व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एसावकडून प्रथमपुत्राचा हक्क विकत घेतल्यामुळे याकोब मसीहाचा पूर्वज बनला का?

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

प्राचीन इस्राएलात, ज्या वंशावळीतून मसीहा प्रगट होणार होता ती प्रथमपुत्राच्या हक्कावर आधारलेली होती का?

आपल्या प्रकाशनांमध्ये काही वेळा असं सांगण्यात आलं होतं, की मसीहा ज्या वंशावळीतून प्रगट होणार होता ती प्रथमपुत्राच्या हक्कावर आधारलेली होती. आणि ही गोष्ट, इब्री १२:१६ या वचनावरून आपण म्हणत होतो. या वचनात म्हटलं आहे, की एसावने “पवित्र गोष्टींची कदर” केली नाही आणि “केवळ एक वेळच्या जेवणाच्या बदल्यात प्रथमपुत्र असल्याचा आपला हक्क [याकोबला] विकून टाकला.” यावरून असं वाटत होतं, की याकोबने “प्रथमपुत्र असल्याचा आपला हक्क” प्राप्त केला, त्याच वेळी त्याला मसीहाचा पूर्वज बनण्याची संधीही मिळाली.—मत्त. १:२, १६; लूक ३:२३, ३४.

पण, बायबलच्या काही अहवालांचं परीक्षण केल्यानंतर दिसून येतं, की मसीहाचा पूर्वज बनण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीला प्रथमपुत्र असण्याची गरज नव्हती. हे समजण्यासाठी आपण याचे काही पुरावे पाहू या.

रऊबेन हा लेआ हिच्यापासून झालेला याकोबचा (इस्त्राएलचा) प्रथमपुत्र होता. नंतर, याकोबची प्रिय पत्नी राहेल हिला योसेफ झाला. हा तिचा पहिला मुलगा होता. पण, रऊबेनने गंभीर पाप केल्यामुळे, प्रथमपुत्राचा हक्क योसेफला देण्यात आला. (उत्प. २९:३१-३५; ३०:२२-२५; ३५:२२-२६; ४९:२२-२६; १ इति. ५:१, २) असं असलं तरी, मसीहाचा पूर्वज बनण्याची संधी ना रऊबेनला मिळाली, ना योसेफला; तर, याकोबला लेआपासून झालेला चवथा पुत्र, यहूदा याला ती संधी मिळाली.—उत्प. ४९:१०.

मसीहाचे पूर्वज बनले अशा पाच जणांची नावं लूक ३:३२ मध्ये दिली आहेत. यांपैकी प्रत्येक जण प्रथमपुत्र असावा असं दिसून येतं. उदाहरणार्थ, बवाजला ओबेद झाला आणि ओबेदला इशाय झाला. —रूथ ४:१७, २०-२२; १ इति. २:१०-१२.

इशायचा पुत्र दावीद हा प्रथमपुत्र नसून आठ पुत्रांपैकी शेवटचा होता. तरीसुद्धा, दावीद मसीहाचा पूर्वज बनला. (१ शमु. १६:१०, ११; १७:१२; मत्त. १:५, ६) शलमोनसुद्धा दावीदचा प्रथमपुत्र नव्हता, पण तरी तो मसीहाचा पूर्वज बनला. —२ शमु. ३:२-५.

पण, याचा अर्थ असा होत नाही, की प्रथमपुत्र असण्याला काहीच महत्त्व नव्हतं. प्राचीन काळात, प्रथमपुत्र असणं ही एक सन्मानाची गोष्ट होती आणि कुटुंबप्रमुखानंतर सहसा त्यालाच मस्तकपदाचा अधिकार असायचा. शिवाय, वारशाने मिळणाऱ्‍या मालमत्तेतून दुप्पट वाटा त्याला दिला जायचा.—उत्प. ४३:३३; अनु. २१:१७; यहो. १७:१.

पण, प्रथमपुत्राचा हा हक्क दुसऱ्‍याला दिला जाऊ शकत होता. उदाहरणार्थ, अब्राहामने इश्‍माएलचा प्रथमपुत्राचा हक्क इसहाकला दिला. तसंच, आधी पाहिल्याप्रमाणे रऊबेनचा हा हक्क योसेफला देण्यात आला.

आता पुन्हा एकदा आपण इब्री १२:१६ हे वचन पाहू. त्यात म्हटलं आहे: “तुमच्यामध्ये अनैतिक लैंगिक कृत्ये करणारा किंवा एसावसारखा पवित्र गोष्टींची कदर नसलेला कोणीही असणार नाही, याची काळजी घ्या; त्याने केवळ एक वेळच्या जेवणाच्या बदल्यात प्रथमपुत्र असल्याचा आपला हक्क विकून टाकला.” इथे पौल काय सांगण्याचा प्रयत्न करत होता?

इथे पौल मसीहाच्या वंशावळीबद्दल बोलत नव्हता. कारण नुकतंच त्याने ख्रिश्‍चनांना, ‘आपल्या पायांसाठी सरळ मार्ग तयार करत राहा’ असा आर्जव केला होता. असं केल्यामुळे त्या ख्रिश्‍चनांना ‘देवाची अपार कृपा’ मिळाली असती. याउलट जर त्यांनी अनैतिक लैंगिक कृत्यं केली असती, तर ते देवाची अपार कृपा मिळवण्यास चुकले असते. (इब्री १२:१२-१६) आणि त्यामुळे ते एसावसारखे झाले असते. एसाव शारीरिक गोष्टींच्या आहारी गेला; त्याने “पवित्र गोष्टींची कदर” केली नाही.

एसाव कुलप्रमुखांच्या काळात राहत होता. यहोवाच्या इतर विश्‍वासू सेवकांप्रमाणेच त्यालासुद्धा काही वेळा बलिदाने अर्पण करण्याचा बहुमान मिळाला असावा. (उत्प. ८:२०, २१; १२:७, ८; ईयो. १:४, ५) पण, शारीरिक गोष्टींकडे कल असल्यामुळे, त्याने केवळ वाटीभर वरणासाठी हे सर्व बहुमान देऊन टाकले. अब्राहामच्या वंशजांना छळ सहन करावा लागेल असं भाकीत करण्यात आलं होतं. आणि ते टाळण्याची कदाचित त्याची इच्छा असावी. (उत्प. १५:१३) एसावने यहोवाची उपासना न करणाऱ्‍या स्त्रियांशी लग्न करून आपल्या आईवडिलांना खूप दुःख दिलं. असं करून एसावने दाखवून दिलं, की त्याला ‘पवित्र गोष्टींची’ मुळीच कदर नाही. (उत्प. २६:३४, ३५) याकोब मात्र एसावपेक्षा खूप वेगळा होता. याकोबने यहोवाची उपासक असलेल्या स्त्रीसोबतच लग्न केलं.—उत्प. २८:६, ७; २९:१०-१२, १८.

बायबलचे हे पुरावे पाहिल्यानंतर, मसीहा ज्या वंशावळीतून प्रगट होणार होता त्याबद्दल आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? हाच की, काही वेळा मसीहाचा पूर्वज बनण्याचा हक्क प्रथमपुत्राला देण्यात आला होता, पण नेहमीच नाही. आणि ही गोष्ट यहुद्यांनासुद्धा माहीत होती. कारण ख्रिस्त हा इशायचा पुत्र, दावीद याच्या वंशावळीतून येणार आहे हे त्यांनी मान्य केलं.—मत्त. २२:४२.