योग्य ते करण्यासाठी द्यावा लागणारा लढा

योग्य ते करण्यासाठी द्यावा लागणारा लढा

प्रकरण २६

योग्य ते करण्यासाठी द्यावा लागणारा लढा

१. ख्रिश्‍चनांनी कोणत्या दोन गोष्टींविरुद्ध लढा दिला पाहिजे?

 सैतानाचे जग अस्तित्वात असेपर्यंत त्याच्या वाईट प्रभावापासून मुक्‍त राहण्यासाठी ख्रिस्ती जनांना लढा द्यावा लागणार आहे. प्रेषित पौलाने लिहिलेः “सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.” (इफिसकर ६:११-१८) तथापि, आपला लढा केवळ सैतान व त्याच्या जगाविरुद्ध नसून वाईट करण्याच्या आमच्या वासनांविरुद्ध देखील आहे. पवित्र शास्त्र म्हणतेः “मानवाच्या हृदयातील कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात.”—उत्पत्ती ८:२१; रोमकर ५:१२.

२. (अ) बहुधा अयोग्य ते करण्याची अनावर इच्छा आपल्याला का होते? (ब) अयोग्य इच्छांच्या विरुद्ध आपण का लढले पाहिजे?

पहिला मानव आदाम याच्यापासून अनुवंशिकतेने मिळालेल्या पापामुळे वाईट गोष्टी करण्याची आपल्या अंतःकरणाला अतिशय इच्छा होते. त्या इच्छेपुढे नमते घेतल्यास देवाच्या नवीन व्यवस्थेमध्ये आपल्याला अनंतकाल जीवन मिळणार नाही. या कारणामुळे योग्य ते करण्यासाठी आपण लढले पाहिजे. प्रेषित पौलाला सुद्धा अशी लढत द्यावी लागली, कारण तो म्हणतोः “मी चांगले करायला इच्छित असता वाईट ते माझ्याजवळ आहेच.” (रोमकर ७:२१-२३) तुम्हालाही हा लढा कठीण वाटेल. काहीवेळा तुमच्या अंतर्यामी जोरदार द्वंद्व होत असेल. तेव्हा तुम्ही काय करायचे ठरवाल?

३. (अ) अनेकांच्या अंतःकरणात कोणते द्वंद्व निर्माण होते? (ब) अनेक लोक योग्य गोष्टी करण्याची इच्छा करीत असतानाही त्यांच्या हातून अयोग्य गोष्टी होतात यावरुन पवित्र शास्त्रातील कोणते सत्य सिद्ध होते?

पृथ्वीवर उत्तम परिस्थितीमध्ये अनंतकाल जीवन उपभोगण्याच्या देवाच्या अद्‌भुत वचनांबद्दल तुम्हाला माहिती झालेली आहे. तुमचा या अभिवचनांवर विश्‍वास आहे व या उत्तम गोष्टी तुम्हाला स्वतःसाठी हव्या असे वाटू लागेल. तेव्हा आपल्या अनंतकालिक फायद्यास्तव देवाची सेवा केली पाहिजे हे तुम्हाला कळते. तरीपण, ज्या वाईट गोष्टी आहेत असे तुम्हाला ठाऊक आहे त्या कराव्या असे तुम्हाला अंतःकरणात वाटते. व्यभिचार करण्याची, चोरी करण्याची किंवा इतर वाईट वर्तन करण्यात सहभागी होण्याची अनावर इच्छा कधी कधी तुम्हाला होईल. या गोष्टी देवाला अमान्य आहेत हे माहीत असताही, या पुस्तकाचा अभ्यास करणाऱ्‍या काही व्यक्‍ती चक्क अशा गोष्टी आचरीत असतील. चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा असताना देखील ते वाईट गोष्टी आचरतात हे या पवित्र शास्त्रीय सत्याची प्रचिती देतेः “हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.”—यिर्मया १७:९.

हा लढा जिंकता येतो

४. (अ) हा लढा जिंकणे वा हरणे कोणावर अवलंबून आहे? (ब) योग्य गोष्टी करण्यासाठी द्यावा लागणारा लढा जिंकण्यासाठी कशाची गरज आहे?

तथापि, याचा अर्थ, चुकीच्या गोष्टी करण्याकडे असलेल्या आपल्या प्रवृत्तीवर त्या व्यक्‍तीचा मुळीच ताबा नसतो असा नव्हे. तुमची मनापासूनची इच्छा असेल तर आपल्या हृदयाकडून योग्य ते मार्गदर्शन मिळावे याकरता तुम्ही त्याला बळकट करु शकता. (स्तोत्रसंहिता २६:१, ११) हा लढा इतर कोणीही तुम्हासाठी जिंकू शकणार नाही. यासाठी, सर्वात प्रथम, पवित्र शास्त्राचे जीवनदायी ज्ञान घेत राहा. (योहान १७:३) ते ज्ञान नुसते आपल्या डोक्यात साठवण्यापेक्षा अधिक काही गोष्टींची गरज आहे. ते ज्ञान तुमच्या हृदयात देखील उतरले पाहिजे. आपण जे काही शिकतो आहोत त्याविषयी आपल्या मनात अशी आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे की, त्यानुसार कृती करण्याची इच्छा तुम्हामध्ये प्रज्वलित होईल.

५. देवाच्या नियमांबद्दल तुम्हाला अंतःकरणपूर्वक प्रेम कसे प्राप्त करता येईल?

परंतु देवाच्या नियमांबद्दल तुम्हाला हृदयपूर्वक प्रेम कसे संपादता येईल? यासाठी तुम्ही त्यांचे मनन केले पाहिजे, त्यांचे गहन चिंतन केले पाहिजे. उदाहरणार्थ, स्वतःला विचाराः देवाला आज्ञाधारक राहिल्याने खरोखर कोणता फरक पडतो? यानंतर, ज्यांनी त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष केले त्यांच्या जीवनावर नजर टाका. अशाच एका १९ वर्षांच्या मुलीने लिहिलेः “मला तीन वेळा गुप्त रोग झालेला आहे. त्यामुळे शेवटी मला गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करावी लागली व मुलांना जन्म देण्याचा हक्क मला गमवावा लागला.” लोकांनी देवाचे नियम तोडल्यामुळे उद्‌भवलेला सर्व त्रास पाहिल्यास मन खरोखर उदास होते. (२ शमुवेल १३:१-१९) व्यभिचार केलेल्या एका स्त्रीने दुःखाने म्हटलेः “अवज्ञेमुळे येणाऱ्‍या वेदना व मानसिक अस्वास्थ्य यांचे मोल देण्याच्या लायकीचा तो [व्यभिचार] नव्हे. त्यासाठी आता मी दुःख भोगत आहे.”

६. (अ) वाईट गोष्टी करण्यापासून मिळणारा आनंद म्हणावा तितका योग्य का नसतो? (ब) मोशेला मिसरमध्ये कशा प्रकारचे जीवन उपभोगता आले असते?

असे असतानाही, व्यभिचार तसेच मद्य पिऊन झिंगणे व अमली पदार्थांच्या सेवनामध्ये मजा असते असे अनेक लोकांकडून तुम्ही ऐकले असेल. परंतु ही तथाकथित मजा क्षणिक असते. तुमचा खरा व चिरंतन आनंद हिरावून घेईल अशा मार्गावर जाऊन फसू नका. मोशेचा विचार करा. तो “फारोच्या कन्येचा पुत्र” म्हणून वाढला. प्राचीन मिसरातील राजघराण्याच्या ऐश्‍वर्यात तो राहिला होता. परंतु पवित्र शास्त्र म्हणते की, तो मोठा झाल्यावर, “पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्‍यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केले.” (इब्रीयांस ११:२४, २५) यावरुन मिसराच्या राजघराण्यामध्ये असलेल्या अनैतिक, अनिर्बंध जीवनामध्ये मजा वा आनंद नक्कीच असेल. पण मग, या सर्वांपासून मोशे का दूर झाला?

७. मिसरच्या राजघराण्यातील “पापाचे क्षणिक सुख” भोगण्यापासून मोशे का दूर झाला?

याचे कारण मोशेचा यहोवा देवावर विश्‍वास होता आणि मिसरी राजघराण्यामध्ये त्याला जे पापाचे क्षणिक सुख मिळाले असते त्यापेक्षा एखाद्या अधिक चांगल्या गोष्टीची त्याला माहिती होती. पवित्र शास्त्र म्हणतेः “त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.” देवाने दिलेल्या अभिवचनांवर मोशेने मनन केले वा गहन चिंतन केले. नीतीमान नवीन व्यवस्थीकरण निर्माण करण्याच्या देवाच्या हेतूवर त्याचा विश्‍वास होता. मानवजातीवरील देवाच्या उदंड प्रेमाने व आत्मियतेने मोशेचे अंतःकरण भारावून गेले. मोशेने यहोवाबद्दल केवळ ऐकले वा वाचले नव्हते. पवित्र शास्त्र म्हणतेः “जो अदृश्‍य आहे त्याला पहात असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्रीयांस ११:२६, २७) मोशेच्या दृष्टीने यहोवा देव जितका खरा होता, तितकीच खरी त्याची अनंतकालिक जीवनाची वचनेही होती.

८. (अ) योग्य गोष्टी करण्यासाठी द्यावा लागणारा लढा जिंकण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? (ब) एका युवकाने प्रकट केलेला कोणता दृष्टीकोन आपणही ठेवणे शहाणपणाचे होईल?

हे तुमच्या बाबतीतही खरे आहे का? तुम्हीही यहोवाकडे, तुम्हावर प्रीती करणाऱ्‍या पित्याप्रमाणे तो खरी व्यक्‍ती आहे या दृष्टीकोनातून बघता का? तुम्ही जेव्हा, नंदनवनमय पृथ्वीवरील अनंतकाल जीवनाच्या त्याच्या अभिवचनांच्या बाबतीत वाचता तेव्हा, त्या परिस्थितीतील आशीर्वादांचा आस्वाद आपण घेत आहोत असे चित्र तुम्ही आपल्यापुढे आणता का? (पृष्ठे १५६ ते १६२ पहा.) वाईट गोष्टी करण्यासाठी आपल्यावर येणाऱ्‍या अनेक दबावांविरुद्ध लढा जिंकण्यासाठी आपला यहोवाशी दृढ संबंध असणे आवश्‍यक आहे. तसेच, मोशेप्रमाणेच आपणही आपली “दृष्टी प्रतिफळावर” ठेवणे जरुरीचे आहे. व्यभिचाराच्या मोहाला तोंड द्याव्या लागलेल्या एका २० वर्षांच्या तरुणाचा दृष्टीकोनही मोशेसारखाच होता. तो म्हणालाः “अनंतकाल जीवनाची माझी आशा व्यभिचाराच्या काही क्षणांच्या मौजेपेक्षा अधिक मोलाची होती.” अशी मनोवृत्ती असणे योग्य नव्हे का?

इतरांच्या चुकांपासून शिकणे

९. योग्य गोष्टी करण्याच्या लढ्यामध्ये राजा दावीद कशारितीने उणा पडला?

आपल्याला या लढतीमध्ये गाफिल होऊन चालणार नाही. दावीद राजा एकदा असाच निष्काळजी झाला होता. एके दिवशी तो राजवाड्याच्या गच्चीवरुन पहात असताना काही अंतरावर बथशेबा ही स्त्री स्नान करीत असल्याचे त्याच्या दृष्टीस पडले. ती फार सुंदर होती. आपल्या अंतःकरणात अयोग्य विचार बळाविण्याआधीच तेथून वळण्याऐवजी तो पहात राहिला. तिच्याशी समागम करण्याची त्याची इच्छा इतकी अनावर झाली की त्याने तिला राजवाड्यात आणले. पुढे ती गर्भवती झाल्यामुळे व आपला व्यभिचार दडपून टाकणे अशक्य झाल्यामुळे दाविदाने तिच्या पतीला लढाईत मारण्याची व्यवस्था केली.—२ शमुवेल ११:१-१७.

१०. (अ) दावीदाला त्याच्या पापासाठी काय दंड झाला?(ब) कशामुळे दावीद व्यभिचार करण्यापासून वाचला असता?

१० ते खरोखरच घोर पाप होते. दावीदाला यामुळे त्रास सहन करावा लागला. जे काही त्याने केले त्यामुळे त्याला मानसिक यातना तर झाल्याच, पण यासोबत उर्वरित आयुष्यामध्ये त्याच्या घरातच समस्या उत्पन्‍न करुन यहोवानेही त्याला शिक्षा केली. (स्तोत्रसंहिता ५१:३, ४; २ शमुवेल १२:१०-१२) दावीदाला वाटले होते त्यापेक्षा त्याचे हृदय अधिकच कपटी निघाले होते. त्याच्या वाईट इच्छांनी त्याच्यावर मात केली. कालांतराने तो म्हणालाः “पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.” (स्तोत्रसंहिता ५१:५) परंतु दावीदाने बथशेबासोबत केलेले गैरवर्तन घडायलाच हवे होते असे नाही. त्याची समस्या ही होती की त्याने आपली नजर आवरली नाही. दुसऱ्‍या मनुष्याच्या बायकोविषयी समागमाची आपली भावना वाढविण्याची परिस्थिती त्याने टाळली नाही.

११. (अ) दावीदाच्या अनुभवावरुन आपण काय शिकले पाहिजे? (ब) कोणत्या क्रियांमुळे कामवासना उत्तेजित होते असे तुम्ही म्हणाल? (क) एका युवकाने म्हटल्याप्रमाणे शहाणा माणूस कोणत्या गोष्टी टाळतो?

११ अयोग्य कामभावना चेतवणाऱ्‍या प्रसंगाविरुद्ध जागरुक राहण्यासाठी आपण दावीदाच्या अनुभवावरुन धडा घेतला पाहिजे. उदाहरणार्थ, लैंगिक विषयावर भर देणारी पुस्तके वाचली, दूरदर्शनवरील कार्यक्रम व चित्रपट पाहात राहिलो तर काय होईल? बहुधा कामवासनांना उत्तेजन मिळेल. यासाठीच “कामवासना” वाढविणारे उद्योग व मनोरंजनाचे मार्ग टाळावे. (कलस्सैकर ३:५; १ थेस्सलनीकाकर ४:३-५; इफिसकर ५:३-५) इतर व्यक्‍तींसह अशा परिस्थितीत येऊच नका की ज्यामुळे व्यभिचाराकडे पाऊल वळेल. एका १७ वर्षांच्या व्यक्‍तीने शहाणपणाने म्हटलेः “‘कधी थांबावे ते आम्हाला कळते,’ असे कोणीही सांगू शकतो. होय, कोणी म्हणेल की, आम्हाला कधी ते माहीत आहे. पण किती जण तसे करतात. यासाठी ती परिस्थिती टाळणेच अगदी श्रेयस्कर आहे.”

१२. योसेफाचे कोणते उदाहरण आपण लक्षात ठेवले पाहिजे?

१२ दावीदाने योसेफाचे उदाहरण लक्षात ठेवले असते तर त्याने देवाविरुद्ध ते घोर पाप केलेच नसते. मिसरात असताना योसेफ पोटीफराच्या घरचा कारभारी नेमला गेला. पोटीफर बाहेर गेला असताना त्याची कामग्रस्त स्त्री योसेफाच्या मागे लागत असे. ती म्हणत असेः “मजपाशी नीज.” पण योसेफाने नकार दिला. एके दिवशी तिने त्याला धरले व आपल्या शेजारी निजण्याची जबरदस्ती केली. परंतु योसेफ स्वतःची सुटका करुन घेऊन पळाला. आपली कामभावना शमविण्यापेक्षा देवाच्या दृष्टीने काय योग्य याचा विचार करुन त्याने आपले अंतःकरण खंबीर ठेवले. त्याने विचारलेः “एवढी मोठी वाईट गोष्ट करुन मी देवाच्या विरुद्ध कसे पाप करु?”—उत्पत्ती ३९:७-१२.

जिंकण्यासाठी लागणारी मदत

१३, १४. (अ) हा लढा जिंकण्यासाठी कशाची गरज आहे? (ब) करिंथमधील ख्रिस्ती झालेल्या लोकांनी कोणते बदल व कशाच्या मदतीने घडवून आणले? (क) पौल व तीत कशाप्रकारचे लोक होते?

१३ हा लढा जिंकण्यासाठी तुम्ही, पवित्र शास्त्राचे ज्ञान आपल्या हृदयात पोहंचू द्या. त्यामुळे तुम्ही त्या ज्ञानाबरहुकूम कार्यही कराल. याशिवाय, तुम्हाला देवाच्या लोकांचा सहवास राखण्याची, देवाच्या दृश्‍य संघटनेचा एक भाग बनण्याची गरज आहे. या संघटनेच्या मदतीने, तुम्ही कुमार्गात कितीही गुरफटलेले असाल तरी, बदल घडवून आणता येईल. प्राचीन काळातील करिंथमधील लोकांनी असा बदल घडवून आणला. त्यांच्याबद्दल प्रेषित पौलाने लिहिलेः “फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते. तरी तुम्ही . . . धुतलेले . . . झाला.”—१ करिंथकर ६:९-११.

१४ जरा विचार करा! प्राचीन काळचे काही ख्रिस्ती जारकर्मी, व्यभिचारी, समसंभोगी, चोर व मद्यपी होते. परंतु ख्रिस्ती मंडळीच्या मदतीने ते बदलले. स्वतः प्रेषित पौलाने एके काळी वाईट गोष्टी केल्या होत्या. ( १ तीमथ्य १:१५) तीत या त्याच्या ख्रिस्ती सोबत्याला त्याने लिहिलेः “आपणही पूर्वी निबुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे . . . असे होतो.”—तीतास पत्र ३:३.

१५. (अ) योग्य गोष्टी करणे पौलाला सोपे नव्हते हे कशावरुन दिसून येते? (ब) पौलाच्या उदाहरणावरुन आपल्याला कोणता फायदा होतो?

१५ पण, पौल ख्रिस्ती झाल्यानंतर योग्य ते करणे त्याला सोपे गेले का? नाही. तो ज्या वाईट सवयींचा गुलाम होता त्यांच्याशी पौलाला आयुष्यभर लढा द्यावा लागला. त्याने लिहिलेः “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करुन ठेवतो. असे न केल्यास मी स्वतः दुसऱ्‍यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.” (१ करिंथकर ९:२७) पौल स्वतःशी ‘कठोर’ झाला. त्याच्या शरीराला अयोग्य गोष्टी करण्याची इच्छा असतानाही, योग्य त्या गोष्टी करण्यास तो स्वतःवर जबरदस्ती करत असे. त्याने केले तसेच तुम्ही केल्यास या लढ्यामध्ये तुम्हीही जिंकू शकाल.

१६. योग्य गोष्टी करण्यासाठी द्याव्या लागणाऱ्‍या लढ्यामध्ये आधुनिक काळातील कोणती उदाहरणे आपल्याला मदत करतात?

१६ एखाद्या वाईट सवयीवर ताबा मिळवणे तुम्हाला कठीण जात असेल तर यहोवाच्या साक्षीदारांच्या येत्या मोठ्या संमेलनाला उपस्थित रहा. तेथे जमलेल्या लोकांचे स्वच्छ वर्तन व आनंद तुम्हाला प्रभावीत करील यात शंका नाही. तरीही यापैकीचे बरेचसे लोक, या जगात, जारकर्म, व्यभिचार, मद्याचे अतिसेवन, समसंभोग, धुम्रपान, अमली पदार्थांची सवय, चोरी, फसवाफसवी, खोटेपणा, जुगार यामध्ये एकेकाळी सहभागी होते. त्यातील अनेक पूर्वी अशा गोष्टी आचरीतही होते. (१ पेत्र ४:३, ४) तुम्ही विलंब न लावता यहोवाच्या साक्षीदारांच्या लहान मंडळ्यातील सभांना उपस्थित राहिला तर तुम्ही ज्या सवयी व इच्छांविरुद्ध आता झगडत आहात त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी ज्यांनी लढा दिला आहे अशांचा सहवास तुम्हाला घडेल. यास्तव, धैर्य धरा! योग्य ते करण्यासाठी द्यावा लागणारा लढा ते जिंकत आहेत. देवाच्या मदतीकरवी तुम्हीही तो जिंकू शकाल.

१७. (अ) लढा जिंकावयाचा असल्यास कोणाचा सहवास जरुरीचा आहे? (ब) समस्या सोडविण्याकरता तुम्हाला कोणाकडून मदत मिळू शकते?

१७ तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसह पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत असाल तर राज्यसभागृहात होणाऱ्‍या सभांना आतापर्यंत नक्कीच उपस्थित राहिला असाल. सभेची उपस्थिती ही तुमची नियमित सवय करा. अशा ख्रिस्ती सहवासातून मिळणाऱ्‍या आध्यात्मिक उत्तेजनाची आपणा सर्वांनाच गरज आहे. (इब्रीयांस १०:२४, २५) मंडळीतील “वडील जन” किंवा वडीलांची चांगली ओळख करुन घ्या. त्यांच्यावर “देवाच्या कळपाचे पालन” करण्याची जबाबदारी आहे. (१ पेत्र ५:१-३; प्रे. कृत्ये २०:२८) तेव्हा, देवाच्या नियमाविरुद्ध एखादी सवय तुम्हाला असल्यास तिला आळा घालण्यासाठी मदत हवी असल्यास त्यांच्याकडे जाण्यास संकोच करु नका. ते प्रेमळ, दयाळू असल्याचे तुम्हाला आढळून येईल.—१ थेस्सलनीकाकर २:७, ८.

१८. हा लढा चालू ठेवण्यासाठी भविष्यकाळातील कोणती आशा तुम्हाला बळ देईल?

१८ वाईट ते करण्याचा दबाव, सैतानी जगताकडूनच नव्हे तर आपल्या स्वतःच्या पापीपणानेही आहे. त्यामुळे देवाशी विश्‍वासू राहण्यासाठी द्यावा लागणारा लढा हा दैनिक आहे. पण हा लढा निरंतर चालणार नाही हे किती चांगले आहे! लवकरच सैतानाला दूर केले जाईल आणि त्याचे संपूर्ण दुष्ट जग नष्ट केले जाईल. मग, जवळ आलेल्या देवाच्या नव्या व्यवस्थेमध्ये आपला मार्ग सुकर करणारी नीतीमान परिस्थिती असेल. हळूहळू पापाचा मागमूसही राहणार नाही. तेव्हा योग्य ते करण्यासाठी द्यावा लागणारा हा लढाही राहणार नाही.

१९. यहोवाला संतुष्ट करण्यासाठी लागेल ते कष्ट करण्याची तुमची तयारी का असावी?

१९ त्या नव्या व्यवस्थेतील आशीर्वादांचे नियमित चिंतन करा. होय, “तारणाची आशा हे शिरस्राण” घाला. (१ थेस्सलनीकाकर ५:८) एका तरुण मुलीने ठेवलेली चित्तवृत्ती आपणही ठेवावी. ती म्हणतेः “यहोवाने माझ्यासाठी केलेल्या व वचन दिलेल्या सर्व गोष्टींचा मी विचार करते. त्याने माझा त्याग केलेला नाही. त्याने मला अनेक प्रकारांनी आशीर्वादित केले आहे. मला उत्तमातील उत्तम गोष्टी मिळाव्या असे त्याला वाटते; आणि त्याला आनंदी करावे अशी माझी इच्छा आहे. अनंतकाल जीवनासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी ते थोडेच आहेत.” आपण विश्‍वासूपणाची कास धरली तर, यहोवाने “ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या” त्या सर्व, त्याच्यावर प्रीती करणाऱ्‍या लोकांसाठी सिद्धीस जातील.—यहोशवा २१:४५.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१९ पानांवरील चित्रं]

प्राचीन मिसरच्या जीवनपद्धतीत मनोरंजकता होती तरीही मोशाने त्याचा त्याग का केला?

[२२०, २२१ पानांवरील चित्रं]

दावीदाने नजर हटविली नाही; ज्या परिस्थितीने त्याला व्यभिचाराप्रत नेले ती त्याने टाळली नाही

[२२२ पानांवरील चित्रं]

पोटीफरच्या बायकोच्या अनैतिक हालचालींपासून योसेफाने पळ काढला