भाग ६
ईयोब देवाशी एकनिष्ठ राहतो
सैतान देवासमोर ईयोबाच्या एकनिष्ठेविषयी शंका घेतो, पण ईयोब यहोवाला विश्वासू राहतो
अतिशय कठीण परीक्षेला तोंड द्यावे लागल्यास आणि देवाला आज्ञाधारक राहून सांसारिक दृष्टिकोनाने काही फायदा न झाल्यास कोणताही मनुष्य देवाला विश्वासू राहील का? हा प्रश्न ईयोब नावाच्या एका मनुष्यासंबंधी उपस्थित करण्यात आला होता आणि त्याचे अगदी चोख उत्तरही देण्यात आले.
इस्राएल लोक अजूनही इजिप्तमध्ये असताना, अब्राहामाचा एक नातलग ईयोब हा सध्या ज्याला अरबस्तान म्हणतात त्या क्षेत्रात राहत होता. याच सुमारास, स्वर्गातील देवदूत एकदा देवापुढे उपस्थित झाले. देवाचा विरोधी बनलेला सैतान देखील त्यांच्यामध्ये होता. स्वर्गातील या सभेपुढे यहोवाने आपला सेवक ईयोब याच्या एकनिष्ठेविषयी भरवसा व्यक्त केला. इतकेच काय, तर ईयोब सर्व माणसांहून जास्त नीतिमान आहे असेही त्याने म्हटले. पण, सैतानाने असा दावा केला, की देवाने ईयोबाला आशीर्वादित केल्यामुळे आणि तो ईयोबाचे संरक्षण करत असल्यामुळेच ईयोब देवाची उपासना करतो. ईयोबाजवळ होते नव्हते ते सर्व काढून घेतल्यास तो नक्कीच देवाचा धिक्कार करेल असेही सैतानाने म्हटले.
देवाने सैतानाला प्रथम ईयोबाची धनसंपत्ती, मुलेबाळे आणि नंतर त्याचे आरोग्य त्याच्यापासून हिरावून घेण्याची अनुमती दिली. या सगळ्यामागे सैतानाचा हात आहे हे माहीत नसल्यामुळे, देवाने आपल्यावर अशा परीक्षा का येऊ दिल्या हे ईयोबाला समजले नाही. तरीसुद्धा ईयोबाने एकदाही देवाकडे पाठ फिरवली नाही.
ईयोबाचे तीन मित्र त्याच्याकडे आले. पण हे फक्त नावापुरते मित्र होते. ईयोबाने गुप्तपणे पाप केले असावे आणि त्याबद्दलच देव त्याला शिक्षा देत आहे असे त्या तिघांनी ईयोबाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. देवाला आपल्या सेवकांविषयी जराही आपुलकी वाटत नाही, त्यांच्यावर त्याला बिलकुल भरवसा नाही असाही दावा त्यांनी केला. अर्थात हे सर्व खोटे होते आणि ईयोबाने त्यांच्या या चुकीच्या तर्कावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. उलट, त्याने मोठ्या आत्मविश्वासाने म्हटले की मरण आले तरीही मी आपली एकनिष्ठा सोडणार नाही! त्या तीन खोट्या मित्रांनी एकापाठोपाठ एक दिलेली लांबलचक भाषणे ईयोबाच्या पुस्तकात आढळतात.
पण ईयोबाने स्वतःचाच चांगुलपणा सिद्ध करण्यावर खूप जास्त भर दिला हे त्याचे चुकले. ईयोब व त्याच्या मित्रांपेक्षा वयाने लहान असलेला अलीहू आतापर्यंत शांतपणे त्या सर्वांचे बोलणे ऐकत होता. पण, आता त्याने बोलायला सुरुवात केली. त्याने ईयोबाची कानउघाडणी केली. कोणत्याही मनुष्याचा निर्दोषपणा सिद्ध होण्यापेक्षा, यहोवाला या विश्वावर आधिपत्य करण्याचा अधिकार आहे हे सिद्ध केले जाणे कितीतरी पटीने जास्त महत्त्वाचे आहे हे त्याने ईयोबाच्या लक्षात आणून दिले. अलीहूने ईयोबाच्या खोट्या मित्रांचीही खरडपट्टी काढली.
यानंतर, यहोवा देवाने स्वतः ईयोबाशी बोलून त्याचा चुकीचा दृष्टिकोन सुधारला. सृष्टीतल्या निरनिराळ्या विस्मयकारक गोष्टींकडे ईयोबाचे लक्ष वेधून, देवाच्या महानतेच्या तुलनेत मनुष्य किती क्षुद्र आहे यावर त्याला विचार करण्यास यहोवाने भाग पाडले. ईयोबाने नम्रपणे आपला चुकीचा दृष्टिकोन बदलला. यहोवा देव “फार कनवाळू व दयाळू” असल्यामुळे त्याने ईयोबाला पुन्हा पूर्वीसारखे आरोग्य दिले व पूर्वीपेक्षा दुप्पट धनसंपत्ती दिली. तसेच, यहोवाच्या आशीर्वादाने त्याला दहा मुलेही झाली. (याकोब ५:११) मनुष्यावर परीक्षाप्रसंग आल्यास तो देवाला विश्वासू राहणार नाही हा सैतानाचा दावा होता. पण, अतिशय कठीण परीक्षेतही यहोवाप्रती आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्याद्वारे ईयोबाने सैतानाचा हा दावा खोडून काढला.
—ईयोब पुस्तकावर आधारित.

