मुख्य विषय | लवकरच भ्रष्टाचारमुक्त सरकार!
सरकारी भ्रष्टाचाराचा फैलाव
स्वतःच्या फायद्यासाठी सत्तेचा गैरवापर करणं याला सरकारी भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्टाचार ही काही नवीन गोष्ट नाही. जवळजवळ ३,५०० वर्षांपूर्वी, लाच न घेण्यासंबंधी बायबलमध्ये एक कायदा नमूद करण्यात आला होता. (निर्गम २३:८) पण, भ्रष्टाचारात केवळ लाचखोरीच येत नाही; तर लुटमार करणं, सेवा-सुविधांचा गैरफायदा घेणं, पैशाचा घोटाळा करणं किंवा जवळच्या लोकांसाठी आपल्या पदाचा गैरवापर करणं या गोष्टीही येतात.
तसं बघितलं तर समाजाच्या सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार पाहायला मिळतो; पण सरकारी क्षेत्र हे भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे असं म्हटलं जातं. जागतिक भ्रष्टाचाराची नोंद ठेवणाऱ्या ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनल संस्थेनं २०१३ मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यानुसार राजकीय पक्ष, पोलीस, सरकारी अधिकारी, कायदा आणि न्याय-व्यवस्था सगळ्यात भ्रष्ट आहेत असं जगभरातल्या लोकांचं मत आहे. ही समस्या किती मोठी आहे हे पुढील अहवालांवरून लक्षात येतं.
-
आफ्रिका: २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत, जवळजवळ २२,००० सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
-
दक्षिण अमेरिका: ब्राझीलमध्ये २०१२ साली, राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी जनतेचा पैसा वापरल्याच्या गुन्ह्याखाली २५ लोकांना दोषी ठरवण्यात आलं. दोषींपैकी एक जण, माजी अध्यक्षाच्या खालोखाल असलेला प्रमुख अधिकारी होता.
-
आशिया: १९९५ मध्ये दक्षिण कोरियाच्या सोल या राजधानी शहरात एक मोठा मॉल कोसळून पडल्यामुळं ५०२ लोकांचा मृत्यू झाला. चौकशी केल्यावर समजलं, की या इमारतीच्या बांधकामात हलक्या दर्जाचं सिमेंट वापरण्यासाठी आणि सुरक्षेचे नियम मोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्यात आले होते.
-
युरोप: युरोपियन कमिशन होम अफेर्सच्या कमिशनर, सिसीलिया मामस्ट्रॉम यांच्या मते, “या समस्येचं [युरोपातल्या भ्रष्टाचाराचं] प्रमाण अतिशय धक्कादायक आहे.” त्यांनी पुढं असंही म्हटलं, की, “भ्रष्टाचार मुळापासून काढून टाकण्याच्या दृष्टीनं राजकीय वर्तुळात गांभीर्यानं विचार झालेलाच दिसत नाही.”
सरकारी भ्रष्टाचाराची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. भ्रष्टाचारविरोधी तज्ज्ञ आणि प्राध्यापक सूझन रोझ-अॅकरमन यांनी म्हटलं, की यात परिवर्तन करायचं असेल तर “मुळात सरकारच्या काम करण्याच्या पद्धतींतच बदल झाला पाहिजे.” भ्रष्टाचाराचा फैलाव रोखणं अशक्य वाटत असलं, तरी ते शक्य आहे आणि ते निश्चितच होईल असं आश्वासन बायबल देतं. (w15-E 01/01)

