यहोवाचे खरे उपासक अनीतीपासून दूर राहतात
“जो कोणी प्रभूचे [“यहोवाचे,” NW] नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.” —२ तीम. २:१९.
१. आपल्या उपासनेत कोणत्या गोष्टीला खूप महत्त्वाचे स्थान आहे?
तुम्ही कधी एखाद्या इमारतीवर किंवा संग्रहालयातील एखाद्या वस्तूवर यहोवाचे नाव लिहिलेले पाहिले आहे का? ते पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच खूप आनंद झाला असेल. कारण देवाच्या नावाचे आपल्या उपासनेत खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपण यहोवाचे साक्षीदार आहोत! जगभरात आपल्याशिवाय दुसरा कोणताही असा गट नाही ज्याचा यहोवाच्या नावाशी इतका जवळचा संबंध आहे. असे असले तरी, आपल्याला माहीत आहे की यहोवाच्या नावाने ओळखले जाण्याच्या बहुमानासोबतच आपल्यावर जबाबदारीही येते.
२. यहोवाच्या नावाने ओळखले जाण्याच्या बहुमानासोबतच आपल्यावर कोणती जबाबदारी येते?
२ यहोवाची कृपापसंती मिळवण्यासाठी फक्त त्याच्या नावाचा वापर करणेच पुरेसे नाही. तर, आपण त्याच्या नैतिक स्तरांनुसार जीवन जगणेही महत्त्वाचे आहे. म्हणूनच बायबलमध्ये यहोवाच्या लोकांना, “वाइटापासून दूर जा” असे सांगण्यात आले आहे. (स्तो. ३४:१४, पं.र.भा.) प्रेषित पौलानेही याबद्दल अगदी स्पष्टपणे सांगितले. त्याने लिहिले: “जो कोणी प्रभूचे [“यहोवाचे,” NW] नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.” (२ तीमथ्य २:१९ वाचा.) यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण त्याच्या नावाचा उपयोग तर करतो; पण, आपण अनीतीपासून दूर कसे राहू शकतो?
वाइटाचा धिक्कार करा
३, ४. बऱ्याच काळापासून बायबलचे अनेक विद्वान कोणत्या वचनाबद्दल गोंधळात आहेत, आणि का?
३ पौलाने २ तीमथ्य २:१९ मध्ये जे म्हटले त्याच्या पार्श्वभूमीकडे लक्ष द्या. या वचनात तो “देवाने घातलेला स्थिर पाया” आणि त्यावर लिहिण्यात आलेल्या दोन गोष्टींचा उल्लेख करतो. पहिली गोष्ट ही, की यहोवा “आपले जे आहेत त्यांना ओळखतो.” त्याने या ठिकाणी गणना १६:५ मधील शब्द नमूद केले आहेत. (याआधीचा लेख पाहा.) दुसरी गोष्ट ही, की “जो कोणी प्रभूचे [“यहोवाचे,” NW] नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.” हे शब्द त्याने नेमक्या कोणत्या वचनातून घेतले आहेत याबद्दल अनेक बायबल विद्वान बऱ्याच काळापासून गोंधळात आहेत. असे का?
४ पौलाने जे म्हटले त्यावरून असे वाटते की त्याने दुसऱ्या एखाद्या वचनातील शब्दांचा या ठिकाणी उपयोग केला. पण, पौलाच्या शब्दांशी जुळणारे एकही शास्त्रवचन इब्री शास्त्रवचनांत आढळत नाही. तर मग, जेव्हा पौलाने म्हटले, की “जो कोणी प्रभूचे [“यहोवाचे,” NW] नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे” तेव्हा तो कशाविषयी सांगत होता? वरील विधान करण्यापूर्वी त्याने गणना याच्या १६ व्या अध्यायातील शब्दांचा उपयोग केला होता. या अध्यायात कोरहच्या बंडाळीबद्दलचा अहवाल आहे. तर मग, देवाच्या सेवकांनी “अनीतीपासून दूर राहावे” या विधानाचाही संबंध या बंडाळीच्या वेळी घडलेल्या घटनांशी असू शकतो का?
५-७. २ तीमथ्य २:१९ यातील शब्द लिहिताना पौल मोशेच्या काळातील कोणत्या घटनांविषयी सांगत होता? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)
५ बायबलमध्ये असे म्हणण्यात आले आहे की अलीयाबाचे पुत्र दाथान आणि अबीराम यांनी कोरहसोबत मिळून मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध बंडाळी करण्यात पुढाकार घेतला. (गण. १६:१-५) त्यांनी सर्वांसमोर मोशेचा अपमान केला आणि देवाने त्याला जो अधिकार दिला होता त्यालाही त्यांनी नाकारले. हे बंडखोर लोक अद्यापही देवाच्या लोकांसोबतच राहत होते आणि यामुळे देवाच्या विश्वासू सेवकांना आध्यात्मिक रीत्या धोका होता. पण, जेव्हा देवाच्या एकनिष्ठ उपासकांना आणि या बंडखोरांना वेगळे करण्याची वेळ आली तेव्हा देवाने एक स्पष्ट आज्ञा दिली.
६ अहवालात पुढे असे म्हटले आहे: “मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मंडळीला सांग की, तुम्ही कोरह, दाथान व अबीराम यांच्या निवासस्थानापासून निघून जा. तेव्हा मोशे उठून दाथान व अबीराम यांच्याकडे गेला आणि इस्राएल लोकांचे वडील त्याच्या पाठोपाठ गेले. तो मंडळीला म्हणाला, तुम्ही या दुष्ट मनुष्यांच्या तंबूंपासून निघून जा बरे. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका; नाही तर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल. मग ते कोरह, दाथान व अबीराम यांच्या डेऱ्यांजवळून निघून गेले.” (गण. १६:२३-२७) त्यानंतर यहोवाने त्या सर्व बंडखोरांचा नाश केला. पण, त्याचे एकनिष्ठ उपासक, ज्यांनी तेथून निघून जाण्याद्वारे अनीतीचा धिक्कार केला अशांना मात्र त्याने जिवंत ठेवले.
७ यहोवा हृदय पारखतो! त्यामुळे, त्याचे एकनिष्ठ उपासक कोण आहेत हे तो ओळखू शकतो. असे असले तरी, त्या एकनिष्ठ उपासकांनी ठोस पाऊल उचलण्याची गरज होती. त्यांनी अनीतीमान जनांपासून स्वतःला वेगळे करायचे होते. यावरून असे दिसते की “जो कोणी प्रभूचे [“यहोवाचे,” NW] नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे” असे म्हणताना पौल कदाचित गणना १६:५, २३-२७ यातील अहवालाविषयीच बोलत असावा. पौलाचे हे शब्द त्याने आधी जे म्हटले होते अर्थात, यहोवा “आपले जे आहेत त्यांना ओळखतो” या विधानाशी जुळतात.—२ तीम. २:१९.
“मूर्खपणाच्या व आज्ञानाच्या वादविषयांपासून दूर राहा”
८. यहोवाच्या नावाचा उपयोग करणे किंवा ख्रिस्ती मंडळीचा भाग असणे पुरेसे का नाही?
८ मोशेच्या काळातील घटनांबद्दल सांगून पौल तीमथ्याला याची आठवण करून देत होता, की जर त्याला यहोवासोबतचा त्याचा बहुमूल्य नातेसंबंध टिकवून ठेवायचा असेल तर त्याने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. ज्या प्रकारे मोशेच्या काळात यहोवाचे नाव घेणेच पुरेसे नव्हते, त्याच प्रकारे ख्रिस्ती मंडळीचा भाग असणेच पुरेसे नाही असे पौल सांगू इच्छित होता. विश्वासू उपासकांनी “अनीतीपासून दूर” राहण्याकरता ठोस पावले उचललीच पाहिजेत. यासाठी तीमथ्याला नेमके काय करण्याची गरज होती? आज यहोवाचे लोक पौलाच्या ईश्वरप्रेरित सल्ल्यापासून काय शिकू शकतात?
९. “मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या” वादविवादांमुळे पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीवर कसा परिणाम झाला?
९ ख्रिश्चनांनी कशा प्रकारच्या अनीतीपासून दूर राहिले पाहिजे याबद्दल देवाच्या वचनात काही खास मार्गदर्शन देण्यात आले आहे. उदाहरणार्थ, २ तीमथ्य २:१९ च्या आधीच्या आणि नंतरच्या काही वचनांत, पौलाने तीमथ्याला “शब्दयुद्ध” आणि “रिकाम्या वटवटीपासून” दूर राहण्याचा सल्ला दिला. (२ तीमथ्य २:१४, १६, २३ वाचा.) मंडळीतील काही लोक धर्मत्यागी शिकवणी पसरवत होते. त्यासोबतच, काही लोक असे विचार मांडत होते ज्यांमुळे वादविवाद घडण्याची संभावना होती. हे विचार शास्त्रवचनांच्या पूर्णपणे विरोधात नसले, तरी त्यांमुळे मंडळीची एकता भंग होत होती. या विचारांमुळे वादविवाद आणि शब्दांवरून भांडणे होऊ लागली, ज्यामुळे मंडळीतील आध्यात्मिक वातावरण बिघडले. म्हणूनच पौलाने तीमथ्याला, “मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविषयांपासून दूर” राहण्याचे आर्जवले.
१०. आपला जेव्हा धर्मत्यागी शिकवणींशी संपर्क येतो तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असली पाहिजे?
१० आज यहोवाचे लोक मंडळीमध्ये धर्मत्यागी शिकवणींच्या संपर्कात येतील याची शक्यता खूपच कमी आहे. असे असले तरी, जेव्हाही शास्त्रवचनांच्या विरोधात असलेल्या शिकवणींशी आपला संपर्क येतो, तेव्हा आपण त्या लगेच झिडकारल्या पाहिजेत, मग त्या कोणीही पसरवत असले तरीही. धर्मत्यागी व्यक्तींशी वैयक्तिक रीत्या वादविवाद करणे, इंटरनेटवरील त्यांच्या ब्लॉग्जद्वारे किंवा इतर कोणत्याही मार्गांनी त्यांच्याशी चर्चा करणे मूर्खपणाचे ठरेल. आपण जरी त्यांना मदत करण्याच्या हेतूने त्यांच्याशी चर्चा केली, तरी ते चुकीचे आहे. कारण असे करण्याद्वारे आताच आपण शास्त्रवचनांतील ज्या मार्गदर्शनाबद्दल पाहिले त्याच्या विरोधात काम करत असू. याऐवजी, यहोवाचे लोक यानात्याने आपण धर्मत्यागाचा पूर्णपणे विरोध करतो आणि त्यापासून दूर राहतो.
धर्मत्यागी लोकांसोबत वादविवाद करण्याचे टाळा (परिच्छेद १० पाहा)
११. कशामुळे मूर्खपणाचे वादविवाद होऊ शकतात, आणि ख्रिस्ती वडील कशा प्रकारे चांगले उदाहरण ठेवू शकतात?
११ धर्मत्यागाशिवाय अशा आणखी काही गोष्टी आहेत ज्यांमुळे मंडळीतील शांतीचे वातावरण बिघडू शकते. उदाहरणार्थ, मनोरंजनाच्या बाबतींत वेगवेगळी मते असल्यामुळे मूर्खपणाचे व अज्ञानाचे वादविवाद होऊ शकतात. पण, जेव्हा एखादी व्यक्ती देवाच्या नैतिक स्तरांच्या विरोधात असलेले मनोरंजन करण्यास इतरांना प्रोत्साहन देते, तेव्हा ख्रिस्ती वडिलांनी फक्त वादविवाद टाळण्यासाठी असे वर्तन खपवून घेऊ नये. (स्तो. ११:५; इफिस. ५:३-५) अर्थात, ख्रिस्ती वडील आपले स्वतःचे विचार इतरांवर लादत नाहीत. ते शास्त्रवचनांत ख्रिस्ती वडिलांना दिलेल्या या सल्ल्याचे पूर्णपणे पालन करतात: “तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा, . . . लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा.”—१ पेत्र ५:२, ३; २ करिंथकर १:२४ वाचा.
१२, १३. (क) मनोरंजनाच्या बाबतीत यहोवाच्या साक्षीदारांची काय भूमिका आहे, आणि ते कोणती बायबल तत्त्वे लागू करतात? (ख) परिच्छेद १२ मध्ये ज्या तत्त्वांची चर्चा करण्यात आली आहे ती इतर वैयक्तिक गोष्टींबाबत कशी लागू होतात?
१२ आपण कोणकोणते चित्रपट, व्हिडिओ गेम्स, पुस्तके किंवा गाणी निवडावीत हे देवाची संघटना आपल्याला सांगत नाही. असे का? कारण बायबलमध्ये असे उत्तेजन देण्यात आले आहे की प्रत्येकाने आपल्या “ज्ञानेंद्रियांना . . . चांगले आणि वाईट” यांत भेद करण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. (इब्री ५:१४) शास्त्रवचनांत काही मूलभूत तत्त्वे देण्यात आली आहेत ज्यांच्या आधारे आपण योग्य मनोरंजनाची निवड करू शकतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कोणतीही निवड करताना “प्रभूला काय संतोषकारक आहे” याचे परीक्षण करण्याचा आपण निर्धार केला पाहिजे. (इफिस. ५:१०) बायबल शिकवते की कुटुंबप्रमुखाला त्याच्या कुटुंबावर अधिकार देण्यात आला आहे, त्यामुळे आपल्या कुटुंबाने कोणते मनोरंजन टाळावे हे तो ठरवू शकतो.—१ करिंथ. ११:३; इफिस. ६:१-४.
१३ आपण ज्या बायबल तत्त्वांवर चर्चा केली ती फक्त मनोरंजनाच्या बाबतीतच लागू होत नाहीत. पेहराव, केशभूषा, आरोग्य, आहार आणि इतर वैयक्तिक बाबींबद्दल वेगवेगळी मते असल्यामुळेही वादविवाद होऊ शकतात. म्हणून, जेव्हा शास्त्रवचनांतील कोणत्याही तत्त्वाचे उल्लंघन होत नाही तेव्हा यहोवाचे लोक वादविवाद करण्याचे समजूतदारपणे टाळतात. कारण, “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य” असावे हे ते लक्षात ठेवतात.—२ तीम. २:२४.
वाईट संगत टाळा!
१४. वाईट संगती टाळण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी पौलाने कोणत्या उदाहरणाचा वापर केला?
१४ यहोवाचे खरे उपासक आणखी कोणत्या मार्गाने “अनीतीपासून दूर” राहू शकतात? ते अनीतीने वागणाऱ्या लोकांशी जवळची मैत्री करत नाहीत. “देवाने घातलेला स्थिर पाया” या उदाहरणाचा वापर केल्यानंतर पौलाने आणखी एका उदाहरणाचा वापर केला याकडे लक्ष द्या. त्याने लिहिले: “मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात; त्यांपैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो.” (२ तीम. २:२०, २१) हे उदाहरण देऊन पौलाने ख्रिश्चनांना सांगितले की “हलक्या कार्यासाठी” वापरल्या जाणाऱ्या ‘पात्रांपासून’ त्यांनी दूर राहावे.
१५, १६. पौलाने ‘मोठ्या घराबद्दल’ जे उदाहरण दिले त्यावरून आपण काय शिकू शकतो?
१५ पौलाने दिलेल्या या उदाहरणाचा काय अर्थ होतो? या ठिकाणी पौलाने ख्रिस्ती मंडळीची तुलना एका ‘मोठ्या घराशी’ आणि मंडळीतील सदस्यांची तुलना ‘पात्रांशी’ किंवा घरातील भांड्यांशी केली. घरात असलेली काही भांडी कदाचित अस्वच्छ किंवा एखाद्या विषारी पदार्थामुळे दूषित होऊ शकतात. अशा वेळी घरमालक त्या भांड्यांना चांगल्या भांड्यांपासून, खासकरून ज्यांत स्वयंपाक करतात अशा भांड्यांपासून वेगळे ठेवेल.
१६ त्याचप्रमाणे आज मंडळीत अशा काही व्यक्ती असू शकतात ज्या वारंवार यहोवाच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात. तेव्हा, यहोवाचे जे सेवक त्याच्या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी मंडळीतील अशा व्यक्तींशी जवळचा नातेसंबंध जोडण्याचे टाळले पाहिजे. (१ करिंथकर १५:३३ वाचा.) जर मंडळीच्या आत असलेल्या काहींसोबत जवळची मैत्री करण्याचे आपण टाळले पाहिजे, तर मग मंडळीच्या बाहेर असलेल्या लोकांपासून दूर राहण्याचा आपण जास्त प्रयत्न करू नये का? कारण यांपैकी बरेच जण धनलोभी, आईबापास न मानणारे, अप्रामाणिक, चहाडखोर, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारे, विश्वासघातकी आणि देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारे असे आहेत.—२ तीम. ३:१-५.
तत्परतेने पाऊल उचलल्यास यहोवा आशीर्वाद देतो
१७. एकनिष्ठ इस्राएली लोकांनी कशा प्रकारे अनीतीच्या विरोधात ठोस पाऊल उचलले?
१७ इस्राएली लोकांना जेव्हा, “कोरह, दाथान व अबीराम यांच्या निवासस्थानापासून निघून जा” असे सांगण्यात आले तेव्हा त्यांनी कशा प्रकारे तत्परतेने पाऊल उचलले त्याबद्दल बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. अहवालात असे सांगितले आहे की ते “बाहेर निघाले.” मूळ भाषेत या ठिकाणी ते तेथून लगेच बाहेर निघाले असे म्हणण्यात आले आहे. (गण. १६:२४, २७) त्यांनी मागेपुढे पाहिले नाही अथवा उशीरही लावला नाही. तसेच, त्यांनी पूर्णपणे आज्ञांचे पालन केले हेही शास्त्रवचनात सांगितले आहे. त्यात म्हटले आहे की ते “चहूकडून . . . उठून गेले.” (पं.र.भा.) देवाच्या एकनिष्ठ उपासकांना आपला जीव धोक्यात घालायचा नव्हता. ते पूर्णार्थाने देवाला एकनिष्ठ होते. त्यांनी यहोवाच्या बाजूने आणि अनीतीच्या विरोधात ठोस पाऊल उचलले. आपण या उदाहरणावरून काय शिकू शकतो?
१८. पौलाने तीमथ्याला “तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ” अशी ताकीद का दिली?
१८ यहोवासोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येतो तेव्हा तो टिकवून ठेवण्यासाठी आपण तत्परतेने ठोस पावले उचलली पाहिजेत. जेव्हा पौलाने तीमथ्याला “तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ” अशी ताकीद दिली तेव्हा तो त्याला अशीच तत्परता दाखवण्यास सांगत होता. (२ तीम. २:२२) पौलाने जेव्हा ही ताकीद दिली तेव्हा तीमथ्य अगदीच तरुण नव्हता, तर तो कदाचित तिशीत असावा. पण, तरुणपणाच्या वासनांचा मोह हा प्रौढांसमोरही येऊ शकतो. म्हणून, तीमथ्यासमोर अशा वासना आल्यास त्याने त्यांपासून लगेच “पळ” काढायचा होता. दुसऱ्या शब्दांत तीमथ्याने अनीतीचा धिक्कार करण्याची गरज होती. येशूनेही असाच सल्ला दिला, त्याने म्हटले: “तुझा डोळा तुला अडखळवत असेल तर तो उपटून फेकून दे.” (मत्त. १८:९) आज जे खरे ख्रिस्ती हा सल्ला मनापासून पाळतात ते आध्यात्मिक धोक्यांना तोंड देताना मागेपुढे पाहत नाहीत, तर तत्परतेने ठोस पावले उचलतात.
१९. काहींनी स्वतःला आध्यात्मिक धोक्यांपासून वाचवण्याकरता कोणती ठोस पावले उचलली आहेत?
१९ सत्यात येण्यापूर्वी ज्या बांधवांना अतिमद्यपान करण्याची सवय होती त्यांपैकी काहींनी सत्यात आल्यानंतर मद्यपान पूर्णपणे बंद करण्याची निवड केली आहे. काही जण असे मनोरंजन टाळतात जे मुळात चुकीचे नाही, पण यामुळे चुकीच्या इच्छांना खतपाणी मिळू शकते. (स्तो. १०१:३) उदाहरणार्थ, साक्षीदार बनण्यापूर्वी एका बांधवाला अनैतिक वातावरण असलेल्या डान्स पार्ट्यांमध्ये जायला आवडायचे. पण, सत्य शिकल्यानंतर त्याने डान्स करण्याचे पूर्णपणे बंद केले, मग तो साक्षीदारांनी आयोजित केलेला एखादा समारंभ असला तरीही. कारण त्याला याची भीती होती की यामुळे त्याच्या मनात पूर्वीच्या वाईट इच्छा व विचार पुन्हा जागृत होतील. हे खरे आहे की ख्रिश्चनांनी पूर्णपणे मद्यापासून दूर राहावे किंवा कोणत्याही प्रकारचे डान्स करू नये असा काही नियम नाही. कारण, काही गोष्टी मुळात चुकीच्या नसतात. पण, आपल्या प्रत्येकाकडून ही अपेक्षा केली जाते की स्वतःला आध्यात्मिक धोक्यांपासून वाचवण्याकरता आपण तत्परतेने ठोस पावले उचलली पाहिजेत.
२०. “अनीतीपासून दूर” राहणे नेहमीच सोपे नसले तरीही आपल्याला सांत्वन का मिळते, आणि आपण कशाबद्दल भरवसा बाळगू शकतो?
२० यहोवाच्या नावाने ओळखले जाण्याच्या बहुमानासोबतच आपल्यावर जबाबदारीही येते. आपण “अनीतीपासून दूर” राहिले पाहिजे आणि “वाइटाचा त्याग” केला पाहिजे. (स्तो. ३४:१४) हे खरे आहे की असे करणे नेहमीच सोपे नसते. पण, जे यहोवाचे खरे उपासक आहेत आणि जे त्याच्या नीतिमान तत्त्वांनुसार जगतात त्यांच्यावर तो नेहमी प्रेम करत राहील. हे जाणून आपल्याला किती सांत्वन मिळते!—२ तीम. २:१९; २ इतिहास १६:९क वाचा.