असावं यासाठी तो आपल्याला मदत करतो. म्हणून बायबलमध्ये त्याने स्वतःबद्दलचं सत्य, मानवांबद्दलची त्याची इच्छा, आपल्या जीवनाचा उद्देश आणि भविष्यात तो काय करेल या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. सुरुवातीला सत्य शिकताना आपल्या पालकांनी किंवा इतर साक्षीदारांनी यहोवाला ओळखण्यासाठी आपल्याला मदत केली. यावरून दिसून येतं की यहोवाला आपल्यापैकी प्रत्येकाची काळजी आहे. आणि आजही तो मंडळीतल्या प्रेमळ वडिलांद्वारे व प्रौढ भाऊबहिणींद्वारे आपल्याला मदत करतो. तसंच, तो आपल्याला आणि भाऊबहिणींना मंडळीतल्या सभांद्वारे मार्गदर्शनही देतो. या आणि इतर मार्गांनी यहोवा आपल्याला दाखवतो की एक पिता म्हणून त्याचं आपल्यावर प्रेम आहे.—स्तो. ३२:८.

१४. यहोवा आपल्याला प्रशिक्षण का देतो आणि हे तो कसं करतो?

१४ यहोवा आपल्याला प्रशिक्षण देतो.  आपण येशूसारखं परिपूर्ण नाही, म्हणून प्रशिक्षण देताना आपला प्रेमळ पिता आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा सुधारतो. बायबल सांगतं: “यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना तो सुधारतो.” (इब्री १२:६, ७) आणि असं तो बऱ्‍याच मार्गांनी करतो. उदाहरणार्थ, आपण बायबलमध्ये एखादा वृत्तांत वाचतो किंवा सभांमध्ये जे ऐकतो त्यामुळे आपल्याला जाणवतं की आपल्या विचारांत आणि कार्यांत आपल्याला बदल करण्याची गरज आहे. तसंच, आपल्याला ज्या मदतीची गरज आहे ती आपल्याला वडिलांकडूनही मिळू शकते. यहोवा आपल्याला कोणत्याही मार्गांनी मदत करत असला तरी त्याचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच तो आपल्याला सुधारतो.—यिर्म. ३०:११.

१५. यहोवा आपल्याला कोणत्या मार्गांनी मदत करतो?

१५ कठीण प्रसंगाचा सामना करत असताना यहोवा आपल्याला मदत करतो.  जसं एक मानवी पिता कठीण परिस्थितीत आपल्या मुलांना मदत करतो, तसंच आपला स्वर्गीय पिताही आपल्याला कठीण परीक्षेत टिकून राहण्यासाठी मदत करतो. आपलं त्याच्यासोबतचं नातं धोक्यात येऊ नये म्हणून तो त्याचा पवित्र आत्मा देऊन आपल्याला मदत करतो. (लूक ११:१३) आपण जेव्हा निराश किंवा चिंतित असतो तेव्हाही यहोवा आपल्याला मदत करतो. उदाहरणार्थ, त्याने आपल्याला भविष्यासाठी एक सुंदर आशा दिली आहे. या आशेमुळे आपल्याला समस्यांचा धीराने सामना करण्यासाठी मदत होते. म्हणून लक्षात असू द्या, की आपल्याला कोणत्याही परीक्षेचा सामना करावा लागला तरी आपल्याला झालेलं नुकसान यहोवा पूर्णपणे भरून काढेल. आपल्या समस्या क्षणिक आहेत पण यहोवा जे आशीर्वाद देतो ते कायम टिकणारे आहेत.—२ करिंथ. ४:१६-१८.

आपला पिता आपल्याला कधीही सोडणार नाही

१६. आदामने त्याच्या प्रेमळ पित्याची आज्ञा मोडल्यामुळे काय झालं?

१६ आदामने यहोवाची आज्ञा मोडली तेव्हा त्याला आणि सर्व मानवांना समस्यांचा सामना करावा लागला. या समस्येला यहोवाने ज्या प्रकारे हाताळलं त्यावरून आपल्याला त्याचं प्रेम दिसून येतं. आदामने आपल्या स्वर्गीय पित्याची आज्ञा मोडली तेव्हा तो आणि संपूर्ण मानवजात देवाच्या आनंदी कुटुंबाचा भाग राहिली नाही. (रोम. ५:१२; ७:१४) असं असलं तरी संपूर्ण मानवजातीला या समस्येतून सोडवण्यासाठी यहोवाने एक उपाय काढला.

१७. आदामने आज्ञा मोडल्यानंतर यहोवाने लगेच कोणतं पाऊल उचललं?

१७ यहोवाने आदामला शिक्षा दिली पण आदामपासून येणाऱ्‍या संततीला त्याने तसंच सोडलं नाही तर तिला एक आशा दिली. आदामने आज्ञा मोडल्यानंतर त्याने लगेच अभिवचन दिलं की तो त्याच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्‍या लोकांना पुन्हा त्याच्या कुटुंबाचा भाग बनवेल. (उत्प. ३:१५; रोम. ८:२०, २१) हे करण्यासाठी यहोवाने आपल्या प्रिय मुलाची, येशूची खंडणी दिली. आपल्या प्रिय मुलाला आपल्यासाठी देऊन यहोवाने हे सिद्ध केलं की तो आपल्यावर खूप प्रेम करतो.—योहा. ३:१६.

आपण यहोवापासून दूर गेलो असलो पण नंतर पश्‍चात्ताप दाखवला, तर आपण खातरी बाळगू शकतो की आपला प्रेमळ पिता यहोवा आपलं आनंदाने स्वागत करेल (परिच्छेद १८ पाहा)

१८. आपण यहोवापासून दूर गेलो असलो तरी आपण परत यावं अशी त्याची इच्छा आहे, हे आपण खातरीने का म्हणू शकतो?

१८ आपण अपरिपूर्ण असलो तरी यहोवाची अशी इच्छा आहे की आपण त्याच्या कुटुंबाचा भाग बनावं. तो आपल्याला कधीच ओझं समजत नाही. आपण कदाचित त्याला निराश करू किंवा त्याच्यापासून काही काळासाठी दूर जाऊ. असं असलं तरी यहोवा आपल्याबद्दल कधीच आशा सोडत नाही. यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे हे दाखवण्यासाठी येशूने अशा एका मुलाचा दाखला दिला जो आपल्या पित्याला सोडून निघून गेला होता. (लूक १५:११-३२) आपला मुलगा परत येईल ही आशा त्या पित्याने कधीच सोडली नाही. मुलगा घरी परत आला तेव्हा त्याने त्याचं आनंदाने स्वागत केलं. त्याच प्रकारे, आपण यहोवापासून दूर गेलो असलो पण नंतर आपण पश्‍चात्ताप दाखवला, तर आपण खातरी बाळगू शकतो की आपला प्रेमळ पिता आपलं आनंदाने स्वागत करेल.

१९. आदाममुळे झालेलं सर्व नुकसान यहोवा कसं भरून काढेल?

१९ आदाममुळे झालेलं सर्व नुकसान आपला पिता भरून काढेल. आदामने बंड केल्यानंतर यहोवाने ठरवलं की तो मानवजातीतून १,४४,००० जणांना दत्तक म्हणून घेईल आणि ते स्वर्गात येशूसोबत राजे व याजक या नात्याने सेवा करतील. नवीन जगात येशू आणि त्याचे सहराजे आज्ञाधारक मानवांना परिपूर्ण बनण्यासाठी मदत करतील. ते यहोवाला एकनिष्ठ आहेत की नाही याची शेवटची परीक्षा त्यांनी विश्‍वासूपणे पार केल्यावर देव त्यांना सर्वकाळाचं जीवन देईल. पृथ्वी जेव्हा देवाच्या परिपूर्ण मुलांनी भरून जाईल तेव्हा त्याला खूप समाधान वाटेल. खरंच, तो खूप आनंदाचा काळ असेल!

२०. यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो हे त्याने कोणत्या मार्गांनी दाखवलं आहे आणि पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

२० यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो हे त्याने दाखवून दिलं आहे. तो सर्वात चांगला पिता आहे. तो आपल्या प्रार्थना ऐकतो आणि आपल्या भौतिक व आध्यात्मिक गरजा पूर्ण करतो. तो आपल्याला प्रशिक्षण देतो आणि मदतही करतो. भविष्यात तो आपल्यासाठी बऱ्‍याच चांगल्या गोष्टी करेल. आपला पिता आपल्यावर प्रेम करतो आणि आपली काळजी घेतो हे जाणून आपलं मन खरंच आनंदाने भरून जातं! पुढच्या लेखात चर्चा केली जाईल की यहोवाने दाखवलेल्या प्रेमाबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो.

गीत १८ देवाचे खरे प्रेम

^ परि. 5 आपण यहोवाला सहसा सृष्टिकर्ता आणि सर्वोच्च अधिकारी म्हणून पाहतो. पण तो एक प्रेमळ आणि काळजी करणारा पिताही आहे असं मानण्याची आपल्याकडे बरीच कारणं आहेत आणि या कारणांबद्दल या लेखात चर्चा केली जाईल. तसंच, यहोवा आपल्याला कधीच सोडणार नाही असं आपण खातरीने का म्हणू शकतो याबद्दलही या लेखात चर्चा केली जाईल.

^ परि. 59 चित्रांचं वर्णन: प्रत्येक चित्रात एक पिता आणि त्याचं मूल दाखवलं आहे: एक पिता आपल्या मुलाचं लक्ष देऊन ऐकत आहे, एक पिता आपल्या मुलीला गरज असलेल्या गोष्टी पुरवत आहेत, एक पिता आपल्या मुलाला शिकवत आहे, एक पिता आपल्या मुलाला सांत्वन देत आहे. या चारही चित्रांच्या मागे यहोवाच्या हाताचं चित्रं आहे आणि यावरून कळतं की यहोवा अशाच प्रकारे आपली काळजी घेतो.