व्हिडिओ पाहण्यासाठी

तरुण लोक विचारतात

समलैंगिकता चुकीची आहे का?

समलैंगिकता चुकीची आहे का?

 जसंजसं मी मोठा होत गेलो तसतसं मला मुलींबद्दल नाही तर मुलांबद्दल आकर्षण वाटू लागलं. हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. मी विचार केला ही भावना माझ्या मनात फक्‍त काही काळच राहील पण या भावना मला आजही सतावतात.​—डेविड, २३.

 डेविड बायबलच्या शिकवणींचा आदर करणारा व्यक्‍ती आहे आणि त्याला देवाला खूश करायचंय. पण त्याला दुसऱ्‍या मुलांबद्दल आकर्षण वाटतं तरी तो देवाला खूश करू शकतो का? समलैंगिकतेबद्दल देवाला काय वाटतं?

 बायबल काय म्हणतं?

 प्रत्येक संस्कृतीत समलैंगिकतेबद्दल लोकांचं वेगळं मत आहे आणि काळासोबत लोकांचा याविषयीचा दृष्टिकोन बदलू शकतो. पण लोक सहसा जो विचार करतात त्याप्रमाणे खरे ख्रिस्ती मात्र वागत नाहीत किंवा “प्रत्येक शिकवणीच्या वाऱ्‍याने इकडेतिकडे वाहवत” जात नाहीत. (इफिसकर ४:१४) उलट, समलैंगिकतेबद्दल (किंवा दुसऱ्‍या नैतिक गोष्टींबद्दल) त्यांचा दृष्टिकोन बायबलमध्ये दिलेल्या तत्त्वांवर आधारित असतो.

 समलैंगिक संबंधांबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे हे बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलंय. त्यात म्हटलंय:

  •  “तू स्त्रीसोबत शरीरसंबंध ठेवतोस, तसे पुरुषाशी ठेवू नकोस. हे घृणास्पद कृत्य आहे.”​—लेवीय १८:२२.

  •  “देवाने त्यांच्या मनाच्या वासनांप्रमाणे, . . . त्यांना त्यांच्या घृणास्पद लैंगिक वासनेच्या अधीन केलं. कारण त्यांच्यातल्या स्त्रियांनी नैसर्गिक नियमांच्या विरोधात जाऊन आपल्या शरीराचा वापर केला.”​—रोमकर १:२४, २६.

  •  “अनीतिमान माणसं देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत हे तुम्हाला माहीत नाही का? फसू नका. अनैतिक लैंगिक कृत्यं करणारे, मूर्तिपूजक, व्यभिचारी, पुरुषवेश्‍या, समलैंगिक कृत्यं करणारे पुरुष, चोर, लोभी, दारुडे, शिव्याशाप देणारे आणि इतरांना लुबाडणारे देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत.”​—१ करिंथकर ६:९, १०.

 खरं पाहिलं तर देवाने दिलेली ही तत्त्वं सर्व लोकांसाठी आहेत, मग त्यांना समानलिंगी व्यक्‍तीबद्दल आकर्षण वाटत असो किंवा विरुद्धलिंगी व्यक्‍तीबद्दल. जर एखाद्या व्यक्‍तीमध्ये अशा भावना येत असतील, ज्यामुळे देवाला दुःख होईल तर तिने स्वतःवर ताबा ठेवला पाहिजे.​—कलस्सैकर ३:५.

 याचा असा अर्थ होतो का . . . ?

 याचा असा अर्थ होतो का, की बायबल समलैंगिक लोकांचा द्वेष करा असं म्हणतं?

 नाही. आपण कोणाचाच द्वेष करू नये असं बायबल सांगतं, मग एक व्यक्‍ती समलैंगिक असो किंवा नसो. उलट त्यात म्हटलंय की लोकांची जीवनशैली कशीही असली, तरी आपण “सर्वांबरोबर शांतीने राहायचा” प्रयत्न केला पाहिजे. (इब्री लोकांना १२:१४) त्यामुळे समलैंगिक लोकांना त्रास देणं, त्यांना मारहाण करणं किंवा त्यांना द्वेषपूर्ण वागणूक देणं चुकीचं आहे.

 याचा अर्थ असा होतो का, की समलैंगिक विवाहाला मान्यता देणाऱ्‍या कायद्यांचा खऱ्‍या ख्रिस्ती लोकांनी विरोध करावा?

 बायबलप्रमाणे विवाह एका स्त्री आणि पुरुषामध्ये झाला पाहिजे असा देवाचा नियम आहे. (मत्तय १९:४-६) पण समलैंगिक विवाहाच्या कायद्यांवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांची वेगवेगळी मतं असतात. त्यामुळे बऱ्‍याचदा हा नैतिक मुद्दा नाही तर राजकीय मुद्दा बनतो. पण बायबल म्हणतं की खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी राजकीय विवादांमध्ये निष्पक्ष राहिलं पाहिजे. (योहान १८:३६) म्हणून ते समलैंगिक विवाहाबद्दल किंवा समलैंगिक संबंधांबद्दल सरकारच्या नियमांचं समर्थन करत नाहीत किंवा त्यांचा विरोधही करत नाहीत.

 पण जर . . . ?

 पण जर एखादी व्यक्‍ती सध्या समलैंगिक कामं करत असेल तर काय? अशी व्यक्‍ती बदलू शकते का?

 हो. पहिल्या शतकातसुद्धा काही जणांनी हा बदल केला होता. समलैंगिक कामं करणारे देवाच्या राज्यात जाणार नाहीत असं म्हटल्यानंतर बायबल पुढे म्हणतं: “तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते.”​—१ करिंथकर ६:११.

 मग ज्यांनी समलैंगिक संबंध ठेवायचं सोडून दिलंय त्यांच्या मनात पुन्हा तशा भावना येणार नाहीत असा याचा अर्थ होतो का? नाही. बायबल म्हणतं: “देवाकडून असलेलं नवीन व्यक्‍तिमत्त्व घाला. हे व्यक्‍तिमत्त्व देवाने निर्माण केलं आणि त्याच्याच प्रतिरूपानुसार ते अचूक ज्ञानाद्वारे नवीन केलं जात आहे.” (कलस्सैकर ३:१०) म्हणजेच त्यांना सतत बदल करत राहावं लागेल.

 पण जर देवाचे स्तर पाळायची इच्छा असूनही एखाद्याच्या मनात समलैंगिक भावना येत असतील तर काय?

 कोणतीही इच्छा आपल्या मनात वाढू द्यायची की नाही किंवा त्या इच्छेप्रमाणे काम करायचं की नाही हे एक व्यक्‍ती निवडू शकते. समलैंगिक भावनांबद्दलही हीच गोष्ट खरी आहे. मग अशा चुकीच्या इच्छांवर मात करण्यासाठी एका व्यक्‍तीला काय करावं लागेल? बायबल म्हणतं: “पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालत राहा, म्हणजे तुम्ही शारीरिक वासना पूर्ण करणारच नाही.”​—गलतीकर ५:१६.

 लक्ष द्या इथे असं म्हटलं नाही, की एखाद्याच्या मनात चुकीच्या इच्छा येणारच नाहीत. पण जर त्याने नियमितपणे बायबल वाचन आणि प्रार्थना केली तर त्याला अशा इच्छांविरुद्ध लढायची ताकद मिळेल.

 ही गोष्ट सुरुवातीला उल्लेख केलेल्या डेविडच्या बाबतीतही खरी ठरली. त्याने आपल्या आईवडिलांची मदत घेतली आणि तो त्याच्या समस्येबद्दल त्यांच्याशी बोलला. तो म्हणतो: “माझ्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं. जर मी माझ्या समस्येबद्दल आधीच त्यांच्याशी बोललो असतो, तर माझ्या किशोरवयातले दिवस आणखी चांगले गेले असते.”

 थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, की यहोवाचे स्तर पाळल्यामुळे आपण आनंदी राहू शकतो. आपल्याला खातरी आहे की त्याचे स्तर “नीतिमान आहेत, ते मनाला आनंद देतात” आणि “त्यांचं पालन केल्यामुळे मोठं प्रतिफळ मिळतं.”​—स्तोत्र १९:८, ११.