युद्धांची आणि संघर्षांची आपल्या सगळ्यांनाच झळ कशी बसते?

युद्धांची आणि संघर्षांची आपल्या सगळ्यांनाच झळ कशी बसते?

“दुसऱ्‍या महायुद्धानंतर आज जगात युद्ध आणि हिंसक संघर्षांचं प्रमाण सगळ्या जास्त बघायला मिळतं. त्यामुळे २०० कोटी लोक, म्हणजे जगातला प्रत्येक ४ पैकी १ माणूस हा युद्धग्रस्त क्षेत्रात राहतोय.”

संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या उपमहासचिव अमीना जे. मोहंमद, २६ जानेवारी २०२३.

आज जिथे शांती आहे तिथेसुद्धा अचानक युद्धं आणि हिंसक संघर्ष सुरू होऊ शकतात आणि याचे दूर असलेल्या देशांवरसुद्धा परिणाम होतात. कारण जगातले देश आज एकमेकांवर पूर्वीपेक्षा जास्त अवलंबून आहेत. शिवाय, युद्धामुळे झालेले परिणाम युद्ध संपल्यावरसुद्धा बराच काळ राहतात. याची काही उदाहरणं घ्या.

  • अन्‍नटंचाई. वर्ल्ड फूड प्रोग्रामनुसार “आजसुद्धा जागतिक उपासमारीचं सगळ्यात मोठ्ठं कारण युद्धच आहे. जगभरात उपासमारीचा सामना करणाऱ्‍यांपैकी ७० टक्के लोक आज युद्धग्रस्त भागातच राहतात.”

  • शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या. युद्धाचा धोका आणि त्यामुळे निर्माण होणारं असुरक्षित वातावरण यांमुळे लोकांना खूप चिंतेचा आणि तणावाचा सामना करावा लागतो. आणि भरीत भर म्हणजे, बऱ्‍याच वेळा अशा ठिकाणी वैद्यकीय सेवांचाही तुटवडा असतो. जे लोक अशा संघर्षग्रस्त भागांत राहतात त्यांना फक्‍त शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्याच्या समस्यांनाही तोंड द्यावं लागू शकतं.

  • नाइलाजाने करावं लागणारं स्थलांतर. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांसाठी असलेल्या उच्चायुक्‍तांनी सांगितल्यानुसार सप्टेंबर २०२३ पर्यंत ११ कोटी ४० लाखांपेक्षा जास्त लोकांना आपलं घरदार सोडून इतर ठिकाणी आश्रय घ्यावा लागलाय. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे युद्ध आणि हिंसक संघर्ष.

  • आर्थिक टंचाई. बऱ्‍याच वेळा युद्धामुळे निर्माण झालेल्या महागाईसारख्या आर्थिक समस्यांचा लोकांना सामना करावा लागतो. आणि खासकरून आरोग्य सेवा आणि शिक्षणासाठी राखून ठेवलेला निधी जेव्हा सरकारं लष्करी कारणांसाठी वापरतात, तेव्हा लोकांना याची जास्त झळ बसू शकते. शिवाय युद्धामुळे झालेलं नुकसान भरून काढायचा खर्चसुद्दा खूप प्रचंड असतो.

  • पर्यावरणाच्या समस्या. लोक ज्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असतात, तीच जेव्हा नष्ट केली जाते तेव्हा लोकांच्या जीवनावर त्याचा खूप खोलवर परिणाम होत असतो. प्रदूषित पाणी, हवा आणि जमिनीमुळे दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय, जमिनीत पेरलेल्या भूसुरुंगांचा धोका युद्धानंतरसुद्धा बराच काळ राहतो.

यावरून दिसून येतं, की युद्धामुळे खूप नुकसान होतं आणि त्याची मोठी किंमतही मोजावी लागते.