कुटुंबासाठी मदत | वैवाहिक जीवन
लग्नाआधी एकत्र राहणं योग्य आहे का?
बरीच जोडपी लग्नाआधी एकत्र राहायची निवड करतात. काहींना वाटतं, की असं केल्यामुळे आपण एकमेकांसाठी योग्य आहोत की नाही हे समजेल. तसंच, काहींना वाटतं की यामुळे पुढे संसार करणं आपल्याला सोपं जाईल. पण लग्नाआधी एकत्र राहणं खरंच योग्य आहे का?
या लेखात
बायबल याबद्दल काय म्हणतं?
बायबलमध्ये म्हटलंय, की फक्त लग्न झालेल्या जोडप्यांमध्येच शारीरिक संबंध असले पाहिजेत. बायबलमध्ये असंही लिहिलंय, ‘अनैतिक लैंगिक कृत्यांपासून स्वतःला दूर ठेवा.’ (१ थेस्सलनीकाकर ४:३; १ करिंथकर ६:१८) लग्नाआधी एकत्र राहणाऱ्या जोडप्यांमधले शारीरिक संबंधही अनैतिक लैंगिक कृत्यांमध्येच मोडतात. a पण जोडप्यांनी बायबलची तत्त्वं पाळली, तर लग्नाआधी गर्भधारणा होण्यापासून आणि इतर वाईट परिणामांपासून ते वाचू शकतात.
देवानेच विवाहाची व्यवस्था घालून दिली आहे. असं करताना त्याने म्हटलं होतं: “माणूस आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायकोसोबत राहील आणि ते दोघं एकदेह होतील.” (उत्पत्ती २:२४) लग्नाच्या वेळी स्त्री-पुरुष एकमेकांना जडून राहायचं वचन देतात. त्यामुळे त्यांच्या विवाहाला एक भक्कम पाया मिळतो आणि त्यांच्या कुटुंबात प्रेमही टिकून राहतं.
एकत्र राहिल्यामुळे तुम्ही लग्नासाठी तयार होऊ शकता का?
काही जण हो म्हणतात. त्यांना वाटतं, की घरातली कामं वाटून घेतल्यामुळे आणि एकमेकांच्या सवयी जाणून घेतल्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो. पण खरंतर एकमेकांना कायम सोबत राहायचं वचन दिल्यामुळेच लग्न यशस्वी होऊ शकतं.
चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात जोडपी एकमेकांना जडून कशी राहू शकतात? लग्नाआधी एकत्र राहून असं करणं तर मुळीच शक्य नाही. कारण जी जोडपी लग्नाआधी एकत्र राहतात ती एकमेकांना कधीही सोडून जाऊ शकतात. पण जी जोडपी एकमेकांना कायम सोबत राहायचं वचन देतात आणि समस्यांचा सोबत मिळून सामना करतात त्यांचं नातं टिकून राहतं.
थोडक्यात: जी जोडपी लग्नाआधी एकत्र राहतात, ती लग्नासाठी तयार होण्याऐवजी एकमेकांपासून दूर जाण्यासाठी तयार होत असतात.
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “एखादा माणूस जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.”—गलतीकर ६:७.
एकत्र राहिल्यामुळे तुम्हाला पैसे वाचवता येतील का?
काही जण हो म्हणतात. एका सर्व्हेमध्ये असं दिसून आलं, की अमेरिकेत दहापैकी चार जोडपी पैसे वाचवण्याच्या हेतूने एकमेकांसोबत राहत होती. पण, काही काळ एकत्र राहिल्यानंतर बऱ्याच जोडप्यांनी म्हटलं, की पुरेसे पैसे नसल्यामुळे ते लग्नासाठी अजूनही तयार नाहीत.
लग्नाआधी एकत्र राहिल्यामुळे इतरही समस्या येऊ शकतात. खासकरून स्त्रियांना. जसं की, वेगळं झाल्यानंतर बऱ्याचदा स्त्रियांनाच मुलांची जबाबदारी घ्यावी लागते.
थोडक्यात: लग्नाआधी एकत्र राहण्याच्या फायद्यांपेक्षा तोटेच जास्त असतात.
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “मी यहोवा तुझा देव आहे. मी तुला तुझ्या भल्यासाठी शिकवतो”—यशया ४८:१७.
एकत्र राहिल्यामुळे चुकीच्या व्यक्तीशी लग्न करायचा धोका टाळता येईल का?
काही जण हो म्हणतात. पण फायटिंग फॉर यॉर मॅरेज या पुस्तकात असं म्हटलंय: “लग्नाआधी एकत्र राहणाऱ्या जोडप्यांच्या लक्षात येत नाही, की एकत्र राहिल्यामुळे त्यांना एकमेकांपासून वेगळं होणं खूप कठीण जातं.” असं का म्हणता येईल? आपण एकमेकांसाठी योग्य नाही असं काही जोडप्यांच्या लक्षात येतं. पण तरी काही गोष्टींमध्ये एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्यांना एकमेकांसोबतच राहावं लागतं. जसं की, त्यांनी एकत्र मिळून भाड्याचं घर घेतलं असेल, त्यांच्या पाळीव प्राण्याची ते सोबत मिळून काळजी घेत असतील किंवा मग नको असलेल्या गर्भधारणेमुळे ते अडकले असतील. तज्ज्ञांना असं दिसून आलंय, की काही जण फक्त एकमेकांची सवय झाल्यामुळे एकमेकांसोबत राहतात; मग एकमेकांपासून वेगळं होणं त्यांच्यासाठी चांगलं असलं तरीही. b फायटिंग फॉर यॉर मॅरेज या पुस्तकात असंही म्हटलंय: “वेगळं होण्याची इच्छा असूनही काही जोडप्यांनी लग्न केलं. कारण लग्न करणं हाच सोपा उपाय आहे असं त्यांना वाटलं.”
थोडक्यात: एकत्र राहिल्यामुळे योग्य निर्णय तर घेता येत नाही, उलट नको असलेलं नातं संपवणंही कठीण जातं.
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “शहाणा धोका पाहून लपतो, पण भोळा पुढे जातो आणि परिणाम भोगतो.”—नीतिवचनं २२:३.
यापेक्षा चांगला पर्याय आहे का?
लग्नाआधी एकत्र राहिल्यामुळे येणारे धोके तुम्ही टाळू शकता आणि तुमचा विवाह यशस्वी बनवू शकता. तुम्हाला हे कसं करता येईल? बायबलमध्ये असलेली विवाहाबद्दलची तत्त्वं पाळून. म्हणून लग्नाआधीच जोडीदाराला जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या. फक्त शारीरिक आकर्षणाच्या आधारावर नाही, तर सारखे स्तर आणि विश्वास यांच्या आधारावर जोडीदार निवडणं केव्हाही चांगलं असतं.
बायबलमधला सल्ला लागू केल्यामुळे तुमचा विवाह आनंदी होऊ शकतो आणि तो टिकूनही राहू शकतो. c उदाहरणार्थ, बायबलमधल्या तत्त्वांमुळे तुम्ही . . .
विश्वासघात करण्यापासून दूर राहू शकता
चांगला जोडीदार बनण्यासाठी लागणारे गुण वाढवू शकता
या विषयाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी, jw.org वरचा “वैवाहिक जीवन आणि कुटुंब” हा भाग पाहा.
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं असून ते शिकवण्यासाठी, . . . उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६.
b हा संदर्भ फॅमेली रिलेशन्स् या जर्नलमधल्या स्कॉट एम. स्टॅन्ली, गॅलेना क्लाइन रोड्स आणि हॉवर्ड जे. मार्कमन यांच्या “स्लायडिंग व्हर्सेस डिसायडिंग: इनर्शिया अँड द प्रीमॅरिटल कोहॅबिटेशन इफेक्ट” या लेखातून घेण्यात आला आहे.
c काही संस्कृतींमध्ये आईवडील आपल्या मुलांना लग्नासाठी जोडीदार निवडायला मदत करतात. अशा आईवडिलांनी मुलांच्या जोडीदारामध्ये कोणते गुण पाहिले पाहिजेत हे समजायलाही बायबल त्यांना मदत करू शकतं.

