व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलच्या प्राचीन हस्तलिखितांमध्ये इब्री अक्षरांत देवाचं वैयक्‍तिक नाव अनेक वेळा आढळतं

बायबल काय म्हणतं?

देवाचं नाव

देवाचं नाव

लाखो लोक देवाशी बोलताना आदरयुक्‍त पदव्यांचा वापर करतात. जसं की, प्रभू, सनातन, अल्लाह किंवा नुसतं देव. पण, देवाला एक वैयक्‍तिक नाव आहे. आपण त्याचा वापर केला पाहिजे का?

देवाचं नाव काय आहे?

काही लोक काय म्हणतात?

 

स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे लोक म्हणतात, की देवाचं नाव येशू आहे. इतर काही जण म्हणतात की एकच सर्वशक्‍तिमान देव आहे, तर त्याच्यासाठी एका वैयक्‍तिक नावाचा वापर करण्याची गरज नाही. तर इतरही काही असे आहेत जे म्हणतात, की देवाच्या नावाचा वापर करणं अयोग्य आहे.

बायबलमध्ये काय म्हटलं आहे?

 

सर्वशक्‍तिमान देवाचं नाव येशू नाही. कारण येशू हा सर्वशक्‍तिमान देव नाही. खरंतर, येशूने आपल्या सहउपासकांना देवाला अशी प्रार्थना करायला सांगितली: “हे पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.” (लूक ११:२) येशूने स्वतः देवाला अशी प्रार्थना केली: “बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.”—योहान १२:२८.

देव म्हणतो: “मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे; आणि दुसऱ्‍याला मी आपले गौरव देणार नाही.” (यशया ४२:८, पं.र.भा.) “यहोवा” हे नाव चार इब्री व्यंजनांचं म्हणजे YHWH यांचं भाषांतर आहे. हे देवाच्या पवित्र नावाला सूचित करतं. हे नाव इब्री शास्त्रवचनांत जवळजवळ ७,००० वेळा येतं. * यहोवा हे नाव “देव”, “सर्वशक्‍तिमान” किंवा “प्रभू” अशा पदव्यांपेक्षा, तसंच अब्राहाम, मोशे, दावीद अशा कुठल्याही नावांपेक्षा जास्त वेळा येतं.

यहोवाने त्याच्या नावाचा आदरयुक्‍त वापर करायला मनाई केल्याचं आपल्याला बायबलमध्ये कुठेही वाचायला मिळत नाही. याउलट, देवाच्या सेवकांनी त्याच्या पवित्र नावाचा वापर केला हे आपल्याला शास्त्रवचनांतून समजतं. त्यांनी त्यांच्या मुलांची नावं ठेवताना देवाच्या नावाचा वापर केला. जसं की, एलीया नावाचा अर्थ होतो “यहोवा माझा देव आहे.” तसंच, जखऱ्‍या नावाचा अर्थ होतो “यहोवाने आठवण ठेवली.” त्याच प्रकारे रोजच्या संभाषणातही देवाच्या नावाचा वापर करायला ते कचरले नाहीत.—रूथ २:४.

आपण देवाच्या नावाचा वापर करावा अशी त्याची इच्छा आहे. आपल्याला असं प्रोत्साहन देण्यात आलं आहे, की “परमेश्‍वराचे उपकारस्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा.” (स्तोत्र १०५:१) यहोवा “त्याच्या नामाचे चिंतन” करणाऱ्‍यांची आठवण ठेवतो.—मलाखी ३:१६.

“ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.” स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.

देवाच्या नावाचा काय अर्थ होतो?

काही विद्वानांच्या मते यहोवा या नावाचा इब्री भाषेत “तो व्हायला लावतो” असा अर्थ होतो. या अर्थातून आपल्याला कळतं, की देव त्याच्या इच्छेनुसार स्वतःला किंवा त्याच्या निर्मितीला त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी जे काही व्हावे लागते ते व्हायला लावू शकतो. फक्‍त एक सर्वशक्‍तिमान सृष्टीकर्ताच अशा नावाला जागू शकतो.

याचा तुम्हाला कसा फायदा होईल?

 

देवाचं नाव जाणून घेतल्यामुळे तुमचं त्याच्याबद्दलचं मत बदलेल. तुम्हाला त्याच्याशी नातं जोडायला सोपं जाईल. आणि खरंतर ज्याचं नाव आपल्याला माहीत नसतं त्याच्यासोबत जवळचं नातं जोडणं शक्य नसतं. याच कारणामुळे देवाने आपल्याला त्याचं नाव सांगितलं आहे. यावरून समजतं की आपण त्याच्या जवळ यावं, त्याच्याशी नातं जोडावं अशी त्याची इच्छा आहे.—याकोब ४:८.

तुम्ही या गोष्टीची खात्री बाळगू शकता, की यहोवा त्याच्या नावाला जागेल. तो त्याचं प्रत्येक वचन पूर्ण करेल. म्हणूनच बायबल म्हणतं, “ज्यांस तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील.” (स्तोत्र ९:१०) त्याचं नाव त्याच्या गुणांशी म्हणजे एकनिष्ठ प्रेम, दया, कृपा आणि न्याय यांच्याशी जुळलेलं आहे. याबद्दल तुम्ही जसजसं शिकत जाल, तसतसा तुमचा विश्‍वास वाढत जाईल. (निर्गम ३४:५-७) आपलं वचन पूर्ण करताना यहोवा आपल्या गुणांच्या विरुद्ध कधीही वागणार नाही. हे जाणून तुम्हाला दिलासा मिळत नाही का?

सर्वशक्‍तिमान देवाचं नाव जाणणं खरंच किती सन्मानाची गोष्ट आहे! यामुळे आपल्याला आज आणि भविष्यातही आशीर्वाद मिळतील. देव वचन देतो: “त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवेन.”—स्तोत्र ९१:१४. ▪

“कारण ‘जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल.’”रोमकर १०:१३.

अनेक भाषांमध्ये देवाचं नाव

^ परि. 9 अनेक बायबल भाषांतरांमध्ये देवाचं नाव काढून त्या ठिकाणी “प्रभू” या पदवीचा वापर केला आहे. इतर भाषांतरांमध्ये देवाचं नाव काही ठरावीक वचनांमध्ये किंवा तळटीपांमध्येच आढळतं. पण, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स या भाषांतरात, देवाचं पवित्र नाव संपूर्ण बायबलमध्ये अनेक वेळा वापरलं गेलं आहे.